तख्तासाठी सख्ख्या भावाचा क्रूर अंत!
३० ऑगस्ट १६५९... (भाद्रपद वद्य अष्टमी, शके १५८१, संवत्सर विकारी नाम)! 

हा इतिहास आहे दिल्लीच्या तख्तासाठी लढल्या गेलेल्या एका अशा वारसाहक्क युद्धाचा, ज्याने मुघल साम्राज्याची दिशा आणि विचारसरणी कायमची बदलून टाकली. मुघल सम्राट शाहजहान आजारी पडल्यानंतर त्याचे चार मुलगे— दारा शिकोह, शुजा, औरंगजेब आणि मुराद बख्श यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. या संघर्षात शाहजहानचा लाडका आणि थोरला मुलगा दारा शिकोह याचा झालेला पराभव आणि अंत जागतिक इतिहासातील अत्यंत नाट्यमय व क्रूर घटना मानली जाते. 
दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्यात झालेल्या निर्णायक लढाईत सुरुवातीला दाराचे पारडे जड होते. औरंगजेबाने पराभव टाळण्यासाठी आपल्या हत्तीचे पाय साखळ्यांनी बांधून लढण्याचा निर्धार केला होता.
परंतु, याच वेळी खलीलउल्लाह खान याने दाराला सल्ला दिला की, "आपण जिंकत आलो आहोत, उंचावर बसून स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार व्हा." दाराने हा सल्ला मानला आणि तो हत्तीवरून उतरला. हत्तीवरील हौदा रिकामा दिसताच सैन्यात "दारा मारला गेला किंवा पळून गेला" अशी अफवा पसरली. यामुळे सैनिकांचे धैर्य खचले आणि काही क्षणांत औरंगजेबाने बाजी पलटवून विजय मिळवला! 

लढाईत पराभूत झाल्यानंतर दारा लपतछपत आग्रा, पंजाब आणि पुढे अफगाणिस्तानच्या दिशेने गेला. तिथे मलिक जीवन याने कपटाने त्याला पकडून औरंगजेबाच्या सैन्याच्या हवाली केले. ९ जून १६५९ रोजी दाराला कैद करून दिल्लीत आणले गेले.
२९ ऑगस्ट १६५९ रोजी फ्रेंच इतिहासकार फ्राँसुआ बर्नियर यांच्या नोंदीनुसार, दारा आणि त्याचा १४ वर्षांचा मुलगा सिफीर शिकोह यांना फाटक्या कपड्यांमध्ये छप्पर नसलेल्या हत्तिणीवर बसवून दिल्लीच्या भर रस्त्यांवरून फिरवण्यात आले. एकेकाळी ज्या राजकुमाराच्या नावाची तुतारी वाजत होती, त्याला जनतेसमोर अपमानित करण्यात आले. रस्त्यावरील एका भिकाऱ्याने जेव्हा आवाज दिला, तेव्हा स्वतःकडे काहीच नसताना दाराने आपल्या खांद्यावरील शाल त्या भिकाऱ्याकडे फेकून दिली होती! 

दाराचे भवितव्य ठरवण्यासाठी औरंगजेबाने दरबारात बैठक बोलावली.
दानिसमंद खान याने दाराचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शाहिस्तेखान, मोहम्मद आमीन खान, बहादूर खान आणि राजकन्या रोशनआरा यांनी दाराला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली.
अखेर ३० ऑगस्ट १६५९ रोजी औरंगजेबाने मृत्यूचे फर्मान काढले. खिजराबादमधील महालात नजरबेग आणि त्याच्या साथीदारांनी दारा शिकोहवर हल्ला करून त्याचा शिरच्छेद केला.
इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची यांच्या 'स्टोरिया दो मोगोर' पुस्तकातील नोंदीनुसार, दाराचे शीर एका तबकात झाकून आग्र्याच्या किल्ल्यात नजरकैदेत असलेल्या वृद्ध शाहजहानकडे भेट म्हणून पाठवण्यात आले. जेव्हा शाहजहानने ते तबक उघडले, तेव्हा आपल्या लाडक्या थोरल्या पुत्राचे शीर पाहून त्याला जबर धक्का बसला. दाराचे धड हुमायूं का मकबरा परिसरात दफन करण्यात आले.

No comments:
Post a Comment