विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 March 2021

*'संभाजीकेन च भ्रात्रा ज्वलज्ज्वलनतेजसा'*

 



*'संभाजीकेन च भ्रात्रा ज्वलज्ज्वलनतेजसा'*
- केशवपंडित
*छत्रपती संभाजी महाराज यांना ज्वलज्ज्वलनतेजस ही बिरुदावली कोणी प्रदान केली ?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावासमोर जी विशेषणे किंवा बिरुदे लावली जातात त्याविषयी एक लेखमाला लिहिण्याच मागे बोललो होतो त्यातील हा पहिला लेख.
शिवरायांच्या निधनानंतर तलवार व लेखणीच्या जोरावर गाजवलेली ९ वर्षांची झंझावाती कारकीर्द.परकीयांसहित स्वकीयांचाही विरोध असताना प्रखरपणे लढतच राहिले असे संभाजी महाराज.संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्याचा डाव आणखीन तीव्र केला.झुल्फीकारखान याने रायगडाला वेढा दिला.यावेळी छत्रपतींच्या परिवारातील सर्व मंडळी रायगडावर होती.अश्या वेळी जर रायगड पडला तर सर्व कुटुंब मुघलांच्या कैदेत जाईल पण महाराणी येसूबाई यांनी अत्यंत हुशारीने छत्रपती राजाराम महाराज यांना रायगडावरून बाहेर काढून दिले व रायगड मुघलांच्या ताब्यात दिला आणि शाहुराजे यांच्यासमवेत त्या कैद झाल्या(यामध्ये शिवरायांच्या पत्नी सकवारबाई या पण कैद झाल्या).
येथुन राजाराम महाराजांचा स्वराज्य वाचवण्यासाठीचा एक खडतर असा रायगड ते जिंजी प्रवास चालु झाला.
या प्रवासाची माहिती व छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र तत्कालीन कवी व पंडित केशवभट दामोधरभट उपाध्ये यांनी १६९० साली राजारामचरितम् या संस्कृत ग्रंथात लिहिले.सध्या या ग्रंथाची हस्तलिखित प्रत तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय येथे आहे.या ग्रंथात एकुण पाच सर्ग आहेत यातील तिसऱ्या सर्गात संभाजी महाराज यांचे ज्वलज्ज्वलनतेजस असे वर्णन केलेला श्लोक.....
महाराजेन पित्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासननिषेदुषा || ५ ||
संभाजीकेन च भ्रात्रा "ज्वलज्ज्वलनतेजसा" |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषु च || ६ ||
*मराठी अर्थ - सिंहासन लालसेने महीपालांचा पाडाव करणारे त्यांचे पिता श्री शिवछत्रपती व जळजळीत ज्वलंत अश्या तेजाने चमकणारे भाऊ संभाजी यांच्यामुळे विरहित झालेले राजाराम महाराज.
१६९० सालीच केशवपंडित यांनी संभाजी महाराज यांच्यासाठी प्रदान केलेले बिरुद.यासाठी त्यांनी संभाजी महाराजांची संपुर्ण कारकीर्द अत्यंत जवळुन पाहिली असल्याने त्यांनी हे बिरूद फक्त आणि फक्त त्यांनाच प्रदान केले.समकालीन पुराव्यानुसार संभाजी महाराज यांची अशीच ज्वलज्ज्वलनतेजस प्रतिमा आपल्याला पहावयास मिळते.डॉ.सदाशिव शिवदे यांनी महाराजांवर लिहिलेल्या चरित्रग्रंथाला 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' हेच नाव दिले.
*केशवपंडित कोण होते ?
केशवपंडित यांचे पुर्ण नाव केशवभट दामोधरभट उपाध्ये.हे राहणार मुळचे कोकणातले शृंगारपूरचे.तेथे ते उपाध्याय होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुर्वे यांच्याकडून शृंगारपूर ताब्यात घेतले तेव्हा ते स्वराज्याच्या चाकरीत रुजू झाले.केशवभट, गणेशभट, कवी कलश व शिवयोगी पंडित यांनी २३ मार्च १६७८ ला संभाजी महाराजांचा कलशाभिषेक केला.यांनीच संभाजी महाराजांना काली व तुळजाभवानी देवीची उपासना करण्यास सांगितले व ते शाक्त उपासक बनले.केशवभट यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना प्रयोगरुप रामायण सांगितलेले आहे.केशवभट यांनी संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथातर्गत दंडनिती हे प्रकरण लिहिले.याशिवाय त्यांनी धर्मकल्पकता, राजारामचरितम, परभूकथा याशिवाय आणखीही काही ग्रंथाचे लिखाण केले असावे असे मत वा.सी.बेंद्रे यांनी मांडले आहे.ते स्वराज्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.
*संदर्भ साहित्य :
१) केशवपंडितकृत श्री छत्रपति राजाराम महाराज यांचे चरित्र जिंजीचा प्रवास - संपादक वासुदेव सीताराम बेंद्रे
२) परमानंदकाव्यम् - संपादक डॉ.सदाशिव शिवदे अनुवादक डॉ.स.मो.अयाचित
३) शिवपुत्र संभाजी - डॉ.सौ.कमल गोखले
४) छत्रपति संभाजी महाराज संस्कृतसाहित्य - संपादन प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम
५) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ - डॉ.जयसिंगराव पवार
६) ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे
लेखन - सुशांत संजय उदावंत
'तुळजाई'नाथापुर,बीड
दि२४/०३/२०२१

इंग्रजी मेडल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी

 


इंग्रजी मेडल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी
=========================
१४ एप्रिल २०२१ रोजी लंडनमध्ये काही नाणी आणि मेडल्सची विक्री / लिलाव होणार आहे. त्याचा कॅटलॉग चाळताना हे एक इंटरेस्टिंग मेडल पहायला मिळालं. हे मेडल आहे १६७० चं. त्यावर एका बाजूला एक डबल पोर्टेट आहे - इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि त्याची बायको कॅथरिन ऑफ ब्रिगॅंझाचं. कॅथरिनच्या वडिलांकडून - म्हणजे पोर्तुगालचा राजा चौथ्या जॉनकडून - मुंबईची बेटं चार्ल्सला लग्नात आंदण मिळाली आणि त्याने ती पुढे ‘ईस्ट इंडीया कंपनी’ला भाडेतत्वावर दिली वगैरे गोष्टी सुप्रसिध्द आहेतच. (“मुंबई माझ्या बापाची आहे” - असं म्हणायचा ‘आद्य’ अधिकार कॅथरिनला होता असे आपण नक्कीच म्हणू शकतो - नाही का!)
पुन्हा मेडलकडे वळूयात. जिथे पोर्टेटस आहेत तिथे लॅटीनमध्ये लिहीलंय ‘Carolus Et Catharina Rex Et Regina’ म्हणजे ‘चार्ल्स आणि कॅथरीन - राजा आणि राणी’. ह्या मेडलची दुसरी बाजू जास्त इंटरेस्टींग आहे. ह्यावर एक पृथ्वीगोल आहे. ज्यात युरोप, आफ्रीका, भारतीय उपखंड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा वगैरे दाखवलेला आहे. ह्यात काय दाखवलंय त्यापेक्षा मेडलच्या ह्या बाजूवर जे काही लिहीलंय ते जास्त महत्वाचं आहे. त्यावर लॅटीनमधे लिहीलंय - “Diffusus in orbe Brittanus”. ह्याचा शब्दश: अर्थ होतो ‘ब्रिटनचा प्रचार (किंवा प्रभाव)’ आणि खरा अर्थ होतो ‘ब्रिटनच्या वसाहती’!
तसं बघितलं तर १६७० मध्ये ब्रिटन ही कोणत्याही प्रकारे प्रबळ सागरी सत्ता नव्हती. २-३ वर्षांपूर्वी - म्हणजे १६६५ ते १६६७ मध्ये झालेल्या - दुसऱ्या ॲंग्लो-डच युध्दात तर डच जहाजं सरळ लंडनमध्ये घुसून इंग्लिश आरमाराची नाचक्की झाली होती. (आपलीच जहाजं थेम्समध्ये बुडवून इंग्लिश आरमाराला डच आरमार लंडनमध्ये आत घुसण्यापासून वाचवावं लागलं होतं!) स्पेन आणि पोर्तुगालने इंग्रजांच्या आधी शंभर सव्वाशे वर्ष जगभर साम्राज्यविस्तार आणि वसाहती बसवायला सुरुवात केली होती. व्यापाराचं म्हणाल तर ‘डच ईस्ट इंडीया कंपनी’ ही इंग्लिश कंपनीपेक्षा खूप श्रीमंत आणि अमाप पैशाचे स्त्रोत असणारी होती. मग १६७० मध्ये हे मेडल बनवण्याचा काय अर्थ? तर हे मेडल ब्रिटीशांची साम्राज्यविस्ताराची इच्छा दाखवत होतं. आपण पुढे जाऊन संपूर्ण जगभर सत्ता गाजवू ही त्यांची अपेक्षा ह्यातून व्यक्त होत होती. ही असली नुसती मेडल्स बनवून इंग्रज थांबले नाहीत तर ही इच्छा वास्तवात उतरण्यासाठी जे काही साम-दाम-दंड-भेद इत्यादी उपाय (आणि सोबत अविरत कष्ट!) त्यांना करावे लागले ते त्यांनी केले. हे स्वप्न खरं करून दाखवलं.
पण हे भारतात शक्य कसं झालं? बरेचदा हा आरोप होतो की भारतीय राजे दुर्बल आणि सारासार विचार न करणारे होते त्यामुळे फक्त व्यापार करायला आलेले इंग्रज शिरजोर होऊन बसले. पण आपल्याकडे हे कोणालाच त्यांचे ‘खरे रंग’ वेळीच कळले नाहीत? कुणीच त्यांचं हे साम्राज्यविस्ताराचं कारस्थान ओळखलं नाही? असं अजिबात नाही. आपल्याकडे इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला समकालीन एक द्रष्टा राज्यकर्ता होऊन गेला ज्याने हा कावा खूप आधीच ओळखला होता - त्याचं नाव? छत्रपती शिवाजी महाराज!
पुरावा काय पण ह्याला? ‘आज्ञापत्रां’त छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवले आहेत त्यात महाराजांनी स्पष्ट म्हटले आहे - “...टोपीकर हेही लोक साहुकारी (व्यापार) करितात, परंतु ते वरकड सावकारासारखे नव्हेत. यांचे खावंद प्रत्यक राज्यच करितात. त्यांचे हुकूमाने त्याचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसें काय घडों पाहतें? तथापि टोपीकरांचा ह्या प्रांते प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें पूर्ण अभिमान. तदनुरूप स्थळोस्थळीं कृतकार्याहि जाले आहेत. त्याहिवरि हट्टी जात, हातास आलें स्थळ मेलियाने सोडावयाचे नव्हेत...”
(‘आज्ञापत्र’ - रामचंद्रपंत अमात्य. संपादन - सबनीस, पृष्ठ २००-२०१)
हे उत्तम उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचूक निरीक्षण, सुयोग्य आकलन, आणि उपजत दूरदृष्टी ह्या गुणांचं!
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन!
- संकेत कुलकर्णी (लंडन)

जामगाव ला शिंद्यांची गढी

 ...दिपाली माळी

काही ठिकाण आपण पाहतो आणि आणि फक्त आणि फक्त अचंबित होतो.
नगर पासुन जवळच 30 किलोमीटर अंतरावर





















जामगाव ला शिंद्यांची गढी आहे. महादजी शिंद्यांनी ती बांधली . तो राजवाडा म्हणा किंवा गढी पाहून इतके गुंग व्हायला आणि त्या काळच्या इंजिनिअरिंग चे कौतुक वाटल्या शिवाय रहात नाही .
87 एकर परिसर, 3 मुख्य प्रवेशद्वारं., अडीच एकर जागेत असलेला महादजी शिंदे यांचा वाडा 17 व्या शतकात बांधलेला. सागवानी दारे आणि तुळया यांनी बांधलेला अजूनही दिमाखात उभा आहे. 2 चौक आणि 21 जिने, प्रशस्त दालने आहेत. वाड्याची संपूर्ण बांधकाम दगड मातीचा लगदा, चुना ,रुमाली वीट, आणि साग यामध्ये केलेले आहे.
वाड्यात मच्छिमहाल,आंबेमहाल,रंगमहाल,तालीम, खलबतखाना,भुयारी मार्ग असुन 17 व्या शतकातले रंगकाम अजूनही शाबूत आहे. या वाड्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या पूर्ण वाड्यात एकाच दगडी खांब आहे.
त्या गढीच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अर्ध चंद्राकृती बारव पायऱ्या मात्र पूर्ण नाहीश्या झाल्या आहेत पण कदाचीत त्यामुळेच त्याचे पाणी अजूनही शाबूत आहे आणि तिथे सुरू असणाऱ्या कॉलेज ची तहान भागवते आहे.
स्थापत्य शास्राचा उत्कृष्टपणा तिथे पाहायला मिळाला. जामगाव पारनेर तालुक्यात आहे तो भाग पूर्वीपासून पूर्णपणे अवर्षण ग्रस्त, पाऊस अगदी नावालाच. पण तरीही वाड्याच्या दोन्ही चौकात कारंजे. आधुनिक घरांमध्ये POP करतो तेव्हा चे लाकडी POP पाहून थक्क होतं तेही, प्रत्येक खोलीत वेगळी कलाकुसर अशी की कल्पनाशक्ती ला सलाम. लाकडी छत असल्यामुळे खोलीतले तापमान नियंत्रित राहायला मदत होते. तिथे खोल्यांना चुन्याचे प्लास्टर केलेले आहे पण ते एका विशिष्ट पद्धतीने. मातीच्या आणि दगडाची भिंत प्लास्टर करण्याआधी तिथे झोपडीला असतात तसे काड्याबआणि गवत यांनी शाकारले आणि मग त्यावर चुन्याचे प्लास्टर केले. त्याकाळी पारनेर चा चुना खुप प्रसिद्ध होता. प्लास्टर करतांना फक्त तो भिंतींना थापला नाही तर सुंदर सुंदर गोखले केले थोडी कलाकुसर केली आणि भिंत आकर्षक बनवली या पद्धतीने भिंत केल्यामुळे तापमान संतुलित राहते
इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणाऱ्या खूप वेगवेगळ्या खिडक्या. लाकडी फ्रेम करून त्यावर चुन्याच्या प्लास्टर च्या डिझाइन अश्या की आपण बघून फक्त स्तब्ध होतो.सोबत काही फोटो देत आहे. भिंतीचे फोटो मात्र काढता आले नाही कारण वाड्याच्या तो भाग बंद केला आहे.
आजूबाजूच्या डोंगरावरून खापरी नळ आणि चाऱ्याच्या खोदून पाणी वाड्यात आणले आणि ते सगळीकडे वापरले. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना आहे हा वाडा म्हणजे . एकदा भेट द्यावीच असाच.
...

अहमदनगरच्या मातीत रुजलेल्या रसिकतेचा पुरावा "चारशे वर्षांपूर्वीच ऑडिटोरियम"!!! - फराहबक्ष महाल किंवा फरहाबाग.

 

रसिक आणि हौशी किती असावं बरं! राजदरबारी येणाऱ्या खास पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ऑडिटोरियम बांधलं. राज्याच्या कोलाहलापासून लांब. विश्वास बसतो का? नाही ना! पण शौकीन लोगोकी शौकीन बाते!! अहमदनगरच्या मातीत रुजलेल्या रसिकतेचा पुरावा, 3 मजली ऑडिटोरिम, मुस्लिम आणि पर्शियन शैलीचं उत्कृष्ट बांधकाम असलेलं, सर्व बाजूनी करंज्यांनी सजवलेलं, तलावाच्या मधोमध वसलेलं,










"चारशे वर्षांपूर्वीच ऑडिटोरियम"!!! - फराहबक्ष महाल किंवा फरहाबाग. अर्थ ही किती छान बघा फराह म्हणजे आनंद, खुशी, उत्साह त्याची बाग फराहबाग , फराह देणारा किंवा बक्षणारा फराहबक्ष महाल.
नगर सोलापूर रोड वर असणारा हा महाल चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी, चौथर्यावर असणारी अष्टकोनी वास्तु, मुर्तुझा निजामशहा ने 1576 च्या दरम्यान बांधून घेतली. मोठे गवाक्ष आणि उंच कमानींनी ही इमारत सुशोभित आहे. महालाच्या मध्यभागी कारंजा, त्याभोवती रंगमहाल, महालाच्या चारही बाजूंना पुन्हा कारंजे. कारंजे आणि तालावसाठी पाणी खापरी नळांनी जवळजवळ चार मैलावरून आणण्यात आलेले.
महालाच्या भोवती मोठ्ठा चौथरा, चौथर्याच्या चारही बाजूंना सुरेख कारंजे. त्याच्या आजूबाजूला कृत्रिम तलाव त्याच्या बाहेर आमराई आणि गुलाबाचे देखणे उद्यान त्यामध्ये सुद्धा कारंजे!! किती सुंदर असेल ते वातावरण आपण फक्त विचारच करू शकतो
नगरचे वातावरण खूप शुष्क असते. त्यामुळे उन्हाळ्यात महाल थंड राहावा म्हणून छतात पोकळी ठेवून त्यात पाण्यावरून येणारी थंड हवा खेळती राहील अशी रचना केलेली आहे. जलविहार करूनच महालात येण्याचा रस्ता होता. वायुविजन, ध्वनी व प्रकाश यांची उत्कृष्ट रचना या इमारतीमध्ये दिसून येते. या महालात नृत्य, गाणी, व मुशायरे होत असत. तो ध्वनी सर्वत्र योग्य पद्धतीने पोहोचण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कोनाड्याच्या रचना केलेल्या दिसतात. तिसऱ्या मजल्यावरील श्रोत्यांना स्पष्ट आवाज ऐकू जाईल अशी रचना आहे. विशेष म्हणजे जुन्या इमारतींमध्ये जसा आवाज घुमतो तसा आवाज येते घुमत नाही कारण इथले वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम. या वास्तूला आतून एकसुद्धा खांब नाहीये. आरसीसी बांधकामा सारखं सागवानी लाकडाच्या मोठया फळ्या कॉलम सारख्या भिंतीत वापरल्या आहेत. रंग महालाच्या फ्लोरिंग मध्ये काच लावलेले दिसते. त्याचा उद्देश म्हणजे दिवे लावले की पूर्ण जमीन उजळल्या सारखी दिसेल. तिथे असणारी ग्रीन रूम तर इतकी बेमालूम बांधलेली आहे की आत जाईपर्यंत कोणाला कळणार पण नाही की इथे ग्रीन रूम आहे. पूर्ण वास्तूमध्ये प्रत्येक दिशेला अनेक दरवाजे आहेत जेणेकरून प्रेक्षक कुठूनही आत-बाहेर जाऊ शकतात. ह्याचा अजून एक उद्देश हा की आत-बाहेर करणाऱ्या लोकांचा इतर प्रेक्षकांवर आणि कार्यक्रमावर काही फरक पडायला नको, त्यांच्यामुळे व्यत्यय यायला नको. असे एक ना अनेक वैशिष्ट्य असणारी ही वास्तू, ताजमहालची रोलमॉडेल आहे. ताजमहाल मध्ये फक्त तीन घुमट जास्तीचे केलेले आहेत बाकी पूर्ण रचना ही नगर मधल्या या वास्तु वरून घेतलेली आहे. किंबहुना एक कथा अशीही सांगितली जाते की शहाजहानने इथलेच कारागीर तिकडे नेले. आणि ते खरं पटतं कारण दोन्ही वस्तूंच्या बांधकामामध्ये खूपच समानता आहे.
मध्यंतरीच्या काळात बरीच पडझड झाली पण आता स्वयंसेवी संघटना आणि पुरातत्त्व खात्याकडून संगोपनाचे प्रयत्न चालू आहेत.
..... दिपाली विजय

सरलष्कर दरेकर वाडा

 












सरलष्कर दरेकर वाडा
पोस्टसांभार :
स्थळ :- आंबळे गाव सासवड पासुन १० ते १२ किमी जिल्हा पुणे
सरदार दरेकर -
हे मोरे या ९६ कुळाचे उपकुळ होय.
मुळ सातारा जिल्हा येथील जावळी भागातील....
दारे गावचे ते दरेकर / दर्या खोर्यातील वीर ते दरेकर असे म्हणतात. असो, पण सुलतानशाही, शिवशाही अशा अनेक राजवटीत दरेकर यांनी पराक्रम केलाय. हिरोजी, गणोजी हे पायदळाचे असामी म्हणून छ. शिवरायानजवळ होते. त्यांचे वारस जसे सुभानजी , काह्न्देराव, गोरखोजी, हणमंतराव, यशवंतराव, मानाजी, गौरोजी अशे अनेक वीर यांना सरंजाम, जहागिरी, सर्देश्मुखी अनेक म्हणजे शेकडो गावचे मोकासे होते.... दरेकर घराण्याला अनेक इनामे होती...मराठ्यान मधले फार मोठ्या इनाम्दारांत दरेकर अग्रणी आहेत आणि होते.⛳️⛳️
पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन , वर्हाड, कोंकण, कर्नाटक, खानदेश उत्तर भारत येथील मराठ्यांच्या लढायचे प्रमुख सरदार हे दरेकर होते.. शनिवार वाड्याजवळ अनेक वाडे दरेकरचे होते व आहेत.. मुधोळकर घोरपडे व अनेक ९६ कुली मराठा घराण्यांचे नातेवाईक आहेत दरेकर, जेजुरी खंडोबा मानकरी.. पाटील, इनामदारी, मोकासे, संदपत्रे जहागिरी अठरा पगड अधिकार धारण करणारे दरेकर मोठे घराणे... आंबले हे गाव छ. शाहुराजेनी सुभानजी दरेकर यांना इनाम दिले लष्कर खर्चासाठी पुढे त्यांच्याजवळ राहिले ..यांचे वंशात सरलष्कर दरेकर खंडेराव झाले त्यांनी माधवराव पेश्वेंचा पिसाळ लेल्या हत्तीपासून जीव वाचवला... हुजुरात व मराठेशाहीच्या प्रमुख मानकरी लोकांत घोरपडे, जाधवराव, भोईटे, निंबाळकर, दरेकर, शितोळे, अशा सरदार घराण्यांचा सहभाग होता... बोलावे तेवढे कमी आहे दरेकर घराण्यबद्दल... वडगाव निंबाळकर व मुढाले गावातील दरेकर आंबलेकर हे आहेत. ....दरेकर गढीचा पोवाडा मी वाचलंय... अनेक पोवाड्यात दरेकर घराण्यांचा उल्लेख आहे... दरेकर यांच्या लोणी दरेकर, राजेवाडी, अशा अनेक शाखा प्रसिद्ध आहेत... सरदार दरेकर यांना मानाचा मुजरा !!

*नक्षीची हवेली* नाशिक.

 









*नक्षीची हवेली*
नाशिक.
लेखक :- श्री. सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.
ही गोष्ट आहे इसवी सन १८०० च्या आसपासची. फार मोठा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात. गोरगरिबांना जगणं मुष्किल झालेलं असताना नाशकातील काही धनिकांनी आपल्या घरांची, वाड्यांची कामे काढली. उद्देश एकच..हातांना काम मिळावं हा. पेशव्यांचे उपाध्याय देवराव हिंगणे यांनी दिल्लीकडुन कसबी कारागीर मागवुन लाकडांवरील कोरीव काम करुन घेतले. अनेक उत्तमोत्तम वाड्यांची उभारणी त्या काळात झाली. त्यातलाच एक वाडा म्हणजे *भालेराव वाडा*.
गोदावरी नदी गावाच्या बाहेर पडते ती मोदकेश्वरा पासुन. तेथुनच नाव दरवाजा सुरु होतो. तर या नाव दरवाज्याच्या मध्यावर उभा आहे हा भालेराव वाडा.. अर्थात *नक्षीची हवेली*.
हो..नक्षीची हवेलीच. हेच नाव रुढ आहे या वाड्याचे.आणि ते यथार्थही आहे.
पावसाळ्यात गोदेला पुर येतो..पण कधी तो महापुराचे रुप धारण करतो. कुठपर्यंत पाणी येऊ शकते जास्तीत जास्त? याचा विचार करुनच या हवेलीचे बांधकाम केलेले आहे. रस्त्यापासुन पाच फुट उंचीचे दगडी जोते बांधुन त्यावर या हवेलीचे बांधकाम केले आहे.
दगडी जोत्यावर उभा असलेला हा वाडा. त्याचे पाच खण. तळमजला आणि पहिला मजला. आणि दर्शनी भागावर असलेले अप्रतिम नक्षीकाम. त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. पाच खणांमध्ये असलेले पाच दरवाजे.. आणि वरच्या मजल्यावर असलेल्या पाच खिडक्या. हे या वाड्याचे दर्शनी रुप. या संपूर्ण भागांवर असलेले उठावदार.. कोरीव काम..वेलबुट्टी..सुर्य, चंद्र, कमळ,कलश..मधुन द्रुष्टीस पडणारे मोर,पोपट.. आज इतकी वर्षे झाली.. पण अजूनही त्यात ताजेपणा आहे, प्रमाणबध्दता आहे.
दरवाज्यांच्या आणि खिडक्यांच्या महिरपी तर विलक्षण सुंदर आहेत. पुर्वी ही हवेली दोन मजली होती. म्हणजे तळमजला आणि पहिला मजला. त्यावर कौलांनी शाकारलेलं छत. बबनशेठ भालेराव आणि नारायणशेठ भालेराव हे दोघे बंधु. त्यांच्या व्यवसाय सोनारकाम. एक खानदानी सोनार म्हणून नावलौकिक. तळमजल्यावर असलेले त्यांचे दुकान अजूनही डोळ्यासमोर आहे. पांढरे शुभ्र धोतर, खादीची कोपरी, त्यांचे ते कामाचे टेबल, ऐरण हातोडा..गिर्हाइकांसाठी पांढरी शुभ्र भारतीय बैठक.. पानाचा डबा, आणि पितळेचा चकचकीत खलबत्ता.. पान कुटण्यासाठी. (विशेष म्हणजे थोड्याफार फरकाने हे दुकान अजुनही तसेच आहे).
दुकानच्या मागील भागात माजघर. तेथुन वर जाणारा लाकडी जिना. या जिन्याच्या मध्यावर एक लहानशी खिडकी. झरोक्यासारखी. जिन्यातुन कोण चढ उतार करतो ते बघण्यासाठी. त्याकाळी पुरुष मंडळींचा बराच धाक असायचा.
वरच्या मजल्यावर एक प्रशस्त बैठकीची खोली. त्याला सर्वजण म्हणायचे..बंगला.
या बंगल्यात मी आयुष्यातला बराच काळ घालवलेला. हा भालेराव वाडा म्हणजे माझ्या आजीचे माहेर. लहानपणापासून तेथे जाणे येणे. माझ्या आजीची एक बहिण होती. बाई म्हणत तिला. अजुनही डोळ्यासमोर दिसतीय मला. सकाळच्या कोवळ्या उन्हात.. खिडकीतून येणाऱ्या उन्हात बसलेली आहे. धुलीकणांनी भरुन गेलेला तो उन्हाचा कवडसा. समोर ठेवलेल्या लाकडी पेटीतल्या आरशात बघुन ती वेणी घालतेय.
१९४०-४२ च्या आसपास स्वातंत्र्य सैनिक श्री वसंतराव नाईक भुमीगत होते. त्यावेळी दोन वर्षे त्यांना आसरा दिला तो याच हवेलीने.
खुप आठवणी आहेत या हवेलीच्या. त्यावेळी लक्षात आले नाही.. पण आता जाणवतंय. गेल्या पन्नास वर्षात काही काही बदल झाला नाही या हवेलीत. नाही म्हणायला दोन मजले चढवलेत यावर, पण ते मुळ रुपाला धक्का न लावता. ब-याच वेळा आपण पहातो पावसाळ्यात घरांचे दरवाजे फुगतात, व्यवस्थित लागत नाही. पण या हवेलीचे सर्वच.. अगदी खिडक्यांचेही दरवाजे कोणत्याही ऋतुत अगदीच व्यवस्थित लागतात. त्याच्या बिजागर्-या, कडी कोंडे सर्वच वेगळ्या घडणीचे आहेत.
सध्या या हवेलीच्या पाच खणांपैकी तीन खण भालेराव कुटुंबाकडे..तर दोन खण पवार कुटुंबाकडे आहेत. भालेराव कुटुंबाने ही हवेली अगदी काटेकोरपणे जपली आहे. अगदी दोनशे वर्षापुर्वी होती तशीच. त्याची देखभाल ठेवणे हे नक्कीच सोपे नाही. या वास्तु जतन करण्यासाठी देखील एक द्रुष्टी असावी लागते. जुन्याच वास्तुंमध्ये..वाड्यांमध्ये एक प्रकारची कलात्मकता होती. हळुहळु गावे बदलत चालली आहे.. शहरीकरण होत आहे. शेकडो वर्षे जुन्या संस्था, जागा, इमारती.. आणि त्यांच्यातली कलात्मकता पाश्चिमात्य देशात जशी जपली जाते, तशी आपल्याकडे. त्या प्रमाणात तरी जपली जात नाही.
आणि म्हणुनच भालेराव कुटुंबाने जपलेल्या या हवेलीचे मोल खुप मोठे आहे. आणि याची जाण खर्या अर्थाने आहे ती विदेशी पर्यटकांना.. अभ्यासकांना. नाशिकमध्ये आले की त्यांची पावले नाव दरवाज्याकडे हमखास वळतात.
संकलन-सुधीर लिमये पेण

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...