विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

!! छत्रपती शिवराय महाराज यांचे आजोबा श्री राजे लखुजीराव जाधवराव !!

!! छत्रपती शिवराय महाराज यांचे आजोबा श्री राजे लखुजीराव जाधवराव !!
|| 'शबिह-ए जादून राय दखनी ' ||
छत्रपती शिवराय महाराज यांचे आजोबा व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधव यांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्क येथील "मेट्रोपोलिटीयन म्युझियम ऑफ आर्ट" या संग्रहालयात आहे. राजे लखुजीराव यांचे हे दुर्मिळ चित्र शिवरायांच्या जन्माआधीचे इ सन १६२२ सालचे असुन चित्रकार हाशिम यानी ते काढले आहे. ते तत्कालीन शहजादा व नंतरचा बादशहा शहाजहाँन याच्या वैयक्तिक अल्बममध्ये समाविष्ट केलेले आहे.
सिंदखेड प्रांताचे राजे, राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचे वडील आणि छत्रपती शिवराय महाराजांचे आजोबा , राजे लखुजीराव जाधवराव यांचे चारशे वर्षांपूर्वीचे चित्र हे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी काढलेले आहे . हे चित्र मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या पाऊलखुणा अधोरेखित करणार आहे.
न्यूयॉर्क येथील 'मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट' या राष्ट्रीय संग्रहालयात असलेले हे चित्र , इतिहास अभ्यासक मनोज दाणी सर यांनी प्रथम प्रमाणीत केले .
या संग्रहालयामध्ये 'बादशाही अल्बम' नावाचा एक चित्र संग्रह असून, त्यामध्ये राजे लखुजी जाधवांरावांचे चित्र जतन करण्यात आले आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात आणखी काही चित्रे जोडली गेली. औरंगजेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला. या संग्रहावर असलेल्या शिक्क्यांवरून आणि सुरुवातीच्या 'शमसा' आणि 'उनवान' या नक्षीदार पानांवरून दाणी यांनी संग्रहाबद्दल माहिती संकलित केली आहे.
ही चित्रे अनेक वर्षे दिल्लीत बादशाही संग्रहात होती. १७३९ मध्ये नादिरशहाच्या लुटीतून ती वाचली. १८०२ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली घेतल्यावर जेम्स फ्रेझर आणि त्यांच्या बंधूनी स्थानिक मोगल चित्रकारांकडून जुन्या चित्रांच्या नवीन प्रती बनवून घेतल्या. त्यानंतर हा चित्रांचा संग्रह दिल्लीतील आर्ट डीलर यांच्याकडे होता. कालांतराने पाश्चात्य संग्राहकानी तो विकत घेऊन परदेशी नेला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी पाच वर्षे आधी म्हणजेच १६२२ मध्ये हे चित्र हाशिम नावाच्या एका मोगल चित्रकाराने काढले आहे.
चित्रावर शाहजहान बादशहाच्या हस्ताक्षरात फारसीमध्ये 'शबिह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम' म्हणजे 'जाधवराव दखनी यांची प्रतिमा, हाशिमने काढलेली' असे लिहिलेले आहे. हाच मजकूर जाधवरावांच्या चित्रातील पांढऱ्या कपड्यांवर पायाजवळ बारीक अक्षरात लिहिलेला आहे.
जादूराय अथवा जादूनराय (मराठीत जाधवराव) हा राजे लखुजीराव जाधवराव यांना मिळालेला किताब होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो किताब राजे लखुजी जाधवराव यांचे नातू राजे पतंगराव उर्फ ठाकुरजी(राजे दत्ताजीराव यांचे कनिष्ठ पुत्र) याना देण्यात आला असा उल्लेख 'माथीर-ए-अलामगिरी' ,जहाँगिरनामा व शहाजहाँन नामा या फारसी ग्रंथात आहे. किताब देण्याची ही पद्धत मोगल आणि दखनी सुलतान,तसेच पुढील मराठा स्वराज्यात देण्याची प्रथा प्रचलित होती. शिवाय मोगल फारसी,निजामशाही हस्तलिखितांमधे जादूनराय/जदुराय दखनी यांचे इ. स. १६०० ते १६२९ या काळातील उल्लेख आहेत. या विशेषनामाचा उल्लेख तुझुक-ए-जहांगिरी या जहांगीर बादशाहच्या आत्मचरित्रातही येतो. जादूनराय(जदुराय/जाधवराव) असा उल्लेख शहाजहानच्या बादशाहनाम्यातही आहे. तिथे 'शाहूजी भोंसला दामाद जादू राय' असा स्पष्ट फारसी उल्लेख मिळतो. या सर्व संदर्भांवरून हे चित्र राजेलखुजीराव जाधवराव यांचेच असल्याचा दावा, मनोज दाणी यांनी केला आहे आणी ते सिद्ध देखील होते. या चित्राच्या पायथ्याशी स्पष्टपणे "शबीह-ए-जदुराय दख्खनी -ए -हाशिम" म्हणजे जदुराय दख्खनी (राजे लखुजीराव जाधवराव) यांचे चित्र चित्रकार हाशिम यानी काढले आहे. तसेच चित्रावरील कपड्यावर देखील "जदुराय दख्खनी"(जाधवराव दख्खनी) असा स्पष्ट उल्लेख आढळतो आणी जाधवराव दख्खनी हा किताब इ सन १६२२ साली फक्त राजे लखुजीराव जाधवराव यानाच होता, बाकी कोणाला हा किताब नव्हता.
कोण होता हाशिम?
या चित्राबरोबरच व्यक्तीचित्रांसाठी प्रसिद्ध असणारा चित्रकार हाशिम याचीही माहिती इतिहास अभ्यासकांना मिळू शकेल.
या चित्राचा चित्रकार हाशिम याची बरीच माहिती संशोधकांनी निश्चित केली आहे. त्यावरून असे सांगता येते की हाशिम हा मूळचा दख्खनचा रहिवासी होता. त्याच्या चित्रकार-कारकिर्दीची सुरुवात अहमदनगर अथवा विजापूर इथे झाली असावी. त्यानंतर तो त्या काळातली मोगलांची दख्खनच्या सुभ्याची राजधानी बऱ्हाणपूर इथे होता. तिथून तो उत्तर हिंदुस्तानातील मोगल दरबारात आणि वेळप्रसंगी परत दक्षिणेत येत जात होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या आणि ठळक आणि ताकदवान रेषांनी काढलेल्या व्यक्तिचित्रांमुळे तो त्या काळातला एक श्रेष्ठ चित्रकार मानला गेला आहे. हाशिमने निजामशाही, आदिलशाही आणि मोगल दरबारातील अनेक बड्या सरदारांची चित्रे रेखाटली आहेत.
चित्रातील वैशिष्ट्ये
चित्रातील कलाकुसर मोगल पद्धतीची..
व्यक्तीचित्रातील पेहराव, आभूषणे, तलवारीचा बारकाईने केलेला अभ्यास.तलवार ही मराठा धोप पद्धतीची आहे.
सदरील चित्र तत्कालीन "बादशाही अल्बम" मध्ये समाविष्ट केलेले असुन त्या अल्बममध्ये देशातील तत्कालीन सुलतान व मातब्बर वजीरांची चित्रे समाविष्ट केलेली आहेत . म्हणजे राजे लखुजीराव जाधवराव यांचे तत्कालीन राजकीय वजन अधोरेखित करते.
हमिद लाहौरी याच्या पादशहानामा या ग्रंथात देखील राजे लखुजीराव जाधवराव यांची मनसब "२४००० जात व १४००० स्वार" असल्याचे उल्लेख सापडतात.
ग्रँट डफ यानी देखील राजे लखुजीराव जाधवराव यांचा उल्लेख "मराठा सरदारांचे प्रमुख " असा स्पष्टपणे केलेला आहे .
राजे लखुजीराव जाधवराव याना "मीर-ए-समिद/सामाण" हे पद देखील होते. यावरुन राजे लखुजीराव यांचे तत्कालीन राजकीय वजन व मराठा सत्ता संघटक म्हणुन असणारी ओळख सिद्ध होते.
राजे लखुजीराव जाधवराव याना असलेले किताब :-
१) जदुराय दख्खनी (जाधवराव दख्खनी)
२) जदुराव कांतिया - कांतीया याचा अर्थ श्रीकृष्ण वंशातील असा होतो. यास दुजोरा देणारा संदर्भ तत्कालीन फारसी साहित्यात देखील आढळतो तसेच राजे लखुजीराव यांच्या समाधीच्या पाठभिंतीवर श्रीकृष्णाचे शिल्प दगडात कोरलेले आढळते.
३) पतंगराव
वैशिष्ट्ये :-
मराठा राजकुळातील राजे लखुजीराव यांच्या पेंटिंग अगोदर कोणाचे पेंटिंग आढळलेले नाही . मध्ययुगीन काळातील मराठा राजकुळातील पहिले पेंटिंग राजे लखुजीराव जाधवराव यांचेच असावे .
राजे लखुजीराव जाधवराव यांच्या नंतर त्यांचे नातु , राजामाता जिजाऊ आऊसाहेब व शहाजीमहाराजसाहेब यांचे पुत्र , छत्रपती शिवराय महाराज यांचे पेंटिंग आढळते .
Rajenaresh jadhavrao

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...