#बलिदानासाठि_निधड्या_छातीने_मार्गक्रमण
#स्थळ_पन्हाळगड
postsaambhar by :
दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर
दिवस मावळतीला झुकू लागला आणि पन्हाळगडच्या तटाबुरुजावर कोसळणारा धुवाधार पाऊस आपले उग्र रुप दाखवू लागला.
आषाढ महिन्याच्या वद्य प्रतिपदा.नुकतीच पौर्णिमा झालेली त्यामुळे आभाळात चंद्र होता.
पौर्णिमेचा पूर्णचंद्र मात्र पन्हाळगडावर नाराज वाटत होता....
नाराज...?
नाराज नव्हे तो मुद्दाम ढगांच्या आडोशाला लपला होता,आपल्या तेजाने शिवाजीराजांचा मनसुबा फसू नये म्हणून.
खूप इच्छा होती चंद्राची की शिवाजीराजांचा चेहरा मन भरून पाहून घ्यावा...पण हिंदवी स्वराज्य तडीस नेण्याकरता केवळ आज रात्री त्याला हा प्राणप्रिय मोह आवरला पाहीजे असे वाटत होते.
पन्हाळगडाचे साडेतीनशे बुरुज सुद्धा आज विचित्र विवंचनेत होते...दगड न दगड राजांच्या काळजीत आभाळातून धो धो पडणारे पाणी सर्वांगावरून ओघळत होता...जणू स्वतःचे अश्रू त्या पावसात लपवत होता.
पन्हाळ्याच्या खलबतखान्याची दिंडी लवलवली. कोणीतरी येण्याची चाहूल लागली.
शिवाजी महाराज भिंतीकडे पाहत हात पाठमोरे बांधून उभे होते..बाहेर पाऊस कोसळत होता,मनात विचारांचा धबधबा सुरू होता.
लागलेल्या चाहुलीने ते सावध झाले तो समोर बघतो तर प्रत्यक्ष आरसाच उभा आहे असा भास झाला.....
शिवा काशीद शिवाजी महाराजांचा हुबेहूब पोषाख करुन महाराजांच्या समोर उभा होता.
शिवा काशीदांच्या बाजूला एक धिप्पाड पैलवान गडी उभा होता,डोईला मावळी मुंडासे,गळ्यात चांदीची पेटी लटकवलेली,ओठावर मिशीचा आकडा त्या गोल चेहऱ्याला शोभत होता.
कमरेला शेला व त्याच्यावर तलवार लटकवलेली,पाठीला ढाल अडकवली होती.
अनवाणी पाय आणि बाभळीच्या टणक लाकडावर आकर्षक सुतारकाम करून घाटदार बनवावी अशी पायाची पिंडरी आणि पायात चांदीचा तोडा....
चेहऱ्यावर गंभीरता आणि हात महाराजसाहेबांच्या समोर मुजऱ्यासाठी लावलेले....
त्याला पाहताच महाराजांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमलले...
ते बोलू लागले....
बहिर्जी.... गड्या कमाल केलीस तू....हे काय पाहतोय मी..असे वाटते की मी माझे प्रतिबिंब आरश्यात पाहतोय...असे म्हणत त्यांनी बहिर्जी नाईकांना कडकडून मिठी मारली...
जणू सह्याद्रीचा शंभूमहादेव नंदीला आलिंगन देत होता...बहिर्जी नाईकांच्या काळजात हजार आनंद तरंग उमटले...जर अशीच मिठी जन्मभर मिळाली तर हा बहिर्जी यमाला सुद्धा आडवा जाईल..
महाराजांची शाब्बासकी म्हणजे चेष्टेचा विषय नव्हता, कोणाच्याही नशिबी नव्हती ती..ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा पुसत नाईक उत्तरले....
"राज... शिवा ला समजावून सांगितलंय काय काय करायचं ते....जीव वाचवून प्रसंगावधनाने सिद्दीच्या छावणीतून सरळ पन्हाळगड गाठायचा...
तहात आढेवेढे घ्यायचे मात्र सिद्दी सांगेल त्याप्रमाणे शेवटी सर्व अटी मान्य करायच्या....जास्तीत जास्त वेळ सिद्दीच्या नजरेला फसवशील तितका जास्त वेळ महाराजांना वेढा फोडून विशाळगड गाठायला मिळेल..."
महाराजानी शिवा काशीदकडे पाहिले आणि महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला.....
शिवा....किती हे जीवघेणे धाडस करतोयस तू...?
आमच्यासाठी...?
यावर शिवा काशीद उत्तरले...महाराज नाही...हे धाडस तुमच्यासाठी करतोयच पण हा स्वराज्याचा खेळ जो तुम्ही मांडलाय..त्यात आमच्या काशीदांच्या घरची एक तरी आहुती पडू द्या...
महाराज गहिवरले..त्यांनी शिवा काशीदाना कडकडून मिठी मारली..... शिवा प्राण वाचवून येणे....आई भवानी आपल्यासोबत आहेच...या संकटातून पार पडू आणि लवकरच तुला पालखी पाठवून राजगडी बोलवू....या हिंदवी स्वराज्याच्या यज्ञकुंडात मला तुमच्या आहुती द्यायच्या नाहीत...द्यायच्यात तर त्या गनिमांच्या.....
महाराजांनी डोळे पुसले...शिवा काशीदानी डोळे पुसले...
शिवा काशीद बोलू लागले...
महाराज नाईकांनी सांगितल्याप्रमाणे मी वागेनच..पण काय अघटीत घडलं तरीपण वाईट नक वाटून घेऊ....मरताना या शिवा च्या अंगावर शिवाजी राजाची कापड असणार हे काय कमी हाय का....!
महाराज तुम्ही ठरल्याप्रमाणे निघा....महाराज जगलो वाचलो तर तुमच्या व औसाहेबांच्या दर्शनाला नक्की येईन मी....असे म्हणत शिवा महाराजांच्या पुढे मुजऱ्याला वाकला... महाराजांनी त्याचा हात तसाच धरला आणि छातीशी कवटाळले....
इतक्यात बहिर्जी बोलले...महाराज आवरलं पाहिजे... क्षण आणि क्षण महत्वाचा आहे आपल्याला... बाहेर दोन पालख्या तयार आहेत,
स्वतः शंभुसिह, बाजीप्रभू,फुलाजीप्रभू व बांदल देशमुखांची चिवट फौज हत्यार पाजळत तुम्हाला वेढ्याबाहेर काढायला आतुर आहेत तर शिवाला सिद्दीच्या तंबूत न्यायला दुसरी पांढऱ्या निषाणाची तुकडी सज्ज आहे..आवरलं पायजे....
ठीक...महाराज उत्तरले मात्र त्यांच्या मनातून शिवा काशीद जात नव्हते.....किती त्याग ह्या पोराचा.... मला परत याचा चेहरा दिसेल का नाही माहिती नाही,पण जोवर आभाळात चंद्र सूर्य आहेत याची कीर्ती या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात घुमत राहील...
शिवा काशीद व बहिर्जी नाईक माघारी फिरले...दिंडी उघडली तितक्यात महाराजांनी हाक मारली....
शिवा.....त्यांची हाक ऐकून दोघेही थांबले...महाराज अश्रू पुसत शिवाच्या जवळ आले.....
महाराजांनी स्वतःच्या गळ्यात असलेली चौषष्ठ कवड्यांची माळ काढली आणि शिवा काशीदांच्या गळ्यात घातली.....
भोसले कुळाची ही दौलत.. आई तुळजाभवानीची ही कवड्यांची माळ गळ्यात असू दे शिवा...या माळेला आई तुळजाभवानी चा आशीर्वाद समज....
आणि महाराज पुन्हा पाठमोरे झाले.....
शिवाजी महाराज स्वतःला आई तुळजभावानीचे भुत्ये समजत.रोज चौषष्ठ कवड्यांची माळ घातल्याखेरीज ते बाहेर पडत नसत.आज ती प्रणापेक्षा प्रिय माळ त्यांनी शिवा काशीदांच्या गळ्यात घातली.....
हा शिवा मुजरा करून मृत्यूला मिठी मारायला निघालाय...आई भवानी त्याला यश दे....त्याच्या त्यागाची किंमत कर.....
महाराजांच्या मनात शिवाचे ते शब्द अजूनही घुमत होते...
"महाराज मरताना या शिवाच्या अंगावर शिवाजी महाराजांची कापडं असणार...माझी कुळी धन्य व्हनार....महाराजांचे अश्रू थांबत नव्हते...बाहेर पाऊस थांबत नव्हता...
तितक्यात बाहेरून आवाज आला....महाराज निघालं पाहिजे.
निर्धारी आवेशात महाराजांनी डोळे पुसले आणि ते निघाले...."
#त्यागमूर्तीच_दूसर_रूप_तो_शिवा...🙏⛳⛳
No comments:
Post a Comment