विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 14 August 2019

शिवाजी महाराजांचा अंत्यविधी कुठे व कसा करण्यात आला?

शिवाजी महाराजांचा अंत्यविधी कुठे व कसा करण्यात आला?

( जगदीश्वर मुख्यदरवाज आणि त्याच्यासमोर शंभुराजेंनी बांधलेली शिवरायांच्या समाधीचे दुर्मिळ छायाचित्र )

शिवाजी महाराजांच्या मृत्यू संदर्भात इतिहासामध्ये अस्पष्टता जाणवते. काही लोकांच्या मते, शिवरायांचा खून झाला आणि तो त्यांच्याच मंत्र्यांनी घडवून आणला होता. पुराव्यानिशी हे आरोप खोडून काढता येतात. फारसी पत्रांमधील नोंदीनुसार, मोरोपंत पेशवे महाराजांच्या मृत्यू समयी बिदरच्या किल्ल्याच्या आसपास फुलमारी परगण्यात सैन्याची जमवाजमव करत होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे कराड मध्ये सैन्य घेऊन होते, अशी नोंद मिळते. इंग्रजांच्या पत्रानुसार, अन्नजीपंत सुरणीस हे चौलच्या भागात असल्याची माहिती मिळते. रायगडवर त्यावेळी धाकटे पुत्र राजाराम , महाराणी सोयरबाईसाहेब, गडाचे कारभारी राहुजी सोमनाथ, प्रल्हादपंत निराजी अशी मोजकीच मंडळी उपस्थित होती.
सभासदांनी त्यांच्या बखरीत महाराजांच्या उत्तरक्रियेबद्दल केलेली नोंद अशी, 'मग राजियांचे कलेवर चंदनकाष्ठें व बेलकाष्ठें आणून दग्ध केले. स्त्रिया ,राजपत्न्या , कारकून व हुजरे सर्व लोकांनीं संगितलें की धाकटा पुत्र राजाराम यांनी क्रिया करावी. सर्वांनी खेद केला. राजाराम यांनी अत्यंत शोक केला, त्यानंतर उत्तर कार्य कनिष्ठांनी करावे असें सिद्ध केले. वडील पुत्र संभाजीराजे वेळेस नाहींत, यांजकरिता धाकट्यानीं क्रिया केली.'
शिवाजी महाराज हे वेदशुचिर्भूत सिंहसनाधिष्ठित अभिषिक्त राजे होते. शास्त्रानुसार त्यांचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेल्या सिंहासनावर त्यांच्या वारसाची विधीयुक्त स्थापना करणे गरजेचे होते. धर्मशास्त्रांच्या नियमानुसार, राजप्रेत नवीन राजा केल्यावाचून दहन करू नये. युवराज्याभिषिक्त संभाजीराजे सोडून हा अधिकार कोणाला ही नव्हता. त्यामुळे जगदीश्वराच्या प्रासादासमोर बेलकाष्ठे आणि चांदनकाष्ठांची चिता रचून राजरामांकरवी महाराजांच्या फक्त कलेवरला मंत्राग्नी देण्यात आला. उत्तरक्रिया साबाजी भोसले शिंगणापूरकर (विठोजी भोसल्यांचे वंशज, ह्याचेच पुढील वंशज नागपूरकर रघोजीराजे भोसले) ह्यांनी राजारामांना जवळ बसवून करवून घेतल्या असा उल्लेख मिळतो. [1]
राणी पुतळाबाईसाहेब महाराजांच्या चितेवर सती गेल्या. बखरीमधील उल्लेख असा, ' नंतर प्रधानादीक मिळोन दरवाजे बंद करून, बातमी बंदोबस्त होय तों न फुटावी, ऐसें करून, शिबिक आणून, सर्व राजचिन्हें व उपचार करून यथाविधी मंत्राग्नी करविला'. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी फुटून राज्यात अनागोंदी माजू नये म्हणून गडाचे दरवाजे बंद ठेवण्यात आले, एवढीच ह्या गोष्टी मागील सत्यता आहे.
कालांतराने जेव्हा संभाजीराजे अभिषिक्त महाराज बनले तेव्हा त्यांनी शिवरायांची उत्तरक्रिया केली. शंभूराजांनी त्याच ठिकाणी म्हणजे जगदीश्वर प्रासादाच्या समोर शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा बांधून घेतली. ही समाधी अष्टकोनाकृती होती. ज्या ठिकाणी महाराजांचा अंत्यविधी झाला त्याच ठिकाणी आज सुद्धा ही समाधी पहिली जाऊ शकते. ह्या अष्टकोनाकृती समाधीचे काही दुर्मिळ चित्रे सुदैवाने आपल्या कडे आहेत.
(पूर्णाकृती समाधीचे छायाचित्र)
ही आहे आजच्या काळातील शिवाजी महाराजांची समाधी:
शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या तब्बल २०० वर्षानंतर मा. ज्योतिबा फुलेंनी शिवजन्मोत्सवाची सुरुवात केली आणि रायगडावर पायी जाऊन झाडा-झुडुपांमध्ये हरवलेल्या किल्ल्यावरील महाराजसाहेबांची समाधी शोधली. पुढे चालून लोकमान्य टिळक आणि इतर काही लोकांनी मिळून समाधीचे नूतनीकरण केले.
धन्यवाद.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...