विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे.

कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे.
माहिती साभार : अजय जयदीप
शाळेतील पाठ्यपुस्तकांमधून आपण उत्तरेतील उठाव, झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल खूप वाचलं. मात्र १८५७ च्या उठावाची एक ठिणगी कोल्हापूरात देखील पडली होती याची माहिती आपणास सहसा कुणी दिली नसेल.
१८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला होता त्या उठावाचे हिरो होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब !!!
२६ डिसेंबर १८३० साली बुवासाहेब महाराज आणि आनंदीबाई यांच्या पोटी शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचा जन्म झाला. तर बुवासाहेब महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी शाहू उर्फ चिमासाहेब महाराजांचा जन्म झाला.
२९ नोव्हेंबर १८३८ रोजी बुवासाहेब महाराज यांचं अकाली निधन झालं. तेव्हा गादीवर आठ वर्षांचे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज आले. गादीवर आलेले बाबासाहेब महाराजांचा स्वभाव शांत आणि मवाळ होता पण त्यांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे वेगळच रसायन होतं.
त्याकाळी कोल्हापूर आजच्यासारखं पसरलेलं नव्हतं. शहराला तटबंदी होती. शहराचं स्वरुप एखाद्या किल्यासारखं होतं. ६ वेशी, सभोवती मोठ्ठा खंदक, ४८ बुरूज आणि त्यांवर शहराच्या सुरक्षेसाठी सज्ज असणाऱ्या तोफा असत. रोज रात्री ८ वाजता कोल्हापूरच्या वेशी बंद होत. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कोल्हापूरात प्रवेश करता येत नसे.
कोल्हापूर संस्थान आणि इंग्रजांमध्ये करार झालेला असल्यानं कोल्हापूरात इंग्रजांची २७ पलटण ठाण मांडून असे.
३१ जुलैच्या रात्री हिंदूस्थानच्या आसमंतात आरोळी घुमली “मारो, फिरंगीओंको.” हाच तो क्षण होता, कोल्हापूरात झालेल्या १८५७ च्या उठावाचा. हा उठाव कोल्हापूरात झाला म्हणून महत्वाचा नव्हता तर संबंध दक्षिण हिंदूस्तानातल्या उठावाची ती पहिली ठिणगी होती.
२७ पलटणीतल्या सुमारे २०० सैनिकांनी इंग्रज सेनाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर चाल केली. पण उठावाची कुणकुण इंग्रज अधिकाऱ्यांना अगोदरच लागल्याने त्यांनी पळ काढला होता. शिपायांनी इंग्रजांनाच्या खजिन्याकडे चाल केली. खजिन्यावर हल्ला करत सुमारे ४० ते ५० हजार रुपयांची रक्कम लुटण्यात आली. या उठावाचा नेतृत्व करत होते — रामजी शिरसाट.
त्यानंतर शिपायांनी आपला मोर्चा कोल्हापूर शहराच्या दिशेने वळवला. मात्र विजापूर वेस (बिंदू चौक) चे दरवाजे बंद होते. आतील लोकांना उठावाचा निरोप न मिळाल्यामुळे हे दरवाजे सकाळीच उघडण्यात आले.
इंग्रजांच्या फौजा मागावर असल्याने शिपायांना पळून जाणं भाग पडलं. याच वेळी उठावाची माहिती मिळाल्याने पळून गेलेले इंग्रज अधिकारी शिपायांना सोळांकूरच्या व्यंकनाथाच्या मंदिरात लपून बसलेले दिसले. शिपायांनी या तिन्ही इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले. उठावाची तोपर्यंतची निष्पत्ती होती ३ इंग्रज ठार आणि ५० हजारांचा सरकारी खजिना ताब्यात.
इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुंबईच्या फौजा दाखल होवू लागल्या.
पुढे १० ऑगस्ट रोजी बेळगावहून आलेल्या लेफ्टनंट केर साहेबांच्या पलटणीने उठावातील काही शिपायांना घाटातील राधाकृष्णाच्या मंदिरात पकडलं. मंदिरात असणारे चाळीस शिपाई विरुद्ध केर साहेबांची घोडेस्वारांची मोठ्ठी पलटण असा सामना झाला यात ४० शिपायांना हौतात्म्य आलं.
ही हकिकत मुंबई सरकारला कळताच मुंबईहून कर्नल जेकब यांना उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. कर्नल जेकब यांनी कठोर कारवाई करत हा उठाव मोडून काढला. १८ ऑगस्ट रोजी ८ जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं. २ जणांना फाशी ११ जणांना जाहिररित्या गोळ्या घालण्यात आल्या.
इंग्रज अधिकारी विचारत राहिले की बंड नेमकं कुणामुळे झालं..? बंडामागे नेमकं कोण होतं…? एकाही शिपायाने तोंड उघडलं नाही, पण कर्नल जेकब यांचा शोध थांबला नाही.
असाच उठाव ६ डिसेंबरच्या रात्री देखील झाला. शिपायांकडून राजवाड्यावर चाल करण्यात आली. उठावातील शिपायांना विश्वासघातामुळे शरणागती पत्करावी लागली. कोर्टाच्या आदेशानुसार ४ जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं तर ३२ जणांना गोळ्या घालण्यात आल्या.
कर्नल जेकबच्या चाणाक्ष नजरेनं चिमासाहेबांची करारी नजर ओळखली.
लागोपाठ दोन उठाव झाले पण उठावाच्या पाठिमागे कोण होतं याचा शोध मात्र लागत नव्हता. कर्नल जेकब राजवाड्यात फेऱ्या मारत होते. कर्नल जेकब बाबासाहेब महाराजांना प्रश्न विचारत होते आणि महाराज त्यांची उत्तर देत होते.
तिथे असणारे बाबासाहेबांचे बंधू चिमासाहेब मात्र कर्नल जेकब यांच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते. जेकब लिहतात, “त्याचं रात्री मला चिमासाहेबांवर संशय आला.
“हा एक तेजस्वी व तडफदार मराठा होता !!!!” दुसऱ्या दिवशी चिमासाहेबांना बोलावून घेण्यात आलं. ही बातमी कोल्हापूरच्या नागरिकांना समजताच सबंध कोल्हापूर रस्त्यांवर उतरलं. परिस्थितीचा अंदाज घेऊन कर्नल जेकब यांनी चौकशी तात्काळ थांबवली. चिमासाहेब महाराज जेव्हा राजवाड्याकडे परतू लागले तेव्हा रस्त्याच्या दूतर्फा नागरिकांची प्रचंड गर्दी जमली.
कोल्हापुरच्या महाराजांची समाधी कराचीमध्ये. कर्नल जेकब यांनी चिमासाहेबांना काहीतरी कारण सांगून बोलावून घेतलं. पूर्वीसारखा गोंधळ नको म्हणून महाराजांना रात्री बोलावण्यात आलं. यावेळी पुर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. महाराजांना चौकशीच्या निमित्ताने अटक करण्यात आलं.
त्याच रात्री चिमासाहेबांना आधी वाघाटणे बंदरातून मुंबई आणि मुंबईमधून पुढे कराचीला नेण्यात आलं. १२ मे १८५८ रोजी चिमासाहेब कराची येथे पोहचले. महाराज आता कैदी होते. भारतापासून कोल्हापूरपासून कौसो दूर कराचीमध्ये.
१५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांच निधन झालं. लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांनी स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. आजही कराचीमध्ये ती समाधी आहे.
कोल्हापूरच्या रक्तात ज्यांनी क्रांतीची बीजे पेरली त्या महाराजांनी ती समाधी !!!
माहिती साभार : अजय जयदीप

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...