postsaambhar :Udaykumar Jagtap
सासवड मधील कऱ्हा व चांबळी नदीच्या संगमावर" हेमाडपंथी" वास्तुरचनेचे "संगमेश्वर मंदिर" आहे . या मंदिराची निर्मिती यादवांच्या काळातील आहे . संगमेश्वर मंदिर वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना आहे .
"हेमाडपंती स्थापत्यशैली": भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या" हेमाद्री पंडित "किंवा" हेमाडपंत "यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते.
मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते.
वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.
संगमेश्वर मंदिराच्या दीपमाळा नेत्रदीपक आहेत. नद्यांच्या दोनही बाजूस सुंदर घाट बांधलेले असून खडकेश्वराचे एक मंदिरही आहे
मंदिराच्या परिसरात छोटी छोटी मंदिरे असून . काही मंदिरे सतीची आहेत . हि सतीची मंदिरे हि सरदार पुरंदरे व पेशव्यांच्या घराण्यातील स्त्रियांची सतीमंदिरे आहेत यात शंका नाही.
ग्रँड डफ यानेही या सती मंदिरांचा उल्लेख केलेला आहे . या मंदिरांकडे बघितलं कि हृदय पिळवटल जात. आता काही मंदिरे नष्ट झाली आहेत ठराविकच सती मंदिर आणि सतीचे दगड दिसताहेत
. जवळच पुरंदरे यांचा भव्य वाडा उभा आहे . समोर कऱ्हा माईचे मंदिर व बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे )चिरनिद्रा घेत आहेत . संगमेश्वर मंदिराच्या मागील बाजूस एक बगीचा होता त्यात एक कारंजही होते त्याचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाले.
बागाही नष्ट झाली सरदार पुरंदरे यांनी त्या ठिकाणी उसाच्या मळ्याची लागण केली बागेचे रूपांतर ऊस मळ्यात झाले . पुरंदर्यांनी उसाचे भरघोस उत्पन्न घेतल्यामुळे त्या मळ्यास नंतर "साखरमळा" म्हणले जाऊ लागले . आजही त्या मळ्यास " साखरमळा "म्ह्नणूनच ओळखले जाते . .
साखरमळ्याच्या काही भागात कळकाची बेटे होती कळकामुळे त्याला नंतर "कळकीबाग" म्हणले जाऊ लागले .आजही तो परिसर "कळंकी बाग" म्हणूनच ओळखला जातो .
चांबळी नदीच्या पात्रात एक उंच बांधकाम दिसते तो पूर्वी राहत होता . त्या रहाटावरून साखर मळ्यास पाण्याने भिजवण्याची व्यवस्था होती भूमिगत पाट पाण्याने मळा भिजवला जात असे रहाटाचे अवशेष आजही पाहावयास मिळतात . भूमिगत पाट पाण्याची व्यवस्था असलेल्या खुणा काळाच्या ओघात नष्ट झाल्या
सासवड मधील जनतेने पेशवाईच्या पडत्या काळात खूप काही सोसलेले आहे. १८०३ साली २२ मार्च ला रामोशांनी मोठा पुंडावा केला .
यशवंतराव होळकर यांनी पुणे शहर लुटल्या नंतर रामोशांच्या सहाय्याने सासवड लुटले. त्रंबकराव महिपतराव पुरंदरे यांनी लिहिलेल्या एका पत्रातील उल्लेख या परिस्थितीचे वर्णनावरून परिस्थिती लक्षात येते
". घरची चीज वस्तू घराबाहेर काढली घरचे देव भांडी बासने व कागदपत्रे ,पोथ्या ,वगैरे झाडून नेले .
यशवंतराव होळकरांमुळे गावं परागंदा झाला होता दंगा शांत झाल्यावर गाव स्थिर स्थावर झाला . त्या समई सासवड गावातील ग्रामदैवतांची शांती करण्यात आली
२९ मे १८०३ मधील एका पत्रात असा उल्लेख आढळतो कि "श्री भैरव ,श्री वटेश्वर ,श्री संगमेश्वर या देवतांना ११ ब्राह्मणानं कारवी लघुरुद्र आवर्तन करण्यात आले या कमी ५० रुपये २ अणे खर्च आला .
मे १८०३ मध्ये पुन्हा सासवडी बेरडांचा पुंडावा झाला . बाजारपेठेत हल्लकल्होळ माजू बेरडांनी भरपूर लुटालूट केली . एक पत्रात उल्लेख अढळला कि "पेठेतून शिंपी वाणी सासवड स येत होते तो बेर डानी लुटालूट करीत "खंडू बंगाळे "जीवे बेरडांनी वाटेस लुटताना मारले . तो मुडदा पडला आहे .घोळ मोठा पडला आहे. स्वारी येउन काही गावाचा बंदोबस्त केला जाईल बेरडाची रीत ठीक नाही "
. सासवड ने लुटालुटीचे अनेक तडाखे सहन केलेले दिसतात . पेशवाईचा अस्त झाला . जारकता माजली. इंग्रजांनी पुरंदर किल्ला घेतला व आसपास लुटालुटीला सुरवात झाली .
त्या काली चांबळी चे सरनाईक घराणे घरंदाज व धनाढ्य होते .हे सर्वजण" महाजीपंत सरनाईकांचे" वंशज होते
" महादजीपंत सरनाईक" पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार . त्यांच्या मृत्यूनंतर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला व त्यांच्या चार मुलांना चांबळी गाव इनाम दिला मनाची वस्त्रे दिली
. पालखीचा मान देऊन बहुमान केला .
या सरनाईकांचे एक मित्र सासवडच्या निरगुडे घराण्यातील होते .सरनाईकानी लुटीच्या भीतीने त्यांनी आपला एक मोहरांचा हंडा सुरक्षित राहावा म्हणून सासवड मधील निरगुडे मित्राकडे दिला
. हल्लेखोरांनी सासवड प्रथमतः लुटण्यास सुरवात केली . अनेक घरे धुवून काढली . पण निरगुडे मोठे प्रसंगावधानी होते . त्यांनी हल्लेखोरांना चाकावण्यासाठी घरातील धान्य कपडे भांडी इतस्ततः पसरून टाकली .
लुटारूंची टोळी जेंव्हा घरात शिरली तेंव्हा त्यांना इतस्ततः पडलेले सामान दिसले त्यांना वाटले हे घर आधीच लुटले गेले आहे . अशी समजूत होऊन ते पुढे निघून गेले
. लुटीची वार्ता चांबळीला सरनाईकांच्या कानावर गेली ते चिंतातुर झाले
. निरगुडे यांनी चांबळीस सरनाईकांना सांकेतिक भाषेत निरोप पाठवला . " तुमची बाळंतीण सुखरूप आहे "
"सरनाईकानी पुढे हा मोहरांचा हंडा परत चांबळीस नेला. निस्वार्थी , विशुद्ध मित्रप्रेमाचे व प्रामाणिकपणाचे या पेक्षा आणखी दुसरे कोणते उदाहरण असू शकते ?
प्रामाणिकपणा, धाडसीपणा, चातुर्य ,संघटनकौशल्य, बुद्धिचातुर्य या सारखे कितीतरी गुणसंपन्न लोक माझ्या सासवड मध्ये राहिले .
देव ,देश, धर्मासाठी लढ़लेली प्रसंगी प्राणांचं बलिदान दिलेली माझ्या सासवड मधील आहेत .
त्यांचे वंशज माझ्या सासवड मध्ये राहतात त्यांना बघितले तरी प्रत्येक घराण्याच्या इतिहास डोळ्या समोर उभा राहतो . म्हणून माझं माझ्या सासवड वर नितांत प्रेम आहे . एका इंग्रज चित्रकाराने काढलेले संगमेश्वरचे अप्रतिम चित्र पाठवीत आहे.
No comments:
Post a Comment