विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

इराप्पा कोरवी आणि राजर्षी_शाहू_महाराज

इराप्पा कोरवी आणि राजर्षी_शाहू_महाराज
इराप्पा कोरवी हा पट्टीचा शिकारी,भटक्यांमधील कोरवी जमात तोरगलच्या जहागिरीत वास्तव्य करुन होती.इराप्पा त्याच्या भाऊबंदांसह तोरगलकर सरकारकडे शिकारीच्या ताफ्यात होता . एकदा शाहू महाराज तोरगलकडे शिकारीस आले होते, तोरगलकरांच्या ताफ्यातील कोरवी ज्या शिताफीने शिकार करीत , ती बाब महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही,शाहू महाराज तोरगलकरांना म्हणाले,' तुमच्या या कोरवी मंडळींपैकी काही मला द्या.तोरगलकर सरकारांनी होकार दिला.महाराज कोल्हापूरला निघून गेले,एके दिवशी इराप्पा कोरवीला तोरगलकरांनी बोलावून घेतले व म्हणाले,'अरे इराप्या, तुझी शिकारीची पध्दत शाहू महाराजांना फार आवडली आहे.त्यांच्या संस्थानात नोकरीसाठी त्यांनी तूला बोलवले आहे,तू त्यांच्याकडे जाशील काय? ' इराप्पा थोडासा घुटमळला.मग थोडा विचार करुन म्हणाला, ' सरकार तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी एकटाच कसा जाऊ? माझ्या जातीची, नात्यागोत्यातली सर्व माणसं इथच आहेत.त्यांना सोडून एकटाच कसा जाऊ? माझ्या सोबत आमची काही माणसं देणार असाल तर जातो. तोरगलकरांनी इराप्पाला बरोबर आणखी काही लोक नेण्याची सम्मती दिली,इराप्पाने मग मुत्ताप्पा कोरवी,गुराप्पा कोरवी यांना सोबत घेतले,बायका - मुलांसह ते कोल्हापुरी आले.
या कोरव्यांना पाहून महाराजांना खूप आनंद झाला,त्यांनी या कोरव्यांची रहाण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्याचा हुकूम दिला.शिकारखान्यात कोरवी मंडळींना नोकरीस ठेऊन राजवाड्याच्या परिसरातच त्यांच्या राहण्याची व्यवस्था महाराजांनी केली. या कोरव्यांचा व महाराजांचा खूपच स्नेह जमून आला . महाराजांबरोबर शिकार करून त्यांच्यासोबतच जंगलात पंगतीला बसण्याचे समाधानी जीवन त्यांना लाभले, एकदा इराप्पा, मुत्ताप्पा व गुराप्पा महाराजांच्या बरोबर सोनतळी कँपकडे निघाले.महाराजांच्या प्रसिध्द खडखड्यात स्वतः महाराज, काही अधिकारी व एक मराठा जमादार बसले होते,महाराजांचा हा रथ त्याच्या खडखड्या आवाजासाठी तर प्रसिध्द होताच पण त्यात बसणारांना हादरे आणि दणकेही बसत . पण महाराज म्हणत, हादरे आणि दणके बसण्याची माणसाला सवय पाहिजे !
तर अशा या खडखड्यात कोरवी मंडळी उभी होती,खडखडा निघाला.रस्त्यातील खाचखळग्यांमुळे माणसे एकमेकांवर आपटत होती . नेमका मुत्ताप्पा कोरवी मराठा जमादाराच्या अंगावर पडला . जमादाराचा पारा चढला,जमादार ओरडला,काय रे मुत्या, माजंरखाऊ!!! लाज न्हाई वाटत मला शिवतूस ते ! ' मुत्ताप्पा यावर काय बोलणार ? त्याने शरमेने मान खाली घातली,पुढच्या बाजूला बसलेल्या महाराजांनी जमादाराचे शब्द ऐकले होते आणि लक्षातही ठेवले होते.खडखडा सोनतळी कॅम्पात आल्यावर महाराजांनी मुदपाकखान्यातील माणसाला बोलावून घेतले व सांगीतले ' एक मांजर धरुन आण आणि त्याचा रस्सा व मटण करुन त्या जमादाराला वाढ . कोणाला समजता कामा नये . लवकरच महाराजांची पंगत बसली. इतर अधिकाऱ्यांसोबत महाराजांच्या पंगतीला हा जमादारही होताच.खानसाम्याने आपले काम चोख बजावले होते . जेवण झाल्यावर एकेक करुन मंडळी महाराजांना मुजरा करुन जाऊ लागली . जमादारही हात पुसत महाराजांसमोर आला, मुजरा करुन निघाला, तसा महाराजांनी प्रश्न केला , ' काय जमादार , आजचा रस्सा आणि मटणाचा बेत कसा काय होता ? जमादार म्हणाला , ' महाराज , रस्सा तर झ्याक झाला होता. का बरं ? ' जमादाराला महाराजांच्या स्वभावाचा परिचय होताच . पण त्याला फारसा विचार करायची संधी न देताच महाराज खानसाम्याला म्हणाले,अरे जमादारांनी आवडीने खालेल्या जनावराचं मुंडकं आणि कातडं आणून दाखवा त्याला, खानसाम्याने धावतच जाऊन मांजराचे मुंडके आणि कातडे आणून जमादाराच्या पुढ्यात ठेवले , ते बघून जमादाराची बोबडीच वळली,तो वरमला... महाराजांचे पाय धरु लागला . महाराज जमादारावर कडाडले,मघाशी तू मुत्ताप्पाला मांजरखाऊ म्हणाला होतास , आता तू कोण झालास ? आपल्या जातीत राहिलास का ? अरे , खाण्या - जेवण्यावरुन माणूस लहान - मोठा ठरत नाही, खबरदार यापुढे कुणाला जातीवरुन काही म्हणशील तर. माझ्या राज्यात जातीवरुन कुणाला कमी लेखलेलं मी खपवून घेणार नाही !
संदर्भ:-राजश्री शाहू स्मारक ग्रंथ--व्यंकप्पा भोसले ( इराप्पा कोरवीचे नातू)

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...