विजापूर दरबारात मुद्पाकखान्यात (भटारखान्यात) एक इसम कामाला होता.
त्याच्या कामामुळे त्याला सर्वजण भटारी म्हणत. त्याला एक मुलगा झाला,
त्याचे नाव त्याने 'अब्दुल्लाखान भटारी' असे ठेवले.हाच 'अब्दुल्लाखान' पुढे
'अफजलखान' या नावाने कुप्रसिद्ध झाला.
( महाराष्ट्र इतिहास मंजरीमध्ये द.वि.आपटे यांनी प्रकाशित केलेले अफजलखानाचे चित्र )
त्याची जन्मतारीख उपलब्ध नाही. त्यामुळे अंदाज लावायचा झाल्यास इ.स.१६१०- १६१२
मध्ये त्याचा जन्म झाला असावा.त्याचा बाप मूळचा अफगाणिस्तानचा होता.म्हणून
तो एक अफगाणी पठाण होता.अफजलखान हा धिप्पाड देहाचा, प्रचंड ताकदीचा आणि
भल्यामोठ्या उंचीचा होता. अंदाजे ७-८ फूट त्याची उंची आणि १००-१५० किलो त्याचे वजन असावे.'अफजलखान' हे त्याचे नाव नसून स्वतः आदिलशहाने त्याला दिलेली पदवी होती.
( त्याची रंगीत प्रत )
अफजलखान सुरुवातीला रणदौला खानाकडे नोकरीला होता.२१
ऑगस्ट १६३८ च्या एका पत्रात 'परवानगी अफजलखान' असा शेरा आहे. म्हणजे महाराज
जेव्हा ८वर्षांचे होते तेव्हा हा राजनीतीचे डाव खेळत होता. अजून एक पुरावा
म्हणजे इ.स.१६५७ साली औरंगजेबाने शहाजानला लिहिलेला पत्रात 'अफजलखान हा
रणदुल्लाखानाचा सेनापती असून त्याला बादशहा आदिलखानाने मोठी दौलत दिली
आहे.' असा उल्लेख आहे.त्यावेळी रणदौलाखानाचा शब्द हा आदिलशहाचा शब्द असे
मानले जाई.
( अफजलखानचा शेरा असलेले पत्र )
अफजलखानाची ताकद सांगणारी एक आख्यायिका आहे.एकदा
विजापूरला रस्त्याच्या एका खड्यात तोफेचे चाक अडकले. दहा माणसांना सुद्धा
ते हलवले जात नव्हते.तेव्हा तिथे अफजलखान आला.त्याने असा जोर लावला कि ती
तोफच १मी. पर्यंत पुढे सरकली. अशा अफाट ताकदी बरोबरच तो खूप क्रूर, खुनशी,
कपटी, अहंकारी, द्वेष्टा, राक्षसी वृत्ती असणारा, पण स्वतःच्या फायद्याचे
असणारे राजकारण उत्तमपणे तडीस (पूर्णत्वास) नेणारा होता.
त्याचा आपल्या ताकदीवर प्रचंड आत्मविश्वास आणि अहंकार
होता.त्याने विजापूर जवळ असणाऱ्या एका गावाला 'अफजलपुर' असे स्वतःचे नाव
दिले.तिथे आणि शहापूर येथे एक शिलालेख लावला. त्यात तो लिहितो,
''कातिले मुतमर्रीदान व काफिरान,
म्हणजेच
'बंडखोर आणि काफ़िरांची कत्तल करणारा आणि मूर्ती पायासकट फोडणारा.' त्याने
मूर्तीची नासधूस केल्याचा उल्लेख पुढे आहेच.तसेच तो स्वतःला संबोधताना
'अफजलखान मुहम्मदशाही' म्हणतो आणि एक विशेषण लावतो. 'फर्जंद - ए - रशीद'
म्हणजेच शहाणा पुत्र.
खानाचा शिक्का त्याच्या अहंकाराचा पुरावा देतो. तो असा-
'' गर्र अर्ज कुनद सिफहर अअला
अर्थ
:- जर उच्च स्वर्गाला इच्छा झाली कि उत्तम माणसांची उत्तमता आणि
अफजलखानाची उत्तमता याची तुलना करून दाखवावी तर प्रत्येक ठिकाणाहून
जपमाळेतील (अल्ला अल्ला) आवाज ऐवजी अफजल हा आवाज येईल.
( फर्जंद-ए-रशीद अफजलखान मूहम्मदशाही याचा अहंकारी शिक्का )
यावर बाबासाहेब पुरंदरे लिहितात,'' अर्थात हा त्याचा गैरसमज होता.''
असं म्हणतात,
''जी मानस शरीराने जास्त असतात,
जी मानस डोक्याने जास्त असतात,
मात्र
अफजलखानाच्या बाबतीत असं काही नव्हतं. ताकदीबरोबरच तो बुद्धिमानही होता
आणि अंधश्रद्धाळू हि होता.त्याचा ग्रहनक्षत्र, भविष्य यांवर खूप विश्वास
होता. तसेच तो अत्यंत कडक शिस्तीचा उत्तम प्रशासक होता.तो आपल्या आमलाखालील
प्रजेवर कधीही जुलूम अन्याय करीत नसे.याच अफजलखानाने दिलेले काही
न्यायनिवाडे उपलब्ध आहे.त्यात त्याने कोणावरही अन्याय केलेला दिसत नाही.
न्यायाधीश म्हणून न्याय देताना तो जातीय पक्षपात करीत नसे असे दिसते.एकदा
त्याच्या आमलाखालील गावकामगारांनी ऐन पेरणीच्या दिवसात पेरणीच्या कामाचा
खोळंबा करून दुसरीकडे मुक्काम ठोकला. रयतेच्या हिताच्या कर्तव्यात बेपर्वाई
केली म्हणून खानाने दि.१५ जुलै १६५४ रोजी त्यांना एक पत्र लिहिले. त्यात
तो लिहतो,'' रयत आमचे पोंगडे* आहे. (त्यांच्या हितात बेपर्वाई केल्यास)
तुम्हाला जनोबासमेत* कापून काढून तेलाच्या घाण्यात पिळून काढीन.''
*येथे पोंगडे म्हणजे मित्र आणि जनोबा म्हणजे बायकापोर.
या अफजलने कर्नाटक स्वारीच्या वेळी शिरोपट्टणच्या
कस्तुरीरांगाला ताहासाठी आमंत्रण दिले आणि त्याचा दगाबाजीने खून केला.
दि.२९ मार्च १६५७ रोजी औरंजेबाने विजपुरावर हल्ला केला. तेव्हा खानाने
त्याला कैद केले.पण औरंगजेबाने विजापूरचा सेनापती खान महंमद याच्या मदतीने
तेथून पळ काढला.नाहीतर औरंजेबाचा अंत निश्चित होता.हि गोष्ट खानाला समजली
तो भयंकर संतापला विजापूरच्या दरबारात त्याने थैमान घातले आणि खान महंमद
दरबारात येताच त्याचे तुकडे तुकडे केले.
भोसले घराण्याचा खानाला खुप द्वेष होता. कनकगिरीचा किल्ला काबीज
करण्यासाठी अफजलखान आणि संभाजीराजे पहिले यांची नेमणूक केली गेली होती.
संभाजीराजांनी हल्ला केला तेव्हा त्यांना जरूर ती मदत खानाने केली नाही.
त्यामुळे ते तेथेच ठार झाले. मुस्तफाखान आणि बाजी घोरपड्याने शहाजीराजांना
कैद केले तेव्हा त्यांच्या हातापायात बेड्या घालून, अत्यंत अपमानास्पद
रीतीने विजापुरात मिरवत आणणारा अफजलखानच होता.
यावेळी दख्खनमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामास
सुरुवात केली होती मराठ्यांच्या फौजानी विजपुरात धुमाकूळ घातला होता.
महाराजांसमोर उभे रहण्याचे कोणाचेच सामर्थ्य नव्हते.अशा परिस्थितीत
विजपुरात दरबार भरला. दरबारात मोठे मातबर सरदार हजर होते. पैजेचा विडा
ठेवला होता आणि इतक्यात बड्या बेगम साहिबिनीने सवाल फेकला, ''बताओ, कौन
तयार है सिवाको गिरफ्तार कारने के लिए? कौन लाएगा सिवाको बिजापूरमे?,बताओ''
भयाण शांतता.दरबारात कोणीच पुढे यायला तय्यार
नाही.सर्वजण माना खाली घालून उभे होते. बडी बेगम म्हणते 'दरबारात मर्दच
उरला नाही.' इतक्यातच हा धिप्पाड देही राक्षस अफजलखान पुढे आला.बादशहाला
कुर्निसात केला आणि मोठ्या जोराने अहंकाराच्या भरात ओरडला, ''मैं लाऊंगा
सिवाको'' आणि त्याने पैजेचा विडा उचलला.कौतुक झाला दरबारात त्याच.
बादशहा खानवर खूप खुश
झाला. त्याला ६०हजारांची फौज, हत्ती, घोडे, उंट, निशाणे, मोठा खजिना देऊ
केला.पूर्वी बादशहा लोक कोणत्याही मोहिमेवर जाण्या आगोदर मुहूर्त पाहायचे
त्यावर त्यांचा विजय अवलंबून होता.असा त्यांचा समज. अफजलखान अंधश्रद्धाळू
असल्यामुळे त्यातलाच एक होता. पण शिवाजी महाराज मात्र तसे नव्हते.ते
मोहिमेवर उत्तम नियोजन करून जायचे मुहूर्त पाहून नाही. म्हणूनच त्यांनी
अमावस्याच्या दिवशीही लढाया केल्या..असो तर खानाने शुभ मुहूर्त काढण्यासाठी
काजीला बोलावले होते.कदाचित त्याचे नाव अवलिया फकीर असावे.काजीने मुहूर्त
पहिला आणि खानाला म्हणाला,'' खान साहब आप सिवाका पिछा छोड दो| यही आपके
लीये सही रहेंगा| आपको वाहापे दगा होने वाला है| मुझे आपका बिना मुंडीका
शरीर दिख रहा है|'' हे एकून खान प्रचंड संतापला. त्याने त्या काजीच्या
मुंडीला धरलं आणि पिळल. एका क्षणात काजी मेला.
(काजीच्या मारण्याचा उल्लेख फक्त शाहीर बा.देशमुख यांच्या पोवाड्यात मिळतो.)
त्यानंतर खान आपल्या वाड्यात आला त्याला त्याच्या
बायकांची चिंता वाटू लागली. त्याला एकूण बायका होत्या ६३.त्याला मोहिमेवर
दगाफटका झाल्यास त्यांनी दुसऱ्या पुरुषासोबत राहन त्याला मान्य
नव्हतं.म्हणून त्याने त्या सर्वाना एका विहिरीजवळ नेले.तीच नाव खुनबावडी
किंवा सुरुंग बावडी आणि या सैतानाने एका मागे एक अशा त्याच्या ६३बायकांना
त्या विहिरीत बुडून मारलं.त्या विहिरीजवळ त्यांच्या कबरी बांधल्या आणि
स्वतःसाठी एक मोठी आणि प्रशस्त कंबर बांधून ठेवली.जर त्याला दगाफटका झाला
तर त्याला तिथेच पुराव या इराद्याने.पण त्याच्या नशिबात ती कबर नव्हती.
Ba'rthelemu Abey Carey नावाचा
एक फ्रेंच प्रवासी सन१६७३ दरम्यान अफजलपुर जवळून प्रवास करीत असताना
त्याला ह्या कबरी दिसल्या त्याने विचारपूस केल्यावर त्याला समजले की
अफजलखानाने त्याच्या ६३बायकांना बुडवुन मारले. त्याने हे सर्व त्याच्या
प्रवास वर्णनात लिहिले.त्यामुळे आपल्याला आज हा इतिहास समजला. आजही ते
ठिकाण कर्नाटकात विजपुरात आहे. आता त्या गावाला ६०कबर असे नाव पडले आहे.
आणि हा सैतान आपली फौज घेऊन
दख्खनच्या दिशेने निघाला.त्याचा पहिला मुक्काम पडला आणि तिथेच त्याला
अपशकुन झाला त्याचा फत्तेलष्कर असलेला डालगज नावाचा झेंड्याचा हत्ती मरण
पावला.त्याकाळी झेंड्याचा हत्ती मरण पावणे म्हणजे खूप मोठे अपशकुन समजले
जायचे. यामुळे तर काही जण मोहीम सोडून मागे यायचे. पण हा खान तसा
नव्हता.बादशहाला हि खबर समजली त्याने लगेच त्याचा बिनीचा हत्ती खानासाठी
रवाना केला.
मजलदरमजल मारीत हा सैतान
तुळजापुरास आला.तेथील प्रसंगाबद्दल सभासद लिहितो, ''अवघी फौज एकत्र होऊन
औरस चौरस लष्कर उतरले. आणि पुढे तुळजापुरास आले तेथे येऊन मुक्काम
केला.श्रीभवानी कुलदेवता महाराजांची तीस फोडून जातीयता घालून भरडून पीठ
केले.भवानीस फोडताच आकाशवाणी जहाली कि, ''अरे अफजला निचा आजपासून एकविसावे
दिवशी तुझे शीर कापून तुझे लष्कर अवघे संहार करून नवकोटी चामुंडास संतृप्त
करिते''. ''
पुढे बा.पुरंदरे लिहितात,'' खानाने देवीपुढे एक
गायही मारली.'' असाच नंगानाच त्याने पंढरपुरातही केला. हिंदूंची देऊळ
फोडणे, हिंदूंच्या मुलींवर अत्याचार करणे, गरीब रयतेचे हाल करणे त्याने
चालू केले होते. पण त्याच जे मुख्य उद्दिष्ट होते त्यात त्याला यश आले
नाही.ते म्हणजे महाराजांना पकडण्याच.
त्याने
दुसरा कपटाचा डाव आखला. महाराजांच्या सरदारांना फार्माने, सुभेदारी,
धनदौलत, नाहीतर धमकी देऊन फितवण्याची तय्यारी सुरु केली. धनदौलतीच्या
मोहामुळे खंडोजी खोपडा देशमुख हा फितूर होऊन खानाला शामिल झाला. परंतु
कान्होजी जेधे* यांनी आपली निष्ठा दाखवली आणि स्वराज्याची सेवा स्वीकारली.
( कान्होजी जेधे* यांच्यावर मी या आधी लिहिले आहे. ते वाचायचे असल्यास मी त्याची लिंक खाली देत आहे. )
अफजलखानाचे सर्व डाव अयशस्वी होत होते.त्यामुळे त्याने
शेवटचा डाव आखला तो म्हणजे दगाबाजीचा. महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या
पायथ्याशी भेटायला बोलवले होते. भेटीला जाण्याच्या वेळेसही त्याचे सल्लागार
मंडळी त्याला तिकडे न जाण्याचा सल्ला देत होते.पण आपल्या ताकदीच्या
अहंकाराने याला झपाटले होते त्यामुळे त्यांचे त्याने एकही नाही ऐकले. खान
मात्र खूप नशीबवान होता. कारण त्याला भेटायला स्वतः क्षत्रियकुलावतंश
छत्रपती शिवाजी महाराज येणार होते. भेटीचा दिवस होता गुरुवार दि.१०
नोव्हेंबर १६५९ .
या भेटीबद्दल माहित नाही असा
एकही मानूस महाराष्ट्रात सापडणार नाही. याभेटीत खानाची दगाबाजी,
महाराजांचे उत्तम नियोजन, त्यांचे बुद्धीचातुर्य यामुळे त्यांनी खानाचा
कोथळाच बाहेर काढला.जखमी खान पळत असताना संभाजी कावजी कोंढाळकर* याने
त्याचे शिर कापले. जिवा महालाने* महाराजांचे प्राण वाचवले हे सर्व झाले.
शेवटी या सर्वशक्तिमान राक्षसाचा अंत झाला. नंतर महाराजांनी त्याची कबर
प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्याचे शिर प्रतापगडावर नेले आणि नंतर
ते राजगडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाज्यात ठेवुन त्याची नित्यनियमाने
पूजाअर्चा करण्याची व्यवस्था केली.महाराजांच्या या पराक्रमाची बातमी
विजापुरी गेली संपूर्ण विजापूर 'शिवाजी' या नावानेच थराथरा कापायला लागले.
( अफजल खानाची समाधी -किल्ले प्रतापगड )
(*या दोन वीरांबद्दलही मी याआधी लिहिले आहे. त्याची लिंक खाली देत आहे)
संदर्भ सूची :-
◆राजाशिवछत्रपती (पृ.क्र.२५१-३१७)
◆सभासदाची बखर ◆इतिहासाच्या पाऊलखुणा ◆अफजलखानचा वध ◆महाराष्ट्र इतिहास
मंजरी ◆'प्रतापगडचा रणसंग्राम' शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा
पोवाडा ◆शिवकालीन पत्र
◆डॉ.विजय कोळपे यांचे व्याख्यान
No comments:
Post a Comment