मराठ्यांनी सुरत, बसनुर, बराणपुर, औरंगाबाद हि औरंगजेबाची प्रमुख ठाणी
लुटली. त्याच प्रमाणे बागलान, दिंडोरी प्रांतातील कित्येक किल्ले
मराठ्यांनी जिंकले.साल्हेरचा गडही त्यातलाच मराठ्यांच्या या आक्रमणामुळे
औरंगजेब पूर्ण वैतागला होता.त्याने ''मराठ्यांवरील मोहिमेसाठी तुम्ही
दख्खनवर कूच करा.'' असा हुकूम इ.स.१६७१ साली 'बहादूरखान व दिलेरखान ' या
दोघांना दिला. दि.१ जून १६७१ च्या एका पत्रात 'बादशहाने बहादरखान व
दिलेरखान हे दोन उमराव शिवाजीच्या मुलखावर पाठविले.ते सुरतेस
आले.सुरतेशिवाय इकडील सर्व मुलखावर कारभार बादशहाने दिलेरखानाच्या हवाली
केला आहे.' असा उल्लेख मिळतो.
या वेळी महाराज शिवापट्टणास म्हणजेच
खेड शिवापुरास होते.त्यांना मोगली फौजेच्या खबरा येत होत्या.त्यांनी आपल्या
फौजेला योग्य त्या आज्ञा केल्या.
हा दिलेरखान रवळागडावर चाल करून गेला.रवळागडावर
मराठयांचे आणि खानाच्या सैन्याचे मोठे युद्ध झाले.खानाच्या हाती काय गड
लागला नाही.त्याने रवळागडाचा नादच सोडला.आणि हा अत्यंत कडवा आणि हट्टी
दिलेरखान नाशिकच्या सातमाळा डोंगररांगेच्या कण्हेरगडाच्या दिशेने वळला.
कण्हेरगडाच्या पायथ्याला महाराजांचा एक विश्वासू शिलेदार अवघ्या हजार
(१०००) मावळ्यानिशी गस्तीवर होता.त्याच नाव होत 'रामजी पांगेरा.'
एका विश्वासू ग्रंथात याचे नाव 'रामजी पांगरीक' असेही आढळते.हा खूपच शूर होता. प्रथम याचा उल्लेख प्रतापगडच्या रणसंग्रामात येतो. जावळीच्या जंगलात खानाच्या सैन्याविरुद्ध याने भयंकर थैमान घातले.खानाच्या सैन्याची कत्तल करून त्याचे २००० घोडे धरून आणले. असं म्हणतात त्याने जर दोन्ही हातात धोप घेऊन त्या फिरवायला सुरुवात केली तर त्याच्या जवळ जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नसे.आणि आता हा कण्हेर गडाच्या पायथ्याशी उभा होता.
दिलेरखानाची १०हजार करड्या पठाणांची
फौज कण्हेरच्या दिशेने येत होती. -(अनेक इतिहासकारांच्या मते तेव्हा दिलेर
बरोबर ३० हजारांची फौज होती.पण इतिहास अभ्यासाचे विश्वासू साधन असलेल्या
सभासदाच्या बखरीत 'दिलेरखानास १०हजार स्वारांनिशी रवाना केले' असा उल्लेख
या संदर्भात आहे.त्यामुळे तेव्हा त्याच्या कडे १०हजारांची फौज असावी.)-
रामजीला त्याच्या हेरांकडून हि बातमी समजली. त्याने ठरवले असते तर तो गडावर
जाऊन सुरक्षित राहिला असता.पण त्याने तसे केले नाही.त्याने आपल्या हजार
मावळ्यांमधून सातशे (७००) मावळे बाजूला काढले. त्यांच्या समोर उभा राहून तो
म्हणाला,''ज्याला लढायच हाय त्यान माझ्या बरोबर या, ज्याला पळायच हाय
त्यान पळा. पण लक्ष्यात ठेवा 'जो लढल त्याला सोन्याची कडी अन जो पळल त्याला
चोळी बांगडी.' हर हर महादेव!''
रामजीने डोक्यावरचे मुंडासे काढले, अंगातला
अंगरखा फाडला, आणि तो उघडा बोडका झाला.मावळ्यानीही तेच केले.रामजी आपल्या
दोन्ही हातात दोन मोठे धोप घेऊन हर हर महादेवाचा गजर करीत खानाच्या
फौजेच्या दिशेने पळत सुटला.त्याच्या मागे मावळेही पळत सुटले.हर हर
महादेवच्या गर्जना करीत येणारी मावळ्यांची तुकडी दिलेरने पहिली आणि त्याने
त्या चिमूटभर फौजिकडे पाहून आपल्या पाठाणांच्या फौजेला त्यांच्यावर
सोडले.प्रचंड जोरदार युद्ध सुरु झाले. मावळे देहभान विसरले होते.रामजीने
पठाणांची कत्तल सुरु केली.हा वाघ चवताळून उठला होता. त्याचे ते रूप पाहून
त्याच्याजवळ जायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती.कण्हेरचा परिसर किंकाळ्या,
आरोळ्या आणि हर हर महादेव अशा गर्जनांनी दणाणून गेला. या प्रसंगाबद्दल
सभासद लिहितो, '' टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडीले.''
मराठ्यांनी बाराशे पठाणांची कत्तल
केली.रामजीने शौर्याची शर्थ केली.मराठ्यांचे ते रूप पाहून खानाच्या
फौजेच्या मनात धडकी भरली. ते लोक चहूबाजूला पळत सुटले.स्वतः दिलेरखान
आश्चर्याने थक्क झाला.त्याला पुरंदरच्या मुरारबाजीचीच आठवण झाली.मावळ्यांनी
रक्तस्नान केले. एका एकाला वीस वीस तीस तीस जखमा झाल्या. कित्येक मावळे
आणि त्यांच्या बरोबर रामजी पांगेराही मरण पावला.केवळ सातशे मावळ्यांना
सुद्धा १०हजारांची पठाणी फौज मात देऊ शकली नाही. एवढ्या ताकदीचे हे मावळे
होते.हे युद्ध नाशिकच्या भुमीवर झाले.हे एकच नाही तर असे बरेच युद्ध या
भूमीने पहिले आहे.आणि दरवेळी शत्रूची हारही या भूमीने पहिली आहे.असे योद्धे
येथे असल्यामुळे नाशिकला 'योद्ध्याचं शहर (The City of Warrier)' असेही
म्हणतात.
इतिहासाला रामजीच गाव माहित नाही, घर माहित
नाही.फक्त त्याच नाव आणि त्याचा हा आभाळा एवढा पराक्रम मात्र माहित
आहे.यावर इतिहासकार डॉ.विजय कोळपे यांनी संशोधन केले. त्यांच्या मते
प्रतापगड ते रायगड दरम्यान एका ठिकाणी दोन डोंगरांच्या कुशीत असणाऱ्या एका
टेकडावर ''कोरजाई वाडी'' आहे.येथेच रामजी पांगेराच घर आहे.पण हे सत्य
असावेच असे नाही.
-रोहित सरोदे
संदर्भ सूची :-
◆राजा शिवछत्रपती (पृ.क्र.८१८-८२१)
◆सभासदाची बखर
◆शिवकालीन पत्र
''अफजलखानचा इतिहास''
http://saroderohit.blogspot.com/2020/11/blog-post.html
No comments:
Post a Comment