सोनोपंत विश्वनाथ डबीर
विजापुरात मुहम्मद आदिलशाह मरण पावला होता.यावेळी
मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मोठा कर्तबगार पण तितकाच जहरी होता आणि खुद्द
शाहजहान बादशाहाचा मुलगा होता.शाहजादा औरंगजेब. संपूर्ण दख्खन काबीज
करण्याची त्याची आकांक्षा होती.महाराजांनी दाभोळ बंदर व भवतीचे किल्ले
काबीज करण्याचा हुकूम दिला.मराठ्यांनी मोठ्या पराक्रमाने छापे घालून तेथील
ठाणी व दाभोळ बंदर काबीज केले.
कुठल्याही
राज्याच्या सैन्याची मुख्य फळी म्हणजे त्या राज्याचे हेरखाते.मोहिमांच
निम्मं यश हे हेरखात्यावरच अवलंबून असते.छत्रपती शिवाजी महाराजांचे हेरखाते
हे त्यावेळचे सर्वात उत्तम हेरखाते होते.त्याचे दोन भाग पडतात.पहिले अस्सल
गुप्तहेर आणि दुसरे म्हणजे वकील.एखाद्या तिखट नजरेच्या, अत्यंत सावध आणि
अत्यंत हुशार माणसाची वकील म्हणून निवड होत.मोहिमेवर असताना परराज्यात
बोलणी करण्यासाठी त्याला पाठवले जाई.तेथील बातम्या उत्तमप्रकारे आणण्याची
जबाबदारी त्याला दिलेली असे.महाराजांचे वकील मंडळी असे असत. त्यातलेच एक
होते 'सोनोपंत विश्वनाथ डबीर.'
दाभोळ बंदर काबीज झाल्यावर
महाराजांनी लगेच सोनोपंतास बिदर परगण्यात औरंगजेबाकडे रवाना केले.या मागे
हेतू होता, 'आतापर्यंत विजापूरकरांचे जे जे किल्ले, मुलुख आणि दाभोळ बंदर
जिंकले त्यास दिल्लीचा शाहजादा औरंगजेब याची मान्यता मिळावी.' म्हणजे
प्रदेश विजापूरकरांचा आणि मान्यता दिल्लीच्या औरंगजेबाची. यावर बाबासाहेब
पुरंदरे लिहितात, ''याला साळसुदपणा म्हणतात, उगीच मोठेपण देऊन आपण दिल्लीशी
फार निष्ठावंत आहोत हे दाखविण्याचा हा आव होता.''
सोनोपंतांनी मोठया नम्रपणे औरंगजेबाची भेट घेतली.आपल्या गोड
बोलण्याने त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले.'महाराजांनी जिंकलेल्या
मुलुखावर मान्यता असावी,' असा अर्ज केला.शिवाजी सारखा पराक्रमी माणूस
आपल्याशी नमुन वागतो आहे,हे पाहून तो मात्र खुश झाला.त्याने मोठ्या मनाने
महाराजांच्या अर्जास मान्यता दिली. सोनोपंतांच्या हवाली एक पत्र दिले.मूळ
फारशी भाषेतील त्या पत्रात असे काही लिहिले होते,
''सांप्रत विजापूरकरांकडील जे किल्ले, जो मुलुख आणि दाभोळच्या खालील मुलुख
तुम्हाकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे.तुमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे.''
या पत्रावर तारीख आहे,दि. २३एप्रिल १६५७ (१८रजब १०६७हिजरी).
आपल्या गोड बोलण्याने सोनोपंतांनी औरंगजेबास आधिच
हरभाऱ्याच्या झाडावर चढवले होते.त्यानंतर त्यांनी त्याच्या फौजेत फेरफटका
मारण्याची अनुमती त्याच्याकडे मागितली, त्याने ती खुशी खुशी ने
दिली.फेरफटका मारता मारता सोनोपंतांनी त्याच्या सैन्याची खंडांखडा माहिती
मिळवली.हि सर्व माहिती महाराजांना मिळाली. महाराज सुमारे पाचशे सहाशे मावळे
बरोबर घेऊन पुण्यात दाखल झाले.
जुन्नरचे मोगल ठाणेदार अगदी
बेफिकीर होते. खटावर पडल्या पडल्या हुक्का फुंकीत होते.त्यांना वाटले, कि
शिवाजीने आता औरंगजेबाकडे आपली निष्ठा व्यक्त केली आहे.आता मोगल मुलुखाला
त्याच्याकडून काहीच त्रास होणार नाही.तो फार चांगला आहे.आता निवांत
झोपा.त्या काळोख्या रात्री महाराज जुन्नरपाशी येऊन धडकले.
महाराजांनी इशारा करताच नंग्या तलवारी घेऊन मावळे
जुन्नरच्या ठाण्यात घुसले.तशी जुन्नरची तटबंदी उंच होती.पण हि मंडळी त्या
तटावरून कोटात शिरली आणि आतून दरवाजे उघडले. कोणी हत्यारांच्या ठाण्यात,
कोणी खजिन्याचा खोलीत, कोनी दारूगोळ्याकडे धावले. मोगल खडबडून जागे
झाले.कापाकापी सुरु झाली. मराठे जे दिसेल ते उचलत होते.सातशे जातवान घोडे
सगळा खजिना, कापडाची ठाणी, हत्यारे, हिऱ्यामोत्यांच्या संदुका सारे भराभरा
पळवले गेले. मोगल फक्त मरत होते.या संदर्भात एक उल्लेख मिळतो तो असा,
''जुन्नरला साडेदहा लाख रुपये, हिरेमोती, कापड, सामानसुमान, शिवाय सातशे
घोडे महाराजांना मिळाले.'' हि सर्व लूट महाराज स्वराज्यात घेऊन आले.
हि घटना घडली
दि. ३०एप्रिल १६५७ रोजी औरंगजेबाच्या त्या मान्यतेच्या पत्राच्या फक्त सात
दिवसांनी.हि बातमी त्याला कळताच तो भयंकर संतापला.पण आता काहीच उपयोग
नव्हता, महाराजांनी त्याला चांगलेच मूर्ख बनवले होते.
यासारख्या अनेक मोहिमांत सोनोपंतांनी महाराजांना
खूप मदत केली.आयुष्यभर स्वराज्यसेवा करून दि. २५जानेवारी १६६५ रोजी सोनोपंत
स्वराज्यसेवेतून मुक्त होऊन ईश्वरीसेवेसाठी स्वर्गात दाखल झाले. अर्थातच
त्यांचे निधन झाले. तेव्हा ते ऐंशी वर्षांचे असावे.
संदर्भ सूची :-
◆राजा शिवछत्रपती (पृ.क्र.२३८-२४२)
◆शिवकालीन पत्र
●नक्की वाचा
''अफजलखानचा इतिहास''
http://saroderohit.blogspot.com/2020/11/blog-post.html
No comments:
Post a Comment