शहाजीराजांना कर्नाटकात जाण्याचा हुकूम मिळाला. त्यामुळे त्यांनी
महाराष्ट्रातील वडिलोपार्जित जहांगिरीची जबाबदारी काही विश्वासू माणसांवर
सोपवली.चाकण परगण्यासाठी त्यांनी अत्यंत विश्वासू, कर्तबगार आणि पराक्रमी
सरदाराची नेमणूक केली.तो म्हणजे फिरंगोजी नरसाळा.पुढे आदिलशहा आणि
मोगलांमध्ये तह झाला आणि त्या तहानुसार चाकणचा परगणा आदिलशहाकडे
गेला.त्यामुळे फिरंगोजीला बादशहाच्या सेवेला जावे लागले. इ.स.१६४७ ला
चाकणचा पूर्ण अधिकार शिवाजी महाराजांनी घेतला.त्यानुसार फिरंगोजीनेही
स्वराज्याची सेवा स्वीकारली.
इ.स.१६६०ला औरंगजेबाने त्याचा मामा 'अमीर-उल-उमराव नवाबाबहादूर मिर्झा अबू
तालिब उर्फ शाईस्तेखान ' ह्याला स्वराज्यावर चालून जाण्याची आज्ञा केली.हा
शाईस्तेखान मोठा पराक्रमी पण खूप क्रूर. शाहजहानची बेगम मुमताजचा हा सख्खा
भाऊ. औरंगजेबाचा सख्खा मामा. शाहजहानचा तो वजीर होता.औरंगजेबाला
दिल्लीच्या तख्तावर बसवण्यासाठी याने खूप मदत केली होती.त्याच्यावर खुश
होऊन औरंगजेबाने त्याला 'शाईस्तेखान' असा किताब दिला होता.तर अशा या
शाईस्तेखानाला ७७हजार घोडेस्वार, ३० हजार पायदळ, हत्ती, उंट, निशाणे,भरपूर
खजिना देऊन स्वराज्यावर पाठवले.सभासद या स्वारीचा उल्लेख लिहितो, ''(हि)
स्वारी म्हणजे कलयुगीचा रावनच. जैशी रावणाची संपत्तीची गणना न करणे तैसाच
खजिना घेऊन दिल्लीवरून निघाला.''
या अफाट
फौजेसह शाइस्तखनाने दि. २८ जानेवारी १६६० रोजी स्वराज्याच्या दिशेने कूच
केली.खानासोबत जसे मोगल सरदार होते तसे मराठेही होते.त्यातच जाधवांची मंडळी
होती.हे जाधव कोण? तर हे जाधव म्हणजे शिवाजी महाराजांचे मामा. म्हणजे एक
मामा चाललाय आपल्या भाच्याच राज्य वाढवण्यासाठी आणि एक मामा चाललाय आपल्या
भाच्याच राज्य मिटवण्यासाठी. किती फरक आहे ना असो. औरंगाबाद, नगर मार्गे हि
स्वारी मजल दरमजल मारत पुण्यात आली. लालमहाल खानाने ताब्यात घेतला,
पुण्यातल्या सर्व किल्ल्यांवर त्याने कब्जा केला. त्यानंतर त्याचे लक्ष
चाकणच्या किल्ल्याकडे गेले. चाकण अजूनही स्वराज्यात होता.चाकण घेतल्यास
पुणे -गुलशनबादचा रस्ता मोगली फौजेस मोकळा होणार होता.हे गुलशनबाद म्हणजे
आताचे नाशिक. हा चाकणचा भुईकोट होता किल्ले संग्रामदुर्ग.
(किल्ले संग्रामदुर्ग)
किल्ले संग्रामदुर्ग एक गढीच होती. जास्तीत जास्त
चारशे हशम राहू शकतील एवढीच. पण हा संग्रामदुर्ग स्वराज्याच्या सीमेवर
होता.त्यामुळे महाराजांनी तेथे भरपूर रसद आणि दारुगोळा यांचा बंदोबस्त केला
होता.या संग्रामदुर्गचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा.दि.२१ जून
१६६०रोजी मोगली फौज चाकणच्या दिशेने निघाली.स्वतः शाईस्तेखानही या
फौजेबरोबर होता.किल्ला पाहताच खानाला वाटलं मोजक्याच दिवसात(४-५दिवसात) गड
आपला होईल. खानाने किल्ल्याला वेढा दिला किल्ल्याच्या दिशेने तोफा
लावल्या.तोफखान्याला हुकूम सुटला.तोफेचे गोळे किल्ल्यांच्या भिंतींना आदळू
लागले. मराठ्यांनी दारूचे मोठमोठे बाण मोगलांवर सोडण्यास सुरुवात केली.पाच
दिवस झाले किल्ला लढत होता.दहा दिवस झाले मराठ्यांनी खानाचा दारुगोळा
उडवला.रात्री फिरंगोजी आणि त्याचे निवडक मावळे गडाबाहेर पडत मोगली
सैन्याच्या लोकांवर अचानक हल्ला करत आणि वाऱ्याच्या वेगाने पसार होत.बघता
बघता पंधरा दिवस लोटले तरी एवढी एवढी गढी सुद्धा मोगलांना ताब्यात घेता आली
नाही.
यावेळी
महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात होते.ते वेढ्यातून सुखरूपपणे निसटले.हि बातमी
खानाला कळली.महाराजांचा त्याला धाक बसला.महिना लोटला तरी संग्रामदुर्ग
त्याला घेता आला नाही.विचार करत असताना त्याला एक कल्पना
सुचली.किल्ल्याच्या नैऋत्यकडील बुरुजाखाली गुप्त भुयार खोदून त्यात स्फोटक
दारू भरून तो बुरुज उडवून द्यायचा आणि किल्ल्यात प्रवेश करायचा.
दि.१४ऑगस्ट १६६०
वेढ्याचा ५५वा दिवस उजाडला.ठरल्याप्रमाणे नैऋत्यकडील बुरुजाला सुरुंग
लावण्यात आले.मोठा स्फोट झाला. बुरुजावरचे माणसे, तोफा, दगड उंच उंच उडाले.
आवाजाने कानठळ्या बसल्या.किल्ल्याला खिंडार पडले. त्यातून मोगली फौज आत
येऊ लागली.अशा परिस्थीतीत पळून जाणे हा मार्ग दिसत असताना सुद्धा मराठे
पळाले नाही. खिंडारातून गनीम 'दीन दीन' करीत आत येत होते. मराठेही 'हर हर
महादेव' अशी गर्जना करीत शत्रूवर तुटून पडले.सबंध दिवसभर मोगल मराठ्यांची
झुंज झाली. फिरंगोजीने पराक्रमाची शर्थ केली.मराठे खूपच मेले. मोगलांचे
दोनशे लोक मारले.
दि.१५ऑगस्ट १६६०
दुसरा दिवस उजाडला.खिंडारातून हजारोंच्या झुंडी येत होत्या. 'आता हि लढाई
आपल्यास खूप जड जाईल शिवाय आपले माणसेही खूप मेले आहे.आता इतरांचा जीव
धोक्यात घालायला नको' असे फिरंगोजीला वाटले. त्यामुळे त्याने भावसिंगच्या
मध्यस्तीने शाइस्तखानाशी तह करून गड त्याच्या हवाली करून उरलेल्या
मराठयांना सुखरूप बाहेर काढले.काय गंमत आहे ना, १५ऑगस्ट रोजी भारत
स्वातंत्र्य झाला होता.पण त्याच्या काही वर्षाआधी स्वराज्याचा किल्ला मात्र
पारतंत्र्यात गेला होता.शाइस्त खानाने फिरंगोजीच्या पराक्रमाचे खूप कौतुक
केले. त्याला मनसब देऊन स्वतःच्या फौजत सामील होण्यास सांगितले.पण
फिरंगोजीने ते कबूल केले नाही. आयुष्यभर त्याने स्वराज सेवेचाच स्वीकार
केला.
महाराजांना हि गोष्ट कळाली. त्यांनीही फिरंगीजीचे
कौतुक केले.आणि त्याला भूपाळगडाची किल्लेदारी दिली.वर्षामागून वर्षे लोटली
गेली. फिरंगोजीने निष्ठेने स्वराज्य सेवा केली. दि.१३ डिसेंबर १६७८ रोजी एक
विचित्र प्रसंग घडला. स्वराज्याचे युवराज शंभूराजे दिलेरखानास सामील झाले.
तसा हा एक महाराजांच्याच गनिमी काव्याचा भाग होता. कारण मोगलांची मोठी फौज
त्यावेळी दिलेरखानास सामील होणार होती आणि महाराज दक्षिण दिग्विजयावरून
नुकतेच आले होते आणि एवढ्या मोठ्या फौजेसोबत युद्धकरने शक्य नव्हते.
त्यातच स्वराज्याच्या सीमेवर दिलेरखान तळ ठोकून होता.म्हणून शंभूराजे
त्यास सामील झाले. 'आणि एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी कि, दिल्लीत
औरंगजेबाने संध्याकाळी काय खाल्ल हे महाराजांना दुसऱ्या दिवशी सकाळी
रायगडावर म्हणजेच जवळपास १५००कि.मी. अंतरावर समजायचं एवढे सतर्क महाराजांचे
गुप्तहेर खाते होते. तेव्हा संभाजी महाराजांबद्दल त्यांना काही माहित नाही
अस होणारच नाही. एवढा पुरावा हि खूप झाला.' खूप मोठी ताकद आता दिलेर
बरोबर होती.ती म्हणजे प्रत्यक्ष स्वराज्याचे युवराज.खानाने भुपाळगडावर
हल्ला करण्याची योजना आखली. गडाच्या शेजारील एका डोंगरावर त्याने तोफा
चढवल्या होत्या.प्रथम शंभू महाराजांनी त्यास आपण कोणतीही मदत करणार नाही
असे सांगितले. गडावर हल्ला झाला.फिरंगोजी चांगलाच झुंजत होता दिवस लोटले
गेले तरी गड काय दिलेरच्या हाती आला नाही.शेवटी त्याला एक कल्पना सुचली
शंभूराजांना पुढे ठेवल्यास गडावरून त्यांच्यावर हल्ला होणार नाही. गड
आपल्या कबज्यात येईल.
दिलेरच्या
फौजेची संख्या जास्त होती. गडावरच्या मावळ्यांचे प्राण वाचावे म्हणून
शंभूराजे आघाडीला आले.त्यांचे सैन्य गडावर येत होते. फिरंगोजी ने तोफेस
बत्ती लावण्याचा हुकूम दिला. पण तो बुरुजा वरून खाली पाहतोतर काय स्वतः
युवराज चाल करून येत आहे.आता महाराजांचा आणि शंभुराजांचा गनिमीकावा त्याला
काय माहित होता.त्याने हल्ला बंद करण्याचा हुकूम दिला.'धान्यावर तोफेचा
गोळा टाकणार नाही' असे त्याने स्पष्ट सांगितले आणि दि.१७एप्रिल १६७९ रोजी
गडाचे दरवाजे उघडले गेले.गड मोगलांच्या स्वाधीन झाला.
संध्याकाळची वेळ होती.शंभू राजांच्या समोरून सातशे
मावळ्यांचे हात पाठीला बांधून चालवले होते.शंभू राजांनी दिलेरखानास
विचारले, ''कोठे घेऊन चाललात याना, खानसाहब?'' दिलेर म्हणतो, ''हुजूर इन
काफ़िरोंके नशीब मे अब बहादूर गड का कैदखाना है|" शंभूराजे संतापले,
संतापलेल्या स्वरात दिलेरास म्हणाले, ''खानसाहब! याना बहादूर गडास पाठविले
तर यादराखा. हे स्वराज्याचे मावळे आहे.गपगुमान यांना स्वराज्याच्या दिशेने
रवाना करा.' परंतु त्या कपटी दिलेरखानाने त्यांचे काही एकले नाही. त्यांना
गाफील ठेऊन त्याने त्या मावळ्यांचे एक हात आणि एक पाय तोडले. पण या
गोष्टीची भनक सुद्द्धा शंभू राजांना लागू दिली नाही.
फिरंगोजी
व सबनीस महाराजांकडे आले.त्यांना सारा वृत्तांत दिला.'गड मुघलांच्या
स्वाधीन गेला ' हे ऐकून महाराज खूप संतापले.'समोर शत्रू म्हणून युवराज असो
वा आणखीन कोणी, तुम्ही तोफेचा गोळा का चालवला नाही? ' असे त्यांना
विचारले.कदाचित फिरंगोजीस त्यांनी शिक्षा केली असेल.कारण यानंतर फिरंगोजीचा
उल्लेख पुढे कुठेच आला नाही.इतिहासाला त्याचे घर, जात, वंशज, अजिबात माहित
नाही.शिवाय त्याच्या समाधीचाही अजून शोध लागला नाही.पण त्याची निष्ठा आणि
पराक्रम सिद्ध करण्यासाठी या कशाचीच आवश्यकता नाही.
संदर्भ सूची :-
◆राजा शिवछत्रपती
(पृ.क्र.३५५-३५८, ३७२-४१२, ९८३-९८६)
◆सभासदाची बखर
◆मराठ्यांची धारातीर्थे
●नक्की वाचा
''अफजलखानचा इतिहास''
http://saroderohit.blogspot.com/2020/11/blog-post.html
No comments:
Post a Comment