विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 24 April 2021

शिवा काशीद

 शिवा  काशीद

महाराज पन्हाळ्यावर अडकले होते. दि. २ मार्च१६६० सिद्दी जौहरच्या ३५ हजारांच्या फौजेने पन्हाळ्याला वेढा दिला होता. सैह्याद्रीचा सिंह कोल्ह्या लांडग्यांच्या वेढ्यात अडकला. त्यातच मे १६६० ला शाईस्तेखान १लाखाच्या फौजेसह स्वराज्यावर चालून आला. स्वराज्य आता दुहेरी संकटात होते. राजांना वेढ्यातून बाहेर काढण्याचा नेताजींनी एक प्रयत्न केला. पण तो हि फसला. राजे आता पावसाची वाट पाहत होते. कोकणातला तो पाऊस खूप मुसळधार असतो आणि सर्वत्र नुसता चिखलच असतो. अशा परिस्थितीत सिद्दी वेढा उठविल. असा राजांचा मनसुभा होता.  जून १६६० धो-धो पाऊस सुरु झाला, सोसाट्याचा वारा सुटला, पाण्याचे छोटे तळे साचले, सर्वत्र नुसता चिखल. पण वेढ्याचा काय झाले? अशा मुसळधार पावसात सुद्धा वेढा एकदम कडक बंदोबस्तात सुरु होता. 



           आषाढ निम्मा संपत आला होता. चार महिने झाले राजांना वेढ्यात अडकून. नेताजींना पराभव भोगावा लागला, पावसानेही सिद्दीचे काही वाकडे केले नाही, तिकडे शाईस्तेखान स्वराज्यात रयतेचे हाल करत होता. आता मात्र राजांना वेढ्यातून बाहेर पडायचे होते. कुठल्याही परिस्थितीत.
            वेढ्यातील सैनिकांची नजर कायम गडाकडे असे. आज ना उद्या कोणीतरी (शिवाजी महाराज) नक्की गडावरून खाली येईल, असा त्यांचा विश्वास होता. आणि झालेही तसेच. दि.११ जुलै १६६०रोजी राज्यांकडून वकील म्हणून गंगाधरपंत तहाचा अर्ज घेऊन सिद्दी जौहर कडे आले. त्यांनी सिद्दीला राजांचा 'फारसी' मजकुराचा अर्ज दिला. त्याचा अर्थ (सारंश) काही असा होता,  "आपल्या आज्ञेने रात्रीच्या वेळी मी आपल्या सेवेत हजर राहील. आपण माझे गुन्हे माफ कराल. माझे रक्षण कराल. मी माझी सगळी मालमत्ता आपल्या स्वाधीन करतो.''
            राजांचा हा गनिमीकावा कळवा एवढा काही तो जौहर हुशार नव्हता. वेढ्यामुळे आणि पावसामुळे वैतागलेल्या जौहरला वाटले, ' शिवाजी बिनशर्त शरण येत आहे. शेवटी तो आपल्या ताकदीला घाबरलाच.' तो खुश झाला. त्याने गंगाधरपंतास अर्जास मंजुरी असल्या चे सांगून दुसऱ्या दिवशी रात्री भेटीस येण्यास सांगितले.
            दि.१२ जुलै१६६० भेटीचा दिवस उजाडला.    'शिवाजी शरण येत आहे.' हि बातमी जौहरच्या तळावर वाऱ्यासारखी पसरली. वेढा आता थोडासा ढिला पडला होता. हीच ती संधी होती, जिचे राजे वाट पाहत होते. राजांनी दोन पालख्या सज्ज केल्या. राजांची योजना विशाळगडावर जाण्याची होती. एक पालखी नेहमीच्या रस्त्याने विशाळगडी जाईल आणि दुसरी आडवाटेने विशाळगडी जाईल. त्या पालखीत शिवाजी महाराज असतील. पण पहिल्या पालखीत बसणार कोण? तर त्यात राजांचा सोंग घेतलेला एक मावळा बसेल. हे काम खूप जोखमीच जर पालखी पकडली गेली तर गाठ थेट मृत्यूशीच. हे माहित असून सुद्धा राज्यांसाठी आणि स्वराज्यासाठी एक मर्द गडी हे सोंग घेण्यास तय्यार झाला. ते होते ' शिवाजी काशीद.' 
( बरेच जण शिवा काशीद असा उल्लेख करतात. पण विश्वनिय ग्रंथ आणि जुन्या कागदपत्रात यांचा उल्लेख 'शिवाजी काशीद' असा आला आहे.)
              शिवाजी काशीद हे नाभिक समाज्याचे होते दिसायला अगदी राजांसारखे, चालायला बोलायलाही राजांसारखे, आणि त्यांची दाढी व केशरचना सुद्धा राजांसारखी. जणू राजांचे आरशातिल प्रतिबिंबच. राजांच सोंग घ्यायला हे तय्यार झाले होते. राजांनी त्यांना या कामाच्या जोखमीची पूर्ण कल्पना दिली होती. प्रत्यक्ष मृत्यूशीच गाठ पडणार हे माहित असून सुद्धा हिंदवी स्वराज्यासाठी हा वीर हसत हसत मृत्यूला सामोरा जायला तय्यार होता.
              राजांनी त्यांना आपला पोशाख दिला. तो अंगावर चढवून ते राजांसमोर आले. राजे आरशात आपले प्रतिबिंबच पाहत आहे असे ते दिसत होते. त्यांना पाहताना राज्यांच्या डोळ्यात आश्रू आले. तेव्हा काशीद त्यांना म्हणतात, '' राज तुमच्या डोळ्यात आसरु (आश्रू). '' राजे म्हणतात, '' शिवा तू आमचा हा पोशाख परिधान केला आहे. आज तू शिवाजी राजा झाला आहेस. पण याचे बक्षीस काय मिळणार ? माहित आहे तुला. ''
       '' व्हय राज माहित हाय. म्या गनिमाला गावल्या वर गनीम मला खतम करणार. पण शिवाजी काशीद म्हणून नाय तर शिवाजी राज म्हणून! सताजन्माची पुण्याई माझी म्हणून तर म्या शिवाजी राज म्हणून मारतोय. या परीस मोठं भाग्य हाय काय. अन हि संधी म्या काय सोडायचोय व्हय.'' 
हे ऐकून राजांचे हात आपल्या छातीवरील चौसष्ट कवड्यांच्या माळेवर गेले आणि राजबोल बाहेर पडले  "जगदंब.. जगदंब..''
              ठरल्या प्रमाणे रात्रीच्या वेळी दोन्ही पालख्या राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडल्या. राजां ची पालखी अवघड वाटेने विशाळगडाकडे निघाली. आणि नव्या राजांची पालखी नेहमीच्या वाटेने गडा कडे निघाली. नवे राजे म्हणजेच शिवाजी काशीद पालखीत बसले होते अगदी राजांसारखेच. डाव्या पायाची मांडी घातली आहे, त्याच्या शेजारी उजवा पाय उभा केला आहे, त्यावर आपला उजवा हात ठेवला आहे. नजर अगदी सरळ आहे आणि ओठांवर जगदंबेचे नामस्मरण चालू आहे. वेढा आता ढिला पडला होता. राजे शरण येत आहे या खबरे मुळे वेढ्यातले काही सैनिक आपापल्या तंबूत झोपले होते दोन्ही पालख्या आपापल्या वाटेला लागल्या. पण नेहमीच्या वाटेवर सिद्दीचे जासूद होते. त्यांनी पालखी पाहिली आणि  लगेच तळावर हि खबर पोहोचवली. सिद्दीने त्याचा जावई सिद्दी मसूद याला त्या वाटेवर जाण्याची आज्ञा केली.
               त्या अंधारात, कोसळणाऱ्या पावसात, चिखलतुडवीत मसुदची फौज निघाली. नवे राजे काही अंतरावर गेले होते. इतक्यात मागून मसुदची फौज आली. त्याला पालखी दिसली. तो ओरडत सुटला '' पकडो... पकडो... सिवाको.. पकडो..'' आणि घात झाला. काशीदांची पालखी पकडली गेली पालखी तळावर आणण्यात आली. तळावरच्या फौजेत आनंद, उत्सव सुरु झाला. 'आपण शिवाजीला पकडलं, आता मराठी दौलत विजापूरची होणार, आपण आता विजापुरी दारबारातला मोठा सरदार होणार.' या स्वप्नात सिद्दी गेला होता.
                काशीदांना सिद्दीच्या शामियान्यात आणले गेले. त्याला वाटले राजांनाच पकडलं. त्याने त्यांना सवाल केला, ''भाग रहे थे क्या राजाजी?'' 
  '' इरादा था|''  अगदी राजांसारखं उत्तर काशिदांनी दिल. इतक्यात एक हेर सिद्दीकडे येऊन म्हणाला,  
  ''हुजूर सिवा भाग गया| मैने देखा|''
सिद्दी काशिदांकडे बोट करून म्हणतो, '' अच्छा! तो ये कौन तेरा बाप बेठा है यहा|'' तितक्यात बाहेरून फाजल खान  ''अब्बाजान के....कातिल...'' असे काहीतरी ओरडत आत आला. याच फाजलखानाने शिवाजी महाराजांना अगदी जवळून पहिले होते. त्याने काशीदांना पहिले. त्याला त्यांचा संशय आला. तेवढ्यातच बाहेरून दुसरा हेर ओरडत आला, ''हुजूरsss..मैने देखा...अल्ला कसमsss.. सिवा भाग गया.. दुसरे रास्तेसे भाग गया.. अल्ला कसम...हुजूsssर..|'' 
                 शंका, संशय उमटले. फाजल खान काशीदांना म्हणतो, ''तुम सिवा नही हो | कौन हो तुम? बतओ |'' 
      '' म्या शिवाजी काशीद. भगव्या झेंड्याचा शिपाई शिवाजी काशीद.'' काशीद म्हणाले. आपण ज्यांना पकडले ते राजे नसून भलतेच आहे हे समजल्यावर सिद्दी, फाजल, मसूद भयंकर संतापले. राजे नक्की कुठे गेले आहे? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी काशिदांचे खूप हाल केले. पण काशीदांनी तोंडातून 'ब्र' अक्षर सुद्धा बाहेर नाही काढले.शेवटी त्यांनी काशीदांवर तलवारीचे वार करून त्यांना ठार केले.
                 केवळ राज्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्या साठी मृत्यूला हसत हसत स्वीकारणाऱ्या या मर्दाची हि कथा. पूर्वी या कथेला आख्यायिका समजले जायचे. परंतु डचांच्या पत्रामुळे हि आख्यायिका नसून खरी ऐतिहासिक घटना आहे हे सिद्ध झाले. राजांनी काशीदांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून त्यांची समाधी पन्हाळागडाच्या पायथ्याला बांधली.

             स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शिवाजी काशीदांना आणि त्या प्रत्येक वीराला मनाचा मुजरा.

-रोहित सरोदे

◆आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा :-
rohisthoughts@gmail.com
    
       संदर्भ सूची :-
◆राजा शिवछत्रपती
  (पृ.क्र.३८२-३९७)
◆ मराठ्यांची धारातीर्थे
◆ ' पावनखिंडीचा इतिहास '
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...