विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 24 April 2021

बाजीप्रभू देशपांडे

 बाजीप्रभू देशपांडे

 

 आषाढ वद्य प्रतिपदा म्हणजेच दि.१३ जुलै १६६० रोजीची पहाट उजाडली होती. सिद्दी मसुदची घोडेस्वारांची फौज महाराजांचा पाठलाग करीत त्यांचा अगदी जवळ आली होती. राजे सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे जात होते. तिकडे सिद्दीच्या छावणीत त्याने शिवाजी काशिदांना ठार करून आपला जावई सिद्दी मसूदला मोठ्या सैन्यानिशी राजांच्या मागावर पाठविले होते. हि फौज राजांच्या अगदीच जवळ आली होती. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गाजपुरची ‘घोडखिंड’ गाठली होती. विशाळगड आजून चार कोस दूर होता. पण शत्रू अगदी टप्प्यात आला होता. ‘आता शत्रू गाठणार तो संखेनेही जास्त शिवाय भयंकर संतापलेला आहे. आणि आपली फौज रात्रभर चालून दमली आहे.’ हे राजांना आणि बाजींना स्पष्ट दिसले. शत्रू खिंडीच्या पायथ्याशी आला होता. बाजींनी निर्णय घेतला. ते राजांना निर्वाणीने म्हणाले, “ राजे..! आपण निम्मे मावळे घेऊन पुढे जावे. निम्मे मावळे घेऊन आम्ही खिंड लढवतो. आपण गडावर जाताच तोफांचे आवाज करा. आपण आमची चिंता करू नये. जो पर्यंत तोफांचे आवाज कानी पडत नाही तोपर्यंत एकही गनिमाला मी खिंड चढू देणार नाही.”

            बाजोप्रभू देशपांडे हिरडस मावळातील खूप पराक्रमी सरदार. हे प्रभू असे मानतात कि, ‘त्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या कायेपासून झाली आहे आणि देवांचा लिपिक चित्रगुप्त याच्याकडून त्यांना लेखणी प्राप्त झाली आहे.’ पौराणिक कथेनुसार प्रभू हे मुळचे क्षत्रियचं होते. पण परशुरामाच्या भीतीमुळे ते एका ऋषीच्या आश्रमात आश्रयाला आले. तेथे ते आपल्या बुद्धी कौशल्यामुळे वेदात निपुण झाले. यांचे कुलदैवत एकविरा आणि तुळजाभवानी आहे. बाजी प्रभूंचे मुळचे आडनाव ‘प्रधान’ असे होते. त्यांच्या पणजोबांना देशपांडेगिरीचे वतन प्राप्त झाले. बाजींचे वडील कृष्णाजी प्रभू हे खूप पराक्रमी होते. बाजींचा जन्म अंदाजे इ.स. १६१५ साली झाला असावा. त्यांना एकूण तीन भाऊ होते. बाजींच्या कारकिर्दीची सुरुवात बांदलांचे दिवाण म्हणून झाली. हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या कृष्णाजी बंदलांकडे त्यांनी दिवाणगीरीचे काम केले. बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्यसेवेत रुजू केले. बाजींनीही आपली संपूर्ण निष्ठा राजांना समर्पिली. दि. १३मे १६५९ रोजीचे महाराजांनी बाजींना लिहिलेले एक पत्र आढळते. त्यात महाराज लिहितात, “कसलोड गड हिरडस मावळमध्ये आहे तो गड उस पडला आहे. याचे नाव मोहनगड ठेऊन किला वासवावा.” किल्ला वसवण्याच्या सगळ्या आज्ञा लिहून शेवटी राजे लिहितात, “तरी सदरहू लिहिले प्रमाणे किला मजबूत करून देणे. मग तुम्ही किल्याखाले उतरणे. मोर्तबसूद.” 
             त्यानंतर बाजींचा उल्लेख अफजलखानाच्या मोहिमेत येतो. खानच्या वधानंतर राजांनी विजापूरचा मुलुख जिंकण्याची मोहीम काढली. तेव्हापासून ते सिद्दीच्या वेढ्यापर्यंत बाजी राजांसोबत होते. 
             राजे तीनशे मावळे घेऊन घोडखिंडीतुन निघाले होते. बाजिंसोबत तीनशे बांदल होते. राजांनी त्यांना खूप समजावले. पण बाजी हट्टाला पेटले होते. शेवटी ते राजांना म्हणाले, “आजपातूर आपल्या चरणापाशी एकही मागण केल नाही. आज करतो आहोत. आपण जावे राजे. लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे.” 
             बाजींनी महाराजांना अखेरचा मुजरा केला. यावेळी बाजींबरोबर त्यांचे बंधू फुलाजी प्रभू हि होते. तेही खिंडीतच थांबले होते. तीनशे बांदल, बाजी आणि फुलाजी खिंडीच्या तोंडावर येऊन उभे राहिले. ते जणू मसूदच्या फौजेला अव्हानच देत होते. “या लेकांनो ! आमचा राजा हवाय नाहीका तुम्हाला ? या इकड.” आणि मसूदच्या फौजेने खिंडीवर हल्ला चढवला. बाजी आपल्या दोन्ही हातात दोन नंग्या समशेरी घेऊन होते. शत्रूच्या ह्या टोळधाडेवर तेही तुटून पडले. मोठी लढाई जुंपली. मावळे फक्त तीनशेच होते, पण एकही गनिमाला त्यांनी खिंड चढू दिली नव्हती. जो तो आपले प्राण पणाला लाऊन लढत होता. सर्वांचे कान फक्त तोफेच्या आवाजांसाठी आसुसले होते.
            इकडे महाराज विशाळगडाच्या पायथ्याला आले. पण पायथ्यालाच सुर्वे आणि दळवी यांच्या वेढा पडला होता. विशाळगड चढून जाण्यासाठी हा वेढा फोडणे भागच होते. तिथेच लढाई जुंपली. पराक्रमाची पराकाष्ठा करून राजांनी आणि मावळ्यांनी तो वेढा फोडला. राजे आता विशाळगड चढू लागले.
             इकडे खिंडीत मावळे सकाळी सहा वाजेपासून लढत होते. खिंडीतून ‘हर हर महादेव’ अशा गर्जना एकू येत होत्या. दुपारचे चार वाजले! मसुद खिंड चढण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करीत होता. पण बाजी काय मागे हटायचे नावच घेत नव्हते. ©Rohitsarode ते खूप जखमी झाले होते, रक्ताने न्हाऊन गेले होते. कित्येक गनिम त्यांनी यमसदनी पाठवले होते. तरीही ते लढत होते. त्यांना ओढ लागली होती तोफांच्या आवाजाची. बांदलांनीही पराक्रमाची पराकाष्ठा केली होती. कित्येक स्वराज्याच्या कमी आले होते. 
             दि. १३जुलै १६६० सायंकाळी सुमारे सहा वाजता विशालगडावरून धडाड धsss! आवाज कडाडला. पहिली तोफ उडाली. मग दुसरी तिसरी... तोफा उडू लागल्या. राजे विशाळगडावर पोहचले होते अगदी सुखरूप. इकडे खिंडीत बाजीनीही तोफांचे आवाज एकले. मावळ्यांनी आरडाओरडा सुरु केला. “राज पोहचल! राज पोहचल!” बाजीही खूप खुश झाले. अन इतक्यात घात झाला. शत्रूकडील कुणीतरी बाजींवर वार केला...आणि बाजी पडले. लढता लढता पडले. राजांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी.....
            खिंडीच्या भूमीवर बाजी पडले होते. संपूर्ण शरीर रक्ताने भरले होते. शरीरावर जखमेलाही आता जागा उरली नव्हती. आणि बाजींच्या तोंडून त्यांचे शेवटचे शब्द बाहेर आले, “आपले राजे गडावर पोहचले. मी माझ वचन पाळल. आता मी सुखाने मारतो. हर हर महादेsssव...” बाजींबरोबर त्यांचे बंधू फुलाजी हि पडले आणि ते तीनशे वीर बांदलही. हि लढाई खूप वेळ चालली होती. एका ठिकाणी अशी नोंद आहे, “बाजीप्रभू देशपांडे त्याचा भाऊ फुलाजी आणि बांदल यांनी सात प्रहर पट्टा खेळला.” पुढे गडावरचे ताजा दमाचे मावळे खिंडीत आले. त्यांनी मसूदला सळो कि पळो करून सोडले. शेवटी मसूदने माघार घेतली.
            बाजी पडल्याचे राजांना समजले. त्यांना खूप दुःख झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. राजांनी बाजींच्या आणि तीनशे बांदलाच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीचे नाव बदलून ‘पावनखिंड’ असे ठेवले. विशाळगडावर बाजींची आणि फुलाजींची समाधी बांधली. पण काळाच्या ओघात त्या समाधीकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे त्या समाधींची वाईट अवस्था झाली होती. याची दखल ‘सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र’ यांनी घेतली व त्या समाधींची १३ डिसेंबर२०२० रोजी छत बसवून डागडुजी करण्यात आली.
            या लढाईत बांदलांचे योगदानही मोलाचे होते. ‘बांदल भांडल, रगात सांडलं, गनिम कांढल, पण स्वराज्यासाठीच त्याची तलवार नांदल.’ असा शब्दच एकदा बांदल प्रमुखांनी शिवाजी महाराजांना दिला होता. शिवकालीन शाहीर अज्ञानदास याने त्याच्या पोवाड्यामध्ये जेधे, बांदलांचा उल्लेख असा केला आहे. 
                      “(जैसे) आंगद, हनुमान रघुनाथाला (रामाला) | 
                                 तैसे जेधे, बांदल शिवरायाला || ”
-रोहित सरोदे 

 ◆आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा :-
      rohisthoughts@gmail.com 

 संदर्भ सूची :- 
◆राजा शिवछत्रपती (पृ.क्र.३९८-४०२) 
◆छावा 
◆शिवकालीन पत्रे 
◆ मराठ्यांची धारातीर्थे 
◆'पावनखिंडीचा इतिहास '
 शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...