सन १६७८..
शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येतांना बेळवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मावळ्यांचं नेतृत्व सखुजी गायकवाड नावाचा एक शूर सरदार करत होता.
मोर्चे लागले .... लढाई सुरू झाली... एक छोटीशी गढी... ती जिंकायला कितीसा वेळ लागणार.. मर्द मावळे लढतायेत... देसाई गढीचा प्रमुख येसाजी प्रभू देसाई धारातीर्थी पडला.. आता तर नक्कीच जिंकल्यात जमा आहे गढी, पण..
आश्चर्य आहे.. तरीही गढी फत्ते होत नव्हती..
एक दिवस गेला ...आठ दिवस गेले ... पंधरा दिवस गेले.... पण गढी काही मिळेना..!
हे बघून सखुजी गायकवाडला शिवरायांनी खरमरीत निरोप पाठवला. राजे रागावले आहेत, हे बघून सखुजीला चेव चढला. मावळ्यांच्या अंगी स्फुरण आले.
भयंकर रणकंदन माजले आणि गढी फत्ते झाली..!
तब्बल पंधरा दिवस लागले ही गढी जिंकायला...
गढीचा मालक विरगतीला प्राप्त होऊनही कोण लढलं एव्हढं चिवटपणे..?
ती गढी लढत होती एक स्त्री..!
साविञी देसाई तिचं नाव..!
कर्नाटकात तिला मल्लाबाई किंवा मल्लम्मा असंही म्हणतात.. ती धारातीर्थी पडलेला गढी मालक येसाजी प्रभू देसाईची विधवा पत्नी होती..!
ती लढवत होती ती गढी..!
ती विधवा तर होतीच, पण एका छोट्या बाळाची आईसुद्धा होती..!
गढी ताब्यात आली... सावित्री कैद झाली ....
सखुजी गायकवाड भयंकर त्वेषात अन रागात होता. त्या रागाच्या, संतापाच्या, त्वेषाच्या अन उन्मादाच्या भरात शिवरायांनी मावळ्यांना (सैनिकांना) 'स्त्री, अबला, दुर्बल, म्हातारे अन रोगी यांना हात न लावता त्यांचे संरक्षण व सन्मान करण्याचा' स्थापित केलेला नियम तो विसरला.
त्याचा संताप इतका अनावर झाला होता, की त्या संतापाच्या अन विजयी उन्मादाच्या भरात त्याने जिद्दीने लढलेल्या व आता कैद झालेल्या त्या गढीच्या मालकिणीवर अर्थात सावित्री देसाईवर बलात्कार केला व तिला काळकोठडीत टाकले.
शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता समजली आणि सखुजी गायकवाडाच्या कुकर्माचीही..!
राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले... आणि सावित्रीला समोर आणले गेले.. सखुजी अभिमानाने छाती पुढे काढून महाराजांच्या शेजारीच उभा होता..
सावित्री घाबरलेली.. गांगरलेली होती.
'आता माझं कसं होणार .. मला शिवाजी मारणार. माझं बाळ अनाथ होणार, मग त्यालाही हा क्रूर शिवाजी मारून टाकणार. किती कीर्ती ऐकली होती मी या शिवाजीची.. पण ते सारं सारं खोटं आहे.. याचा सेनापती जर एका कैद झालेल्या लढवय्या विधवा स्त्रीवर बलात्कार करून तिला काळकोठडीत ढकलण्याचे क्रौर्य करू शकतो, तर हा तर त्याचा राजा आहे, मग हा किती क्रूर असेल.. मी आता काय करू..?' सावित्रीचे विचारचक्र सुरू झाले.
ती राजांसमोर धाय मोकलून रडायला लागली ...
"महाराज मला मारा ... ठार मारा... पण माझं लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हवं तर माझा जीव घ्या.." सावित्रीने आर्त किंकाळी फोडली.
हे तीचे करुण शब्द ऐकून शिवाजीराजा गहिवरला...
त्यांनी तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली.. बाळ आणले.. राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीचं काळीज धडधडत होते.. 'आता हा शिवाजी माझ्या मुलाला मारणार.. काय करावे..?'
तेव्हढ्यात राजांनी आज्ञा दिली. सावित्रीला बंधमुक्त करण्यात आले. ती धावत महाराजांच्या पायावर जाऊन पडली. तिने त्यांचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि राजांना "माझ्या लेकराला मारू नका हो.." अशी आर्त साद घातली.
आणि नुकतीच मावळ्यांनी जिच्याबरोबर चिवट संघर्ष करून ही गढी जिंकली होती, अशा शत्रूस्त्रीसाठी.. शिवाजीराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
"ताईसाहेब............. ताईसाहेब... कोण म्हटलं मी तुम्हाला मारणार आहे..? या बाळाला मारणार आहे..? मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला ना..! आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय... त्याला काहीतरी दिले पाहिजे ना ताईसाहेब..!"
"ताईसाहेब.. या बाळाच्या दुधभातासाठी हा शिवाजी.. तुमचा भाऊ.. ही जिंकलेली गढी त्याला देतोय... आणि आजूबाजूचा प्रदेश तुम्हाला चोळी बांगडीसाठी.."
सावित्री आश्चर्यचकित झाली.. 'काय ऐकत आहोत आपण हे..? मी.. मी स्वप्न तर बघत नाही ना.. हा शिवाजी जे काही बोलत आहे, ते सत्यच आहे ना.. मला भास तर होत नाहीये ना..'
सावित्रीने हळूच स्वतःला चिमटा घेऊन पाहिला.. 'अरे होय.. हे सत्यच आहे.. हा भास नाही.. हा शिवाजी.. नाही.. नाही.. हे शिवाजीराजे मला ताईसाहेब म्हणाले.. माझ्या मुलाला भाचेसाहेब म्हणाले.. आई यल्लमा.. तुझा जय असो.. हे शिवाजीराजा तुझा जयजयकार असो..!'
सावित्रीने हळूच राजांकडे आश्चर्यमिश्रित नजर टाकली. राजे तिच्याकडे बघून स्मितहास्य करत होते..!
त्यानंतर दरबारात बाजूलाच उभ्या असलेल्या सखुजी गायकवाडकडे महाराजांनी नजर वळवली. सखुजीला पाहताच महाराजांच्या नजरेतून अंगार बरसायला लागले. ते संतापाने थरथर कापायला लागले आणि त्यांचा हा रुद्रावतार बघून ज्याने नुकतीच पराक्रमाने ही गढी जिंकली, तो त्या मावळ्यांच्या तुकडीचा सेनापती.. सखुजी गायकवाड.. भीतीने थरथर कापायला लागला..
"सखुजी.. संताप आणि उन्मादाच्या भरात आम्ही जीवनोपरांत स्त्री, सज्जन अन दुर्बलांच्या बाबतीत स्थापिलेले नियम तुम्ही विसरलात.. ज्या स्रियांच्या, अबलांच्या, दुर्बलांच्या अन साधू - सज्जनांच्या रक्षणासाठी आम्ही हे रयतेचे स्वराज्य उभे केले, त्याला तुमच्या या कुकर्माने आज बट्टा लावलात.. जिंदगीभर जे दुष्कृत्य करण्यास आमचा एखादा साधा शिपाईगडीही धजावला नाही, ते दुष्कृत्य तुम्ही.. आमच्या एका सेनापतीने केले.. कोण पाप केलेत तुम्ही हे.. आम्ही आमच्या स्वर्गस्थ आऊसाहेबांना, आमच्या महाराजसाहेबांना कसे तोंड दाखवू.. सखुजी.. कोण विचाराने हे घोर पाप केलेत तुम्ही..? तुम्ही आमच्या हयातीची कमाई आज बुडविली.. सांगा काय करावं आम्ही तुमचं..!"
शिवरायांच्या थडथड उडणाऱ्या त्या अंगारशलाकांनी सखुजी होरपळून गेला. आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, याची त्याला पुरेपूर कल्पना आली. तो महाराजांच्या पायांवर कोसळला..
"महाराज, माफी द्यावा महाराज.. पुण्यांदा आसं पाप कंदीच नाय घडणार. माफी द्यावं राजं.. माफी द्यावं..!" सखुजी गयावया करायला लागला..
त्याच्या या कृत्याने तर महाराजांचा अधिकच तिळपापड उडाला. पायावर कोसळलेल्या सखुजीला त्यांनी क्रोधाने दूर लाथाडले आणि ते कडाडले, "हंबीरराव, या सखुजीला कैद करा आणि ज्या मग्रूर डोळ्यांनी याने माझ्या बहिणीवर आपली पापी नजर टाकली, ते पापी डोळे उखडून काढा.. ज्या पापी हातांनी या हारामखोराने माझ्या बहिणीची अब्रू लुटण्याचे अघोरी कर्म केले, ते हात कलम करा आणि या पाप्याने ज्या काळकोठडीत माझ्या बहिणीला ढकलले, त्याच काळकोठडीत याला ढकलून द्या..!"
महाराजांची ती आग ओकणारी आज्ञा ऐकून मराठ्यांचा मुख्य सेनापती हंबीरराव मोहितेसहित साऱ्या सरदार, शिपाई अन मावळ्यांच्या छातीचा थरकाप झाला.. भीतीने ते एकाच जागी गारठून गेले..
'काय ऐकत आहोत आपण.. नुकतीच ज्याने पराक्रमाने ही गढी जिंकली, त्या सखुजीची चौकडी होणार.. त्याचे डोळे काढले जाणार.. त्याला काळकोठडीत टाकले जाणार..'
"हंबीरराव..!" महाराज कडाडले.. त्याबरोबर हंबीररावांसह सारे मावळेगण भानाणार आले आणि ताबडतोब महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात आले..
लालबुंद सळया सखुजीच्या भेदरलेल्या डोळ्यांतून आरपार झाल्या.. त्याचे हात अन पाय कलम करण्यात आले.. आणि त्याला काळकोठडीत ढकलून देण्यात आले..
नुकतीच आपल्या शौर्याने या अजिंक्य गढीवर भगवा फडकावणारा तो सखुजी आपल्या अघोरी कृत्यामुळे काळकोठडीत गडप झाला..
आपल्या विजयी सेनापतीच्या एका अक्षम्य गुन्ह्याबद्दल त्याला ताबडतोड शिक्षा फर्मावण्याचा हा प्रकार
जगाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत होते..!
महाराजांनी फर्मावलेल्या आज्ञेचे पालन होताच त्यांनी ते बाळ सावित्रीच्या अर्थात, त्या बाळाच्या आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा मोठा सन्मान केला. काय होत आहे, हे तीला कळतच नव्हते .. पण मघाशी दुःखाने येणारे अश्रू आता आनंदाने वहायला लागले होते..
'राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा - बहिणीच नातं निर्माण करून या अबलेचा सन्मान केला...
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता - पिता..'
सावित्रीच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या धारांबरोबरच तिचे मनही शिवरायांच्या बंधुप्रेमाने प्रवाहित झाले होते..!
.
.
.
ही कथा इथेच संपत नाही..
.
.
शिवाजीराजे निघुन गेले, पण ती बहीण शिवरायांना विसरली नाही.. तिने त्याच दरबारातल्या एका भिंतीवर शिवरायांचे शिल्प उभारले..!
शिवरायांच्या हयातीत उभारले गेलेले त्यांचे स्वतःचे असे हे एकमेव शिल्प..!
.
.
कसे आहे हे शिल्प..?
.
.
'यात गादीवर शिवाजीराजे बसले आहेत.. लहान मुल मांडीवर आहे. महाराजांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे..!
.
.
हे शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते..!
हेच शिल्प आजही भावा - बहिणीच्या सच्च्या प्रेमाची साक्ष देत आहे...
जय शिवराय..!
No comments:
Post a Comment