भाग ३
प्राचीन भारतातील जनसंपदा एक समूह. इ. स. पू. सहाव्या शतकाच्या आरंभी उत्तर भारतात अनेक लहान मोठी स्वतंत्र राज्ये अस्तित्वात होती. यांतील कालांतराने काही जनपदे मिळून महाजनपद निर्माण झाले. सोळा महाजनपदांची माहिती प्राचीन बौद्ध व जैन वाङ्मयातून मिळते. यांतील महत्त्वाच्या राज्यांच्या राजवंशावळी पुराणांत येतात; मात्र त्यांमध्ये राजशासित जनपदांप्रमाणे गणशासित जनपदांचाही अंतर्भाव केला आहे. या सोळा महाजनपदांच्या याद्या एकरुप नाहीत; तथापि बौद्ध पाली ग्रंथ अंगुत्तरनिकाय यातील पुढील जनपदांची यादी प्रातिनिधिक मानता येईल : अंग, मगध, काशी, कोसल, वृज्जि, मल्ल, वेदी, वत्स,कुरु, पंचाल,मत्स्य, शूरसेन, अश्मक, अंवती, गंधार आणि कंबोज. यांच्याविषयी याच क्रमाने संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अंग
निग्नोक्त मगधाच्या पूर्वेकडील देश. यात विद्यमान भागलपूर व मोंघीर जिल्ह्यांतील समावेश होतो. याची राजधानी चंपा ही चंपा व गंगा या नद्यांच्या संगमावर वसली होती. गौतम बुद्धाच्या काळापर्यंत हिची भारतातील सहा प्रमुख नगरांमध्ये गणना होत असे. येथून पूर्वेकडील सुवर्णभूमीसारख्या बृहद्भारतातील देशांशी व्यापार चाले. मगधाचा युवराज बिंबिसार याने या देशाचा शेवटचा राजा ब्रह्मदत्त यास ठार मारून अंगाला मगधाच्या साम्राज्यात समाविष्ट केले.
मगध
यात विद्यमान पाटणा (पटणा) व गया जिल्ह्यांचा समावेश होत होता. याची राजधानी राजगृह (विद्यमान राजगीर) ही होती. याच्या सभोवार पर्वत असल्याने त्याला गिरिव्रज असेही नाव पडले होते. याचे ऋग्वेदकालीन नाव कीकट होते. गोतम बुद्धाच्या काळी येथे हर्यंक कुलातील बिंबिसार व आजातशत्रू हे राजे करीत होते. नंतर गंगेच्या काठी पाटलिपुत्र शहर स्थापिल्यावर तेथे राजधानी जाऊन राजगृहाचे महत्त्व हळूहळू कमी झाले.
काशी
वारणा आणि असी यांनी वेष्टिलेल्या आणि म्हणून वाराणसी नावाने प्रख्यात झालेल्या नगराच्या सभोवतालचा प्रदेश काशी नावाने प्रसिद्ध होता. काशीच्या राजांची कोसल, मगध आणि अंग देशांच्या राजांशी वारंवार युद्धे होत.
शेवटी कोसलच्या कंस नामक राजाने गौतम बुद्धाच्या कलापूर्वी काशी नगरी जिंकून आपल्या राज्यात सामील केली.
कोसल
याची राजधानी श्रावस्ती होती. गोतम बुद्धाच्या काली कोसलवर प्रसेनजित् राजा राज्य करीत होता. तो गौतम बुद्धाचा भक्त होता. याने शाक्य कुलातील कन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली; पण कुलाभिमानी शाक्यांनी त्याच्याकडे एक दासी पाठविली. तिजपासून झालेल्या विडूडभ याने या फसवणुकीचा सूड घेण्याकरिता शाक्यांचा संहार केला.
वृज्जी
वृज्जींनी संघराज्य केले होते. त्यात विदेह, लिच्छवी, ज्ञातृक इ. आठ-नऊ गणांचा समावेश होता. या संघराज्यांची राजधानी वैशाली (वसाड−मजफरपूर जिल्हा) ही होती. वैशालीच्या चेल्लना या राजकुमाराशी विवाह केल्यावर हे वैर संपुष्टात आले.
मल्ल
हा देश महाभारतकालीही प्रसिद्ध होता. कुकुत्था (सध्याच्या कुकू) नदीने याचे दोन भाग केले होते. एकाची राजधानी कुशीनगर (विद्यमान गोरखपूर जिल्ह्यातील कसिया) आणि दुसऱ्याची पावा ही होती. पावा कसियाच्या उत्तरेस सु. २० किमी. वर असलेले पदरवना हे होय. कुशीनगर येथे त्याचे गमराज्य झाले. शेवटी गौतम बुद्धाच्या कालांनंतर त्याचा मगधाच्या साम्राज्यात समावेश झाला. मनुस्मृतीत लिच्छवी आणि मल्ल यांना व्रात्य क्षत्रिय म्हटले आहे.
चेदी
सध्याचे बधेलखंड. याची राजधानी शुक्तिमती ही होती. दक्षिणेत याचा विस्तार नर्मदेपर्यंत होता. कलिंगदेशाचा सुप्रसिद्ध राजा खारवेल हा चेदी कुलातील होता.
वत्स
युमनेच्या काठचा प्रदेश. याची राजधानी यमुनेच्या दक्षिण तीरावरची कौशाम्बी (सध्याचे कोसम) ही असून गौतम बुद्धाच्या काली उदयन राजा राज्य करीत होता.
अवतीच्या प्रद्योत राजाने त्याला कपटाने पकडून आपल्या राजधानीत आणले आणि आपली कन्या वासवदत्ता हिच्या वीणावादनाचा शिक्षक केले; पण त्याने तिच्यासह प्रद्योताला नकळत आपल्या देशास प्रयाण केले. पुढे त्याच्या या प्रणयकथेवर अनेक संस्कृत नाटके रचली गेली.
कुरु
हा प्रदेश वेदकालापासून प्रसिद्ध आहे. गौतम बुद्धाच्या काळात याची राजधानी इंद्रप्रस्थ होती. कुरुचे यादव, भोज आणि पंचाल यांच्या राजांशी वैवाहिक संबंध झाले होते. बौद्धकालानंतर या देशात गणराज्य स्थापन झाले.
पंचाल
या देशामध्ये उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस चंबळा नदीपर्यंतचा प्रदेश अंतर्भूत होता. गंगा नदीचे याचे उत्तर पंचाल आणि दक्षिण पंचाल असे विभाग झाले होते.
पहिल्याची राजधानी अहिच्छत्र (बरेली जिल्ह्यातील रामनगर) आणि दुसऱ्याची काम्पिल्य (फरुखाबाद जिल्ह्यातील कम्पील) ही होत. काम्पिल्याचा राजा ब्रह्मदत्त याचा उल्लेख संस्कृत, बौद्ध व जैन ग्रंथांत येतो. पुढे ख्रिस्तोत्तर सहाव्या शतकात तेथे गणराज्य स्थापन झाले.
मत्स्य
यामध्ये चंबळा आणि सरस्वती या नद्यांमधील प्रदेश समाविष्ट होता. याची राजधानी विराटनगर (पूर्वीच्या जयपूर संस्थानातील वैराट) ही होती. बौद्धकालात हा प्रदेश मगध साम्राज्यात सामील झाला होता.
शूरसेन
याची राजधानी मथुरा होती. येथे अंधक-वृष्णीचे संघराज्य होते. गौतम बुद्धाच्या काळी येते अवंतिपुत्र राज्य करीत होता. तो त्याच्या प्रमुख शिष्यांपैकी होता. पुढे हे मगध राज्य राज्यात समाविष्ट झाले.
अश्मक
हे गोदावरीच्या दक्षिणेस होते.
राजधानी पोतन किंवा पोदन (सध्याचे बोधन). गोदावरीच्या उत्तरेस मूलक देश होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) होती. गौतम बुद्धाच्या काळाच्या अश्मक राजाच्या सुजात नामक पुत्राच्या उल्लेख बौद्ध वाङ्मयात येतो. अवंतीया देशाची राजधानी उज्जयिनी होती.
तेथे बौद्धकाली प्रद्योत राजा राज्य करीत होता. त्या काळच्या प्रबळ राजांत त्याची गणना होत असे. प्रद्योताची स्वारी होईल, या भीतीने अजातशत्रूने राजगृहाची तंटबंदी सदृढ केली होती. याच्या पालक नामक मुलाच्या कारकीर्दींत राज्यक्रांती झाली. त्या घटनेवर शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकाचे संविधानक आधारित आहे.
गंधार
या देशात पेशावर आणि रावळपिंडी जिल्ह्यांचा अंतर्भाव होत असे. याची राजधानी तक्षशिला व्यापार आणि विद्या यांबद्दल सुप्रसिद्ध होती. खिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या मध्यास येखे पुष्करसारिन् नामक राजा राज्य करीत होता. त्याचे मगधराजा बिंबिसार याच्याशी सख्य; पण अवंतिराजा प्रद्योत याच्याशी शत्रुत्व होते. त्याने प्रद्योताचा पराभव केला होता.
कंबोज
यात वायव्य प्रांतातील हजारा जिल्ह्याचा समावेश होत होता. याचे नाव गंधार देशाशी संलग्न झालेले आढळते. याची मर्यादा काफिरीस्तानपर्यंत होती. उत्तर वैदिक काळात हे वेदविद्येचे केंद्र होते; पण पुढे निरुक्तकार यास्काच्या कलात येथे आर्येतरांचे प्रबल्य झालेले दिसते. त्यांची भाषा आर्याच्या भाषेहून भिन्न झाली होती. मौर्यकाळात येथे संघराज्य स्थापन झाले होते.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1972.
2. Raychaudhari Hemchandra, Ed. Political History of Ancient India, Calcutta, 1972.
मिराशी, वा. वि.
No comments:
Post a Comment