१८ ऑगस्ट इ.स.१७००.
शके १६२२, विक्रमनाम संवत्सर,भाद्रपद शुद्ध १५ या तिथीला बाजीरावांचा जन्म झाला. त्यांचे जन्मस्थान कोणते याबद्दल दुर्दैवाने नेमका पुरावा सापडत नाही. राऊंचे पाळण्यातले नाव विश्वनाथ उर्फ विश्वासराव होते. तसेच लहानपणी त्यांना विसाजी असेही हाक मारत. बाजीरावांची मुले त्यांना बाबासाहेब म्हणत. 'बाजीराव' हे नाव का ठेवले याबद्दल एक उल्लेख आहे. बाजीरावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील त्यांनी स्वतः लिहिलेली एक बखर वाचत होते. त्या बखरीत पुर्वी जे 'बाजी' नावाचे नावाचे पराक्रमी लोक होऊन गेले त्यांची माहिती होती. ही बखर वाचत असतानाच बाळाजींना मुलगा झाल्याची बातमी समजली म्हणून त्या मुलाचे नाव बाजीराव असे ठेवले. पुढे जाऊन हेच नाव जास्त प्रसिद्ध झाले. बाजीरावांचे हे भट आडनावाचे घरणे मुळ कोकणातील श्रीवर्धनचे होते. पुढे ते काही कारणाने देशावर आले. कालांतराने राजाराम, ताराबाई, शाहू या कालखंडात बाळाजी पराक्रम गाजवत १७१३ साली पेशवेपदावर पोचले. बाळाजींचा मुक्काम सासवडला होता. पुढे बाजीरावांच्या काळात तिथुन सातारा व नंतर पुण्यात शनिवारवाड्यात स्थलांतर केले. १७२० मधेच बाजीरावांची बाळाजींच्या जागेवर पेशवेपदावर नेमणूक झाली व पुढे अनेक पराक्रम गाजवत बाजीरावांनी हिंदवी साम्राज्य व्रुद्धिंगत केले.
१७२९ साली बाजीरावांच्या जीवनात मस्तानी आली. यावरुन पुढे काही वाद झाले. तसेच पुढे बाजीरावांचा दाभाडे सरदारांशी संघर्ष झाला. हे दोन अपवाद सोडले तर बाजीरावांची कारकीर्द पराक्रम व राजकारणाने भरली आहे.
१७१३ सालची पांडवगडाची चकमक,१७२० मधे निजामाचा केलेला पराभव, १७२१ मधे दाऊदखान पन्नीचा पराभव, १७२२ चा पोर्तुगीजांशी केलेला तह, १७२४ ला उज्जैनला दयाबहाद्दूराचा केलेला पराभव, १७२५ ते १७२७ दरम्यान चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणची यशस्वी मोहिम, १७३७ मधे दिल्लीवर मोहिम काढुन तिची केलेली दुर्दशा या आणि अनेक मोहिमांत बाजीरावांनी पराक्रम केला. १७२८ मधे बाजीरावांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव केला. त्या लढाईतील बाजीरावांचे युद्धकौशल्य बर्नार्ड मॉन्टेगमरी या इंग्रज सेनानीला पुढे अनेक वर्षांनी इतके भावले की त्याने त्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. यावेळी भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता हे विशेष.
बर्नार्ड म्हणतो त्यातील काही वाक्ये:
"The way Bajirao outgenerelled Nizam-Ul-Mulk at the Battle of Palkhed was the Masterpiece of Strategic Mobility ...."
इस १७२८ मधे बुंदेलखंडचे छत्रसाल बुंदेला यांच्या जैतापूरच्या राज्यावर मोहंमद बंगशने आक्रमण केले. सुरूवातीला छत्रसालांनी प्रतिकार केला मात्र नंतर बंगश वरचढ ठरू लागला तेव्हा छत्रसालांनी बाजीरावांकडे मदत मागितली. त्यासंदर्भात छत्रसाल काय म्हणाले याचा एक उल्लेख आहे 'जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज ।। बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज ।। '
बाजीरावांनी तिथेही मोठा पराक्रम गाजवत बंगशाला नामोहरण करत शरण यायला भाग पाडले. छत्रसालांचे राज्य वाचले व खुष होऊन त्यांनी बाजीरावांना मुलगा मानून त्यांच्या राज्याचा तिसरा हिस्सा देण्याचे जाहिर केले. त्याच वेळी छत्रसालांनी त्यांची एक दासीकन्या बाजीरावांना नजर केली. तिच पुढे बाजीरावांशी जन्मभर जोडली गेली व 'मस्तानी' या नावाने ओळखली गेली. इस १७२२ साली बाजीराव पेशव्यांनी स्वतः चा शिक्का तयार केला. त्यात शाहुराजांबद्दल आदरभाव व्यक्त होतो.
"श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान।।"
आपल्या पराक्रमाने मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, निजाम व काही आपल्याच फितुरांना नामोहरण करणार्या राऊंना इतिहास कायम लक्षात ठेवेल ही अपेक्षा...!
No comments:
Post a Comment