


मल्लयुद्ध स्पर्धेतील प्रसंग शिल्प !
---------------------------
---------------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
.................

दख्खनभरातून फिरताना प्राचीन मंदिरादी वास्तु आणि त्यामधील हमखास दिसणार्या मल्लयुद्ध शिल्प प्रसंगांना पाहिल्यानंतर साळुंखे चाळुक्य राजवंशाच्या शैलीची आठवण होते. चाळुक्य राजवंश हा मल्लवंशीय असल्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शिल्पाकृती मंदिरादी वास्तुमधून मल्लयुद्ध प्रसंगाची शिल्पे हमखास कोरलेली दिसून येतात. दख्खनातील राजे साळुंखे चाळुक्यांच्या शैलीतील निर्मित मंदिरांचा धुंडाळा घेताना एका मंदिरात मल्लयुद्ध प्रसंगाचे हे विशेष शिल्प आढळून आल्यामुळे या शिल्पाविषयी थोडेबहुत लिहिण्याची इच्छा.... म्हणून हा लेखप्रपंच !
साळुंखे चाळुक्य राजवंशातील राजांकडून आपल्या राज्यामध्ये मल्लयुद्धांच्या स्पर्धा घेण्यात येत असत. मल्लयुद्ध प्रतियोगितांना आयोजित करून साळुंखे राजे अशा मल्ल युद्धातील थरारक प्रात्यक्षिकातून स्वतःचे आणि राज्यातील प्रजेचे मनोरंजन करत असत. साळुंखे राजांच्या सैन्यामध्ये मल्लांचा मोठा भरणा होता. सैन्यातील मल्लांच्या वर्गवारीमध्ये ज्येष्ठिक, आंतरज्येष्ठिक आणि गोवल वगैरे प्रकारच्या मल्लांचा समावेश होता. शारीरिक बल तसेच अनेक गुणांनी युक्त असलेले हे मल्ल साळुंखे राजांनी आयोजित केलेल्या मल्लयुद्ध स्पर्धेतील आपल्या थरारक प्रदर्शनातून राजाचे आणि राज्यातील जनतेचे मनोरंजन करत असत.
----------
श्लोक :
----------
त××ऽ× हीय××श्चे××रेव गु×स्त×।
गोव× ना× मल्लोऽ× ×युद्धे वेग×××र:॥
----------
राजे साळुंखे चाळुक्यांच्या सैन्यातील हे सर्व मल्ल आयोजित स्पर्धेमध्ये आपापल्या शारीरिक शक्तीनुसार मल्लयुद्ध करत असत. हेच मल्ल साळुंखे राजांकडून वेळोवेळी लढल्या जाणाऱ्या युद्धातही प्रमुख भूमिका बजावत असत. यामुळे साळुंखे राजांच्या फौजांमध्ये ३२ वर्षे वयापर्यंतच हे मल्ल नोकरीसाठी ठेवण्यात येत होते. साळुंखे राजांनी मल्लांच्या वयानुसार त्यांची वर्गवारी केलेली दिसून येते. वीस वर्षाच्या मल्लाला भविष्णु तर तीस वर्षाच्या मल्लाला प्ररूढ म्हटले जात होते. भविष्णु प्रकारातील मल्लाला श्रेष्ठ प्रकारातील मल्ल संबोधले जात होते. साळुंखे राजांनी आयोजित केलेल्या मल्लयुद्ध स्पर्धांमध्ये असे मला जास्त संख्येने भाग घेत होते. साळुंखे राजांकडून या मल्लांची विशेष प्रकारे काळजी घेतली जात होती. त्यांना पौष्टिक भोजनाद्वारे पुष्ट केले जात होते. उडदाच्या डाळीचे लाडू, मांस, दही तसेच दुग्धजन्य पदार्थ आणि दूध मिश्रित पीठाचे लाडु त्यांना खाण्यासाठी दिले जात होते. युद्धामध्ये या मल्लांकडून रणांगणात योग्य प्रदर्शन व्हावे म्हणून त्यांना स्त्रियांचे दर्शन, स्त्री स्पर्श आणि समागमा पासून दूर ठेवले जात होते. ज्यामुळे मल्लांची शक्ती नष्ट न होता तिचे वर्धन होण्यास मदत मिळत असे.
साळुंखे राजवंश हा मल्लवंशीय राजवंश असल्यामुळे राज्यातील मल्लयुद्ध स्पर्धा आयोजित करणे अथवा मंदिरादी वास्तुमधून मल्लयुद्ध प्रसंगाची शिल्पे कोरण्यातूनही त्यांचे मल्लयुद्ध प्रेम दिसून येते. मल्लयुद्धाद्वारे मनोरंजनासाठी राज्यामध्ये साळुंखे राजांनी आयोजित केलेल्या मल्लयुद्ध स्पर्धेचे प्रसंग शिल्प कधी एका मंदिरात कोरलेले आहे. शिल्पाकृती मंदिर प्रकारातील निर्मित मंदिराच्या स्तंभावर साळुंखे चाळुक्य राजांनी हे मल्लयुद्ध प्रसंगाचे शिल्प कोरलेले आहे. साळुंखे राजांनी आयोजित केलेल्या मल्लयुद्ध प्रतियोगिता प्रसंगातील हे शिल्प असल्यामुळे या शिल्पाचे महत्त्व विशेष आहे.
मंदिरातील स्तंभावर कोरलेले हे शिल्प मल्लयुद्ध स्पर्धा प्रसंगातील असून सदरील शिल्पातील साळुंखे राजा सिंहासनाधिष्ठित दाखविला आहे. त्याच्या समोर मल्लयुद्ध स्पर्धेतील मल्लयुद्ध सुरू असल्याचे दर्शविले आहे. उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या शैलीतील निर्मित अपूर्णावस्थेत राहिलेले हे मंदिर असून त्रिगर्भी आणि शिल्पाकृती मंदिर प्रकारातील निर्मिती असलेल्या या मंदिरात साळुंखे राजांनी त्यांच्या अनेक परिवार देवता आणि शिल्प वैशिष्ट्यांना कोरलेले आहे. त्यामुळे हे मंदिर राजे साळुंखे चाळुक्य निर्मित मंदिरांचा अभ्यास करण्यासाठीही महत्त्वाचे ठरते.
मंदिराच्या एकंदर शैलीकडे पाहिल्यानंतर शैली साळुंखे चाळुक्य नरेश षष्ठ विक्रमादित्याची असल्याचे लक्षात येते. मंदिरात चाळुक्यांच्या सप्तमातृका, त्यांचे राजचिन्ह वराह आणि असंख्य शिल्प वैशिष्ट्यांना कोरलेले आहे. त्यामुळे मल्लयुद्ध स्पर्धेतील शिल्पामध्ये सिंहासनाधिष्ठित असलेला राजा साळुंखे चाळुक्य नरेश षष्ठ विक्रमादित्य असल्याची खात्री होते. शिल्पातील राजाच्या डोक्यावर मुकुट परिधान केलेला असून त्यावर त्रिपुंडी तिलकाला कोरलेले आहे. राजाच्या कानात कुंडले, हातात कंकण, गळ्यात सुवर्णहार, ब्रह्मपवित (जानवे), उजव्या हातात उगारलेले खड्गे, दंडात बाजूबंद, डाव्या हातात न्यायदंड, कपाळाला त्रीपुंडी तीलक, कमरेला लोंबलेल्या सुवर्ण साखळ्या, पायात तोडे असा शृंगार आहे.
सिंहासनाधिष्ठित राजाच्या डावीकडून मल्लयुद्ध सुरू आहे. डावीकडील मल्लयोध्याने उजवीकडील मल्लाचा पाय मुडपलेला दिसत आहे. हा डाव टाकताना डावीकडील मल्ल पाय दुमडून खाली बसलेल्या स्थितीत, तर दुसरा पाय समोरच्या पंचाकडे आहे. डावीकडील मल्लाने उजवीकडील मल्लाला डावात घेण्यासाठी त्याचा उजवा पाय दुमडून मांडीवर घेतलेला आहे. तर उजवीकडील मल्लाने डावीकडील मल्लाचा उजवा हात आपल्या डाव्या हाताचा आडा टाकून त्याच्या मनगटाला जोरात पकडलेल्या स्थित आहे. उजवीकडील मल्लाने डावीकडील मलाच्या डाव्या पायाने कबरेला दाबले आहे. शिल्प पाहणाऱ्यांना एखादवेळी हे मल्लयुद्ध शिल्प दोन पुरुषांमधील कामशिल्पही भासू शकते. मात्र तसे नसून हे मल्लयुद्ध शिल्प आहे. या शिल्पाच्या खाली स्तंभाला वर्तुळाकार आकारातील छोटी रांगोळी शिल्पपट्टी कोरलेली आहे. त्याखाली छोट्या-छोट्या दोन वर्तुळाकार पट्ट्यातील चौकोनी व घंटीच्या आकारातील डिझाईन शिल्पपट कोरलेले आहे. त्याखाली वर्तुळाकार रांगोळी शिल्पाला कोरलेले आहे.
( अपूर्ण )
ता. क. :
१) राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखामध्ये चाळुक्य राजांनी आपल्या राज्यात मनोरंजनासाठी मल्लयुद्ध प्रतियोगितांचे आयोजन केल्याचे उल्लेख सापडतात.
२) आयोजित मल्लयुद्ध प्रतियोगिता प्रसंग शिल्पाला अनुरूप असलेले हे शिल्प आहे.
३) वरील लेखात सदरील शिल्पाविषयी केलेले विश्लेषण शिल्पाशी अनुरूप नसेल तर अभ्यासकांनी या ठिकाणी आपले शिल्पाविषयीचे मत व्यक्त केले तरी चालेल!
@
शब्दांकन :
सतीशकुमार शिवाजीराव सोळंके-देशमुख,
(एम.ए.बी.एड् & बी.पी.एड्),





सिद्धीविनायक काॅलनी गेवराई,
ता.गेवराई,
जि.बीड.
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment