खमेर, पारसिक, सिंहल वगैरे द्वीपसमुहावर



विजय मिळवणारा सम्राट विनयादित्य साळुंखे चाळुक्य
-------------------
--------------..............

सतीशकुमार सोळंके-देशमुख
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य नरेश प्रथम विक्रमादित्याच्या इसवी सन ६८१ मध्ये झालेल्या मृत्युनंतर त्याचा पुत्र विनयादित्य हा बदामीस राजे साळुंखे चाळुक्यांच्या राजसिंहासनावर बसला. आपले वडील विक्रमादित्य यांच्याविरुद्ध त्रैराज्य नृपतींनी आणि कांचीपतीने उठाव केला असताना तो मोडून काढण्यात विनयादित्याने फार मोठे साहाय्य केले होते.
---------------
श्लोक :
----------
करदीकृतकमेरपारसिकसिहळादि द्वीपाधिपस्य सकलोत्तरपथनाथमथनोपर्ज्जितोर्ज्जितपालिध्वजादिसमस्तपारमैश्वर्य्यचिह्नस्य विनयादित्यसत्याश्रयश्रीपृथिवीवल्लभमहाराजाधिराजपरमेश्वरभट्टारकस्य....
---------------
राजे साळुंखे चाळुक्य नरेश विनयादित्याने खमेर, पारसिक, सिंहल, कंबोडिया वगैरे द्वीपसमूहांवर चढाई करून येथील राजांवर विजय मिळविले. शिवाय त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर खंडणीही वसूल केल्या. यातील खमेरचा उल्लेख विशेष महत्त्वाचा मानावा लागेल. या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी व्यापाराच्या क्षेत्रातील तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील संबंध खूप वाढला होता याची साक्ष पटते. याचा परिणाम असा झाला, की हे देश पूर्णपणे भारतीय संस्कृतीच्या अगदीच जवळ आले. यालाच इतिहासकारांनी बृहत्तर भारत असे नाव दिले आहे.
दुर्दैवाने भारतीय संस्कृतीच्या या भारताबाहेरील प्रसाराची माहिती जास्त करून विदेशी साधनातूनच मिळावी हे पण विशेष वाटते. वरील खमेर किंवा कंबोडियाचा उल्लेख विनयादित्याच्या कोरीव लेखातील त्यादृष्टीने त्रोटक का असेना, परंतु अतिशय महत्त्वाचा आहे. राजे साळुंखे चाळुक्यांचा द्वीपातील हा विजय ऐतिहासिक दृष्ट्या उल्लेखनीय म्हणावे लागेल. अशा सामुद्रिक द्वीपाच्या युद्ध मोहिमांवरून राजे साळुंखे चाळुक्यांच्या सुसज्ज आरमारदलाची ताकदही त्यातून लक्षात येते आणि यातून चाळुक्यांच्या त्यावेळच्या भारताबाहेरील साम्राज्यविस्ताराचीही कल्पना येते.
राजे साळुंखे चाळुक्य नरेश विनयादित्यावर याच काळात संपूर्ण उत्तर भारताचा स्वामी असलेल्या राजाने आक्रमण केले. विनयादित्याने आपल्या पराक्रमाने त्याचे दमन करून त्याचा पालिध्वज इत्यादी सम्राटपदाची सर्व चिन्हे प्राप्त करून घेतली. विनयादित्याच्या अनेक कोरीव लेखातून वरील युद्धाची माहिती आलेली आहे, पण त्याने अभिलेखातून उत्तर भारतातील या शत्रूंचा उल्लेख केवळ 'वज्रट' आणि 'सकलोत्तरपथनाथ' म्हणून करण्यात आलेला दिसतो. इतिहासाला अद्यापपर्यंत या दोघांचीही ऐतिहासिकता स्पष्ट झालेली नव्हती. मात्र अलीकडील काही ऐतिहासिक संशोधनातून त्यावर प्रकाश पडलेला दिसतो.
काही संशोधकांच्या मते वज्रट किंवा वज्जड म्हणजे कनोजचा राजा हर्षवर्धन याच्या नंतरचा राजा वज्रायुध असून आणि त्या काळात कनोज ही त्याची उत्तर भारतातील राजधानी असल्यामुळे तो 'सकलोत्तरपथनाथ' असल्याचे तर्क मांडलेले होते. मात्र हे तर्क निराधार वाटतात. कारण वज्रायुध हा विनयादित्याच्या समकालीन नसून त्याचा काळ नंतरचा होता. तसेच त्याच्या काळातील कनोजचे वैभव त्या शहरापासून सीमित राहिले होते. त्यामुळे अशा राज्याचा शासक 'सकलोत्तरपथनाथ' म्हणून वर्णिला जाणे शक्य वाटत नाही.
उत्तर भारतात हर्षवर्धनानंतर कनोजच्या सिंहासनावर बसलेला सर्वात पराक्रमी राजा यशोवर्मन हा 'सकलोत्तरपथनाथ' हे बिरुद धारण करणे शक्य होते. यावरून असे अनुमान केले जाऊ शकते की माळव्यातील राष्ट्रकूट हे कनोजच्या यशोवर्मनचे मांडलिक असून वज्रटाचा समर्थक म्हणून बदामीच्या चाळुक्यांच्या आणि त्याचा संघर्ष झाला असावा. त्यामुळे यशोवर्मन हा खरा 'सकलोत्तरपथनाथ' असावा याची शक्यता अधिक वाटते.
( अपूर्ण /क्रमशः )
------------
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
( Neeraj Salunkhe )
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
------------
@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड.


No comments:
Post a Comment