विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 22 March 2022

समशेर बहाद्दर संताजीराव शिलीमकर....!!

 



समशेर बहाद्दर संताजीराव शिलीमकर....!!
पोस्तसांभार ::

Indrajeet Khore

कार्तिक संपत आला होता.आणि मार्गशीर्षची चाहूल लागली होती.थंडी नुसती मी मनत होती.भयाण गारठा होता.अशीच गारठ्याची पहाट गुंजन मावळात उतरली होती.रांगणा किल्ल्यावरून निघालेले दोन खबरगिर पहाटेच्या पहिल्या प्रहरी गुंजन मावळात सिलीमकर देशमुखांच्या वाड्या पुढं येऊन ठेपले.फेसाळलेली घोडी तबेल्यात ठाण करून त्यांनी वाड्यातनिरोप पाठवला.रांगण्यावरून जासुस आल्यात म्हटल्यावर त्यांना लगोलग आता घेण्यात आलं.नुकतच स्नान आटपून संताजीराव बयटकीच्या दालनात आले होते.जसुदाना सामने पेश करण्यात आलं.रावांना मुजरा करून कमरदाबात खोचलेले लखोटे त्या जसुदानं समोर धरले.रावांनी खास महाराणी ताराबाईसाहेब यांच्या कडून तो आल्यामुळे आधी कपाळी भिडवला.आणि आपले खासगी सचिव हरिपंत तात्यांनी यांच्या हाती दिला.तात्यांनी एका दमात ते पत्र वाचून काढलं.
पत्रातील ख्याली-खुशालीचा व इतर मुद्दे सोडले तर एक मुद्दा महत्वाचा होता तो म्हणजे औरंग पातशाहा हा जरी पुणे मुक्कामी होता तरी तो कोणत्याहीक्षणी राजगडाचा रोख धरून कूच करू शकतो ही बाब आईसाहेबांनी संताजीरावांच्या लक्षात आणून दिली.किल्ल्याची सगळी जबाबदारी संताजीरावांवर देण्यात आली होती.हुशारीनं किल्ला जागसुद ठेऊन प्राणपनानं
तो झुंजवुन राखण्याचा सल्ला ही देण्यात आला.रसद पुरण्याचे व इतर कुमकेचे कामकाज राज्याचे सचिव शंकराजी नारायण
पारपाडणार होते कारण सर्व मावळ प्रांत सचिवांच्या अखत्यारीत येत होता.
दिवस फुटून वरती आला होता.सर्व चर्चा झाल्यावर संताजीरावांनी सेवकास खबरगिरांची व्यवस्था करण्याचा हुकूम केला.आणि विचार मग्न झाले.कारण दोनच दिवसा पूर्वीच संताजी सहज म्हणून राजगड उतरून घराकडं आले होते.
लढाईची गोष्ट काय नवीन नव्हती त्यांना पण यावेळेस सामना होणार होता तो खुद्द औरंग पातशाहा बरोबर.त्यांना या घडीला थोरल्या स्वामींची सय दाटून आली.छत्रपतींची प्रथम राजधानी
आपुन प्राणपणानं जपली पाहिजे या विचारत ते हरवले. स्वराज्याच रोपटं याच गडावरून फुलून उठलं.कितेक मोहिमांचे नारळ इथेच म्हणजे पद्मावतीच्या चरणी फुटले.फते मुबारकीची
कित्येक भांडी याच गडावर वाजली असतील.सुरतची दाबजोर
मोहीम इथूनच निघाली.शाहिस्तेखानाला उभा फाडण्याचा कट इथंच रंगला.ती आग्रा भेट आणि तिथून पुन्हा सही सलामत माघारी येन इथंच घडलं.शंभुराजांनच बालपण इथंच गेलं. सुभेदार तानाजी मालुसरेनां सिंहगड घेण्याचा मनसुबा इथंच कळाला.अशा कित्येक आठवणीचा भूतकाळ त्यांचा मनात नाचू लागला.स्वराज्यावरआलेलं औरंग रुपी संकट बारीक मुळीच नव्हतं.पण यावरही आपण माता करू हा विश्वास मात्र दांडगा होता.
आता मात्र संताजीरावांना उसंत नव्हती.दुसऱ्या दिवशी कुलदैवतेला बेलभंडारा वाहून.सर्व कुटंब-कबील्याची भेट घेऊन संताजीराव वाड्या बाहेर पडले.बारा मावळातील देशमुखांन कडून खासे खासे दोन-एकशे हत्यारावर हुकूमत असणारे धारकरी निडून त्यांनी एकजात केले.हर हर महादेवच्या जय घोषणात सर्वांनी राजगडाची वाट धरली.गडावर प्रवेश करताच या सर्व तुकडीच स्वागत करण्यात आलं.गडावर आधीच संताजीरावांचे भाऊ महिपती सिलीमकर व इतर सरदार हजर होते.दोन दिवसांनी सचिव शंकराजी नारायण ही गड दाखल झाले.सर्वांनी मिळून अख्खा गड नजरे खालून घातला
रसद आणि दारूगोळ्याची शंकराजींनी अगदी चोक व्यवस्था केली होती.खबर ही होती की मुगलांनी आपले बेलदार,कामाटी
इतर मजूर वाट तयार करण्याकामी पुढे पाठवले होते.हे कळताच मराठयांनी छापे मारी चालू केली.यामुळे मुगल मजूर मेटाकुटीला आले.रास्ता काय तयार होईना या मुळे मुगल हैराण झाले.औरंगजेब वयतागला शेवटी नाइलाज म्हणून त्याने पुण्याहून राजगडाकडे कूच केली.( १० नोव्हेंबर १७०३ )
वाट चालतानासुद्धा मराठयांनी मुगलांना सोडलं नाही.कसबस मुगल राजगडच्या पायत्याशी पोहोचले( २८ नोव्हेंबर )
अखेर राजगडाला मोर्चे लागले गेले.तरबियतखान आणि हमीद्दुनखान यांनी पद्मावतीच्या बाजूने ते खुद्द औरंगजेबाने
सुवेळा माची समोर मोर्चा लावले.मुगलांना संपूर्ण गड घेरता आला नव्हता कारण गड मोठा टोलेजंग.गडाचा घेराच जवळ जवळ बारा कोसाचा.त्यामुळे गडाची संपूर्ण नाकेबंदी राहून गेली.गडाला मोर्चे लावताच मुगलांनी तोफांन साठी उंच दमदमे उभे केले आणि मारा सुरू केला.मराठयांनीही जशाचतसे उत्तर दिले.मराठे आता थेट रात्रीचे गडउतार होऊन छापेमारी करू लागले.मुगलांनी बऱ्याचदा सुलतानढवा करण्याचा प्रयत्न केला पण संताजींनी तो मारून काढला.मराठयांनी लढाईची शर्त केली.मुगलांना रणास आणून मारले.बादशाहा हबकला.उनपुरे दोन महिने झाले तरी गड पडण्याचं नाव घेत नव्हता.गडाकडे नजर लावून बसलेला औरंग बिचारा थकून गेला.
मुस्तैदखान राजगडा बाबत लिहितो..
" राजगड हा अतिशय बेलाग उंच,त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ होय असे म्हणता येईल.त्याचा घेर बारा कोसांचा आहे.त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही.
या डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही.येथे पावसालाच
फक्त वाट मिळू शकते.इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही."
दोन महिने गडा खाली मुक्कामी असलेले मोगल आपल्या बादशाहासाठी शर्तीन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.तर गडावर तोफगोळ्या सारखे पेटलेले तप्त मराठे आगीचा लोळ होऊन मोगलांन वरती कोसळत होते.औरंगजेबानं आयुष्यात बऱ्याच लढाया केल्या असतील आणि पहिल्याही असतील पण
बारा मावळातलं पाणी तो प्रथमच जोकत होता.अक्षरशः त्याला मराठयांनी गुढग्यावर आणला होता.मराठे हटत नव्हते आणि सुला तर त्यांना मुळीच मान्य नव्हती.काय करावं या विचारानं पातशाहा हायरान झाला.एका बाजूनं किल्ल्याचा घेरा रिकामा असल्यानं रसद बिनदिक्कत चालू होती.सरदार लोकांच्या समशेरीचा जलवा बघून पंत सचिव खुश होते.त्यांनी संताजी,महिपती शिलीमकर यांचा कार्य करीना सविस्तर लिहून महाराणी ताराबाईसाहेबांन कडे रवाना केला.आईसाहेब दक्षिण कोकणात रांगण्यावर होत्या.सचिवांच पत्र वाचून महाराणी बेहद आनंदी झाल्या.त्यांनी ताबडतोब फेर पत्र लिहिण्याचा हुकूम केला.
आपल्या सरदार आणि शिलेदार,धारकऱ्यांचं बहुत कवतुक वाटलं होतं आईसाहेबांना.आईसाहेब लिहितात...
" श्री राजा शिव छत्रपती याजी संताजीराव सिलंबकर व महीपतराव सिलंबकर देशमुख ता गुंजन मावळ यासि आज्ञा केली एसीजे अवरंगजेब किले राजगडास बिलगला आहे.मोर्चे चालऊन यालगार करितो.परंतु तुम्ही त्याचा हिसाब न धरीता शर्तीनसी नतीजा पाववित म्हणून शंकराजी पंडित सचीव याणी
लिहिले व संप्रद तुमचे मर्दनगीचे वर्तमान राजश्री सोनजी फर्जंद याणी लिहिले त्यावरून कोळ आले.तुमचे सेवेचा मजरा जाला
तरी तुम्ही स्वामीचे एकनिष्ठ सेवक तरवारेचे आहे.पुढेही एकच रीतीने अवरंगजेबास नतीजा पावऊन फत्तेचे वर्तमान लिहून पाठविणे.स्वामी तुमची सर्फराजी करितील..."(१९ डिसेंबर १७०३ )
खास संताजींनी साठी पत्र घेऊन जसुस गड उतरला आणि इकडे राजगडाला बरेच दिवस शांत राहून मोगलांनी पुन्हा उचल खाल्ली.बादशाहाचा तळ ज्या सुवेला माचीच्या तर्फेला होता त्या बाजून मुगलांनी यलगार पुकारला.मराठेही तयारीत होते.मोठा झगडा झाला.मराठयांनी शिपाईगिरीची शर्थ केली.निम्मे अर्धेअधिक मुगल संताजींनी गारद करत आणले.मराठयांच्या माऱ्या मुळे मोगल बिथरले.त्यांनी माघार घेतली.पण घात झाला.मुगलांनी उडवलेल्या तोफेच्या गोळ्यानं संताजींना अचूक टिपलं.संताजीराव जागीच पडले.स्वामीकार्यावर ठार झाले.
( २० डिसेंम्बर )
संताजीराव पडल्यामुळे गड शोकात बुडाला.पण पुन्हा सर्वजण सावरून उठले.रक्ताचा शेवटचा थेंब आणि गडावर असलेल्या शेवटच्या मावळ्या पर्यंत गड लढवण्याचा निर्धार व्यक्त केला गेला.पुन्हा मारामारी सुरू झाली.दहा-बारा दिवसांनी मोगलांनी
पुन्हा एका माचीवर हल्ला चढवला.जंगी मारामारी जुंपली मराठे हट्टायला तयार नव्हते.मारामारीत जखमी अगर मरण पावलेल्या लढाऊ असमींचा नुसता खच पडला होता.पण यावेळेस मोगलांनी सर्व बळ एकवटून हल्ला चढवला होता.नियतीस मराठयांचा जय मान्य नसावा मराठयांना माघे हटाव लागलं.त्यांनी बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला उनपुरे बारा-तेरा दिवस मराठे बालेकिल्ला लढवत होते.पण शेवटी मर्यादा आल्या. रहूल्लाखाना मार्फत तह करून गड मोगलांना देण्यात आला.
उरलेले मावळे गुमान जड अंतःकरणान गड उतार झाले.
( १६ फेब्रुवारी १७०४ )
लेखन समाप्त
इंद्रजित खोरे
जे वीर राजगडापाई लढले आणि पडले त्या सर्वांना मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय रौद्र शंभू ।।
टीप :- फोटो हा गुगल वरून घेतला आहे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...