थोरले बाजीराव पेशव्यांचे सहकारी उदाजीराव पवार यांना १७६० साली उदगीरच्या लढाईत वीरमरण आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी संभाजी पवार हे मलठणचा पाटील असून महाराजांच्या सैन्यांत होता. यांना एकंदर तीन पुत्र उदाजी, आनंद व जगदेव (हिं. ऐ. राज्यें. पृ. २३८). औरंजेबाच्या विरुद्ध मराठ्यांनी रजपुतांस मदत दिली, त्यावेळीं १६९८ मध्ये, उदाजीनें माळव्यांत शिरून मांडवगडास तळ दिल्याचा उल्लेख आढळतो. तथापि तेथे कायमचे वास्तव्य करण्यास उदाजीस सवड झाली नाही (म. रि. म. वि. भा. १ पृ. ३५५). माळवा व गुजराथ या ठिकाणी प्रारंभी मराठ्यांचा जम बसविणारा मुख्य इसम उदाजीच होता, असे १७२६ त शाहूने ठरवून दिलेला ६ कलमी तह आहे त्यावरून दिसते. १७१८ च्या नोव्हेंबरच्या सुमारास बाळाजी विश्वनाथ, सम्यदाच्या मदतीस दिल्लीस गेले, तेव्हा उदाजीहि बरोबर होते तिकडून १७२० मध्ये परत आल्यानंतर बाळाजीपंत नानांनी जी संरजाम पद्धती ठरवून दिली, उदाजीस माळव्यांत मुलुख दिला, उदाजी हे लहानपणी पहिल्या बाजीरावाचा खेळगडी होते. त्यांनी १७२४ धार येथे आपलें ठाणे बसविले. १७२७ च्या मार्चांत पेशवे कर्नाटकांत गुंतले असतां इकडे निजामने महाराष्ट्रांत गडबड उडवून दिली, तेव्हा शाहूने उदाजीस इकडे येण्याबद्दल निकडीचे हुकुम पाठविले होते. पुढे पुढे उदाजी हे बाजीराव यांना डोईजड झाले अखेर १७२८ मध्ये दोघांचे वाकडे येऊन, श्रीमंतांनी त्याला कैदेंत टाकून त्यांचा सरंजाम आनंदरावास दिला, परंतु ते लवकरच कैदेंतून सुटले. १७२९ च्या सुमारास होळकरांनी व उदाजीने मांडवगड काबीज केल्याचा उल्लेख आहे. पुढे माळव्याचा अंमल सुरळीत चालेना, तेव्हा १७३० च्या वेळी उदाजीने तिकडील मराठ्यांचे स्नेही नंदलाल मंडलोई यास जरबेचे पत्र लिहिले आहे. डभईचे लढाईंत उदाजी हा बाजीरावांच्या विरुद्ध दाभाड्याकडून लढत होते. अखेर त्यांचा पाडाव झाला यानंतर १७६० मध्ये उदगीरमध्ये निजामविरुद्ध लढतांना त्यांना वीरमरण आले.
संदर्भ-
१) इचलकरंजी दफ्तर लेखांक ४४
२) मराठी रियासत मध्यविभाग, पृ. ३५५ पुढे
No comments:
Post a Comment