इतिहासातील प्रतिशिवाजी, हिंदवी स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख…सरसेनापती नेताजीराव पालकर
पोस्तसांभार ::डॉ विवेक दलवे पाटील
हिंदवी स्वराज्याचे २ रे सरसेनापती इतिहासातील प्रतिशिवाजी सरनौबत श्री नेतोजीराव पालकर हे शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ होते.
हे याठिकाणी लक्षात घ्यावे.
त्यांचा जन्म १६२० साली रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे झाला. १६३५ साली ते शहाजीराजे यांच्या सेवेत रुजू झाले होते. कारण त्यांच्या आधी त्यांचे काका बळवंतराव पालकर हे पराक्रमी सरदार शहाजी राजांच्या
सेवेत होते. जसे हंबीरराव मोहिते यांचे वडील संभाजी मोहिते हे सुध्दा शहाजीराजांच्या सेवेत होते. १६४० साली स्वराज्याचा संकल्प शहाजीराजांनी केला. त्यावेळेला त्यांच्यासोबत माणकोजी दहातोंडे, यशवंतराव उर्फ बाजी पासलकर, कान्होजी नाईक जेधे , बळवंतराव पालकर व नेतोजीराव पालकर देखील होते. तसेच १६४१-१६४२ या २ वर्षांच्या काळात नेताजींनी आदिलशाही फौजेला फार पिटाळून लावलं होतं. पण १६४३ साली शहाजीराजांची रवानगी आदिलशहाने बंगळूर प्रांतात केली. तेव्हा त्यांच्या सोबत कान्होजी जेधे व बळवंतराव पालकर देखील गेले होते. १६४३ ला स्वराज्याची सूत्रे छत्रपती शिवरायांनी हातात घेतली. १६४५ साली स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना नेताजी पालकर उपस्थित होते. पुढे १६४६ साली बाजी पासलकर यांच्यासोबत नेताजीराव खांद्याला खांदा लावून लढले. व तोरणा स्वराज्यात आणला.
१६४९ साली शिवरायांची कृष्णाजी बांदल यांच्या विरुद्ध हिरडस मावळात लढाई झाली. तेव्हा नेतोजी पालकर यांनी विशेष शौर्य गाजवले.
१६५० साली राजगड घेताना छत्रपती शिवरायांसोबत नेतोजीराव पालकर आघाडीवर राहून लढत होते. राजगड स्वराज्यात आल्यावर महाराजांनी खूश होऊन नेतोजींना स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख पद म्हणजे सरनौबत बनवले.
१६५२ साली घोडदळ प्रमुख सरनौबत नेताजीराव पालकर यांनी आदिलशाहाच्या ताब्यातील लिंगाण्याचा सुळका ताब्यात घेतला. हा सुळका चढणे म्हणजे साक्षात मृत्यूला आलिंगण देण्यासारखे होते.
म्हणून १६५२ ला संपूर्ण स्वराज्याचे सरसेनापती पद देखील नेतोजींना दिले. व "इतिहासातील प्रतिशिवाजी" असा किताब देऊन गौरव केला.
१६५४ ला नेताजींना पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार देखील बनवले. १६५६ साली जावळीमध्ये महाराजांसोबत चंद्रराव मोरेच्या फौजेचा धुव्वा उडवून दिला. जावळी प्रांत स्वराज्यात दाखल केला. १६५९ साली अफजलखानाच्या भेटीला जाण्याआधी नेतोजी पालकर शिवरायांना म्हणाले. " राजे तुमच्या जागी आम्ही तुमचं वेषांतर करून खानाच्या भेटीस जातो." मात्र राजे म्हणाले, "आमचं जर काही बर वाईट झालं तर खचून न जाता शंभूबाळास गादीवर बसवून स्वराज्याचा सरसेनापती व प्रतिशिवाजी या नात्याने आपण हे हिंदवी स्वराज्य पुढे चालविणे." असे राजे नेताजीरावांना म्हणाले होते. खानाचा वध केल्यावर सरसेनापती नेताजी पालकर यांनी त्याच्या फौजेला झोडपून काढलं होतं. अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर याची सरसेनापती नेतोजीराव पालकर यांनी खांडोळी करून टाकली. तर अंकुशखानाचा सुद्धा वध केला. खानाचा पुत्र फाजलखान याचा पराभव केला. तो नेताजींच्या कचाट्यातून पळून गेला.खानाच्या फौजेला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पुढे १६६० साली महाराज पन्हाळगडी अडकले असता नेतोजीनी विजापूरचा मुलुख काबीज केला.चक्क विजापूरलाच वेढा दिला. व आदिलशहाला धर्मसंकटात टाकलं. त्यामुळे राजे ६ महिने पन्हाळगडी सुखरुप राहिले. पण जिजाऊंची प्रतीक्षा भंग पावली. त्या स्वतः राजियास सोडविण्यास निघाले असता नाईलाजाने नेताजींनी विजापूरचा वेढा उठवावा लागला. व त्यांनी राजगड गाठला. मासाहेब यांना थांबवून पन्हाळ्याची मोहिम स्वतः हाती घेतली. व नेतोजींनी पन्हाळ्यावर झडप घातली. सिद्दी मसूद आणि फाजलखान यांच्या फौजेला कडवी झुंज दिली. संख्याबलामुळे व युद्ध मोकळ्या मैदानात असल्यामुळे नेताजींना गनिमी कावा साधता आला नाही. व लढाईतून काढता पाय घ्यावा लागला.
१६६१ साली कार्तलाबखान याची सह्याद्री घाटमाथ्याची वाट नेताजींनी अडवून धरली आणि उंबरखिंडीत महाराजांसोबत मोठा पराक्रम गाजवला. त्याचा पराभव केला.
१६६२ साली सरसेनापती नेतोजीराव पालकर यांनी परांड्याला वेढा दिला. मोगली फौजेचा दारूण पराभव केला. लगेच नळदुर्ग, भगवानगड, धारूर, देवगिरी, दौलताबाद, अजिंठा, वेरूळ असे एका मागून एक गड जिंकून घेतले. व उस्मानाबाद, बीड, जालना, संभाजीनगर ४ प्रांत हिंदवी स्वराज्यात दाखल केले. अर्धा मराठवाडा विभाग सरसेनापती नेताजीराव पालकर यांनी स्वराज्यात जोडला.
१६६३ साली लाल महालात छापा टाकताना नेतोजी पालकर यांनी मोठे शौर्य गाजवले. गनिमांची खूप लांडगेतोड केली. शाईस्तेखानाचा सेनानायक नेतोजींच्या हातून मारला गेला. पुढे १६६४, सुरत लुटीत नेतोजी राजांसोबत होते. सुरतेत इनायतखानाच्या फौजेचा नेताजींनी धुव्वा उडवून टाकला. राजे सुरत लुटत असता समयी खंबात जवळील बंदर सरनोबत नेताजी पालकर यांनी जाळून बेचिराख केले. तिथले मोगली, पोर्तुगीज खलाशी नेताजींच्या धाकाने समुद्रात उड्या टाकून जीव देऊ लागले.
१६६४ साली छत्रपती शिवरायांनी व सरसेनापती नेताजीराव पालकर यांनी मिळून वेंगुर्ला येथे खवासखानाचा दारूण पराभव केला. व वेंगुर्ल्याचा किल्ला जिंकून घेतला.
पुढे १६६५ ला आदिलशहाकडून फलटण प्रांत व वसंतगड जिंकून घेतला. १६६५ ला मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान यांच्या फौजेला घिरट्या घालून नेतोजी त्रास देत होते. त्यांना कंटाळून अखेर मिर्झाराजे जयसिंह यांनी आपला पुण्यातला तळ उठवला व पुरंदरला मुक्काम ठोकला. वज्रगड पडला. लगेच पुरंदर पडला. मुरारबाजी देशपांडे देखील धारातीर्थी पडले. पुरंदरच्या परिसरातील रयतेचा छळ सुरू झाला. म्हणून नाईलाजास्तव राजांनी पुरंदरचा तह केला.
तहाची बोलणी करताना मिर्झाच्या छावणीत महाराजांनी सरसेनापती नेताजीराव पालकर यांना सोबत नेले होते.
२३ किल्ले व ४ लाख होनांचा प्रदेश मिर्झाला द्यावा लागला. तहात नको त्या अटी राजांना मान्य कराव्या लागल्या. त्यात २३ किल्ले येई पर्यंत शंभुराजे यांना ओलीस ठेवले गेले. त्यांच्या सोबत अंगरक्षक म्हणून नेतोजी पालकर यांना शिवरायांनी मिर्झाच्या छावणीत पाठवले. तह झाला व शंभुराजे यांची सुटका झाली. पुढे छत्रपती शिवराय आणि सरसेनापती नेताजी पालकर यांना तहात ठरल्यानुसार मिर्झाच्या बाजूने लढावे लागले. शिवराय, नेतोजी,मिर्झाराजे व दिलेरखान विजापूरवर चालून गेले. मात्र आधी महाराज आणि सरनौबत यांच्यात गुप्त चर्चा झाली होती. त्यात राजे नेतोजी यांना बोलले,
" विजापूरस्थळी मिर्झा व दिलेरचा मुद्दामून पराभव करणे.. आम्ही पन्हाळा घेतो म्हणोनी निघतो..आपण विजापूरहून पन्हाळा कूच करणे…परंतु समयास न पावणे ही खबरदारी घेणे..! "जेणे करुन पन्हाळा फत्ते झाला नाही पाहिजे..!
कारण मावळे आपले लढवावे नि पन्हाळ्यावर निशाण यवनांचे फडकावावे.. हा कसला स्वराज्य धर्म..!
म्हणजे यावरून कळते की पन्हाळा जिंकणे राजांना कठीण नव्हते परंतु आपण पराक्रम गाजवून जिंकलेला पन्हाळा हा मिर्झाराजेला देऊन टाकावा लागणार होता. कारण राजे व नेताजी या समयास स्वराज्याकडून लढत नव्हते. तर तहात ठरल्याप्रमाणे मिर्झाचे मनसबदार म्हणून त्यांना लढावे लागले होते. त्यामुळे पन्हाळा आपल्या शिवरायांनी व मावळ्यांनी जिंकला तरी तो स्वराज्यात न येता मोगलांना द्यावा लागणार होता..! त्यामुळे पन्हाळ्यावर स्वतः पराभूत होण्याचा मनसुबा शिवरायांनी आखला. नेतोजींनी विजापूरमध्ये सर्जाखान याच्याविरुध्द मुद्दाम कच खाल्ली.(शिवरायांच्या पूर्व योजनेनुसार) व मिर्झा आणि दिलेरखान यांचा विजापूरमध्ये दारूण पराभव केला. व पन्हाळ्यावर वेळेवर पोहोचले नाहीत. (हे देखील पूर्व नियोजित होते.) आणि आपले १००० मावळे कामी आले. पन्हाळ्यावर महाराजांचा पराभव झाला.(ठरल्याप्रमाणे)
तेव्हा त्यांच्याकडे २००० मावळे होते. व पन्हाळ्याचा किल्लेदार हा आदिलशाही सरदार बेशकखान हा होता. आणि त्याची शिबंदी ही ८००० एवढी होती. मग यावरून तुम्ही एक विचार करा. २००० मावळे असताना व पुढे शत्रूचे ८००० सैन्य असताना महाराजांना अजून कुमक का बर लागेल..? १६६१ ची उंबरखिडीची लढाई आठवा.. त्यात आपले फक्त १००० मावळे होते व २०००० एवढी शिबंदी कार्तलाबखानाची होती. तरी देखील महाराजांनी त्याचा पराभव केला.१६६३ चा लाल महालाचा छापा आठवा…फक्त १००० मावळे असून देखील महाराज ७५००० च्या मोगली छावणीत शिरले.
पण पन्हाळा मोहीम फत्ते केली असती तर पन्हाळा स्वराज्यात येणारच नव्हता.. हे या ठिकाणी लक्षात घ्या.. कारण तो मिर्झाराजे याला द्यावा लागणार होता. कारण त्यावेळेस महाराज पुरंदरच्या तहानुसार मोगलांच्या बाजूने लढत होते.
महाराज आपले १००० मावळे का मुद्दाम धारातीर्थी करतील…बरोबर आहे…महाराजांना आपले १००० मावळे धारातीर्थी करायचेच नव्हते. फक्त अटीतटीची लढाई न करता हलक्या हाताने लढायचे म्हणजे थोडी कापाकापी करायची आणि पन्हाळ्याच्या किल्लेदाराला हुलकावणी देऊन पळून जायचे व आपला पराभव झाला असे मिर्झाराजे जयसिंह याला सांगायचे..! असा मनसुबा होता. तो महाराजांनी पूर्ण केला.. मात्र किल्लेदार बेसावध असेल असा शिवरायांचा अंदाज होता. व या अंदाजाने त्यांनी पन्हाळ्यावर छापा टाकला. पण तो सावध होता.. आणि एकदम शत्रूने आपल्यावर हल्ला चढवला त्यामुळे सगळेच गडबडून गेले. शत्रूने एकदम चढविलेल्या हल्ल्यामुळे महाराज आणि मावळे यांना पन्हाळ्यावरून चुटकी सरशी पळून जाता आले नाही. पलायन करण्यास त्यांना वेळ लागला आणि लढाई मोकळ्या मैदानात झाल्यामुळे आपले १००० मावळे हे कामी आले.
राजगडी आल्यावर राजियांनी नेतोजींना बोल लावले."समयास कैसे पावला नाहीत."व स्वराज्यातून हकालपट्टी केली.(हा एक राजकीय डाव)
कारण पुरंदरचा तह झाला. त्या नंतर महाराज अटी शर्थीमध्ये गुरफटले होते. त्यात मिर्झा आणि दिलेरखान यांच्याविरुध्द आक्रमण करायचे नाही. अशी एक अट होती. ती देखील मान्य केली होती. म्हणून नेताजींना स्वतः शिवरायांनी आदिलशहाला जाऊन मिळण्यास सांगितले. व तिकडून तुम्ही प्रत्यक्ष मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान यांना धरणी माय ठाव करून सोडा. आपला शत्रू एकच मिर्झा व दिलेरखान असे आदेश नेताजींना शिवरायांनी दिले. कारण महाराष्ट्रातून या मिर्झाची हकालपट्टी शिवरायांना करायची होती. नेताजींनी १६६६ च्या सुमारास मोगलांना दिवसा चांदण्या दाखवल्या. मिर्झा फार त्रस्त झाला. तेव्हा राजे आग्रा भेटीस गेले. वाटेतच राजांनी खलीता पाठवून मिर्झाला मिळण्याचे आदेश नेताजींना दिले. तो खूप दिवस नेताजींच्या मागे लागला होता. शेवटी राजाज्ञेनुसार नेतोजी मिर्झाला जाऊन मिळाले. महाराज आग्र्याहून सुटले. आता प्रतिशिवाजी सुटू नये म्हणून औरंग्याने १९ ऑगस्ट १६६६ रोजी त्यांच्या अटकेचे फर्मान काढले. व १६६७ च्या सुमारास नेतोजी पालकर यांना दिलेरखान याने धारूर येथे कैद केले. पुढे त्यांना आग्र्याला हलवले. धर्मांतराचे ओझे त्यांच्यावर बादशहाने घातले. त्यांनी शेवट पर्यंत नकार दिला.मग त्यांचा अतोनात छळ सुरू केला.त्यातच कोंडाजी पालकर यांचं निधन झालं.तरीही नेतोजी नमले नाहीत. पण ही खबर बहिर्जी नाईक यांनी महाराजांना दिली. तेव्हा शिवरायांनी नेतोजी पालकरांना पत्राद्वारे कळविले की,
" काकाश्री देह राखणे.. शरीर वाचवणे.. धर्मांतराचे दिव्य पत्करणे.. संधी मिळताच पलायन करावे…बजाजी नाईक निंबाळकराप्रमाने तुम्हास देखील पुनश्च स्वधर्मात घेऊ."
आणि मग महाराजांच्या आदेशानुसार नेताजींनी प्राणाहुन प्रिय असा स्वधर्म देखील सोडला. त्यांनी शिवरायांच्या राजाज्ञेचे पालन केले.
१६६७ साली नेताजींचे जबरदस्ती धर्मांतर केले. व "महम्मद कुली खान" असे बादशहाने नाव ठेवले. आणि काबूल कंधारच्या मोहिमेवर रवाना केले. तिथून पळून जाण्याचा २ दा नेताजीरावांनी प्रयत्न केला पण दोन्ही वेळेस त्यांना अपयश आले. पुढे ९ वर्षे त्यांना स्वराज्यापासून दूर राहावे लागले.
महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. स्वराज्य विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. औरंग्याचे सगळे सरदार शिवरायांसमोर अपयशी ठरत होते. तेव्हा १६७६ साली त्याने महम्मद कुली खान म्हणजेच नेताजींना महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविले. सोबत दिलेरखान यालासुद्धा पाठवले.
मे १६७६ मध्ये नेतोजी पालकर महाराष्ट्रात आले. आणि तेव्हा नेताजी दिलेरखानाच्या छावणीतून पळून रायगडावर गेले. छत्रपती शिवरायांनी नेताजींना पहिल्या नजरेत ओळखले. सरनौबत…असा हंबरडा शिवरायांनी फोडला.
१९ जून १६७६ रोजी नेताजीराव पालकर , त्यांचे पुत्र नरसोबा पालकर व नातू जानोजी पालकर यांना महाराजांनी पुनश्च हिंदू धर्मात घेतले. व जानोजी पालकर यांचा विवाह शिवरायांनी त्यांची कन्या कमळाबाई हिच्याशी लावून दिला.
याशिवाय छत्रपती शिवरायांनी १६७६ साली पुन्हा एकदा संपूर्ण स्वराज्याचे सरसेनापती पद देखील नेताजीरावांना द्यायचं ठरवलं होतं. तसा प्रस्ताव राजांनी दरबारात देखील मांडला. या प्रस्तावाला चालू सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी देखील पाठींबा दिला. हंबीरराव म्हणाले,
"महाराज,काकाश्री आमच्या पेक्षा २० वर्षाने मोठे…आम्ही सरकारांना आमच्या वडीलांप्रमाणे मानतो…तो त्यांचा मान आहे.. मी त्यांच्या फौजेतला साधा शिपाई गडी होतो.. त्यांच्या पराक्रमासमोर माझा पराक्रम हा कवडीमोल आहे..आता ते परत आलेत.. थोरले सरनौबत असताना मी सरसेनापती असणे योग्य नाही.. तो तुमची प्रतिमा असणाऱ्या इतिहासातील प्रतिशिवाजी म्हणजे आमच्या काकासाहेबांचा.. थोरल्या सरनौबतांचा मान आहे."
फार मोठे मन होते हंबीरराव मोहिते यांचे..! हंबीरराव मोहिते यांचं नेताजीराव पालकर यांच्यावर असणारे पितृप्रेम पाहून नेतोजी थक्क झाले. ते महाराजांना म्हणाले,
"महाराज, आपण कृपया हंबीरराव मोहिते यांचे सरसेनापती पद काढू नये..अहो ते आमच्या फौजेतले शिपाई गडी असले तरी आमच्या माघारी त्यांनी आमच्या सारखाच पराक्रम गाजवलाय.. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा बदला हंबीरराव यांनी घेतला.. व त्यांच्या ह्या पराक्रमामुळे त्यांना हे सरसेनापती पद मिळालय..! शिवाय ते उमदे तरूण आहेत सध्या आम्ही साठीच्या घरात गेलो.. स्वराज्याला त्यांच्या सारखा तरूण रक्ताचा सरसेनापती हवा.. की जो जास्त काळ स्वराज्यात अस्तित्वात असेल..!
आम्हास पद वगैरे काही नको.. राजे.. आजवर तुम्ही जे दिले ते अतुलनीय आहे..! एवढे मोठे संकट येऊनही आम्हाला तुम्ही स्वराज्यात नाही तर हिंदु धर्मात देखील घेतले.. वेळ प्रसंगी धर्मपीठाच्या विरोधात गेलात.. स्वराज्यातील मंत्र्यांचा विरोध पत्करलात..! बस राजे बस.. एका नेताजीरावासाठी एवढं करावं.. तेही हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींनी..! महाराज,आमचं महत्व, आमचा पराक्रम आज देखील तुमच्या, सरसेनापतींच्या व आमच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या स्वराज्यातील सर्व शिलेदार, सहकाऱ्यांच्या मनात ठासून भरलाय.. अजून काय पाहिजे एका पामराला..!
धन्य ते नेतोजीराव..थोरले सरनौबत..!
१६७६ साली महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघाले. तेव्हा त्यांच्या सोबत जुने निष्ठावंत सहकारी होते. त्यात नेताजी पालकर हे देखील सहभागी होते.
१६७८ साली महाराज आणि सहकारी दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्रात आले. तेव्हा शिवरायांनी नेताजींना चिपळूण येथे मोहिमेवर पाठविले.
१६८० पर्यंत नेतोजी चिपळूण मध्ये मोहिमेवर होते. तेव्हा पोर्तुगीजांना त्यांनी सलो की पळो करून सोडले.
१६८० ला येसाजी कंक यांच्या सोबत रायगडचा वेढा नेताजीरावांनी फोडून काढला. फितुर रायगडाचा किल्लेदार राहुजी सोमनाथ याला नेताजींनी कैद केले.
तेव्हा नेताजींनी स्वराज्यातील काही जुन्या सरदारांना एकत्र करून त्यांचा एक गट तयार केला. त्याचे प्रमुख नेतोजीराव होते. व त्यांनी त्यांच्या गटाचा पाठिंबा हा शंभुराजे यांना दिला.
नंतर पुढे देखील नेताजींचा उल्लेख आढळतो तो कुठे ते पाहुया.
१६ जानेवारी १६८१ रोजी शंभुराजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हा नेतोजी उपस्थित होते. तिथे त्यांचा योग्य तो मान सन्मान झाला. कारण त्या समयास त्यांचे वय ६१ वर्षे इतके होते. त्यांच्या एवढा ज्येष्ठ, निष्ठावंत व जुना शिलेदार स्वराज्यात दुसरा कोणताच नव्हता. त्यामुळे स्वराज्यात नेताजीरावांचा दबदबा कायम होता.
नंतर औरंग्याचा पुत्र शहजादा अकबर हा त्याच्या बापा विरुद्ध बंड पुकारून स्वराज्यात शंभुराजे यांच्या आश्रयास आला. शंभुराजे यांनी त्यांचं स्वागत केले. व नेताजींना त्याचा मान पान करण्यासाठी त्याच्या छावणीत पाठवले. कारण नेताजींना त्या अकबराच्या धर्मातील रीती रिवाज माहीत होता.
तेव्हा ती जबाबदारी शंभुराजे यांनी काढून घेतली. व हिरोजी फर्जंद यास वकील म्हणून त्याच्या छावणीत पाठवले.
आणि नेताजींना बागलाणचे किल्लेदार केले. नेताजींनी बागलाण प्रांतात अनेक मोगली सरदारांचा दारूण पराभव केला.
या पराक्रमामुळे खूश होऊन शंभुराजे यांनी १६८२ साली नेताजींना नांदेड मधील हदगाव तालुक्यातील तामसा येथील जहागिरी दिली. व नांदेडचे सुभेदार म्हणून नेमले.
तेव्हा देखील नेताजींनी मोठा पराक्रम गाजवला. त्यांनी रयबागण या स्त्री सेनानीच्या फौजेचा धुव्वा उडवला. व गोवळकोंड्याकडून येणारी परकीय आक्रमणाची वादळे महाराष्ट्राच्या सीमेवरच रोखली.
या पुढे देखील नेताजींचा उल्लेख आढळतो.. पण तो कुठे हे पाहुया. १६७८ साली शिवरायांनी नेताजींना इंदापूर व वाई प्रांताची देखील जहागिरी दिली होती. परंतु नेतोजी तिथे न थांबता शिवरायांच्या आदेशानुसार चिपळूण मोहिमेवर रवाना झाले. व वाई आणि इंदापूर प्रांताची जहागिरी ही त्यांनी त्यांचे पुत्र नरसोबा पालकर व कर्णसिंह पालकर यांच्याकडे सोपवली. त्यांनी १६७८-१६८२ पुढे ४ वर्षे सांभाळली देखील होती.
पुढे याच समयास १६८२ साली नेतोजी पालकर यांचे वय ६२ वर्षे इतके होते. वाढते वय पाहून त्यांना जास्त दगदग होऊ नये म्हणून शंभुराजे यांनी नेतोजींना नांदेड मधून माघारी बोलावले. व
इंदापूर प्रांताची जहागिरी ही त्यांनी नेतोजी पालकर यांच्याकडे सोपवली. आणि नांदेडचे सुभेदार म्हणून त्यांचे पुत्र नरसोबा पालकर यांना नांदेडमध्ये पाठवले.
१६८३ पासून १६८९ पर्यंत ६ वर्षे नेताजीरावांनी इंदापूर परागणा सांभाळला.
११ मार्च १६८९ रोजी शंभूराजे यांची हत्या करण्यात आली. तेव्हा नेतोजी पालकर इंदापूर परगणा सांभाळत होते. आणि स्वराज्य हे फार मोठ्या संकटात सापडले.
याच ठिकाणी काही इतिहासकार नेताजीराव हे शंभुराजे यांच्या मृत्यूनंतर मोगलांना मिळाले असा दावा करतात. मात्र "हे पूर्णपणे खोटे कथन आहे" हे या ठिकाणी श्रोत्यांनी लक्षात घ्यावे.
आणि शिवचरित्र खंड-३ चा संदर्भ हे इतिहासकार देतात.. मात्र आपण शिवचरित्र खंड-३ हे नीट वाचावे त्यात असे सांगितले की," महाराजांनी इंदापूर मधील मशिद वतने बंद केली व १६९० ला ती पुन्हा चालू झाली. या ठिकाणी
( "कोणी चालू केली हे स्पष्टपणे सांगितलेले नाही.") एवढंच की नेतोजी पालकर तेव्हा इंदापूर परगणा सांभाळत होते. या वरून नेतोजीराव पुन्हा मोगलांना मिळाले असे खोटे कथन केले जाते. कारण नेताजींचे वय तेव्हा ७० च्या घरात होते.
१६८९ साली शंभुराजे यांची हत्या करण्यात आली. व औरंग्याच्या छावण्या ह्या वढू,तुळापूर तसेच इंदापूर पर्यंत पसरल्या होत्या. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव यांनी सोन्याचे कळस कापून आणण्याआधी नेतोजीराव औरंग्याच्या फौजेला घिरट्या घालून त्रास देत होते.
आणि यापुढेही जाऊन विचार केला तर नेताजीरावांचा मृत्यू हा १६९० ला झाला. मात्र त्या समयास नेतोजी "तामसा" या ठिकाणी होते. म्हणजेच नांदेड मध्ये होते. थोडक्यात १६९० ला त्यांनी इंदापूर प्रांताची जहागिरी ही नरसोबा पालकर यांच्याकडे दिली होती. व ही मशिदीच्या वतनाची घटना ही नेतोजी पालकर यांच्या मृत्यूनंतर १६९० लाच घडली होती. इतिहासाने नरसोबा पालकर यांना या घटनेबाबत जबाबदार धरावे.
आणि तामसा येथे असतानाच १६९० साली सरसेनापती नेताजीराव पालकर यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. इतिहासातील प्रतिशिवाजी हे काळाच्या पडद्याआड गेले.
नेतोजीराव पालकर हे दीर्घकाळ स्वराज्यसेवा करणारे १ ले शिलेदार होते. म्हणजे जवळ जवळ १६४० पासून १६९० पर्यंत ५० वर्षे नेताजींनी स्वराज्याची सेवा केली होती.
काहींच्या मते १६८२ ला त्यांचा मृत्यू झाला असही मत आहे. हे देखील खरे असू शकते कारण १६८२ ला शंभुराजे यांना त्यांना तामसा येथील जहागिरी दिली होती. व त्यांचा मृत्यू इथेच झाला हे सत्य आहे.
किंवा १६९० ला झाला असे म्हणावे तरी तामसा येथेच त्यांचे निधन झाले ही सत्य घटना आहे. कारण त्यांची समाधी तामसा या ठिकाणीच आहे. आणि इंदापूर प्रकरण १६९० लाच घडले.पण तेव्हा नेतोजी तामसा येथे होते. इंदापूरची जहागिरी त्यांनी आधीच सोडलेली होती
किंवा १६८२ नंतर ते तामसा येथेच वास्तव्य करत असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. व जरी हयातीत घडली असली तरी नेतोजी पालकर यांचा या घटनेशी संबंध लागत नाही. कारण त्यांनी आधीच इंदापूरची जहागिरी सोडली होती. त्यांच्या पश्चात नरसोबा पालकर यांनी ही घटना केली असावी. हे याठिकाणी सिद्ध होते.
अशा श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला म्हणजेच इतिहासातील प्रतिशिवाजी, हिंदवी स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख…हिंदवी स्वराज्याचे २ रे सरसेनापती.. पुरंदरचे किल्लेदार.. शंभुराजे यांचे अंगरक्षक…बागलानचे किल्लेदार…नांदेडचे सुभेदार अशा वेगवेगळ्या पदावर राहून मोठा पराक्रम गाजवणारे सरसेनापती नेताजीराव पालकर यांना त्रिवार मानाचा मुजरा.