विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 17 September 2022

लातूरचे जुने नाव काय? लातूर हे नाव कसे पडले?

 


लातूरचे जुने नाव काय? लातूर हे नाव कसे पडले?
उत्तर:
रट्टगिरी, रट्टनपुर, रत्नपुर, लत्तलौर, लत्तनीर, लत्तलूर ही आजच्या लातूरची प्राचीन प्राचीननावे.

लातूर या नावाची व्युत्पत्ती रट्ट वा राष्ट्रकूट या राजवंशाच्या नावातून झाल्याचे दिसते.
आताच्या लातूर शहराच्या नावासंबंधात इ.स. च्या ७-८ व्या शतकापर्यंत मागे जाऊन मागोवा घेता येतो. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या एका बलिष्ठ अशा घराण्याचा मूळ पुरुष येथला होता. त्यावेळी या शहराला "लत्तलूर" असे म्हणत याचा पुरावा तत्कालीन अभिलेखांतून मिळतो. ते घराणे होते राष्ट्रकुटीचे. त्यांच्या अनेक अभिलेखातून त्यांचे "लत्तलूरपुरवराधीश्वर" असे बिरुव येते. हे लत्तलूर म्हणजेच आजचे लातूर होय.
राष्ट्रकुटांच्या सर्व शाखांचे मूलस्थानच मुळी लातूर हेच होते. मानपूरच्या राष्ट्रकुटांनी कारणवशात सत्ता गेल्यावर लातूरकडे धाव घेतली असावी व तेथे किल्ला वा गढी बांधून वास्तव्य केले असावे असे अनुमान लातूरच्या प्राचीन "रट्टगिरी" या नावावरून करता येते.
लत्तलूर किंवा लत्तनौर ही "रट्टनौर" या कानडी नावाची तद्भव रूपे आहेत. याचा अर्थ असा की, लातूर हे गावच मुळी त्यांनी नावारूपाला आणले होते, वसविलेही असावे.
म्हणजेच लातूरचे पूर्वीचे नाव रत्नपूर (रट्टनपूरचे संस्कृत रूप) असून ते मांजरा नदीवर वसलेले होते. या परिसराच्या अन्वेषणात येथील टेकड्यांवर प्राचीन वस्तीच्या खुणा आजही आढळतात.
मांजरा नदीच्या पुरामुळे वा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे ही वस्ती आजच्या लातूरच्या गावठाणात स्थलांतरित झाली व गावाच्या विस्तारामुळे रट्टनपुर - लत्तनीर - लत्तलौर - लातूर अशा क्रमाने त्याचे नामांतर होत गेले.
आधिकची माहिती:
लातूर हे बदामीच्या चालुक्य काळात अस्तित्वात असल्याचे विक्रमादित्याच्या कर्नूल ताम्रपटातील या स्थलनामाच्या उल्लेखावरून सिद्ध होते.
सातव्या शतकात ते रत्नगिरी (रट्टनागिरी) आणि रट्टगिरी या नावांनी ओळखले जात होते. रत्नपुर माहात्म्यात लातूरचे प्राचीन नाव रत्नपुर असे असून ती ताम्रध्वज राजाची राजधानी असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. तसेच येथील वस्ती त्या काळात मांजरा नदीच्या काठावर असल्याचे म्हटले आहे. ही माहिती म्हणजे केवळ आख्यायिका नसून ती ऐतिहासिक घटनावर आधारित आहे हे कर्नूल ताम्रपटातील रत्नगिरी या लातूरच्या चालुक्यकालीन नावावरून स्पष्ट होते.
तसेच लातूरजवळ मांजरा नदीच्या काठावर जे ओस पडलेल्या वस्तीचे अवशेष दिसतात. त्यावरून रत्नपूर माहात्म्यातील हे नगर मुळात नदीकाठावर असल्याच्या माहितीस दुजोरा मिळतो. विक्रमादित्याच्या काळातील रत्नगिरी किंवा रहगिरी हे बहुधा लातूरच्या जुन्या वस्तीचे नाव असावे. या स्थलनामाची व्युत्पत्ती "रट्ट" किंवा "राष्ट्रकूट" राजवंशाच्या नावाशी निगडित आहे हा अंदाज कर्नूल ताम्रपटातील रट्टगिरी या नावावरून खरा ठरला आहे.
राष्ट्रकूट तिसऱ्या गोविंदाने लातूरजवळील मोरखण्डी येथे राजवानी हलविल्यानंतर त्याचा व त्याचा युवराज अमोघवर्ष याचा या नगराशी संपर्क वाढत गेला व हे ग्रामाचे "पुर" बनले. अमोघवर्षाची ही बहुधा निवासी राजधानी असावी. रत्नपूर माहात्म्यातील ताम्रध्वज म्हणजे राष्ट्रकूट अमोघवर्षच असला पाहिजे.
स्थलमाहात्म्यातील आख्यायिकांतील नावे बदलली तरी तिच्यामागे ऐतिहासिक घटना असतात हे वेरूळ शिवालय माहात्म्यातील राष्ट्रकूट पहिल्या कृष्णाच्या एलराजा या नावावरून स्पष्ट झाले आहे.
तथापि, राष्ट्रकूटकाळात निवासी राजधानी असून देखील केवळ अमोघवर्षाच्या शिरूर आणि मुळगुंद कोरीव लेखाव्यतिरिक्त राष्ट्रकुटाच्या इतर कुठल्याही साधनात या नगराचा उल्लेख आढळत नाही. या कोरीव लेखात लातूरला "पुरूर" म्हणजे श्रेष्ठ नगर असल्याचे जे विशेषण लावले आहे.
त्यावरून नवव्या शतकात लातूर हे त्या काळातील शहराच्या परिमाणानुसार मोठे नगर असल्याचे प्रतीत होते.
लातूर नगराचा उल्लेख असलेले बहुतेक कोरीव लेख कल्याणीच्या चालुक्य राजवटीतील होत. खुद्द लातूर येथे जे दोन शिलालेख उपलब्ध झाले आहेत, त्यापैकी एक कल्याणीचा चालुक्य राजा तिसऱ्या सोमेश्वराच्या काळातील म्हणजे बाराव्या शतकाच्या पूर्वार्वातील आहे. त्यात लत्तलूरचे वर्णन 'दिव्य' आणि "पुरश्रेष्ठ" या विशेषणांनी करण्यात आले आहे.
तसेच वेदविद्येत पारंगत असलेल्या ५०० महाजनांचे येथे वास्तव्य असल्याची माहिती त्यात नमूद करण्यात आली आहे. यावरून लातूर हे कल्याणच्या चालुक्य राजवटीत विद्वानांचे माहेरघर व शैक्षणिक केंद्र असल्याची माहिती मिळते. त्याच शिलालेखात येथील भूतेश्वर शिवमंदिर आणि पापविनाशन तीर्थाचाही उल्लेख असून ते आजही त्याच ठिकाणी अवशिष्ट स्वरूपात का असेना, परंतु अस्तित्वात आहे.
येथील राष्ट्रकूट वंशातील विविध व्यक्तींनी बाहेर जाऊन कर्नाटकातील बेळगाव जवळील सौंदत्ती, तसेच महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात छोटी राज्ये किंवा सामन्त आणि प्रशासनाधिकाऱ्यांची पदे प्राप्त केली.
परंतु लातूरचे राजकीय किंवा प्रशासकीय महत्त्व मात्र वाढले नाही. परंतु या काळात ते धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र मात्र होते. लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर बहुधा याच काळात बांधले गेले असावे.
यादव राजवटीत लातूरला सर्वप्रथम राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व प्राप्त झल्याची माहिती कान्हरदेव यादवाच्या कान्हेगाव येथील शिलालेखावरून मिळते.
त्यानुसार गोपाळ राष्ट्रीड हा या काळात यादवांचा प्रशासनाधिकारी असून त्याच्या अधिकार क्षेत्रा त लातूर जिल्हयातील उदगीर आणि नांदेड जिल्हयातील कंवार देशांचा समावेश होता. गोपाल राष्ट्र याचे वास्तव्य लातूर येथे होते.
त्यावरून लातूर हे या काळात देश विभागांचा समावेश असलेल्या मंडळ विभागाचे मुख्य केंद्र असावे असे दिसते

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...