विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 11 September 2022

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग १६ प्रथम रुद्रसेन

 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे

भाग १६रुद्रसेन प्रथम का इतिहास - India Old Days

 

 

प्रथम रुद्रसेन

 

प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र सातकर्णी हा पित्याच्या हयातीतच कालवश झाला होता. म्हणून सन ३३० च्या सुमारास प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा नातू प्रथम रुद्रसेन हा गादीवर आला. ही वाकाटकांची ज्येष्ठ शाखा होय. हा चक्रवर्ती गुप्त सम्राट समुद्रगूप्ताचा समकालीन होता. भारशिव वंशाच्या भवनाग राजाचा हा नातू असल्यामुळे त्याला भारशिवांचे खूप मोठे सहाय्य लाभलेले होते. त्याच्या वंशजांच्या लेखात याचे वर्णन ' भारशिव महाराज भवनाग याचा दौहित्र ' असा येतो.

 

या राजाचा फक्त एकच शिलालेख आज पर्यंत सापडलेला आहे. 'प्राण्यांचे बंधन हिंसा कोणीही करू नये ' अशी आज्ञा असणारा अशोकाचा शिलालेख रूद्रसेनाने वरून छिलून त्यावर आपला लेख कोरलेला आहे. लेखाचा उद्देश त्या ठिकाणी राजा रुद्रसेनाचे धर्मस्थान होते हे जाहीर करणे हा होता. रुद्रसेन हा भगवान शंकराने दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याकरिता उत्पन्न केलेल्या महाभैरवाचा भक्त होता.

 

त्याकाळी नर्मदेच्या उत्तरेस अनेक राज्ये होती. त्यातील अनेक राज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेऊन आपल्या राज्यात जोडली. समुद्रगूप्ताने ज्या राज्यांचा समूळ उच्छेद केला त्यामध्ये नागदत्त, गणपती नाग नागसेन हे नाग राजे देखील होते. त्यातील गणपती नाग हा भारशिव नृपती भवनागाचा उत्तरअधिकरी असावा. भवनाग हा रूद्रसेनाचा मातुल घराण्यातील आजोबा. समुद्रगूप्ताने या सर्व नागवंशीय राजांचे समूळ उच्चाटन केल्याने रुद्रसेनाला उत्तरेतील या राजांच्या पाठबळाला मुकावे लागले आणि त्याचे सामर्थ्य कमी झाले.

 

उत्तर भारत जिंकून घेतल्यावर समुद्रगूप्त दक्षिण दिग्विजय करण्यास निघाला. त्याने दक्षिणेतील कोसल देशाचा राजा असणाऱ्या महेंद्र याचा पराभव केला. समुद्रगुप्ताच्या या विजयाने वाकाटकांच्या सामर्थ्यास मोठाच धक्का बसला. महाकांतारचा व्याघ्रराज, कुराळचा मण्टराज, पिष्टपूरचा महेंद्रगिरी या राजांनी वाकाटकांचे वर्चस्व झुगारून देऊन गुप्तांचे स्वामित्व कबूल केले. त्यामुळे वाकाटकांच्या या ज्येष्ठ शाखेचे राज्य नर्मदा नदी आणि विंध्याद्री पर्वतराजी यापूरतेच मर्यादित झाले.

रुद्रसनाचे राज्य छोटे झाले असले तरी त्याने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले आणि बलाढ्य समुद्रगूप्तापुढे मान तुकवली नाही.

 

सन ३५० च्या सुमारास प्रथम रुद्रसेनाचा पुत्र पृथ्वीषेण हा राज्यावर आला. हा देखील आपल्या वडिलांप्रमाणे शिव भक्त होता. त्याचा एकही लेख सापडलेला नाही असे असले तरी त्याचे उल्लेख त्याच्या वंशजांच्या लेखात आलेले आहेत. त्यात तो सत्य, ऋजुत्व, कारुण्य, शौर्य, विक्रम, बुद्धिमत्व, मनोनैर्मल्य इत्यादी गुणांविषयी त्याची ख्याती होती असे समजते. त्याची तुलना अजातशत्रू धर्मराजा सोबत केलेली आहे. त्यावरून त्याने कधीही परराज्यपहरणाकरिता युद्ध केले नव्हते असे म्हणता येईल. त्याने राज्य प्रसारापेक्षा आपल्या प्रजेकडे जास्त लक्ष दिले. त्याच्या काळात समुद्रगूप्ताने उत्तरेतील क्षत्रप राजांविरुद्ध युद्ध पुकारले. त्यावेळी दक्षिणेतील वाकाटकांनी सुद्धा त्याला मदत केली. गुप्त-वाकाटक युती मुळे क्षत्रपांचा सहज पाडाव झाला आणि उत्तर भारतातील गुप्तांचे राज्य निष्कंटक झाले. या प्रसंगी वाकाटकांशीडून आलेल्या मैत्रीला चिरठायी बनवण्यासाठी चंद्रगुप्ताने आपली पुत्री प्रभावतीगुप्ता पृथ्वीषेणाचा पुत्र द्वितीय रुद्रसेन याला दिली.

या घटनेपूर्वी पाच शतके आधी देखील शूंग काळात असाच माळवा आणि विदर्भ यांवर राज्यकरणार्या राजवंशात विवाहसंबंध आलेले होते. या पुरातन घटनेवर आधारलेले कविकुलगुरू कालिदासाचे 'मालविकाग्नीमित्र ' हे नाटक सुध्दा याच काळातील आहे.

 

- प्राजक्ता देगांवकर

 

 

संदर्भ

)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी

) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...