प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग १५
प्रथम प्रवरसेन
विंध्यशक्ती नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन हा राजगादी वर बसला. हा वाकाटक वंशातील सर्वश्रेष्ठ नृपती होय. त्याने आपले राज्य सर्व दिशात पसरवले होते. प्रवरसेनाने उत्तरेत नर्मदेपर्यंत स्वारी करून पुरीका नगरी जी नागराजा दौहीत्र शिशुक याच्या ताब्यात होती ती जिंकून घेतली व तिथे आपली राजधानी वसवली. दक्षिणेत उत्तर कुंतलातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर हा भाग ही त्याच्या ताब्यात असावा तर पूर्वेस दक्षिण कोसल, कलिंग व आंध्र येथील राजांनी त्याचे वर्चस्व मान्य केले असावे. मात्र निश्चित पुराव्याअभावी प्रवरसेनाच्या साम्राज्याच्या सीमा सांगणे कठीण आहे.
प्रवरसेन हा देखील आपल्या वडिलांनप्रमाणे वैदिकधर्माभिमानी होता. त्याने अनेक श्रौत याग केले. त्याच्या वंशजांच्या अनेक ताम्रपटात त्याने केलेल्या चार अशमेघ यज्ञांचा व सप्तसोम ( अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, व आप्तोर्याम ) यज्ञांचा उल्लेख आलेला आहे. पुराणांमध्ये त्याच्या वाजपेय यज्ञांचा व त्यात त्याने दिलेल्या बहुमूल्य दक्षिणांचा मुद्दाम निर्देश केलेला दिसतो. या वाजपेय यज्ञाच्या अनुष्ठानानंतर त्याने सम्राट ही अत्यंत मानार्ह पदवी धारण केली. दक्षिण भारतातील इतर कोणत्याही प्राचीन राजाने ही पदवी धारण केल्याचे इतिहासात नमूद नाही.
त्याने आपल्या धर्मविजयत्वाची निदर्शक म्हणून ' धर्ममहाराज ' अशी उपाधीही धारण केली आपल्याला दिसते.
दक्षिण भारतात आपले सम्राटपद घोषित केल्यानंतर प्रवरसेनाने आपल्या उत्तर भारतातील सत्तेला बळकटी आणण्यासाठी तेथील भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडले. भारशिव हे नागवंशी असून मूळचे विदर्भातील असावेत. त्यांनी कुशाणांकडून हिंदूंना पवित्र असणारी प्रयाग व काशी ही दोन्ही धर्मक्षेत्रे आपल्या ताब्यात घेतली होती. भारशिव नृपती भवनाग याने आपली पुत्री प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र यास दिली होती. या वैवाहिक संबंधाने उत्तर भारतातील प्रबळ अश्या राजसत्तेचे पाठबळ वाकाटकांना मिळाले व त्यांची राज्यसत्ता दृढमूल होण्यास मदत झाली.
पूराणांनूसार प्रवरसेनांने साठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर वाकाटक राज्याची चार शकले पडली. वर उल्लेखिलेला गौतमीपुत्र आधीच मरण पावल्याने त्याचा पुत्र रुद्रसेन हा गादीवर आला. त्याने उत्तर विदर्भावर पुरिका वा नंदिवर्धन ( सध्याचे नगरधन ) येथून राज्य केले. प्रवर्सनाचा दुसरा मुलगा असणाऱ्या सर्वसेन याने वत्सगुल्म ( आत्ताचे वाशिम, जी.अकोला ) येथून दक्षिण विदर्भावर राज्य केले. उर्वरित दोन पुत्र कुठे राज्य करत असावेत हे नक्की सांगता येत नसले तरी त्यापैकी एक कृष्णा नदीच्या खोऱ्यात उत्तर कुंतलवर तर दुसरा दक्षिण कुंतलवर राज्य करत असावा. मात्र या दोनही शाखांचे राज्य लवकर संपुष्टात आल्याने त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
No comments:
Post a Comment