प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग १७
द्वितीय प्रवरसेन
प्रथम पृथ्वीसेना नंतर त्याचा पुत्र द्वितीय रूद्रसेन राज्य करू लागला. त्याचा पिता व पितामह हे शिवोपासक होते, पण हा स्वतः मात्र चक्रपाणीचा ( विष्णू ) भक्त होता व त्याच्याच उपासनेमुळे आपल्याला राज्य प्राप्ती झाली अशी त्याची श्रद्धा होती. याचे कारण त्याची अग्रमहिषी ( पट्टराणी ) प्रभावतीगुप्ता ही विष्णू उपासक असून तिचा प्रभाव द्वितीय रुद्रसेनावर पडला असावा. तिने रामटेकच्या टेकडीवरील आपले दोन्ही ताम्रपट हे प्रबोधिनी एकादशीस उपवास करून पारण्याच्या प्रसंगी दिलेले आहेत. राज्यारोहणानंतर लगेचच द्वितीय रूद्रसेनाचा मृत्यू झाला. त्याचे दोन्ही पुत्र हे अल्पवयीन असल्याने प्रभावतीगुप्ता हीच आपला वडील पुत्र दिवाकरसेन याच्या नावाने राज्यशकट चालवत होती. तिला राज्यकारभारात मदत करण्यासाठी तिचे वडिल असणार्या समुद्रगुप्ताने अनेक कारभारी आणि मुत्सद्दी पाठवले होते, त्यामध्येच कवी कुलगुरू कालिदास ही असावा. विदर्भात असताना त्याने आपले प्रसिद्ध खंडकाव्य मेघदूत हे रचले. यातील शापित यक्ष रामगिरि जवळच्या ( आजचे रामटेक ) आश्रमात राहत होता असे वर्णन आहे. दुर्दैवाने दिवकरसेनही अल्पायुषी ठरला. त्याच्या अकाली निधनानंतर त्याचा छोटा भाऊ दामोदरसेन हा गादीवर आला. राज्यारोहणाप्रसंगी त्याने आपला सुविख्यात पूर्वज प्रवरसेन याचे नाव धारण केले. त्याने जवळपास तीस वर्षे राज्यकारभार केला. त्याच्या काळात नंदिवर्धन ही काही काळासाठी राजधानी होती मात्र नंतर त्याने प्रवरपुर हे नविन शहर वसवून या नवीन वसवलेल्या नगरीत आपली राजधानी स्थापन केली.
द्वितीय प्रवरसेन हा शिव उपासक होता. मात्र आपल्या वैष्णव उपासक मातेच्या प्रभावतीगुप्तेच्या आज्ञेवरून त्याने भगवान रामचंद्रांच्या चरित्रावर ‘सेतुबंध’ हे काव्य रचण्यास सुरुवात केली. मात्र त्यात खूपच अडचणी येऊ लागल्या, चुका होऊ लागल्या हे त्याने स्वतः सांगितले आहे. या वेळी त्याने कालिदासाची मदत घेतली असावी. या कारणाने ते काव्य प्रवरसेनाच्या नावावर मोडत असेल तरी ते समुद्रगूप्ताच्या आज्ञेवरून कालिदासाने लिहिले असावे अशी समजूत प्रचलित झाली. तिचा उल्लेख या काव्याच्या प्रत्येक सर्गाच्या अखेरीस आढळतो.
याच्या कारकिर्दीच्या शेवटी प्रभावतीगुप्ताचा मृत्यू झाला असावा. तिच्या स्मरणार्थ प्रवरसेन व त्याच्या बहिणीने रामटेक येथे ' प्रभावती स्वामिन ' या नावाने विष्णू ( नरसिंह) मंदिर बांधले, आणि सुदर्शन नावाचा तलाव ही खोदला.
दुसऱ्या प्रवरसेनाच्या मृत्यू नंतर त्याचा पुत्र नरेंद्रसेन हा गादीवर आला.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
No comments:
Post a Comment