विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 11 September 2022

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग १८ नरेंद्रसेन

 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे

भाग १८


 

 

नरेंद्रसेन

 

द्वितीय प्रवरसेनानंतर त्याचा मुलगा नरेंद्रसेन हा सन ४३० च्या सुमारास गादीवर आला. त्यावेळी त्याचे वय बरेच जास्त असावे कारण त्याचा पिता असणाऱ्या द्वितीय प्रवरसेनाने दीर्घकाळ राज्य केले होते. नरेंद्रसेनाचा एकही लेख आजपर्यंत सापडलेला नाही. मात्र त्याचा पुत्र मांडलिक राजे यांच्या लेखात त्याचे उल्लेख आलेले आहेत.

 

नरेंद्रसेनाने आपल्या राज्याच्या पूर्व उत्तर दिशेस आक्रमक धोरण अवलंबिलेले दिसते. त्याचा मुलगा पृथ्वीषेण याच्या बालाघाट ताम्रपटात नरेंद्रसेनाने शौर्याने आपल्या कोसला, मेकला आणि मालव या शत्रूंचा पराभव केला होता, या देशांचे अधिपती त्याच्या आज्ञा शिरसावंद्य मानत होते, असे वर्णन आलेले आहे. त्या काळात उत्तरेतील गुप्त राजवट ही निर्बल झाली असल्याने  त्यांची या भागांवरील पकड सैल झाली होती, याचाच फायदा नरेंद्रसेनाने घेतला आपला राज्यविस्तार केला.

नरेंद्रसेनाचे लग्न हे कुंतल नरेशाची कन्या अज्झितभट्टरिका हीचाशी झाला होता. यावरून नरेंद्रसेनाने राज्यविस्तारासोबतच इतर राज्यांशी वैवाहिक संबंधही जोडलेले दिसतात.

 

नरेंद्रसेनाच्या अखेरच्या काळात वाकाटक राज्यसत्तेवर नल राजा भगदत्तवर्मा याने प्रचंड मोठी स्वारी करून वाकाटकांचा बराचसा भाग जिंकून घेतला. त्या काळात वाकाटकांच्या घराण्याला वाईट दिवस आल्याचे स्वतः वाकाटक मान्य करतात. कारण द्वितीय पृथ्वीषेणाचा उल्लेख बालाघाट ताम्रपटात 'निमग्न वंशाचा उद्धर्ता ' असा आलेला आहे.

नरेंद्रसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा द्वितीय पृथ्वीषेण हा गादीवर आला. त्याने प्रतिकूल परिस्थिती पाहून आपली राजधानी प्रवरपुराहून हलवून ती भंडारा जिल्ह्यातील आमगाव जवळ पद्मपुरी येथे नेली. तिथे आपले लष्करी सामर्थ्य वाढवून त्याने नल राजांवर आक्रमण केले आणि त्यांचे विदर्भातून संपूर्ण उच्चाटन केले. एवढेच नाही तर त्यांची राजधानी असणारी पुष्करी ही नगरी सुद्धा त्याने उध्वस्त केली.

 

द्वितीय पृथ्वीषेणाने पूर्वे सोबतच उत्तरेत ही आपली सत्ता दृढ केली. त्याने मेकला देशाच्या उत्तरेस असलेल्या चेदी देशापर्यंत आपले राज्य वाढवले. हे राजे आधी गुप्तांचे मांडलिक होते मात्र नंतर त्यांनी वाकाटकांचे स्वामित्व स्वीकारल्याचे दिसते.

 

वाकाटक राजे हे शिवोपासक होते. याला दोनच अपवाद आहेत ते म्हणजे द्वितीय रूद्रसेन आणि हा शेवटचा राजा द्वितीय पृथ्वीषेण होय. द्वितीय पृथ्वीषेण हा स्वतः ला ' परमभागवत ' ( विष्णूचा निस्सीम भक्त) म्हणवून घेत असे. त्याचा अंत सन ४९० च्या सुमारास झाला असावा. यानंतर ज्येष्ठ शाखेचा प्रदेश वत्सगुल्म शाखेच्या हरिषेण या नृपतीच्या साम्राज्यात विलीन झाला.

 

याप्रमाणे जवळपास सन ३३० ते ४९० अश्या १६० वर्षांच्या शासनानंतर वाकाटकांच्या ज्येष्ठ शाखेचा अस्त झाला. या शाखेतील राजे शुर, राज्यशासनकुशल, दानशील, वैदिकधर्माभिमानी, साहित्य आणि शिल्पादी कलांचे भोक्ते आश्रयदाते होते. त्यांनी बांधलेली देवालये आज अस्तित्वात नसली तरी रामटेक पवनार येथील अवशेषांवरून त्यांची भव्यता शिल्पांची सुबकता यांची कल्पना येते. त्यांच्या काळात अनेक काव्ये निर्माण होऊन वैदर्भी रीतीला सर्वत्र मान्यता मिळाली. त्यातील कवी कुलगुरू कालिदासाचे मेघदूत हे संस्कृत महाकाव्य तर द्वितीय प्रवरसेनाचे महाराष्ट्री प्राकृतातील सेतूबंध किंवा रावणहो या काव्यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमुळे वाकाटकांच्या जेष्ठ शाखेतील राजे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे शासनकर्ते ठरले.

 

 

 

- प्राजक्ता देगांवकर

 

 

संदर्भ

)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी

) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...