प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग १४
विंध्यशक्ती पहिला
प्रथम विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा होय. याचे नाव पुराणांत तसेच अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यांमधील लेखात आलेले आहे. त्या लेखात विंध्यशक्तीचा हा द्विज म्हणजे ब्राह्मण असून त्याचे गोत्र विष्णूवृद्ध आहे असा उल्लेख आलेला आहे. त्यात विंध्यशक्ती चा
' वाकाटकवंशकेतुः ' म्हणजे वाकाटक वंशाचे मानचिन्ह असा केलेला आहे. त्याची राजधानी ही पुरातन नगरी चनका ही होती.
विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राजवटीमध्ये मोठ्या अधिकारावर असावा व त्यामुळेच त्याला पुढे राज्यसत्ता बळकावणे शक्य झाले असावे असे वाटते. त्याने इ.स २५० ते २७० असे राज्य केले असावे असे अनुमान आहे. पुराणांमध्ये आलेली त्याची ९६ ही कालगणना त्याच्या कारकिर्दीची नसून त्याच्या वयोमानाची असावी असे वाटते.
पुराणांच्या मते वाकाटकांचा पहिला प्रसिद्ध राजा विंध्यशक्ती होय. त्याने आपले राज्य विदिशेच्या आसपास पसरवले व वाढत वाढत साम्राज्याच्या दर्जाला पोहचवले.
अजिंठ्याच्या लेखात विंध्यशक्तीची मोठी स्तुती केलेली आहे. ' त्याने मोठ्या मोठ्या लढायांत विजय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते. तो क्रुद्ध झाला तर प्रत्यक्ष देवांनाही अनिवार्य होत असे. त्याच्या घोड्यांच्या टापांनी उडविलेल्या धुळीने आकाशात सूर्य झाकून जात असे. त्याच्या शौर्याने पराभूत झालेले शत्रू त्याच्या पुढे विनम्र होत’. एकंदरीतच विंध्याशक्ती हा एक प्रबळ राजा होता. त्याचा पराक्रमाची तुलना प्रत्यक्ष इंद्र व विष्णूशी केलेली आहे.
त्याने आपल्या कारकीर्दीत चार अश्वमेध आणि आप्तोर्यांम, बृहस्पतिसव, ज्योतिष्टोम, वाजपेयादी यज्ञ केल्याचे दिसते.
विंध्यशक्तीच्या माघारी त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन राजा झाला. वाकाटक घराण्यातील हा सर्वात महत्त्वाचा राजा होय.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
No comments:
Post a Comment