प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग १३
वाकाटक राजघराणे
प्राचीन महाराष्ट्रात जी अत्यंत बलाढ्य व सुसमृद्ध अशी साम्राज्ये झाली त्यात वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. इ.स. २५० ते जवळपास इ.स. ५५० पर्यंत वाकाटकांनी विदर्भावर राज्य केले. या तीनशे वर्षांच्या कालावधीत वाकाटकांनी आपली सत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरा पर्यंत पसरवली. नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या मालव, मेकल व चेदी या देशांनीही त्याचे मांडलिकत्व काही काळासाठी पत्करलेले होते.
असे हे सामर्थ्यशाली घराणे इतिहासाला १८३६ पर्यंत अज्ञात होते. इ.स. १८३६ मध्ये सिवनी येथे वाकाटक राजा द्वितीय प्रवरसेन याचा ताम्रपट सापडला व हे राजघराणे इतिहासाला ज्ञात झाले. पुराणांमध्ये मात्र वाकाटकांबद्दल काहीच लिहिलेलं नाही. त्यांचा पहिला राजा विंध्यशक्ती याचा मात्र उल्लेख पुराणांमध्ये सापडतो.
वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्ती पहिला याने केली. त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन हा त्याच्या नंतर राजा झाला. प्रवरसेनाच्या माघारी वाकाटकांच्या दोन शाखा महाराष्ट्रावर राज्य करू लागल्या. त्यांना ज्येष्ठ शाखा आणि वत्सगुल्म शाखा असे म्हणतात.
वाकाटक राजांनी संस्कृत व प्राकृत या दोनही भाषांतील कवींना उदार आश्रय दिला होता. विदर्भातील वाङ्मय निर्मितीमुळे तेथील वैदर्भी रीतींना प्राधान्य प्राप्त झालेले दिसते. कलिदासासरख्या कवीने देखील यावर काव्ये केलेली आहेत. त्याने आपल्या मेघदूत या महाकाव्यात विर्दभाचे वर्णन केलेले आहे.
वाकाटकांच्या काळात भारतीय समाजात अनेक महत्त्वाचे बदल झाले आणि त्या बदलांमध्ये वाकाटकांचा मोठा हात होता. त्यांच्या काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कुशाण कारकीर्दीत सनातन धर्मास जी उतरती कळा लागली होती ती या गुप्त व वाकाटक काळात संपून सनातन धर्म पुन्हा उभारी धरू लागला. याच काळात संस्कृत भाषेच्या व वांगमयाच्या अभीवृद्धीची चळवळ सुरू झाली. यामुळेच गुप्त नृपतींनी सुद्धा संस्कृत भाषेला राजाश्रय दिला. संस्कृतभाषे सोबतच शिल्पकला व चित्रकला यांचे पुनरुज्जीवन सुद्धा वाकाटकांच्या काळात झाले. त्याचे पूरावे त्यांच्या राज्यात असणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसते.
वाकाटक राजांनी केवळ विद्वानांना वा कवींना आश्रयच नव्हता दिला तर ते स्वतः सुद्धा उत्तम काव्ये व सुभाषिते रचत. वाकाटक राजांनी रचलेली हरिविजय, सेतुबंध अथवा रावणवहो ही काव्ये तर अनेक सुभाषितांचे उल्लेख आजही अनेक ठिकाणी सापडतात. वाकाटकांनी स्वतः जी काव्ये रचली त्याची प्रशंसा बाण व दण्डी या सारख्या कवींनी केलेली आहेत.
त्यांच्याच काळात अजिंठातील काही लेण्या कोरल्या गेल्या. ज्यातील विहार, चैत्य, शिल्प, चित्र यांची प्रशंसा आजही जगभरात होते आहे.
अजिंठ्यातील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी ही वाकाटक कालीन असून ती लेणी स्थापत्य व चित्रकला या दोन्ही दृष्टींनी इतर लेण्यांपेक्षा उत्कृष्ठ आहेत.
एकंदरीतच त्या काळातील संस्कृत भाषा, कला, वाङ्मय या सर्वांच्या पुनरुज्जीवनाचे सारे श्रेय जरी गुप्त राजांना दिले गेले असले तरी खऱ्या अर्थाने ते श्रेय वाकाटकांचेच आहे.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
No comments:
Post a Comment