विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 1 October 2022

महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक राजा ईल उर्फ श्रीपाल भाग 2

 

महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक राजा ईल उर्फ श्रीपाल
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे

भाग 2
राजा ईलने आपले राज्य व्यापार आणि उद्योग यांनी संपन्न करून एलिचपूर शहराचे वैभव वाढवले होते. त्यामुळे त्याच्या राज्यात भरभराट होत राहिली. त्याच्या काळात जैन धर्माला राजाश्रय लाभल्यामुळे अनेक जैन धर्मीय विद्वान आणि साहित्यिक येथे येऊन ग्रंथरचना करत असत. याचे कारण म्हणजे जवळच असलेले शांत व रमणीय असे मुक्तागिरी! हे पवित्र जैन तीर्थक्षेत्र त्याकाळी अनेक विद्वानांचे तसेच श्रध्दाळू लोकांचे आकर्षणाचे केंद्र होते.
त्याकाळात माळव्याहून सातपुडा ओलांडून विदर्भावर सतत आक्रमणे होत असत. शत्रूंच्या या आक्रमणांना तोंड देण्यासाठी ईल राजाने मध्य प्रांतातील बैतूलजवळ 'खेरला' येथे भव्य दगडी किल्ला बांधला व तेथे आपले सैन्य ठेवले होते. त्याने बांधलेला खेरला येथील किल्ला विदर्भाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा होता. या किल्ल्याचे अवशेष आजही दिसून येतात.
ईल राजाचे राज्य संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत पसरले होते. चालुक्य राजा अलकेसरी याने ईलच्या कार्यकाळात अचलपूर येथे भेट दिली होती. शहर आणि राज्याचे वैभव पाहून तो चकित झाला होता.
राजा ईलचा नातू 'जैतपाल' होय. तो 'विवेकसिंधू'चा कर्ता 'मुकुंदराज' याचा पुतण्या होता. जैतपालचा खेरला येथील शिलालेख मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे.
राजा ईल आणि शहा दुल्हा रहेमान गाझी या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाल्याचे उल्लेख काही फारशी ग्रंथांत आहेत. यातील बराचसा भाग दंतकथात्मक असला तरी त्याचे स्थळविषयक पुरावे आजघडीला अचलपुरात अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्याबद्दलची माहिती देणे आवश्यक वाटते.
ती अशी-
एकदा ईल राजाने आपल्या राजधानीत धर्मासभा आयोजित केली होती. या धर्मसभेत विविध धर्माचे प्रतिनिधी आले होते. वादविवादात ईल राजाने एका मुस्लिम फकिरास हरवले. लागलीच त्याने ही वार्ता गझनीचा बादशहा महमूद याला सांगितली. घटना ऐकून महमूद अतिशय क्रोधित झाला व त्याने आपला भाचा रहेमान शहा याला अचलपूरवर आक्रमण करण्याचा हुकूम केला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...