वाईच्या वतन साठी / देशमुखीसाठी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या घशात घातली, असा त्याच्यावर आरोप आहे. आज फितुरीचं दुसरं नाव म्हणून त्याचंच नाव घेतलं जात आहे.संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर झुल्फिकारखान ने रायगड ला वेढा घातला.मराठ्यांची राजधानी ल वेढा अन राजा च नुकताच वध झाला होता.तरी पण मराठयानी आठमहिने किल्ला निकराने लढवला.किल्ला इतका दुर्भेद्य की लढून तो बहुधा मोगलांस प्राप्त झाला नसता. वेढा घालून आठ महिने झाले, तथापि ईतिकादखानाचे (जुल्फिकारखानाचे) पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. बादशहाने सारखी त्यास निकड लाविली; आणि त्याच्या मागणी प्रमाणे सामान फौजा सर्व काही तयार करून पाठविले. तेव्हा खानाने कपटविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता किल्लेदार म्हणून. त्यास वाईची सुभेदारी देण्याचे आमिष दाखवून खानाने फितूर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्गशीर्ष शु. 2 रविवार ता. 3-11-1689 रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्या आधीच आधीच राजाराम महाराज काही निवडक लोकसंहित रायगडावरून निसटले होते.जिवास अपाय करणार नाही अशी खानाकडून शपथ घेववून नशिबाला बोल लावीत येसु बाईंनी मुलामंडळींसह खानाचे स्वाधीन झाली.
ही कथा जनमानसात प्रसिद्ध आहे.
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार या मध्ये सांगितलेला हा खरा मागोवा.
सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे रायगड मोगलांच्या हाती गेल्यानंतर काही काळात तो पुन्हा राजाराम महाराजांच्या सेवेत रूजू झाला. एवढेच नव्हे, तर राजाराम महाराजांनी त्याला वाईची देशमुखी दिली.
रायगड मोगलांच्या हाती लागल्यानंतर बादशहाने जुल्फिकारखानास जिंजी किल्ल्याच्या मोहिमेवर पाठविले. (30 नोव्हेंबर 1689) त्यावेळी सूर्याजी पिसाळही त्याच्याबरोबर गेला. जिंजीच्या वाटेवर असतानाच त्याने वाईच्या पूर्ण देशमुखीचे वतन मिळविले. पण ते जिंजीला पोहचेपर्यंत परिस्थिती बदलली होती. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांच्या फौजांनी मोगलांनी जिंकलेले गडकोट व ठाणी पुन्हा ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. त्यात वाई परगणाही पुन्हा एकदा मराठ्यांच्या अंमलाखाली आला. आणि पुन्हा एकदा दत्ताजी पिसाळ याला वाईची देशमुखी देण्यात आली. जिंजीचा वेढा सुरू असताना ही बातमी सूर्याजीला समजली असावी. येथपावेतो त्याच्या लक्षात वारा फिरल्याचे आले असावे. त्यामुळे मग त्याने राजाराम महाराजांशी संधान बांधले आणि जुल्फिकारखानास आणि मोगली लष्करास गुंगारा देऊन तो किल्ल्यात छत्रपतींच्या दर्शनास गेला. तेथे त्याने राजाराम महाराजांना त्याच्याकडील जुनी आदिलशाही फर्माने दाखविली. ती पाहून राजाराम महाराजांनी त्याला वाईच्या निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या. त्या घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण रामचंद्रपंत आदी प्रधान व अधिका-यांना वाईच्या देशमुखीचा सर्व इतिहास माहित असल्याने तेथे सूर्याजीची डाळ शिजली नाही. तेव्हा तो पुन्हा कर्नाटकात जिंजीला गेला.
तेथे त्याने आता निराळेच डाव लढविण्यास सुरूवात केली. राजाराम महाराजांची सगुणाबाई नावाची अत्यंत सुंदर नाटकशाळा होती. राजा कर्ण हा तिचा मुलगा. तिला आणखी एक मुलगीही होती. या कन्येबरोबर आपल्या मुलाचा विवाह लावण्याचा प्रस्ताव सूर्याजीने महाराजांजवळ मांडला. सूर्याजीसारखा घरंदाज मराठा आपल्या पुत्राचे लग्न दासीकन्येशी लावण्यास तयार झाल्याचे पाहून राजाराम महाराजांनी त्याला आता वाईची सगळीच देशमुखी दिली.
राजाराम महाराजांनी दत्ताजीकडील देशमुखी काढून घेतल्याचा जो रोखा उपलब्ध आहे, त्यात ते म्हणतात - "सूर्याराऊ पिसाळ... हे मोगलाईतून स्वामीसंनिध येऊन आपल्या वतनाचे वर्तमान विदीत केले.... सूर्याराऊ पिसाळ याणी ... मोगलाईमध्ये मबलग पैके खर्च करून दिवाणात सीरणी देऊन फर्मान करून घेतले, अलीकडे स्वामीच्या पायापासीही येकनिष्ठा धरून संनिध येऊन सेवा करीत आहेत...."
पण यानंतरही देशमुखीची वाद काही मिटला नाही. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी दत्ताजीस त्याचे वतन परत केले. तेव्हा मग सूर्याजी पुन्हा मोगलांना जाऊन मिळाला. मोगलांनी वाईचे ठाणे पुन्हा जिंकले असावे. त्यावर इस्माईलखान मखा याची ठाणेदार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सूर्याजीने त्याला हाताशी धरले. परगण्याचे देशपांड्यांसारखे वतनदार व दत्ताजी यांना बोलावून त्यांना कैद केले आणि त्यांच्याकडून सूर्याजीच्या निम्म्या वतनाचा महजर तयार केला. याच महजरात सूर्याजीने वतन सोडविण्यासाठी एक लक्ष बावीस हजार सातशे रूपये खर्च केल्याचा उल्लेख आहे.
या काळात औरंगजेब बादशहाची छावणी विशाळगडाच्या पायथ्याशी होती. दत्ताजीने तेथे जाऊन फिर्याद नोंदविली. औरंगजेबाला त्याची बाजू न्याय्य वाटल्याने त्याने सूर्याजीने केलेल्या सेवेकडे न पाहता दत्ताजीला त्याच्या वतनाचे फर्मान दिले, एवढेच नव्हे, तर इस्माईलखान मखा याची वाईच्या ठाणेदारपदावरून बदली करून तेथे यासीनखान याला पाठविले. दत्ताजी वाईस येऊन वतनदारी अनुभवू लागला.
इकडे सूर्याजीही इरेस पेटला. छावणीत जाऊन त्याने खूप लटपटी-खटपटी केल्या. मुसलमान धर्म स्वीकारल्यास बादशहाची मर्जी प्रसन्न होते हे त्याला माहित होते. तेव्हा बादशहाची मेहेरबानी मिळविण्यासाठी तोही मुसलमान झाला. पण दत्ताजीची बाजू इतकी न्याय्य होती, की औरंगेब बादशहाने सूर्याजीने धर्मांतर केले तरी त्याला वतन काही दिले नाही.
हे प्रकरण नमूद करून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, "जी गोष्ट मराठ्यांच्या छत्रपतींना (राजाराम महाराजांना) जमली नाही तो औरंगजेबाने करावी, आणि तीही सूर्याजीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर करावी, याची मराठ्यांच्या इतिहासकारांनी खास दखल घेतली पाहिजे.
सूर्याजीचा हा वतनलोभ, त्यासाठी त्याने केलेली कारस्थाने हे सर्व तेव्हाच्या मराठा वतनदारांच्या प्रवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहे.
आणि अखेरीस येथे एक बाब नमूद करायलाच हवी, की भलेही सूर्याजी पिसाळ रायगडचा फितूर नसेल, पण तो त्याच्यासारख्या अनेक वतनदारांप्रमाणे स्वराज्यद्रोही मात्र निश्चित होता.
संदर्भ -
- मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993, पृ. 109 ते 120.
No comments:
Post a Comment