पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ –
इंदोरचे होळकर घराणे : 1
पोस्तसांभार ::-प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट
ज्याप्रमाणे मानवाला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चार दिशांचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य
संस्थापनेत शिंदे-होळकर-पवार-गायकवाड या मध्य आणि उत्तर हिंदुस्थानात तसेच
बडोद्यात शिवछत्रपतींच्या आकांक्षांप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या सीमा
बलवत्तर करणारी ही चार मराठा घराणी ही मराठेशाहीच्या इतिहासात तेवढीच
महत्त्वपूर्ण आहेत.
मल्हारराव होळकर!
काही नावं आणि माणसं असतातच अशी जबरदस्त की समोरचा आदराने झुकला पाहिजे. मल्हारराव होळकर हे इंदोर च्या होळकरशाहीचे आद्य संस्थापक. मल्हाररावांचा जन्म हा धनगर कुटुंबातील. वडिलांचे नाव होते खंडोजी/खंडुजी विरकर. धनगर समाजातील असल्यामुळे त्यांची गावोगाव भ्रमंती चालू असायची. असाच एकदा त्यांच्या पालांचा, तांड्याचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावी असताना 16 मार्च 1693 रोजी या मध्य भारतातील होळकरशाहीच्या संस्थापक असलेल्या मल्हाररावांचा जन्म झाला. मात्र धाकटा मल्हार अवघा तीन वर्षांचा असतानाच वडील खंडुजींचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांचे बंधू आणि मल्हाररावांचे मामा असलेल्या सुलतानपूर तालुक्याच्या भोजराज बारगळ यांचा आश्रय घेतला. मामा भोजराज यांनी छोट्या मल्हारला मेंढपाळी तर शिकवलीच, पण सोबत घोडदौड, भालाफेक इत्यादी नैपुण्याची कामे पण शिकवली. एकदा छोटा मल्हार शेळ्या-मेंढ्या राखताना रानात झोपला असताना एक नागराज झोपलेल्या छोट्या मल्हारच्या चेहर्यावर सूर्याची किरणे पडून त्रास होऊ नये म्हणून जणू आपला फणा काढून उभा होता. मामांनी ही अनन्यसाधारण घटना, ईश्वरीसंकेत बघून ताडले की, हा छोटा मल्हार पुढे जाऊन नक्कीच कोणीतरी मोठा सामर्थ्यशाली पुरुष होणार. आणि झालेही तसेच. पुढे जाऊन विरकर आडनावाचे परंतु होळ गावी जन्मल्याने होळकर आडनाव प्राप्त झालेले हे मल्हारबाबा मराठेशाहीच्या इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून नोंदले गेले.
कंठाजी कदमबांडे यांच्या फौजेत मल्हारराव दिवसेंदिवस प्रगती करीत असतानाच भोजराजमामांची कन्या गौतमी हिच्याबरोबर त्यांचा विवाह करण्यात आला. त्यांना यथावकाश खंडेराव हे पुत्ररत्नही झाले. जेजुरीच्या खंडेरायाच्या कृपाशीर्वादानेच हे सौख्य प्राप्त झाले, अशी मल्हाररावांची धारणा होती आणि त्यांनी थोरल्या बाजीरावराऊ स्वामींच्या विश्वासास पात्र ठरून आणि त्यांचे अत्यंत नजीकचे म्हणून मान्यता पावून इसवी सन 1729 मध्ये सुभेदारी मिळाल्यावर जेजुरी गडावर कुलोपाध्ये नेमले तसेच जेजुरीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. उत्तरोत्तर मल्हाररावांचे नाव आणि पराक्रम मराठेशाहीची वृद्धी उंचावत चालला होता. राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्या साथीत ते छत्रपती आणि पंतप्रधान पेशव्यांच्या वतीने माळवा प्रांताची जबाबदारी आणि उत्कर्ष याकरिता दक्ष होते. मुत्सद्देगिरी आणि गनिमी कावा या शिवछत्रपतींनी चतुराईने वापरलेल्या दोन शस्त्रांचा सार्थ वापर करून उत्तर हिंदुस्थानातील राजकारणात मल्हाररावांचा दबदबा सातत्याने वाढत होता. 1733 मध्ये त्यांनी पुत्र खंडेराव यांचा विवाह महाराष्ट्रातील चौंढी गावचे माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्या हिच्यासोबत केला. हीच छोटी अहिल्या पुढे मल्हाररावांप्रमाणेच होळकरशाहीचा मुकुटमणी म्हणून जनसामान्यांच्या हृदयसिंहासनावर अहिल्यादेवी म्हणून विराजमान झाली. पुढे हा मराठेशाहीचा होळकररूपी शूल भरभराटीस येत असतानाच 17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या रणसंग्रामात खंडेराव ऐन दुपारी गोटातून बाहेर पडून युद्धास सहभागी होत असताना तोफेचा गोळा लागून वीरमरण प्राप्त करते झाले. मल्हाररावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. स्नुषा अहिल्याबाई सतीगमनास निघाल्या असता मल्हारबाबांनी कसेबसे त्यांना यापासून परावृत्त केले.
काही काळाने शाहू छत्रपतींच्या अनुज्ञेने पंतप्रधान पेशव्यांनी मराठा फौजा थेट अफगाणिस्तानातील अटकच्या किल्ल्यावर विजयासाठी धाडल्या. राघोबादादांच्या नेतृत्वाखालील या बुलंद मराठा फौजांमध्ये अटकेवर शिवशाहीचा भगवा फडकवण्यात अकाली झालेले पुत्रवियोगाचे दुःख पचवून हिंदवी स्वराज्य विस्तारासाठी सहभागी झालेल्या सुभेदार मल्हारराव होळकरांचा दमदार सहभाग आणि पराक्रमही सामील होता. याचवेळी मराठ्यांनी वाटेतील लाहोर आणि मुलतान या आता पाकिस्तानात गेलेल्या शहरांत आपल्या टांकसाळी उघडून आपली नाणीही पाडली होती. हे आम्हा समस्त महाराष्ट्रधर्मी मराठ्यांना खरोखरीच अभिमानास्पद आहे. ग्वाल्हेरच्या शिंदेशाहीचे संस्थापक राणोजीबाबा आणि इंदोरच्या होळकरशाहीचे संस्थापक मल्हारबाबा यांची सुरुवातीला खाशी दोस्ती होती. कालांतराने राजकारणपरत्वे त्यात, त्यांच्या वारसांत काही वेळा वितुष्टही आले. दस्तुरखुद्द मुघल बादशाह शिंदेहोळकरांच्या सामर्थ्यापुढे दबून असायचा. अखेर आक्रमक अहमदशाह अब्दालीच्या तिसर्या स्वारीनंतर त्याने पेशव्यांचे उत्तर-मध्य हिंदुस्थानातील प्रतिनिधी म्हणून यांच्याशी मदतीचा/रक्षणार्थ करार केला. पुढे 1761 च्या पानिपतच्या युद्धात मल्हाररावांनी अखेरपर्यंत पराक्रमाची शर्थ केली. शेवटी शेवटी सदाशिवरावभाऊंच्या साहाय्यासाठी आपला सरदार संताजी वाघ यालाही धाडले होते, असेही सप्रमाण सिद्ध झाले आहे. मात्र पानिपतच्या या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांच्या अर्धांगिनी गौतमाबाईसाहेब त्याच वर्षी 29 सप्टेंबर 1761 ला मरण पावल्या. मल्हारराव हे खंडेरावांच्या निधनानंतर स्नुषा अहिल्याबाईंशी राज्यकारभाराबद्दल चर्चा करीत असत. अखेर आलमपूर येथे मोहिमेवर असतानाच मराठेशाहीच्या या एका जबरदस्त मानकर्याचे 20 मे 1766 रोजी निधन झाले. पुढे राज्यावर आलेल्या अहिल्याबाईंनी या आलमपूरचे नाव मल्हारनगर असे बदलून तेथे मल्हाररावांची छत्री उभारली.
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य विस्ताराचा वारसा इंदोरला रोवणार्या मल्हाररावांनी पाडलेले चांदीचे नाणे/रुपया उपलब्ध आहे. या रुपयावर हिजरी सन 1174 आणि राजाभिषेक वर्ष – 7 हे आढळून येते. मुघल बादशाह आलमगीर – दुसरा याचे नाव आणि तो तख्तावर बसला ते वर्ष होते इसवी सन 1767. म्हणून राजाभिषेक वर्ष 7. तसेच याच आलमगीर दुसरा याचे राजाभिषेक वर्ष – 2 पासून ही नाणी आढळून येतात, असे ज्येष्ठ अभ्यासकांचे, नाणकतज्ञांचे म्हणणे आहे. या नाण्यावर पुढे होळकरशाहीच्या नाण्यांवर आढळणारे बिल्वपत्र, शिवलिंग, नंदी, सूर्य, तलवार, खांडा आदींपैकी कोणतेही चिन्ह छापलेले नाही.
No comments:
Post a Comment