पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ
बडोदा येथील गायकवाड घराणे
शिवछत्रपतींच्या दख्खनदौलतीला पेशवेकालीन कालखंडात संपूर्ण हिंदुस्थानात एका मजबुतीने विस्तारण्यास ज्या घराण्यांचे सहकार्य लाभले, त्यात थोरल्या बाजीराव पंतप्रधान पेशव्यांनी प्रस्थापित केलेले बडोदा येथील गायकवाड घराण्याचे योगदानही मोठे आहे. शिंदे, होळकर, पवार आणि गायकवाड हे या उत्तरकालीन मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ मानले जात असत.
शिवछत्रपतींचा चरित्रलेखक कृष्णाजी अनंत हिरेपारखी अर्थात ‘सभासद’ याने शिवछत्रपतींचे बोल लिहून ठेवलेले आहेत. हिंदवी स्वराज्याचा विस्तार आसेतूहिमाचल ते थेट रूमशामपावेतो व्हावा, अशी शिवरायांची धारणा होती. आपल्या हयातीत शिवरायांनी मुघल आक्रमणांचा संभाव्य आणि अपेक्षित धोका ओळखून दक्षिणदिग्विजयाच्या वेळी दख्खनमधील स्वराज्य सीमा खाली थेट जिंजी, तंजावरपर्यंत नेऊन पोहोचवल्या होत्या, ज्याचा फायदा अपेक्षेप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज यांना झाला. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर दस्तुरखुद्द आलमगीर औरंगजेबाने संभाजी महाराज छत्रपती असताना दिल्ली सोडून स्वराज्यावर आक्रमण केले आणि पुढे संभाजी महाराजांना पकडून ठार मारले व राजधानी रायगडही जिंकला. नाइलाजास्तव छत्रपती राजाराम महाराज हे गुप्तपणे महाराष्ट्र सोडून जिंजीला डेरेदाखल झाले. कालांतराने शिवछत्रपतींचे हे भव्यदिव्य, उदात्त स्वप्न साकारायला, स्वराज्य विस्तार करायला शाहू छत्रपतींचे निष्ठावान पंतप्रधान पेशवे थोरले बाजीरावराऊस्वामी यांनी आपली समशेर थेट उत्तरेकडे वळवली. पराक्रमी मराठा सैन्याने अखंड हिंदुस्थानच नव्हे तर लाहोर, मुलतान, सरहिंद आणि पुढे अफगाणिस्तानातील अटक येथपर्यंत आपल्या भीमथडी तट्टांच्या दमदार टाचा आणि तळपत्या तलवारींचे तेज पोहोचवून शिवरायांचा भगवा ध्वजही अटकच्या किल्ल्यावर डौलाने फडकवला. ही घोडदौड, हा पराक्रम काही साधासुधा नव्हता. तर प्रचंड ध्येयासक्ती असलेली आणि शिवछत्रतींना सदैव आदर्श मानणारी अठरापगड जातींनी मिळून भगव्या झेंड्याखाली एकवटलेली ही मराठा फौज सर्वच तत्कालीन सत्ताधीशांच्या उरात धडकी भरवत होती, यात संशयच नाही. मध्य उत्तर हिंदुस्थानात शिंदे, होळकर, पवार, नागपूरकर भोसले आदी दिल्ली, कटकपर्यंत धुमाकूळ घालत होते, तर इकडे महाराष्ट्रालगतच्या गुजरातमध्ये गायकवाड घराणे आपली छाप पाडून होते. म्हणूनच अन्य पराक्रमी मराठा घराण्यांसह शिंदे-होळकर-पवार- गायकवाड यांचे नाव पेशवेकालीन मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून आदराने घेतले जाते.
थोरल्या बाजीरावांनी समजून उमजून या घराण्यांना हिंदुस्थानात ठायीठायी आसनस्थ केले. याद्वारे दिल्लीपतीला सदैव मराठ्यांचा दबदबा राहील याचीही पुरेपूर काळजी घेतली. असेच हे गुजरातमधील गायकवाड घराणे. या संस्थानाची स्थापना करणारे मूळ पुरुष हे दमाजी गायकवाड होत. हे गायकवाड घराणे मूळचे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील धावडी येथील आहे. दमाजी गायकवाड यांनी गुजरातेत स्वार्या करून छत्रपती शाहू महाराज यांचे सेनापती खंडेराव दाभाड्यांच्या हाताखाली मर्दुमकी गाजवून ‘समशेरबहादूर’ हा किताब मिळविला होता. दमाजीच्या मृत्यूनंतर त्यांचा पुतण्या बंधू जनकोजी याचा पुत्र पिलाजी याने सोनगड येथे ठाणे करून सुरत, बडोदा, भडोच, चंपानेर आदी प्रदेशावर अंमल बसवला. 1731 मध्ये शाहू महाराजांचे सेनापती असलेले त्र्यंबकराव दाभाडे सरकार यांनी प्रसंगोत्पात खुद्द छत्रपतींच्या विरुद्ध उठाव केला अन् पंतप्रधान पेशवे बाजीरावांनी सेनापतींचेच पारिपात्य करायला तलवार उचलली. या ‘डभोई’ येथे झालेल्या लढाईत सेनापती त्र्यंबकराव दाभाडे हे मारले गेले. यानंतर बाजीरावांनी छत्रपतींच्या अनुज्ञेने पिलाजीला ‘सेनाखासखेल’ या किताबाने गौरविले तसेच आता दाभाड्यांऐवजी त्यांचे गुजरातेतील हक्क देखील मान्य केले. पिलाजी आधी खानदेशातील नवापूर येथे मुक्कामी होता. मात्र यास हरकत घेतल्यावर त्यांनी सोनगड हे आपले ठाणे केले.
मात्र लगोलग पुढच्याच वर्षी 1732 मध्ये मोगल सुभेदार आणि जोधपूरचा राजा अभयसिंह याने तह करार करण्याच्या उद्देशाने आपला वकील पाठवून विश्वासघाताने पिलाजीचा ‘डाकोर’ येथे खून करवला आणि शेरखानकडे बडोद्याचे अधिपत्य सोपवले. पुढे 1734 मध्ये पिलाजीचा मुलगा दमाजी – दुसरा याने पुन्हा बडोदे शहरावर आपला अंमल प्रस्थापित केला. या दोघा बापलेकांनी मुघल सुभेदार तसेच कंठाजी कदमबांडे आदी स्वकीय मंडळींशी मुकाबला करून थेट काठेवाड, माळव्यापर्यंत स्वार्या करून, गुजरातेत गायकवाडांच्या सत्तेचा पाया घातला. परंतु कोल्हापूरच्या महाराणी ताराराणीचा पक्ष घेणार्या दमाजीला 1751 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी अटक केली. पुढे 1754 मध्ये मागील बाकी सुमारे 15 लाख, पेशव्यांना आवश्यकता असेल तेव्हा 10000 चे घोडदळ सज्ज ठेवावे, सुरत व आसपासचे 28 परगणे तसेच माळव्यातील काही प्रदेश राखून उर्वरित प्रदेश आणि नवीन जिंकलेल्या भूभागाचे निम्मे उत्पन्न पेशव्यांना द्यावे इत्यादी अटींवर दमाजींची सुटका झाली, असे इतिहासात नमूद आहे.
दमाजींना एकूण चार पुत्र होते. थोरला मुलगा म्हणजे सयाजीराव – पहिले, दुसरा मुलगा गोविंदराव आणि तृतीय पुत्र मानाजीराव आणि चौथे फत्तेसिंहराव हे होत. सयाजीराव प्रथम हे थोरले पुत्र असले तरी ते पहिल्या पत्नीपासून झालेले नव्हते आणि त्यांना काही मानसिक अडचणीही होत्या, असे आढळते. दमाजींनी राघोबादादांशी संधान राखून अहमदाबादवर ताबा मिळवला व काही काळानंतर आपले ठाणे इसवी सन 1762 ला पाटण येथे हलवले. यानंतर गायकवाड घराण्याची राजधानी बडोदा हीच झाली. परंतु नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या पेशवाईच्या वादात दमाजींनी आपला द्वितीय पुत्र गोविंदराव यास पदसिद्ध रीतीने पेशवेपदावर आरूढ झालेल्या थोरल्या माधवराव पेशव्यांविरोधात बंड करणार्या राघोबादादांना मदत करण्यास धाडले. परंतु दुर्दैवाने गोविंदराव हाच पेशव्यांचा बंदी होऊन त्यांच्या कैदेत पडला. मात्र 18 ऑगस्ट 1768 ला दमाजी हे मृत्यू पावल्यानंतर गोविंदराव गायकवाड यांनी खंडणी मान्य करून सुटका करवली तसेच बंधू सयाजीराव यांसाठी गायकवाड घराण्याचे राज्य चालवायचे हक्क मागून घेतले आणि स्वतः त्याचा प्रतिनिधी / मुतालिक/ ठशसशपीं म्हणून कारभार बघू लागला. येथपर्यंत गायकवाड संस्थानिकांनी तांबे, चांदी अथवा सोन्याची कोणतीच नाणी पाडल्याची नोंद मिळत नाही किंवा कोणतेही नाणे आढळून येत नाही.
No comments:
Post a Comment