विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

ग्वाल्हेर येथील ‘शिंदे घराणे’ – 4

 

ग्वाल्हेर येथील ‘शिंदे घराणे’ – 4

 रशांत सुमती भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | ‘नाणे’घाट

राणोजीराव शिंदे यांच्या रूपाने थोरल्या बाजीरावराऊ स्वामींनी ग्वाल्हेरला लावलेल्या शिंदे घराण्याचे हे बीज आता यथावकाशपणे उत्तरेकडील मराठेशाहीचा डोलारा सांभाळण्याचे कार्य करीत होतेच. सोबत मराठेशाहीच्या विस्ताराकडे उत्तर हिंदुस्थानातील सत्ता आणि दिल्लीपतीदेखील वाकड्या नजरेने बघणार नाहीत, याबद्दल सदैव दक्ष होते.

शिंदे घराण्यातील अनेक वीरपुरुष पानिपतच्या संग्रामात धारातीर्थी पडले, परंतु महादजी शिंदे हे मात्र वाचले. महादजींनी वडील राणोजीरावांचे शासन, बंधू जयाप्पारावांचे शासन, अत्यंत अल्पकाळ सत्तेवर असलेला पुतण्या जनकोजी याचा कारभार बघितलेला होता. महादजी हा बुद्धिचातुर्य आणि शौर्य याबाबतीत निखालस उजवा होता. त्याने पानिपतच्या मराठेशाहीला बसलेल्या हादर्‍यानंतर आपले आसन मजबूत करण्याकडे लक्ष दिले. आणि 1761 नंतर शिंदे घराण्याच्या झालेल्या पडझडीनंतर उत्तर भारतातील गोहद येथील शासक लोकेंद्रसिंह याने ग्वाल्हेरचा किल्ला आणि आसपासच्या भूभागावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. महादजी पानिपतनंतर महाराष्ट्रात आलेले होते. येथे येऊन आपली शक्तिस्थाने अधिक बळकट करून ते फिरून 1764 मध्ये माळव्याच्या सुजलाम् भूभागात येते झाले. ग्वाल्हेरच्या किल्ल्याचे महत्तव महादजींना पुरेपूर ठाऊक होते आणि त्यांनी विनाविलंब तो दुर्ग जिंकून घेतला. येथून ते संपूर्ण उत्तर हिंदुस्थानवर आपला दाब राखू शकत होते.
इकडे नानासाहेब पेशव्यांच्या नंतर थोरले माधवराव हे हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान पेशवे झाले होते. त्यांनी बर्‍याच अंशी पानिपतावर विस्कटलेली मराठेशाहीची घडी आणि गाडी रुळावर आणण्यास प्राधान्य दिले. आणि ते त्यात बर्‍यापैकी यशस्वीही होत होते. परंतु थोरले माधवराव दुर्दैवाने तसे अल्पायुषी ठरून 1772 ला मृत्यू पावले. आणि आता पेशवेपदाकरिता राघोबादादांनी दावा ठोकला.
या सगळ्या धामधुमीत आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने उडी घेतली. कारण व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात आलेल्या या परकीयांना संपूर्ण सत्ताप्राप्तीची पहिल्यापासून हाव होतीच. त्यांनी बंडखोर राघोबादादांना सशर्त पाठिंबा देऊन मराठेशाहीच्या अन्य धुरिणांसोबत लढा मांडला. हा संघर्ष 1775 ते 1782 पर्यंत सुरूच होता. त्यात महादजींना देखील ब्रिटिशांच्या हाती पराभव पत्करावा लागला तसेच ग्वाल्हेरचा किल्ला ही 1780 मध्ये गमवावा लागला. कालांतराने युद्धबंदीसाठी महादजींच्याच पुढाकाराने सुप्रसिद्ध सालबाईचा तह आकारास येऊ लागला. या तहानुसार ब्रिटिशांनी महादजी शिंदे यांना निव्वळ मध्यवर्ती सत्तेचे प्रतिनिधी न मानता स्वतंत्र राज्यकर्ते म्हणून मान्यता दिली.
याचा फायदा घेऊन महादजींनी उत्तर हिंदुस्थानात आपली सत्ता अधिक बळकट करण्यासाठी शक्ती लावली. परकीय सत्तांप्रमाणे त्यांनी देशी सैनिकांना, युरोपियन अधिकार्‍यांना नेमून कवायती फौजा उभारल्या.
बेनॉईत दे बॉइन हा शिंद्यांच्या फौजांचा इसवी सन 1796 पर्यंत कमांडर इन चीफ होता. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत उत्तर हिंदुस्थानात शिंदे, होळकर, पवार यांची संस्थाने प्रस्थापित झाली होती. आणि मध्यवर्ती सत्ताकेंद्र असलेली पुण्याच्या पंतप्रधान पेशव्यांची ताकद कमी होऊ लागली होती. परंतु अजूनही या सत्ता त्यांच्यापासून संपूर्णपणे विलग न होता आपापल्या सत्तांना बळकट करीत होत्या.
महादजींनी 1784 मध्ये स्वसामर्थ्यावर रोहिल्यांनी पदच्युत केलेल्या मुघल शाहआलम बादशाहाला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले. त्याच वर्षी शाहआलम ने पेशव्यांना आपले निकटचे सहकारी (वर्शिीीूं ) म्हणून नेमले तसेच त्यांचे दिल्ली दरबारातील प्रतिनिधी म्हणून दुसरे तिसरे कोणीही नाही तर महादजी शिंदे यांनीच राहावे, असेही जाहीरपणे सांगितले. यानंतर लवकरच शाहआलमने दरबारातील सर्वोच्च पद वकील – इ – मुतालिक म्हणून महादजींना सन्मानित केले. यामुळे आता महादजींचे आग्रा, दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरावर प्रस्थ मोठे होऊ लागले. अर्थातच महादजी जणूकाही संपूर्ण हिंदुस्थानचे नेतृत्व म्हणून गणले जाऊ लागले. यावेळी त्यांच्या स्वतःच्या सैन्यात तब्बल 1 लाख घोडदळ आणि 500 तोफा होत्या, अशी नोंद आहे. संपूर्ण सत्ताच हाती असल्याने महादजींनी अनेक राजेरजवाड्यांकडून महसुलाच्या नावाने नजराणे घेतले. अनेक नवाब दरकदारांच्या जहागिरी ताब्यात घेतल्या आणि याच कारणाने अनेकांशी वैर ओढवून घेतले. नाराज राजपूत, मुघल नवाब, रोहिले यांनी युती करून महादजींशी दावा मांडला. परिस्थितीत बदल होऊन आपल्या सैन्याला वेतन देण्याइतके पैसेही कमी पडू लागले. यातच आग्रा, अजयमेरू उर्फ अजमेर तसेच दोआबचा प्रदेश इस्माईल बेग आणि राजपुतांनी जिंकला.
महादजींच्या या तात्कालिक पीछेहाटीमुळे रोहिला गुलाम कादिरने दिल्लीही जिंकली आणि जुलै 1788 मध्ये बेदरबख्तला तख्तावर बसवून पदच्युत केलेल्या शाहआलमचे डोळे काढले. मात्र या तात्कालिक पीछेहाटीनंतर महादजींनी पुन्हा थोड्याच काळात पुनःश्च दिल्लीवर ताबा मिळवला आणि अंध केल्या गेलेल्या शाहआलमला बादशाह म्हणून तख्ती बसविले. यानंतर काही वर्षांतच महादजी शिंदे वैभवाच्या अत्युच्च अवस्थेत असताना इसवी सन 1794 मध्ये पुणे येथील वानवडीजवळ मृत्यू पावले.
महादजींनी अनेक नाणी पाडली आहेत. अजयमेरू उर्फ अजमेर, भरूच, बुरहाणपूर, ग्वाल्हेर फोर्ट, नरवर, उज्जैन आदी टांकसाळीत (चळपीं) महादजींनी पाडलेली नाणी उपलब्ध आहेत. यातील विविध नाण्यांवर अनेक चिन्हे आपणांस बघता येतात. ङशरष र्ींरीळशीूं / झाडाची फांदीसदृश चिन्ह, फुलाची नक्षी, बारीक दिसणारी छोटेखानी कट्यार अथवा तलवार, बिल्वपत्रसदृश भासणारे पान किंवा कळी, उलटा झेंडा, कट्यार, आडवी तलवार (बरेचदा या तलवारी मूठच नाण्यांवर दृश्यमान असते.) अशी आगळीवेगळी चिन्हे या नाण्यांवर आपण बघू शकतो.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...