विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे

 


अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे  🚩
२८ एप्रिल १७४०
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना विसाजी उर्फ बाजीराव व अंताजी ऊर्फ चिमाजी हे दोन पुत्र होते. बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाल्यावर शाहू छत्रपतींनी काही दरबारी मंडळींचा विरोध डावलून केवळ वीस वर्ष वय असलेल्या बाजीरावांना सर्वात महत्त्वाचे असे पेशवेपद दिले. बाजीरावांची धडाडी, लष्करी कामकाजाची आवड, आणि निर्धारी वृत्ती पाहून शाहू महाराजांनी केलेली पेशवे पदावरील बाजीरावांची नियुक्ती किती योग्य होती हे पुढील काळात सिद्ध झाले.
आपल्या कुशल नेतृत्वाच्या आणि युद्धाच्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला .त्यांना अपराजित हिंदू सैनिक सम्राट म्हणूनही ओळखले जात होते. बाजीराव पेशवे कधी ठरले नाहीत म्हणून ब्रिटिशांना त्यांच्याविषयी नेहमीच भीती वाटत होती. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी-शिकाऱ्यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यांना लाभले. सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावाच्या हाताखाली होती. छत्रपती शाहूंनी त्यांची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२० रोजी त्यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली.
बाजीराव पेशव्याने दक्षिण निर्वेध केली, पण त्याच्या या यशाचे मर्म त्याच्या उत्तरेकडील राजकारणात शोधले पाहिजे. मोगल बादशाहीचा वृक्ष जीर्ण झाला आहे; फांद्यांवर कुऱ्हाड न चालविता बुंध्यासच हात घालावा, हे धोरण पेशव्याने पतकरले. पेशव्याचा संचार सुरुवातीपासून नर्मदेपलीकडे सुरू होता.२९ नोव्हेंबर १७२८ रोजी चिमाजी आप्पाने माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादूर यास आमझेरा येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल याच्या साहाय्यास गेला. त्याने जैतपूर येथे सुभेदार मुहम्मदखान बंगश यास वेढले आणि त्याच्या सैन्याची वाताहात केली. हरसाल मराठी फौजांच्या उत्तरेकडे हालचाली सुरू झाल्या.१७३३ साली पेशव्याने सवाई जयसिंगाशी सामना दिला.१७३३मध्ये बुंदी, दंतिया, ओर्छा या भागांतून पेशव्याच्या सरदारांनी चौथ वसूल केला. पिलाजी जाधवाने मार्च १७३५ मध्ये वझीर कमरुद्दीनखान याच्याशी ओर्छानजीक लढाई केली. याच वेळी राजस्थानात मुकुंदरा घाट ओलांडून शिंदे-होळकरांनी मीरबक्षी खान-इ-दौरां याच्या सैन्यास घेरले. धावपळीच्या लढाईत मोगली सैन्याचा मराठी फौजांपुढे टिकाव लागेना. माळव्याचा चौथ म्हणून मोगल दरबाराने दरसाल मराठ्यांना बावीस लक्ष रुपये द्यावेत, या अटीवर युद्ध तहकुबी झाली.
मीरबक्षी आणि सवाई जयसिंग यांचे तडजोडीचे धोरण मोगल दरबारात मान्य होईना. तेव्हा फिरून एकदा बाजीराव आपल्या फौजांसहित उत्तरेत चालून आला (१७३६). जयसिंगामार्फत दिल्ली दरबाराशी बोलणी सुरू झाली. माळव्याची सुभेदारी मांडू, धार, रायसीन इ. किल्ले, काही जहागिरी, बंगालच्या वसुलात ५॰ लक्षाचा चौथ, अलाहाबाद, वाराणसी, गया, मथुरा इ. हिंदूंची पवित्र क्षेत्रे, दख्खनची सरदेशपांडेगिरी व दक्षिणेत ५॰ लाखांची जहागीर या मागण्या पेशव्याने दरबाराकडे केल्या.
पेशव्याच्या वाढत्या मागण्या दिल्ली दरबारास मान्य होईनात. चालढकलीचे धोरण दरबाराने स्वीकारले. तेव्हा पुन्हा १७३७च्या सुरुवातीस पेशव्याने उत्तरेकडे चाल केली. पेशव्याचा रस्ता रोखून धरण्याकरिता दोन मोगली दिल्लीतून निघाल्या. दोन्ही सैन्यांची नजर चुकवून मराठी फौज २९ मार्च रोजी दिल्लीजनीक येऊन ठेपली. राजधानी आता उद्ध्वस्त होणार अशी धास्ती सर्वांस वाटू लागली. आपल्या मागण्यास अनुकूल असणाऱ्या पक्षाच्या विचाराने बादशाह वागेल, अशी पेशव्याची अपेक्षा होती; पण दिल्ली दरबारात पेशव्याचे वर्चस्व स्थापन झाल्यास, आपण निर्माल्यवत होणार हे ओळखून निजामाने उत्तरेस प्रयाण केले. मराठ्यांचे आक्रमण हाणून पाडण्याकरता मोठी फौज, जंगी तोफखाना आणि भरपूर खजिना निजामाच्या स्वाधीन करण्यात आला. निजामाची स्वारी पेशव्याशी निकराचा सामना घेण्याच्या इराद्याने निघाली. पेशव्यानेही भोपाळनजीक निजामास गाठले. १५ डिसेंबर १७३७ रोजी निजामाचा पराभव झाला. तो भोपाळच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. पेशव्याच्या फौजेने शत्रूची नाकेबंदी केली. निजामाचे प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा त्याने पेशव्याच्या मागण्यांस दरबाराकडून मान्यता मिळवून देऊ, या अटींवर संमती देऊन ७ जानेवारी १७३८ रोजी समेट केला.
माळवा सुभा, नर्मदा आणि चंबळ यांमधील सर्व प्रदेश हे मराठ्यांना बहाल करावयाचे आणि त्याबाबतचे बादशाही फर्मान पेशव्यास मिळवून द्यावयाचे, या अटींवर पेशव्याने वेढा उठविला.
भोपाळचा विजय हा पेशव्याच्या कारकीर्दीतील सवोच्च बिंदू होय. या विजयाने माळवा-बुंदेलखंडात मराठी सत्ता प्रस्थापित झाली आणि मोगल दरबारात मराठ्यांचे वर्चस्व वाढले.
पुढील दोन वर्षांत पेशव्याच्या खानदेश-माळव्यात हालचाली चालू होत्या. पेशव्याने निजामाचा थोरला मुलगा नासरजंग याचे पारिपत्य केले (१७४॰). नर्मदाकाठी रावेरखेडी येथे मुक्काम असता एकाएकी ज्वराचे निमित्त होऊन हा थोर पेशवा मरण पावला.
बाजीरावाचे चरित्र व चारित्र्य रोमांचाकारी घटनांनी भरले आहे. तो स्वभावाने तापट होता. सेनापतीस योग्य असे धैर्य व घाडस त्याच्या अंगी होते. त्याचे खासगी जीवन अत्यंत साधे, मराठी शिपाईगडयास साजेसे होते. वयाच्या तेराव्या वर्षी महादजी कृष्णा जोशी यांच्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला . त्यांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. उत्तरेकडील स्वारीत त्यांचा मस्तानीशी संबंध आला मस्तानीविषयी अत्यंत विश्वासार्ह असे साहित्य अद्यापि उपलब्ध झाले नाही. मस्तानी एक नर्तकी होती. छत्रसालापासून ती पेशव्यास प्राप्त झाली. त्या वेळेपासून ती पुढे सर्व स्वाऱ्यात त्याच्याबरोबर असे. मस्तानीच्या नादाने पेशवा मद्यप्राशन आणि मांसभक्षण करू लागला. बाजीरावाने मस्तानीचा नाद सोडावा, म्हणून चिमाजी आप्पा व नानासाहेब यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. बाजीरावापासून मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला.
तो पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. मस्तानी ही बाजीरावाच्या निधनानंतर लगेच मरण पावली. तिच्या नावाचा महाल शनिवार वाड्यात बांधला होता.
बाजीरावाने मराठेशाहीची शान वाढविली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर कले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवी क्षितिजे निर्माण केली. पेशव्याच्या चपळाईच्या हालचालींपुढे प्रचंड मोगली फौजा आणि त्यांचे तोफखाने कुचकामी ठरले, याबद्द फील्ड मार्शल मंगमरी याने बाजीराव पेशव्याची प्रशंसा केली आहे. त्याने दिल्ली दरबारात मराठी सत्तेला मानाचे स्थान प्राप्त करून दिले; तथापि राजकारभारात त्यास शिस्त निर्माण करता आली नाही आणि राज्य सुसंघटित करता आले नाही. बाजीराव पेशवा स्वत:च एक बलाढय सरंजामी सरदार बनला आणि मराठ्यांचे राज्य बलाढय सरदारांच्या जहागिरीचा संघ बनले.
दोनदा बाजीरावांकडून पराभूत झालेला निजाम पूर्वी ठरलेला प्रदेश व रक्कम शाहू महाराजांना देण्यास टाळाटाळ करू लागताच बाजीरावांनी निजामाच्या प्रांतात घुसून औरंगाबाद जवळ पुन्हा तिसऱ्यांदा निजामाच्या सैन्याचा मोड केला व पूर्वीच्या प्रदेशाबरोबर आणखी जादा प्रदेश मिळवला. फेब्रुवारी १७४० मध्ये बाजीराव उत्तरेकडे जाण्यास निघाले असता वाटेत नर्मदा नदीकाठी
रावेरखेड येथे आजारी पडून वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी २८ एप्रिल १७४० मधे निधन पावले. एका अत्यंत पराक्रमी योद्य्याचा अकाली अंत झाला. भारतभर मराठ्यांचा दरारा निर्माण करणारे शिंदे, होळकर असे पराक्रमी सरदार पाठिंबा देऊन पुढे आणणारे, लष्करी नेतृत्वाच्या बाबतीत सर्वात वरचढ ठरलेले बाजीराव पेशवे मराठ्यांच्या पराक्रमाला नवीन क्षेत्रे उपलब्ध करून देऊन मराठेशाहीच्या विस्तारात आपले अमूल्य योगदान देऊन मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून गेले.
🙏 अशा या थोर शूर योद्ध्याला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...