विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

एक पोवाडा, जीवबादादा बक्षींचा

 



एक पोवाडा, जीवबादादा बक्षींचा
लेखन :

Pramod Karajagi

मित्रानो,इतिहासाच्या पडद्यामागे दडलेल्या एका पोवाड्याची माहिती आपण घेणार आहोत. हा पोवाडा शिरोडे तालुका वेंगुर्ले,येथील रहिवासी रा. रा. नरहर व्यंकोजी राजाध्यक्ष उर्फ नाना हवालदार यांच्या संग्रही अगदी जीर्णावस्थेत पडून होता. तो तसाच लिहून व आवश्यक ठिकाणी टीपा देऊन छापलेला आहे. काव्य म्हणून या पोवाड्याचे ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहे. पोवाड्याचे पठण 'इतिहासभक्तास परोपकारी ठरेल' असे पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हंटले आहे.
जीवबादादा बक्षी हे मूळचे आजच्या गोमंतकातील केरी गावाचे होते. त्यांचे आडनाव केरकर होते. आपल्या कारकिर्दीच्या शोधार्थ ते आधी कोल्हापूरला आणि तेथून ते पुण्यास आले. तेथे पेशव्यांच्या वाड्यावर येणे जाणे झाले आणि अचानक महादजींच्या नजरेत भरले. महादजी म्हणजेच पाटीलबावांच्याकडे त्यांना सेवा करण्याची व आपली हुशारी दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले.
या पोवाड्यामध्ये महादजींनी आपल्याकडील चार रत्नांची नांवे घेतलेली आढळतात. ती म्हणजे जीवबा, लखबा, बाळोबा आणि सदोबा होय. त्यांची इतिहासातील नांवे अनुक्रमे जीवबादादा बक्षी, लखबदादा लाड, बाळोबातात्या पिंगे (पागनीस) व सदाशिव मल्हार उर्फ भाऊ दिवाण होत. खरे बघायला गेले तर अशी अनेक कर्तबगार 'नर रत्ने' पाटीलबोवांच्याकडे होती.
जीवबादादा महादजी शिंद्यांचे प्रसिद्ध सेनापती होते. जीवबादादा यांच्यावर एखादी मसलत पूर्णपणे सोपवून महादजी निर्धास्त असत. जीवबादादांनी अनेक महत्वाच्या लढायांत शिंद्यांना यश मिळवून दिले. त्यामध्ये इंग्रजांच्या बरोबरच्या अनेक लढाया, बदामीची लढाई, आग्र्याची लढाई, कन्नौदची लढाई वगैरे महत्वाच्या होत्या. दिल्लीच्या बादशहाकडून पेशव्यांना ‘वकील मुतलकी’ची पदवी मिळाली, ती सादर करण्यास महादजी दक्षिणेत आले त्यावेळेस उत्तर हिंदुस्थानाचा कारभार त्यांनी जीवबादादा यांच्यावर सोपविला होता. महादजींच्या निधनानंतर निजामाविरुद्ध झालेल्या खर्ड्याच्या लढाईत जीवबादादा बक्षी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
जीवबादादा अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपल्या हुशारीमुळे व कष्टामुळे वर चढत गेले आणि महादजीचे प्रमुख सल्लागार बनले.जीवबादादा शिंद्यांचे सेनापती होते. तरी राज्यकारभार प्रकरणी हरेक महत्वाचे काम त्यांच्या सल्ल्याशिवाय होत नसे. पाटीलबावांच्या मुत्सद्दी मंडळात जीवबा अग्रगण्य होते.
जीवबा केरकर यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्तींनी शिंदे घराण्याची चाकरी बजावली. त्यापैकी काही जणांचा उल्लेख पोवाड्यात आलेला आहे. जगन्नाथ उर्फ जगोबा बापू केरकर हे चुलत बंधू, नारायणराव बक्षी हे थोरले पुत्र, यशवंतराव व शिवबा नाना केरकर हे इतर पुत्र इत्यादी. महादजींचे इतर अनेक शूर सेनापती जीवबादादांच्या हाताखाली होते. त्यामध्ये प्रसिद्ध फ्रेंच सेनापती डी बॉयन तसेच पेरॉन यांचाही समावेश होतो.
जीवबादादांनी लहानमोठ्या अशा एकूण तीनशे सत्तर लढाया केल्या असे काव्यात म्हंटले आहे परंतु अनेक पोवाड्यामध्ये वीरश्रीचा संचार करण्यासाठी आवश्यक अशी अतिशोयोक्ती वाटते.
हे काव्य एकूण बेचाळीस पानांमधून उतरवले आहे. जीवबादादांच्या लहानपणी त्यांच्या घरी एक नाथ संप्रदायातील साधू आला होता आणि त्याने त्यांच्या आईवडिलांना भविष्य सांगितले होते की हा लहान मुलगा मोठा होऊन हिंदुस्थानात राज्य करेल,याला तुम्ही मागे रोखू नका. त्या साधूचे शब्द आपल्या अतुलनीय शार्याने व मुत्सद्देगिरीने जीवबादादांनी खरे करून दाखवले.
इसवी सन १७९६च्या अखेरीस जीवबादादा यांनी आपला देह ठेवला.जीवबादादांच्यावरील पोवाड्याचे हे पुस्तक कलकत्ता येथील राष्ट्रीय ग्रंथालयात (National Library) आज उपलब्ध आहे.
जीवबादादाच्या अतुल यशामुळे प्रभावित झालेल्या पेशव्यांच्या दरबारी खालील श्लोक म्हणण्यात येत असे.
“माधवो म्हादजीबाबा जीवबादादाssर्जुनपर:I
क्षत्रिना श्रीमंतां स्वार्थे युद्धंभारत संपंन्न II
अशी ही महादजी शिंदे व जीवबादादा बक्षी यांची जोडी महाभारतातील कृष्णार्जुनासारखी उत्तर मराठेशाहीत शोभून दिसते.
------------------------------------------------------------------------
संदर्भ: जिवाजी बल्लाळ केरकर यांच्यावरील पोवाडा, शिंदेशाहीचा इतिहास अथवा बक्षी बहाद्दर मुजाफरदौल जिवाजी बल्लाळ तथा जीवबादादा बहाद्दर फत्तेजंग उर्फ जीवबादादा केरकर बहाद्दर फत्तेजंग चरित्र:नरहर व्यंकाजी राजाध्यक्ष, संकलन व लेखन: प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...