विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 19 November 2025

रणमार्तंड.. दत्ताजीराव शिंदे...।।

 


रणमार्तंड.. दत्ताजीराव शिंदे...।।

ज्या वीरांनी पानिपताच्या यज्ञ कुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली.त्याचा प्रथम बहुमान हा दत्ताजींराव शिंद्यांचा आहे हे विसरता येणार नाही...!!
जयाप्पा शिंदे यासी दग्याने मारण्यात आले सबब. मराठा सरदार दत्ताजी शिंदे मोठी दाबजोर फौज संगती घेऊन राजपुतान्यात घुसले.(१७५५) साल.
जयाप्पा यांच्या खुन बिजेसिंगाच्या मोहिमेत झाला होता
त्यामुळे मराठयांनी जयपूर व मारवाड या दोन्ही संस्थांनावर आपल्या तलवारीची धार धरली आणि सर्व प्रदेश आपल्या पटा खाली घेतला.दत्ताजींनी त्यास पुरता गुडघ्यावर आणला.शेवटी काकुळतीला येऊन बिजेसिंगानं दत्ताजींनसमोर मुजरा घालून शरणागती पत्करली व तहाची याचना केली.
तहाची कलमे
१. अजमेर व झालोर हे दोन्ही किल्ले
२.रोख दंड पन्नास लाख
असा करार झाला.
यानंतर दत्ताजी दक्षिणे उतरले आणि सिंदखेडचा रणसंग्राम सुरू झाला.पेशव्यांनी निजामाच्या या मोहिमेवर दत्ताजीस नामजाद केले व नानासाहेब पेशव्यांचा मुलगा विश्वासराव याला दत्ताजींच्या हाताखाली दिले.यावेळी दत्ताजींचा पुतण्या जनकोजीदेखील या मोहिमेत होते.विश्वासराव व जनकोजी हे समवयस्क तरुण अनुभवी दत्ताजींच्या छत्रछाये खाली गरधीत उतरले. दत्ताजी सिंदखेडास मोर्चे
देऊन बसले असता लढाईस तोंड फुटले.दत्ताजी इरेस पेटून तमाम हत्यारांचा एकच मारा चालवीला.बेभान होऊन ते लढत होते.दत्ताजींचा रणवतार बघून निजामही
धास्तावला.दत्ताजींचा पराक्रम पाहून खुद्द भाऊसाहेब ( चिमाजीअप्पांचा मुलगा ) म्हणतो, " दत्ताजी शिंदे यांचे
मर्दुमकीची शर्थ आहे.जसे ऐकण्या आले तसे कर्तव्य करून दाखवले.रावांनी शर्थ केली.फत्ते झाली..."
दत्ताजींनी निजामाकडून पंचवीस लाखांचा मुलुख करार करून घेतला.नळदुर्गकिल्ला देखील मराठयांना या लढाईत मिळाला.
बरोबर याच समइ रघुनाथराव पेशवे,मल्हारराव होळकर हे उत्तरेत होते.१७५७ ला रघुनाथराव पेशवे यास नजीबखान रोहिला सरदार हा जिवंत सापडला. " त्यास
गर्धन मारावी,जिवंत राहिल्यास नाश करील " अशी सूचना पुष्कळांनी रघुनाथराव पेशव्यांना केली. नाहीतरी
नजीबखान हा उत्तरेत मराठयांना मोठा अडथळाच होता.
नजीबखानान आपल्या वकील अंतस्थपणे मल्हारराव यांच्याकडे पाठवून कळविले, " मी तुमचा धर्मपुत्र आहे.
त्यावरून मल्हाररावांनी दादासाहेबांना भीड घातली की
याचा आपणास पुढे आपल्याकामी उपयोग होईल,यास
अपाय करू नये.मल्हाररावांच्या मुळे दादासाहेबांनी ही विनंती मान्य केली. म्हणून नजीबखानाचा पक्का बंदोबस्त करता आला नाही.
नजीबखाननं रघुनाथरावांस नाइलाजास्तव लेखी लिहून दिली,की राजधानीतील सर्वाधिकार सोडतो आणि अंतर्वेदीतील ठाणी सोडून स्वस्थळी निघून जातो,पुनः
दिल्लीच्या भानगडीत पडणार नाही.हा करार करून नजीबखान ता.६ सप्टेंबर रोजी दिल्ली सोडून गेला.
( मराठयांनी खानाला धर्म वाट दिली खरी.पण जी हरामखोरी करायची ती केलीच त्यानं )
इकडे दक्षिणेत सिंदखेडच्या लढाईत निजामाला नामवून दत्ताजी पुण्यास आले.पुण्यास काही काळ राहून ते उज्जनीस गेले.तेथून पुढे उत्तरेत आपले कामकाज पाहू लागले.ते ता.२६ डिसेंम्बरला दत्ताजींनी कुचाचा आदेश दिला व जनकोजीला सोबत घेऊन ते दिल्लीला आले व मुक्कामी राहिले.खंडणी चुकवणाऱ्या लोकांवर दत्ताजींनी सक्त पवित्रा घेतला.पूर्वीचे वातावरण बदलून नवीन वातावरण दत्ताजींनी तयार केले.आणि विशेष म्हणजे दत्ताजींनी दिल्ली व आसपासच्या इलाख्यात त्यांनी आपली पकड मजबूत केली होती.
वरचेवर जरी नजीबखान रोहिला गोडी गुलाबीनं वागत होता.तरी आतून त्याच्या अंतस्थ कारवाया चालूच होत्या
त्यानं लढाईची गुप्त तयारी केली होती.पण ही बाब काय लपून राहिली नाही याची कुणकुण मराठयांला लागली म्हणून स्वतः दत्ताजींनी पुन्हा नजीबखानाला जरब देण्याकरता व अयोध्येचा नबाब सुजा उद्दौलावर स्वारी करण्याकरता १७५९ च्या जून महिन्याच्या सुमाराला कुंजपुऱ्यास आले.त्यांनी आपल्या फौजेच्या दोन फळ्या
केल्या आणि दुसरी फळी गोविंदपंत यांच्या नेतृत्वाखाली देऊन त्यांना इटाव्याकडून नजीबखानास घेर्णयाचा डाव टाकला.अंतर्वेदीतील नजीबखानाचा मुलुख ताराज करून
गंगा नदी पार करून खुद्द रोहिलखंडात प्रवेश केला.
वरून दत्ताजी व खालून गोविंदपंत यांच्या घेऱ्यात सापडल्यामुळे नजीबखान चांगलाच मेटाकुटीला आला होता.तो त्याचा मुलगा व साथीदार दुदेखान,सादुल्लाखान
व हाफीज राहिमत यांचा दोन-चार लढायांतच मराठयांनी धुराळा केला.मराठयांनी नंतर रोहील्यांचे गाव जाळले.
तसा नजीबखानान हाफीज राहिमतखानाद्वारे वरकरणी
सलुखाची बोलणी लावली. पण हे सगळं वरकरणी होत.
त्याच दरम्यान दत्ताजी शिंदेंचा सरदार साबाजी शिंदे हा लाहोर वरून माघारी आला होता.कारण अहमदशहा अब्दाली हा हिंदुस्थानाच्या वाटेवर होता.लाहोर मध्ये
मराठयांची व अब्दाली याची चकमक होऊन त्यात साबाजी शिंदेंना माघार घ्यावी लागली.म्हणून साबाजी यांनी ही खबर तातडीने दत्ताजींना शुक्रतालला येथे दिली
(८ नोव्हेंबर )
दत्ताजींच्या मनात नजीबखानाचा पुरता नक्षाउत्तरवायचा
मनोदय होता पण अब्दाली आल्यामुळे नजीब वाचला
ती मोहीम गोविंदपतांचा मुलगा बाळाजी याच्या हाती सोपवून त्यांनी कुंजपुऱ्यास कूच केली.
दत्ताजींनी आपल्या मदतीसाठी मल्हारराव होळकरांना राजस्थानमध्ये पत्रे पाठवली होती कारण मल्हारराव यावेळी राजस्थानात मोहिमेवर होते.आणि दक्षिणे सुद्धा
पेशव्यांनी व भाऊंनी निजामाविरुद्ध मोहीम उघडली होती
अशा परिस्थितीत दक्षिणेतून( महाराष्ट्रा )तून मदत येणं तरी शक्य नव्हतं. अशा बाक्या प्रसंगी कुमक मिळणं अवगड होऊन बसलं.दक्षिणेतून कुमक येईपर्यंत लढाई टाळावी हा विचार दत्ताजींचा होता.पण वेळ कमी होता.
अब्दाली सारखा शत्रू चाल करून येत असता या साऱ्यांची वाट पहात बसणं.हा काय दत्ताजींचा स्वभाव
नव्हता.लगोलग दत्ताजींनी आपल्याबरोबर २५००० हजाराच सैन्य ठेवल आणि अफगाण सैन्याचा सामना करण्याकरता ठाणेसरकडे कूच केली.यावेळेपर्यंत अब्दालीन यमुना नदी ओलांडुन बुधिया घाटात थांबला
कारण तो वाट बघत होता नजीबखानाची.त्याला हे चांगलं माहीत होतं की दत्ताजीही काय बारकी आसामी नव्हे.
दत्ताजींना सरळ सरळ अंगावर घेणं म्हणजे आपली कबर खोदन असा विचार करून तो नजीबची वाट बघत थांबला
२०डिसेंम्बर १७५९ रोजी दत्ताजींचे सरदार शिवाजी भोईटे यांच्या नेतृत्वाखाली पुढे सैन्य पथकाची गाठ अफगाणांच्या काही तुकड्यांशी पडली.आणि पहिली चकमक उडाली मराठयांच्या रेठ्या पुढे अफगाण मागे हटले.पण अफगाणांनी तोफांचा मारा करताच मराठयांना
माघार घ्यावी लागली.कारण मराठयांन जवळ तोफा नव्हत्या. या चकमकीत भोईटे पितापुत्र कामी आले.
अब्दाली आता शुक्रतालकडे सरकू लागला.इकडे दत्ताजींनी मल्हाररावांना लवकर येण्याबद्दल तातडीने निरोप पाठवला.त्या समइ दत्ताजींनी विचार केला
दिल्लीस बादशहा वीद्यमान नाही.समोर पठाण एकत्र जमलेले,अशा परिस्थितीत आपण दिल्ली सोडून मागे गेल्यास आज इतक्या वर्षांची अंगमेहनत अन दिल्ली व प्रदेशात बसविलेला जम सर्व फुकट जाऊन मराठयांची पीछेहाट होईल आणि मुस्लिम सत्ता शिरजोर होईल.
त्यापेक्षा आपण इथेच थांबून मल्हारराव आल्यावर मग अब्दालीशी झुज देऊ.
यावेळी दत्ताजींनीकडे फौज कसलेली होती.दीमतीस नारो शंकर,गोवींदपंत व इतर मंडळी मदतीसाठी सज्ज होती.अब्दाली व त्याचे सैन्य यमुना ओलांडून सहरनपुरला नजीबाखानाची गाठ घेऊन दिल्लीच्या रोखाने निघाल आणि दत्ताजी कुंजपुऱ्याहुन अब्दालीच्या
हालचालीवर नजर ठेवत सोनपतला आले.यमुनेच्या काठावर आपल्या चौक्या उभारत बंदोबस्त लावत
दत्ताजींनी सुध्दा दिल्लीचा रोख धरला
दत्ताजींराव अशा परिस्थिती सुद्धा किती सावध पणे व निडर पणे वागले याचे वर्णन दत्ताजींच्या कारभाऱ्यानं
लिहून ठेवलं आहे.
ते लिहितात :
" यद्यपि मानसबा तर भारीच पडला आहे.राजपूताकडे
राजश्री मलारजी होलकर गुंतले चहूकडून दुश्मनी
फौजाही भारी व सारे अमित्र परंतु शिंदे मोठ्या हिमतीचा
माणूस,जवामर्द,शूर,पराक्रमी.येवढे आवडंबर आले
असता किमपि भय अगर चिंता किंवा कसे होईल हा
उद्योग ज्याच्या मुखश्रीवर दिसतच नाही अयसा रनमर्द
तो शिंदे...!!"
यावरून आपल्याला दत्ताजींराव यांच्या निडर स्वभावाची
कल्पना येऊ शकते.
यावेळी उत्तरेत कडाक्याची थंडी होती.सोनपतपासून दिल्लीच्या अलीकडे १० मैलांवर अब्दालीला यमुना पार
करू न देण्याच्या उद्देशान दत्ताजींनी साबाजी शिंदे यास बुराडी घाटावर तयनात केलं होतं आणि स्वतः दत्ताजी थोडेसे दक्षिणेला यमुनेच्या उजव्या तीरावरच्या मजनूकाटीळा इथं होते.पौष मासाचा हिवाळा असल्यानं धुके भरपूर प्रमाणात होते.बुराडी घाटावर यमुना नदीची दोन पात्रे तयार झाली होती एकाचा प्रवाह रुंद तर एकाचा अरुंद होता.यामुळे त्या पात्राच्या मधल्या भागात एक बेट
तयार झाले होते.हे बेट झावू ( शेरनी,वोरू ) नावाच्या झुडपांनी उंच वनस्पतींनी पूर्ण भरून गेले होते.
त्याचे दाट असे जाळेच तयार झाले होते.याचा फायदा शत्रूला जास्त झाला.धुक्यामुळे यमुनेच्या निम्म्या पात्रापर्यंतच थोडंफार दिसू शकत होतं. १० जानेवारी १७६० रोजी धुक्याचा फायदा घेऊन अफगाण आणि रोहिले बंदूकधारी हशमांनी गपचूप रीत्या नदीचा रुंद प्रवाह ओलांडून बेटावर आले आणि तसेच धुक्याचा फायदा घेत पार तीरावर आले.बेटावर दलदल असल्यामुळे मराठयांच्या घोडदळाचा या ठिकाणी चाल करून जाता येणार नव्हतं.आणि रोहील्यांच्या कडे
मोठ्या प्रमाणात बंदुधारी हशमांचा भरणा होता.
मात्र मराठयांजवळ फक्त भाले आणि तलवारी होत्या
सकाळच्या प्रहरी अचानक रोहिल्यानी मराठयांनवर तुफान गोळीबार चालून केला.याही परिस्थितीत मराठयांनी सावध होऊन रोहील्याची लाट थोपवून धरली
दत्ताजी लगेच साबाजीचा मुलगा बयाजी याच्याबरोबर
पाच हजार शिवबंदी कुमक बुराडी घाटावर पाठवली
कारण त्यावेळी साबाजी जवळ फक्त सातशे शिपाई होते
पण तेवड्यात बयाजी पडल्याची खबर दत्ताजींना कळाली.खबर कळताच दत्ताजींनी घोड्यावर झेप घेतली
हाताशी होते तेवढे शिपाई गडी गोळा करून त्यांनी साबाजीला मदत करण्यासाठी धाव घेतली.दत्ताजींचा
आवेश इतका जबरदस्त होता.की रोहील्याना माघार घ्यावी लागली.
विशेष म्हणजे नजीबखानाचा बखरकारानं या युद्धाच वर्णन केलेलं आहे..
तो लिहितो :-
" दत्ताजी आणि त्याच्या सैनिकांनी हल्ला चढवला.स्वतः
शिंदे भाल्यानं रोहिल्यांनी भोसकत चालला होता.बरेच
रोहिले ठार झाले आणि मराठयांनी रोहील्यांच्या
निशाणावर रोख घरून जबरदस्त हल्ला केल्यावर
उरलेले रोहिले नदीच्या पात्राच्या काठापलिकडे रेटले
गेले...!!"
एव्हाना या हातघाईच्या लढाईत प्रेतांचा नुसता खच
पडला होता.ती समर भूमी वीरांच्या रक्तानं लालेलाल
झाली होती.मराठयांनी अजून जोर धरला होता.तेवड्यात
यशवंतराव जगदाळे पडल्याची हाक उठली.तसा दत्ताजींनी यशवंतरावांच्या जवळ जाण्यासाठी आपल्या घोड्याला टाच दिली आईन गर्दी घोडा घातला.इतक्या रोहील्यायांना जदा कुमक येऊन मिळाली तसा त्याचा जोर वाढला.आणि याच रणधुमाळीत कुण्या एका रोहील्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोलीनं दत्ताजींच्या वेध घेतला आणि उजव्या बरगडीत गोळी गुसली.दत्ताजीराव पडल्याची खबर पसरल्यामुळे मराठयांचं अवसान गळालं
मात्र जनकोजी शिंदे हे अजून रणात उभे होते.त्यांनी युद्धाचं पारडं फिरवण्याचा बराच प्रयत्न केला मात्र त्यांच्या दंडात गोळी लागली व ते जखमी झाले.त्यांना मराठयांनी या धामधुमीतून बाहेर काढलं.आणि माघार घेतली.
कुतुबशहा रोहिला याला दत्ताजी कुठे पडलेत हे कळताच
तो त्या ठिकाणी गेला आणि घायाळ अवस्थेत असलेल्या दत्ताजीरावास त्यानं विचारलं.
" क्यूं पटेल, और लढोगे ?" यावर दत्ताजींनी बाणेदारपणे
उत्तर दिलं." बचेंगे तो और भी लडेंगे.."
हे वाक्य आज इतिहासात अजरामर झालं,बखरीतमध्ये
या वाक्याची नोंद आहे.
दत्ताजींचं शीर त्या हरामखोर कुतुबशहानं कापून ते नजीबखानकरवी अब्दालीकडे पाठवून दिलं.
मात्र परत मराठयांनी कुंजपूऱ्यात दत्ताजींचा मारेकरी कुतुबशाह हा रोहिला सरदार मराठयांच्या हाती लागला.
त्याच शीर धडापासून वेगळं करून मराठयांनी दत्ताजींच्या मृत्यूचा बदला घेतला.
१० जानेवारी १७६० मकरसंक्रांतीचा सण सगळीकडे आनंदाने साजरा केला जात असताना, घात झाला दूर उत्तरेत यमुनेच्या बुराडी घाटावर शत्रूशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दत्ताजींनी दिली .मराठा साम्राज्यातील हा वीर आपल्या पराक्रमाची गाथा अजरामर करून गेला.
या थोर सेनानिस विनम्र अभिवादन...!!
©इंद्रजीत खोरे

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...