विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार

 


छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार ही बाब जरी भारतीयास तितकी आवश्यक नव्हती तरी समुद्रापलीकडील आघात व व्यापार यामुळे धर्माचारातही बदल घडवून आणून आरमारी नेतृत्व वगैरेत आपल्या प्रजेला आवड उत्पन्न करून त्यांना ती कला आत्मसात करावयास लावण्याचे मोठे काम छत्रपती शिवाजी महाराजनांच करावे लागले...

मोगल, आदिलशाहा आदि इस्लामी शाह्यांतून जरी त्यास तसे करण्यास धर्म आडवा येत नव्हता तरी त्यांचे तिकडे फारसे लक्ष वेधले गेले नाही. शिवाजी महाराजांनी धार्मिक अडचण आपल्या वजनाने बाजूस करून ते कार्य साधावयाचे होते. पंचवीस तीस वर्षात ही उत्क्रांती करून दाखविली आणि आपले आरमार म्हणजे उसनी घेतलेली कला नसून स्थानिक प्रदेशाला अनुरूप अशीच आरमारची घडण घडविली आणि आपले आरमार युरोप आरमाराला यशस्वी रीतीने तोंड देण्याइतके सामर्थ्यवान बनविले. इंग्रजांशी मैत्री राखण्यात या कलेचाही अनुभवसिद्ध अभ्यास केला हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे...
सन १६७८ च्या अखेरीपर्यंतचे इंग्रजांशी आलेले संबंध व्यापार विषयक होते. राजकारणी नव्हते. तो दारूगोळा आदि युद्ध विषयक महत्त्वाचे साहित्य विकत घेणे, व्यापारास सवलती देणे, अन्नधान्य व लाकुडफाटा देऊन त्यास मदत करणे इतकेच होते. राजापूर प्रकरणाकडे पहाण्याचे दृष्टिकोण इंग्रज व शिवाजी महाराज यांचे परस्पर विरोधी होते म्हटले तरी चालेल. असे असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी सहिष्णुतेने त्यांच्याशी संबंध राखले होते. सिद्दी जोहारला दारूगोळ्याची मदत व ते वापरण्यात प्रत्यक्ष साह्य करणारे इंग्रज म्हणजे शत्रूच होत. असे असताना राजापूर जिंकताच अशा शत्रूला शासन केले तर ते राजनीतीला धरूनच होते. अशा प्रसंगात झालेल्या वसूलीची भरपाई करून देणे म्हणजे केवळ दयेचाच प्रश्न होता. भारतातील वसूलीचा शिरस्ता म्हणजे सोने, चांदी, जड, जवाहिर आदि किंमतीच्या वस्तू फक्त सरकारी तिजोरीत जमा व्हावयाच्या व बाकी वसूल लष्कर व बरोबर असणाऱ्या इतर लोकांनी घ्यावयाची. असे असताना जाणूनबुजून अधिक किंमत लावून व नोकरचाकरांच्या भांडीकुंडी कपडालत्ता यांचा जो आधार त्यांनी दिला तो मानून वसूल करून मागावयाचा हक्क इंग्रजांना नव्हताच. ही बाब शिवाजी महाराजांनी व त्यांचे अंमलदारांनी स्पष्ट केल्याचा कागद पत्रीही पुरावा आहे. परंतु मित्रतेकरिता दिलेली सूट नीट न्यायबुद्धीने न पाहता स्वार्थ वृत्तीनेच तक्रार करणे अशी भूमिका त्यांनी घेतली, आणि या लंगड्या भूमिकेचे आपल्या धन्यास व शत्रूस समर्थन करून दाखविण्यास अवसर पाहिजे असल्याने केवळ शिव्याश्रापानेच बोलत राहून केलेले दुसऱ्याची मानखंडना करण्याचे प्रयत्न अर्थातच लुळे, पांगळे ठरले तर नवल नाही. सूरतकर व कंपनी अशा बडबडीवर आळा घालण्याचाही प्रयत्न करताना दिसून येते...
हे राजापुर प्रकरण सोडले तर येथपर्यंतच्या संबंधात राजकारणी भाग नव्हताच म्हटले तरी चालेल. उलट इंग्रजांनी मोगलाच्या भीतीने सिद्दीला आसरा देणे व शिवाजी महाराजांच्या मुलुखावर आक्रमण करीत असताना सुप्त मदत करणे ही शत्रुत्वाचीच आचरणूक होती. परंतु शिवाजी महाराज त्यांनी अशा परिस्थितीत लाचारीने लावलेली विशेषणे पुढे इंग्रज इतिहासकारांनी मान्य करून इंग्रजांच्या तत्कालीन म्हणजे मदत व मित्रत्व राखणाऱ्या राजकीय संस्थांच्या शत्रूला साह्यक व्हावयाचे व त्यांच्या शत्रुराष्ट्राकडील आवश्यक वस्तू आपल्या नावाने मिळवून त्यांना पुरवावयाच्या या वागणुकीमुळे पोर्तुगीजांनीही आपल्या हद्दीत धान्यादि माल नेण्याची इंग्रजांना बंदी केली होती...
भारतातील प्रदेश विस्तीर्ण असल्याने भांडणात जर काही अडचण भासत असेल तर सैन्याला वगैरे दाणागोटा मिळण्याची. वाहतुकीचे मार्ग फारच दुष्कर असल्याने बैलावर वाहतूक अवलंबून असल्याकारणाने ती जितकी शीघ्रतेने व्हावी तितकी होत नसे व त्या वहातुकीस शत्रूने अडथळे आणल्यास ती वाहतूक नेहमीच अपुऱ्या संरक्षणाच्या अभावी शत्रूचे हाती पडत असे. असली मदत व्यापाराचे नावाखाली करण्याचे प्रयत्न, राजनीतीला डावलून, प्रथम केले आणि त्यामुळे इंग्रजांना पुढे मानहानी सोसावी लागली...

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...