#तुळजापूरच्या मंदिराशी संबंधित असलेल्या, नसलेल्या किती तरी गोष्टी आहेत ज्या माहीत नसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर तुळजापूरजवळ असलेलं धाकटं तुळजापूर का वसलं हे माहीत आहे? ‘आराध’ बसणं म्हणजे काय? ‘दसरा काढणं म्हणजे काय? तुळजा भवानीसमोरच्या सारीपाटामागची गोष्ट काय आहे?
तुळजाभवानीसंदर्भातल्या अनेक गोष्टींचा उलगडा करणारा लेख-
श्रीतुळजाभवानी ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच नव्हे तर देशातील लाखो लोकांचीही कुलस्वामिनी आहे. पण हे मंदिर किती पुरातन आहे हे ठामपणे सांगणे कठीण आहे. हे मंदिर सुरुवातीला चार कुटुंबांच्या खासगी मालकीचे होते. माणिकराव कदम पाटील, रोचकरी, मलबा आणि गणपतराव कदम यांचे पूर्वज ही ती चार कुटुंबे. या मूळ मालकांच्या देवीच्या दैनंदिन पूजेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांचे नातेवाईक खपले, क्षीरसागर, हंगरगेकर, भोसले या घराण्यांनाही पूजेचा मान दिला गेला. मंदिरातील भक्तांची वाढती संख्या, मिळणारे प्रचंड उत्पन्न यामुळे ही पूजा करण्यासाठी या मूळ मालकांनी मग १६ कुटुंबांची ‘पाळकरी’ (पाळीपाळीने पूजा करणारे) म्हणून नेमणूक केली. त्यांना पाळ्या वाटून देण्यात आल्या होत्या. मिळणाऱ्या उत्पन्नातून पाळकऱ्यांना किती हिस्सा द्यायचा याचा संपूर्ण अधिकार या मानकऱ्यांना म्हणा किंवा मूळ सेवेकरांना होता. या पद्धतीने पाळकऱ्यांनी अनेक वष्रे प्रामाणिकपणे काम केले. पण नंतर मात्र त्या पाळकऱ्यांनीच हक्क सांगायला सुरुवात केल्याने भांडणे सुरू झाली. पाळकऱ्यांना उत्पन्न घेण्याचा अधिकार असला तरी मूळ मूर्तीला हात लावण्याचा अधिकार त्यांना नव्हता, तर तो कदमांनाच होता. त्यामुळे पाळकर कोर्टात गेले. प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्यात कालांतराने पाळकरांनाही मूर्तीला हात लावण्याचा अधिकार आला. शिवाय त्यांचे हिस्सेही ठरवून दिले गेले. िहे प्रकरण उच्च न्यायालयात १९६० साली चालल्याची आठवण न्या.बी. एन. देशमुख सांगतात.
मूळ पाळकऱ्यांच्या व्यतिरिक्त वाकोजीबुवा इत्यादी महंतही मानकरी होते. विशेष म्हणजे वाकोजीबुवा महंतांची गादी तर अविवाहिताची आहे. त्यामुळे दत्तक घेऊनच त्यांचा उत्तराधिकारी ठरतो. या महंताची प्रेते जाळत नाहीत. मराठीत ‘गार भरली’ असा एक वाक्प्रचार आहे. मराठवाडय़ात तर बायका एकमेकींशी भांडताना सर्रास ‘तुझी गार भरली, तुझा मुडदा बसवला’ अशा शिव्या देतात. पण या ‘गार भरली’चा नेमका अर्थ कुठेच दिलेला नाही. तो इथे प्रत्यक्षात पाहायला मिळतो. ‘गार’ म्हणजे विहिरीसारखा एक खोल खड्डा. त्यात मीठ टाकून प्रेत पुरण्याची आगळीवेगळी प्रथा इथे आहे. मंदिराचे जे मानकरी आहेत त्यांना ते िहदू असले तरी जाळले जात नाही. त्यांचे प्रेत या विशिष्ट विहिरीपर्यंत रीतिरिवाजानुसार आणले जाते. तिथे त्या विहिरीत टाकून वर मीठ ओतून त्याखाली पुरले जाते.
बकऱ्याची झडती
नवरात्रात अजाबळी म्हणून जे बकरे कापले जाते ते बकरे देण्याचा मान सिंदफळच्या एका गृहस्थाचा असतो. वर्षभर त्यांनी सांभाळलेले बकरे अजाबळीच्या दिवशी वाजतगाजत मंदिरात आणले जाते व रीतसर पूजेनंतर ते कापले जाते. केवळ अजाबळीच्याच बकऱ्याचे हे विशेष नाही, कोणताही बळीचा बकरा कापण्यासाठी एक विशिष्ट पद्धत इथे अवलंबली जाते. त्यानुसार इतर वेळीदेखील बकऱ्याचा जो नवेद्य असतो ते बकरे कापण्यापूर्वी त्याची ‘झडती देणे’ महत्त्वाचे आहे. बळी दिल्या जाणाऱ्या बकऱ्याची परवानगी मागण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकले जाते. त्यानंतर त्या बकऱ्याने पूर्ण अंग जर झटकले तरच त्याने ‘झडती’ म्हणजे परवानगी दिली असे समजून ते कापले जाते. त्याने जर ही झडती दिली नाही तर लोक असे बकरे दुकानदाराकडे परत देऊन दुसरे बदलून आणतात व दुकानदारही ते बदलून देतात हे विशेष.
आश्चर्याची बाब अशी की श्रीतुळजाभवानीची मंदिरे नेपाळमधील काठमांडू आणि भाटगांव (सध्याचे भक्तपूर) इथेही आहेत. यासंबंधी ज्येष्ठ समीक्षक, संशोधक व साहित्यिक डॉ. रा. चि. ढेरे यांनी त्यांच्या श्रीतुळजाभवानी या अभ्यासग्रंथात उल्लेख केला आहे. मिथिलेचा राजा हरिसिंहदेव यांनी इ.स. १३२४ ते मध्ये उभारले. कर्नारवंशीय हरिसिंहाची कुलस्वामिनी तुळजाभवानी होती. तिच्या दृष्टांतानुसार तो नेपाळमध्ये गेला. देवीचे मंदिर प्रथम भाटगांव (भक्तपूर) इथे उभारले. नेपाळमधील कर्नारवंशीय राजघराण्याची सत्ता संपल्यावर मल्ल, गोरख या पुढच्या राजवंशीयांनीही श्रीतुळजाभवानीचा स्वीकार कुलस्वामिनी म्हणूनच केला. त्यानुसार भक्तपूर, काठमांडू आणि देवपारण येथील तिची ठाणी या राजकुलांच्या श्रद्धेचा विषय होती.
सोलापूरला जाता-येता तुळजापूर स्थानकावर बस थांबली की, तेथील भोपी म्हणजे पुजारी लोक हातात एक चोपडी घेऊन यात्रेकरूंना गाठत असत. सर्वसाधारणपणे आपल्या घराण्यातील कोणतीही व्यक्ती एकदा तुळजापूरला येऊन गेलेली असेल तर त्याची संपूर्ण माहिती म्हणजे वंशावळ या भोप्यांच्या चोपडीत लिहिलेली असे. ते सगळे एकमेकांशी संगनमत करून ज्याच्या चोपडीत त्या यात्रेकरूचे नाव असेल त्या भोप्याकडे वा पुजारी ब्राह्मण असल्यास त्याच्याकडे त्या यात्रेकरूला हवाली करत. त्यानंतर ते यात्रेकरू त्या पुजाऱ्याकडे, त्यांच्या मोठमोठय़ा वाडय़ात राहणे, पूजा, अभिषेक, भोजन याच्या व्यवस्थेसाठी उतरत. त्यातही ज्यांची नावे कोणत्याच चोपडीत नसतील त्यांना ‘खंडून’ म्हणत. अशांचा लिलाव पुजाऱ्यात आपसात करून त्यात जादा बोली देणाऱ्याकडे त्या यात्रेकरूला स्वाधीन केले जाई व नंतर तो त्याचा कायम यात्रेकरू असे. या चोपडय़ा आधी मोडी भाषेत होत्या. काही जणांनी त्या नंतर मराठीत केल्या. आता तर त्यातही आधुनिकता आली. आता ही नावे कॉम्प्युटरवर फीड केली जातात. पूर्वी यात्रेकरू चारचार दिवस भोपी किंवा पुजाऱ्याकडे मुक्कामाला असत. आता मुक्काम कमी, शक्यतो नाहीच ही वेळ आली आहे. त्यामुळे दर्शन घेऊन जेवण करायचे व नारळ-प्रसाद घेऊन परत जाणे लोक जास्त पसंत करीत आहेत. गेल्या पाच-दहा वर्षांत तर फोनवर लॉजचे बुकिंग करून पूजा झाली की परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
तुळजापूरच्या मंदिराच्या आवारातील मूळ स्वरूपात व आतापर्यंत जवळपास पंधरा-वीस वर्षांत इतके बदल झालेले आहेत की विचारता सोय नाही. मंदिराच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात व त्यांच्या सोबत निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार, नगराध्यक्ष हे सगळे पदसिद्ध सदस्य असतात. याशिवाय पूर्वी पुजारी मंडळाचा एक प्रतिनिधीही बहुधा होता. रामानंद तिवारी जिल्हाधिकारी असताना त्यांनी सर्वप्रथम या देवस्थानात बदल करण्याचे ठरवले. त्यानुसार एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. त्यानुसार तो धर्मादाय आयुक्तांनी, विभागीय आयुक्तांनी मंजूरही केला होता. पण दुर्दैवाने नंतरच्या जवळपास सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो गुंडाळून ठेवला व आपल्या मर्जीनुसार त्यात बदल करीत गेले. नंतरच्या काळातच आवारातील वेगवेगळ्या जागी असलेल्या विविध देवांची छोटी छोटी मंदिरे काढून सर्व देव एका ओळीत आणण्यात आले. आराधींच्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या, महाद्वाराचे काम झाले तिथूनच खाली मंदिरात उतरण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या दुरुस्त झाल्या. आंघोळीसाठी जे असलेले कल्लोळतीर्थ आहे त्याच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांना कठडा आला. मंदिराच्या समोरच्या बाजूला काही दुकाने, ज्यात चप्पल स्टॅन्ड, देवीच्या साडय़ाविक्री इत्यादी व वरच्या मजल्यावर काही खोल्या झाल्या. सुसज्ज कार्यालय झाले. पूर्वीपासून मंदिरात असलेली पूजा-साहित्य विक्रीची दुकाने बांधली गेली. मंदिर आवारात असलेला चौक मोठा झाला. बाजूच्या ओवऱ्यात देवीची वाहने आली व एक मोठी गॅलरी भक्तांना बसण्यासाठी झाली. गोंधळाचा ओटा मोठा व व्यवस्थित झाला. कालांतराने तेथे दर्शनरांगाही पाइपचे कठडे लावून झाल्या. मंदिराचे कार्यालय, देणग्या, साडय़ा नेसवण्याची पावती यासाठी सोय झाली. आता तर दर्शनरांगांचे कठडेही गेले आणि वरूनच भक्तांना दर्शनमंडपातून प्रवेश देऊन थेट मंदिरात येता येईल अशी व्यवस्था झाल्याने कसलीही धक्काबुक्की न होता एकच व्यक्ती रांगेत जाईल अशी व्यवस्था झाल्याने भाविकांना यात्रेचे दिवस सोडून इतर वेळी तासाभरात दर्शन होईल इतकी चांगली व्यवस्था झाली आहे. देवीला पूर्वीच्या प्रथेनुसार होमकुंडासमोर तेल वाहण्याची पद्धत होती. या तेलाच्या पिशव्या यात्रेत चक्क फेकल्या जात असल्याने त्या फरशीवर फुटत व खूप लोक घसरून पडत. आता मंदिर प्रशासनाने तेल व नारळ मंदिरात नेण्यालाच बंदी केल्याने हे सगळे बंद झाले आहे. शिवाय पूर्वीची मूळ मंदिराच्या चारही बाजूने प्रदक्षिणा मार्गावर कुंकवाचा सडा घालण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे.
एक गाव, एक चव
तुळजापूरचे वैशिष्टय़ असे की, संपूर्ण गावात, मग ते शुक्रवारपेठचे असो वा मंगळवारपेठेतील घरचे असो जेवणाची चव एकच असते. याचे कारणही गमतीशीर आहे. इथे गावातल्या गावातच स्थळ पाहून लग्न करण्यावर भर असतो. त्यामुळे शुक्रवार पेठेतली पोरगी जास्तीतजास्त मंगळवारात दिलेली असते. त्यामुळे मटणाचा मसाला करण्याची माहेरची व सासरची पद्धत जवळपास एकच असते. त्यामुळे एक गाव एक गणपती, एक पाणवठासारखे नसले तरी इथे ‘एक चव’ हे मात्र पाहायला मिळते. आता आता मात्र गावाच्या बाहेर मुली दिल्या जात असल्याने व बाहेरच्या इथे आणल्या जात असल्याने चवीत फरक पडला आहे, पण तो तितकासा जाणवत नाही. गावातच मुली देण्याचे एक दुसरे कारण काही जणांनी सांगितले. जवळपास प्रत्येक घरात यात्रेकरू वस्तीला असल्याने रोजचे देवीचे सिंहासन असो वा इतर पूजाविधी असोत, पुरणाचा किंवा पुरण आणि मटणाचा (ज्या त्या यात्रेकरूच्या परंपरागत रीतिरिवाजानुसार) घरातच स्वयंपाक करणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे आपल्या लेकीने रोजच पाचपन्नास लोकांचा स्वयंपाक करायचा, शेकडय़ांनी भाकऱ्या बडवायच्या हे परगावच्या कोणत्या आईबापाला आवडेल? शिवाय घरात मात्र ‘तिने काम नाही करायचे तर बायको कशाला आणली?’ अशी पूर्वापार चालत आलेली विचारसरणी असल्याने म्हणा किंवा स्वयंपाकाला बाई लावायची म्हणजे तिला पसे देणे आले ते टाळण्यासाठी म्हणा, स्वयंपाक घरच्या बाईमाणसांनाच करावा लागत असल्याने जाणूनबुजून आपली पोर या घरात कोण देणार? त्यामुळेच असेल स्थानिक पाहुणेरावळे आपसातच मुली देत असतात.
मूळ मंदिरात पूर्वी जी दगडी फरशी होती त्यात खोलगट भाग करून त्यात पूर्वीचा रुपया ठोकण्याची पद्धत नवस म्हणून होती. यापकी अनेक नाणी चांदीचीसुद्धा असत. लोकांनी ते रुपये काढून घेतलेले असले तरी बाजूच्या िभतीवर व खाली फरशीवर असे दोन-चार इंचावरचे खळगे तसेच दोन दगडाच्या मध्ये असलेल्या खाचा नंतरही खूप वष्रे होत्या. पण या खळग्याच्या दगडी फरशीमुळे तेल असो वा कुंकवाचा सडा असो, माणसे घसरून पडत नव्हती. पण एका जिल्हाधिकारी साहेबांनी या दगडी फरशीवर पॉलिश फरशी घातली. जेव्हा खूप माणसे त्यावरून घसरून पडायला लागली तेव्हा कालांतराने दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्याने ती बदलून साधी फरशी घातली. या सगळ्या प्रकाराने फरशी उन्हाळ्यात तापत असल्याने लाखो भाविकांना जे चटके बसले ते बसलेच. आता पुन्हा या फरशीवर नव्या पद्धतीच्या न घसरणाऱ्या फरशा बसवण्यात आल्या आहेत.
मंदिरात हे जे सगळे बदल झाले त्याला कोणाचीही कसलीही मंजुरी नव्हती. आश्चर्य असे की जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या सर्व मंदिराच्या बदलाला ज्यांच्या ताब्यात हे मंदिर आहे त्या पुरातत्त्व खात्याची कसलीही मंजुरी घेण्यात आलेली नाही. मंदिराचे मुख्य काम हे भाविकांची सोय असताना बी. बी. पाटील या जिल्हाधिकाऱ्याने चक्क मंदिराचे सोने स्टेट बँकेत गहाण ठेवून दोन कोटी रु. कर्ज घेतले. ट्रस्टच्या नावे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करायला परवानगी घेतली व मंदिराचे एकही भक्तनिवास नसताना त्याची मुख्यत्वे गरज असतानादेखील त्याऐवजी या नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची, विद्यार्थी वसतिगृहाची भव्य वास्तूही उभी केली. विशेष म्हणजे या कोटय़वधी रुपयांच्या सर्व बांधकामावर देखरेख करणे, बिले लिहिणे ही कामे फक्त एका ज्युनियर इंजिनीयरच्या सहीने होत व त्याला थेट जिल्हाधिकारी सही करून चेक गुत्तेदाराला मिळे. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार तर झालाच, शिवाय प्रारंभीच्या काळात शासकीय धोरण धाब्यावर बसवून बेकायदेशीररीत्या ऐंशी टक्के परप्रांतीय व वीस टक्के महाराष्ट्रातील असे उलटे प्रमाण करून अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले. मंदिराला या सगळ्या खटाटोपापायी कर्ज घेतलेल्या दोन कोटींवर वर्षांला किमान छत्तीस लाख रु. व्याज अनेक वष्रे भरावे लागले ते वेगळेच. हा उद्योग कमी झाला म्हणून की काय, शासनाची वृद्धाश्रमाची जी कल्पना होती त्यानुसार वृद्धाश्रम सुरू करण्यात आला, पण नंतर त्याची नीट देखभाल न झाल्याने तो बंद करण्याची नामुष्की आली.
महाराष्ट्रातील जोतिबा, खंडोबा, महादेवाची अनेक मंदिरे, येरमाळ्याची येडाई अशी जी मंदिरे आहेत ती बहुतांशी गुराखी मंडळींची आहेत. ही मंदिरे एक तर सहजासहजी जाता-येण्यासारखी नसून अवघड स्थळी डोंगरात उंचावर अशीच आहेत. महाराष्ट्रातील बहुसंख्य मंदिरात ब्राह्मणांचे वर्चस्व असल्याने पुजारीही साहजिकच त्याच समाजाचे असतात. त्या त्या गावातल्या प्रतिष्ठित समाजाचे प्राबल्य असल्याने ही मंदिरे त्यांच्याच वर्चस्वाखाली असत. इतर सगळीकडे मंदिरात ब्राह्मणांचेच वर्चस्व असल्याने तेथील पूजा, चालीरीती, परंपरा, रूढी यावर त्यांचीच छाप असते. हे एकमेव मंदिर असे आहे की इथे पुजारी मराठा समाजाचेच असल्याने त्यांच्याच चालीरीतीचा प्रभाव आहे. इतरांनाही तेवढेच स्थान आहे. त्यामुळे ब्राह्मणांनाच स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. ब्राह्मण पुजारी नसल्यामुळे देवळात ब्राह्मणी पद्धतीचे सोवळे ओवळे नाही, हेही या देवळाचे वेगळेपण आहे.
आजकाल अनवाणी चालत देवीला जाण्याची फॅशन झाली आहे. मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी जातात म्हणून इतरही जनता मोठय़ा प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे आसपासच्या परिसरातील विशेषत: बीड, उस्मानाबाद जिल्हे, सोलापूर आणि कर्नाटकातून अक्षरश: हजारो लोक नवरात्रात देवीच्या दर्शनाला अनवाणी येतात.
कोल्हापुरी मटण म्हणजे तिखट असा एक सर्वसाधारण समज आहे, अशा लोकांनी आमच्या भागातले चिकन-मटण खावे म्हणजे त्यांना तिखट व झणझणीत शब्दाचा अर्थ थेट डोक्यात भिनेल. एक भुरका मारला तरी डोक्यावर, तोंडावर रुमाल फिरवावा लागतो. त्यातही तुळजापूरचे मटण अस्सल तिखटजाळ. तिथे तर देवीसाठी जो नवैद्य भोपी करतात त्यात देवीसाठी पुरणपोळी, दूध आणि तिने वध केलेल्या महिषासुरासाठी मटण व दारूचा नवेद्य थेट देवीपर्यंत नेण्याची व दाखविण्याची प्रथा आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी ही पद्धत नसावी असे मानले जाते. कारण तसे संदर्भ सापडत नाहीत. ज्या महिषासुराचा वध देवीने केला म्हणून तिचे नाव महिषासुरमर्दनिी आहे, त्या दैत्यालाही नवेद्य दाखवला जातो, हे अजबच म्हणायला हवे.
तुळजापूरचे देवीची पूजा आणि दैत्याचीही पूजा हे जसे अजब रसायन आहे तसेच इथले रीतिरिवाज, सण, सामाजिक चालीरीती यासोबतच इथल्या विशेषत: मराठा समाजातील खास जेवणावळी यादेखील तितक्याच प्रसिद्ध, पण सर्वसाधारणपणे स्थानिक लोकांच्या व्यतिरिक्त इतरांना फारशा माहीत नसलेल्या आहेत; हे त्याचे वैशिष्टय़च म्हणायला हवे. या जेवणावळीत खास जेवणावळी या लग्नाशी निगडितही आहेत. स्थानिक पाहुण्यारावळ्यात एखाद्याच्या घरात लग्न ठरले ही बातमीच सगळ्यांना पर्वणी असते. त्यामुळे लग्न ठरले की पहिली जेवणावळ ही लग्न ठरल्याची म्हणजे नमनाची. ही साधी शाकाहारी असते. पण त्यानंतर दुसरे जेवण मात्र सामिष असते. तुळजापुरात लग्न, मग ते कोणत्याही जातीचे, गरिबाचे वा मानकराचे असेल, ते लग्न मंदिरातच लावायची पद्धत होती. ही प्रथा जवळपास १९८० पर्यंत होती. आणि लग्न म्हटले की देवकार्य आलेच. देवकार्याचा अर्थच असा की, देवासाठी दिलेले जेवण. देवकार्य सामिष असलेच पाहिजे, मग ते लग्नाच्या आधी किंवा नंतर, जसे सोईचे असेल तसे दिले तरी चालते. त्यानंतर पाहुण्यारावळ्यांची केळवण सुरू होतात, तीच मांसाहाराची. शिवाय त्यात प्रारंभी दारू नसेल तर त्या जेवणाला काय अर्थ आहे? या जेवणात सुक्के आणि रश्श्याचे, खिमा, बिर्याणी असा सगळा साग्रसंगीत बेत असतो. ही जेवणे फक्त नातेवाईक व संबंधितांचीच असतात, त्यामुळे त्याला मर्यादित व ठराविक लोकांनाच आमंत्रण असते. इथे लग्नाच्या जेवणाला जेवढे महत्त्व नसेल तितके या ‘गडंगणाच्या’ (केळवणाच्या) जेवणाला असते, हे विशेष! अशी केळवणं काही लोकाच्याकडे तर एका दिवसाकाठी दहा-बारासुद्धा असू शकतात. त्यामुळे गेलं तरी पंचाईत, नाही म्हटलं तर ‘पावणे’ नाराज होण्याची भीती व त्यांना तो अपमान वाटेल, ही धास्ती. त्यामुळे तुळजापूरकर अशा सगळ्या ठिकाणी आवर्जून जातात व रीतीनुसार ‘हात ओले’ करतात. यानंतरच्या जेवणावळी या लग्नाआधी होणाऱ्या देवकार्याच्या. या जेवणाची पहिली पंगत संध्याकाळी साधारणपणे सहा वा. सुरू होते व शेवटची रात्री बारा-एक वाजेपर्यंत. यात पहिली पंगत गप्पागोष्टी ऐकण्याची तर शेवटची फक्त ‘पाहण्यासारखी’ असते असे म्हणतात. सुरुवातीला लहान मुले व सामान्य जनतेच्या पंगती असतात. त्यांना मटणाचा एखादा-दुसरा तुकडा व भरपूर झणझणीत रस्सा असला तरी भागते, त्यांचे पोट भरते. जितका उशिरा येईल तितका तो पाहुणा मानाचा असतो. जसा उशीर होईल तितकीच येणाऱ्यांची पिण्याची वाढती कॅपॅसिटी लक्षात येत असते. बऱ्यापकी पिणारे या मधल्या काळात जेवण करून जातात. त्यांना मटणासोबत तिखट रस्सा व त्यावर ‘र्ती’ म्हणजे तिखटाचे तेल असले की भागते. शेवटची पंगत ही खाशा स्वाऱ्यांची. या पंगतीला येणारे पाहुणे नुसते डुलतच नव्हे, तर दोन माणसांच्या आधारानेच त्यांचे आगमन होते. या पंगतीतली मंडळी जेवणासाठी आलेलीच नसतात, कारण त्या अवस्थेत ते नसतातच. त्यामुळे ‘जास्त झालेल्या’ या मंडळींचे नुसते बोलणे ऐकणेही आपली करमणूक करणारे असल्याने, ही केवळ ‘ऐकण्याची’ पंगतच म्हणायला हवी. या जेवणावळीच्या पंगतीशिवाय पक्षपंधरवडय़ात होणाऱ्या पंगती वेगळ्याच कारणांनी गाजतात. हे पंधरा दिवस त्यात केल्या जाणाऱ्या पदार्थाच्या चच्रेतच जात असले तरी भजी आणि कढी हे त्या शाकाहारी जेवणातले अत्यावश्यक पदार्थ हे करावेच लागतात. दुपारी बारानंतर सुरू होणाऱ्या या जेवणावळी रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत चालतात.
तुळजापूरच्या मंदिरात ‘आराध’ बसण्याची पद्धत आहे. लग्नानंतर नवरानवरी, आईवडील, जवळचे नातेवाईक मंदिरातच एका खोलीत, त्यांच्या घरातील पद्धतीनुसार सात ते पंधरा दिवस आराध बसतात. या कालावधीत मंदिराच्या आवाराच्या बाहेर यायचे नसते. या आराध्यांना देवळातून वर जाण्याची परवानगी नसते. पण त्यांना मंदिराच्या खालच्या बाजूला म्हणजे आराधवाडीकडे जाण्याची परवानगी असते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. ही व्यवस्था पाचपन्नास माणसांपर्यंतदेखील असू शकते. आराध बसणारी मंडळी या काळात जोगवा मागतात. ही प्रथा आजही अनेक घरांत कटाक्षाने पाळली जाते, हे विशेष. तुळजापूरचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे एकमेकांच्या घरी दिवाळी व इतर सण-समारंभानिमित्त जेवणाचे ताट देणे. असे ताट गल्लीत असलेल्या संबंधित प्रतिष्ठित व प्रसिद्ध लोकांच्या घरी दिले जाते. पण हे एक केवळ कर्तव्यभावनेने उरकणे नसून चवीने केलेले पदार्थ इतरांनी आवर्जून खावेत या प्रेमाने, आपुलकीने दिलेले असते. या जेवणात प्रामुख्याने गरम पुरणपोळी, मटण, भजी यांचा समावेश असतो. इथल्या स्वयंपाकात केवळ दोनच प्रकारचे तिखट वापरले जाते. पकी एक तांबडे व दुसरे मसाल्याचे. पकी मसाला विशेषत: मांसाहारी जेवणासाठीच मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. इथल्या पुजाऱ्यांचे (भोप्यांचे) वैशिष्टय़ असे की, येणारा यात्रेकरू ज्या भागातील असेल त्याच्याच पद्धतीने जेवण बनवण्याची त्यांची खासियत आहे. आंध्र आणि कर्नाटकच्या लोकांना भात आणि आमटी लागते व त्यातही आमटीत जास्तीतजास्त चिंचेचा कोळ आणि तिखट घातलेले त्यांना आवडते. हे या पुजाऱ्यांच्या बायकांना पक्के माहीत झालेले आहे. या बायकांना स्वयंपाकाची इतकी सवय झाली आहे की, त्यांना त्याचे काहीच अप्रूप वाटत नाही. पाचशे माणसांचा स्वयंपाक करताना त्यांच्या ज्या वेगवान हालचाली होत असतात, त्याही पाहण्यासारख्या असतात. तुळजापुरात आता दर्शनासाठी नेहमीच प्रचंड गर्दी असते. राज्याचे वरिष्ठ सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले रामानंद तिवारी जेव्हा उस्मानाबादेत जिल्हाधिकारी होते तेव्हा नेहमी ‘उस्मानाबाद में है क्या? हवा, पानी और तुळजाभवानी!’ असे म्हणत असत. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणासारखे हवामान व कुलदेवतेच्या माहात्म्याने या शहराचे एक वेगळे स्थान होते. आता पाण्याची बोंब व हवेचे प्रदूषण झाल्याने फक्त मातेचे माहात्म्य जिल्ह्य़ाला तारत आहे. देवीची जी साडेतीन पीठे आहेत, त्यातही इथल्या प्रथा खूप वेगळ्या आहेत. इथे कवडय़ांच्या माळा घालणे, बांगडय़ा भरणे, जोगवा मागणे, दिवटीला तेल घालणे याही प्रथा आहेत.
सकाळी पोळी, संध्याकाळी नळी
इथल्या जवळपास सगळ्या घरांत रोजच सकाळी पोळी व संध्याकाळी ‘नळी’ (मटण) हे ठरलेले असते. त्यामुळे हे गावच जणू खाद्यसंस्कृतीवर पोसलेले वाटते. आषाढ, श्रावण, भाद्रपद या महिन्यांत मांसाहार न करणारे बरेच असतात. शिवाय फारशी यात्राही नसते. त्यामुळे भोप्यांच्यासाठी हे दिवस तसे कंटाळवाणेच असतात. त्यामुळे वर्षांच्या बारा महिन्यांपकी आठ महिने खाणे चालू असते तर बाराही महिने ‘पिणे’ सुरू असते. यात्रा नसलेले चार महिने वा विशिष्ट दिवस, याला त्यामुळेच ही मंडळी ‘खाडे’ दिवस म्हणतात. इथे जेवणाची आमंत्रणे देण्याचीही एक खास स्टाइल आहे. सायकलवरून देशमुखांच्या घरचा माणूस पाटलांच्या घरी आमंत्रण देण्यासाठी गेल्यावर, दारातूनच आत मोठय़ा आवाजात हाळी देतो, ‘आमंत्रण खालच्या घरच्या देशमुखांचे, घ.म.’ म्हणजे ‘घरातील सर्व मंडळी’.
तुळजापूरला येणारे भक्त हे केवळ दर्शनासाठी येणारे जसे असतात तसेच नवसपूर्तीसाठी येणारेही असतात. घरात शुभकार्य, विशेषत: लग्न झाल्यानंतर परंपरागत जे कुलधर्म कुलाचार असतात, त्यापकी एक म्हणजे गोंधळ. देवीचा गोंधळ पूर्वी आपल्या घरातच घालण्याची प्रथा होती. पण आता फ्लॅट संस्कृती, जागेची अडचण, शेजाऱ्यांना होऊ शकणारा त्रास, छोटय़ा जागेत सगळे नातेवाईक, इष्टमित्रांची न मावणारी संख्या, होणारा खर्च या सगळ्यांचा विचार करून आजकाल सगळेजण देवळातच गोंधळ घालणे पसंत करतात. त्यातही तुळजाभवानी ही अनेकांची कुलदेवता असल्याने हा गोंधळ शक्यतो तिथेच जाऊन करण्याची पद्धत आता हळूहळू रूढ झाली आहे. घरात घालायचे गोंधळ शक्यतो रात्रीच घालावे लागतात, पण देवस्थानात दिवसभर हे विधी सुरूच असतात, ही सोयही लोकांच्या पथ्यावर पडते. गोंधळी गीते, त्यातील गण, गौळण हे सगळे म्हणजे लोकसाहित्याचा एक आगळावेगळा प्रकारच म्हणायला हवा. परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आलेले ज्ञान म्हणा किंवा अलिखित अशी मौखिक संस्कृती आहे त्यालाच लोकसाहित्य म्हणता येईल. हे केवळ अशिक्षित अप्रगत लोकांतच असते असे नाही, तर ते सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांतही प्रचलित असते.
गोंधळ गीतांचा ठेवा गोंधळी समाजाकडून जपला जात असला तरी ते परंपरागत व्यवसाय म्हणूनच पाहतात. त्या समाजातील सुशिक्षित तरुण या व्यवसायाकडे पाठ फिरवून आहे. पण त्यालाही काही अपवाद आहेत. पर्याय नसल्याने हा व्यवसाय करणारेही बरेच आहेत. तसेच यातून होणारा आíथक लाभही त्याला कारण आहे. राजुरी गावातील अनेक कुटुंबे आजही हा व्यवसाय निष्ठेने करतात. सुशिक्षित मुलेही या व्यवसायात आहेत. मोठमोठय़ा कार्यक्रमांच्या तर सुपाऱ्या घेतल्या जातात व त्या दहा ते पंधरा लाखांपर्यंत असतात. या गीतांत सामाजिक, धार्मिक प्रथांचा, सामाजिक समस्यांचाही समावेश असतो. गोंधळाची प्रथा ही विधिवत पार पाडली जाते. हा विधी सुरू करण्यापूर्वी गोंधळ्याला येऊन गोंधळ घालण्याची सुपारी (म्हणजे निमंत्रण) दिले जाते. या गोंधळाच्या पूर्वरंगात गण, गवळण, आवाहन व नमन असते, तर उत्तररंगात आवाहन, गायन, सादरीकरण, आरती व भार उचलणे हे प्रकार असतात. श्रीगणेशाच्या स्तवनानंतर विविध देवतांना आवाहन केल्यानंतर सुरू झालेला गोंधळ आरतीने समाप्त होतो. गोंधळ सुरू करण्यापूर्वी देवीची परडी भरण्याची पद्धत आहे. यामध्ये देवीच्या परडीत मीठ, पीठ, तेल इत्यादी घालून सवाष्ण स्त्रीच्या हस्ते पूजा केली जाते. तुळजापूरच्या मंदिरात गोंधळ घालण्यासाठी खास मोठा कट्टा केलेला आहे. तिथे एका कोपऱ्यात गोंधळासाठी चौक मांडला जातो,

No comments:
Post a Comment