श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट ह्यांना श्री छत्रपती शाहू महाराजांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, शके १६३५, विजयनाम संवत्सरे, मंगळवार दि.१७ नोव्हेंबर १७१३ रोजी पुण्याच्या दक्षिणेस ८ मैलांवर असलेल्या मांजरी मुक्कामी पेशवेपदाची वस्त्रं दिली."
थोरले शाहू महाराजाना मोंगलांच्या कैदेत असताना बाळाजी विश्वनाथांनी जोत्याजी केसरकर, धनाजी जाधवांच्या तर्फे त्यांच्या सुटकेचे केलेले प्रयत्न तसेच अहहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर खंडो बल्लाळ चिटणीस, धनाजी जाधव वगैरे अनेक मातब्बर मराठा सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूची सत्यता पटवून त्यांना त्यांच्या पक्षी आणणे, श्री छत्रपती शाहू महाराजांची ताराराणींच्या विरुद्ध झालेली खेडची लढाई, त्यातला विजय, कान्होजी आंग्र्यांचं प्रकरण, त्यांना मुत्सद्देगिरीनी शाहूंच्या पक्षात आणणे, दमाजी थोरात, चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, खटावकर वगैरे सरदारांचा शाहू महाराजांना होणार उपद्रव कमी करणे अश्या एकूणच सन १६९७ ते १७१३ पर्यंतच्या कामगिऱ्यांचा लेखाजोखा पहाता मराठी राज्याचे सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ हे एक हरहुन्नरी, व्यवहारदक्ष, अनुभवी, एकनिष्ठ सेवक आहेत याची थोरल्या शाहू महाराजांना पुरेपूर खात्री पटली होती.
अशी भरभक्कम कामगिरी केल्यामुळे श्री छत्रपती शाहू महाराजांनी "बहुत संतोष पावून (बाळाजी विश्वनाथ) प्रधानपदास योग्य आहेत समजोन सुमुहुर्त पाहोन मुख्य प्रधानपदाची वस्त्रे, सणगे सहा व जवाहीर, शिरपेच तुरा, कंठी, चौकडा, ढाल, तलवार, शिक्के, कटार, साहेब नौबत, हत्ती, घोडे, जरीपटका याप्रमाणे देऊन मुख्य प्रधान केले. शके १६३५ विजयनाम संवत्सरे सुरुसन आर्बा अशर मया व अलफ राज्याभिषेक शक ४०"
पुण्यश्लोक श्री छत्रपती थोरले शाहू महाराज भोसले ज्यांचा उल्लेख “अतुल पराक्रमी सेवक” असा करत त्या श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट ह्यांना थोरल्या शाहू महाराजांकडून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, शके १६३५, विजयनाम संवत्सरे, मंगळवार दि.१७ नोव्हेंबर १७१३ रोजी पुण्याच्या दक्षिणेस ८ मैलांवर असलेल्या मांजरी मुक्कामी पेशवेपदाची वस्त्रं मिळाली.
त्याचवेळी रांजणगाव, कुर्डा वगैरे पाच महालांचे सरदेशमुखी वतनही त्यांना लिहून दिले. आतापर्यंत बाळाजींकडे असलेले 'सेनाकर्ते' पद होनाजी अनंतना मिळाले. तसेच रामाजीपंत भानु हे फडणीस झाले. अंबाजीपंत पुरंदऱ्यांना मुतालिकी मिळाली. अमात्य पद अंबूराव हणमंते यांस असून नारो गंगाधर उर्फ आयाबा मुजुमदार यास मुजुमदारी दिली
मराठ्यांच्या इतिहासातली ही नव्या पर्वाची सुरुवात झाली. आज या घटनेला ३१२ वर्षे पूर्ण झाली..
© स्वराज्यसेवक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ :
१) पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक
२) मराठी रियासत (मध्यविभाग - १) १७०७-१७४० - गोविंद सखाराम सरदेसाई
३) खरे जंत्री - गणेश सखाराम खरे
४) मराठ्यांचा इतिहास : खंड २ : पेशवाई - डॉ. जयसिंगराव पवार

No comments:
Post a Comment