निंबाळकर घराणे
फलटण हे फक्त चौऱ्याऐंशी गावांचे संस्थान. आकाराने आटोपशीर; परंतु त्याचा मान आणि दबदबा मोठा होता. फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्याची सत्ता सातशे वर्षे निरंकुशपणे होती. त्या राजघराण्याने एकूण सत्तावीस पिढ्यांच्या राज्यकर्त्यांची वैभवशाली कारकीर्द घडवली. प्रजाप्रिय घराणे म्हणून त्यांची ओळख होती.
नाईक-निंबाळकर घराण्याचे मूळ इतिहासात नवव्या शतकात सापडते. तेव्हा मध्य भारतातील धार येथे परमार वंशाच्या राजपूत राजाने त्याचे राज्य स्थापन केले होते. नंतरच्या काळात दिल्लीच्या सुलतानांनी सतत हल्ले करून त्यांना राज्य चालवणे मुश्किल करून टाकले. त्या हल्ल्यांना कंटाळून काही राजपूत घराणी मध्य प्रांतातून दक्षिण भारतात आली, त्यांपैकी नाईक-निंबाळकर हे घराणे होय. त्यावेळी ते ‘पवार’ होते.
त्यांना ‘निंबाळकर’ हे आडनाव मिळाले त्याची कहाणी आहे. इसवी सन 1270 च्या सुमारास त्या घराण्याचा पुरुष निंबराज परमार याने फलटणजवळच्या शंभू महादेवाच्या जंगलात मुक्काम ठोकला. ‘निंबराज’ या नावावरून त्या जंगलाला आणि त्या परिसराला लोक ‘निंबळक’ असे म्हणू लागले. त्यावरून घराण्याला आडनाव मिळाले ‘निंबाळकर’ असे. निंबराजाने त्याची अकरा वर्षांची कारकीर्द चांगल्या पद्धतीने घडवली. त्याने फलटण संस्थानाची स्थापना 1284 मध्ये केली. तो सुलतान महंमद तुघलक याच्या पदरी होता. निंबराजाचा पराक्रमी मुलगा पोडखल जगदेवराव. तो युद्धात मारला गेला. महंमद तुघलकाने त्याच्या मुलाला म्हणजे दुसऱ्या निंबराजाला सरदारकीची वस्त्रे, फलटणची जहागिरी; तसेच, नाईक हा सन्मानाचा किताब बहाल केला. त्याला सोन्याचा तोडा दिलाच, पण मस्तकावर ‘मोरचेल’ वापरण्याचा हक्क देऊन एक प्रकारे ‘राजे’ म्हणून त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली.
नाईक-निंबाळकर घराण्याचा शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी पिढीजात स्नेहबंध आणि नातेसंबंध गहिरा आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वजांना नाईक-निंबाळकर घराण्याने सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भोसले घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या संबंधातील हकिगत अशी – 1570 ते 1630 या काळात जगपाळराव ऊर्फ वणगोजी दुसरे हे फलटणच्या गादीचे अधिपती होते. हिंगणी बेरडीचे भोसले सरदार शंभू महादेवाच्या यात्रेला दरवर्षी चैत्र महिन्यात येत तेव्हा ते फलटणला नाईक-निंबाळकर यांच्याकडे मुक्काम करत असत. एकदा काही कामाच्या निमित्ताने बाबाजी भोसले फलटणला जगपाळराव यांच्याकडे आले असताना, त्यांनी सोबत मालोजी आणि विठोजी या त्यांच्या दोन्ही पुत्रांना आणले. ते दोघेही तडफेचे जवान मुलगे होते. जगपाळरावांनी त्या दोघांना बाराशे होनांची आसामी देऊन स्वत:च्या पदरी ठेवले. त्या दोघांची फलटण संस्थानाचा विस्तार वाढवण्याच्या कामी जगपाळरावांना मदत झाली. दोन्ही घराण्यांचे मैत्र असे वाढीस लागले.
नंतरच्या काळात कोल्हापूरजवळील लढाईत जेव्हा विजापूरचा आदिलशहा जगपाळरावांच्या सैन्यावर चालून आला, तेव्हा प्राणांची शर्थ करून मालोजी आणि विठोजी भोसले यांनी निंबाळकरांचा मुलख राखला, जगपाळरावांची बाजू सांभाळली. त्या लढाईत भोसले बंधूंच्या पराक्रमाची कीर्ती सर्वदूर पसरली. ती ऐकून निजामशहाने भोसले यांना त्यांची जप्त वतने परत केली आणि ‘राजे’ हा किताब दिला. भोसले घराणे पुन्हा निजामशाहीत रुजू झाले. भोसले आणि नाईक-निंबाळकर या दोन्ही घराण्यांतील स्नेहसंबंधांची परिणती परस्परांशी नातेसंबंध जोडण्यात झाली. जगपाळरावांच्या बहिणीशी मालोजीरावांचा विवाह झाला ! त्या विवाहाचा परिणाम म्हणजे नाईक-निंबाळकर यांच्यासारख्या मातब्बर राजांचे पाठबळ मिळाल्यामुळे शहाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक कार्याला मोठे यश मिळू शकले. या दोन्ही घराण्यांतील जिव्हाळा इतका होता, की शहाजीराजे यांच्या विवाहाची बोलणी जगपाळरावांच्या मध्यस्थीने पार पडली. जगपाळराव हे त्या काळातील मोठे मातब्बर मराठा सरदार होते. त्यांनी लखुजी जाधव यांच्याकडे त्यांच्या मुलींसाठी शब्द टाकला. जगपाळरावांचा शब्द प्रमाण मानून लखुजी जाधव यांनी त्यांची कन्या जिजाबाई शहाजीराजे यांना दिली. नंतरच्या काळात- 1631 च्या सुमारास जगपाळरावांच्या नंतर फलटणच्या गादीवर आलेले मुधोजीराजे दुसरे आणि विजापूरचा आदिलशहा यांचे संबंध बिघडले. आदिलशहाने मुधोजीराजे यांना साताऱ्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवले. त्यावेळी मुधोजीराजांनी त्यांच्या धाकट्या पत्नीला बजाजी आणि जिऊबाई या मुलांसह साताऱ्यात स्वतःजवळ बोलावून घेतले. त्यांना त्यांच्या जीवाला दगाफटका होईल अशी भीती वाटली. त्यांना अशी कैदेत दहाएक वर्षे गुजरावी लागली. दरम्यानच्या काळात, शहाजीराजे आदिलशहाकडे रुजू झाले होते. नाईक-निंबाळकर आणि भोसले या घराण्यांतील ऋणानुबंधांना जागून शहाजीराजे यांनी आदिलशहाकडे शब्द टाकला आणि मुधाजीराजे यांची सुटका करवली. या घटनेमुळे नाईक-निंबाळकर व भोसले या घराण्यांचे मैत्रीसंबंध अधिक घट्ट झाले. मुधोजीराजे यांनी त्यांची कन्या जिऊबाई शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजी राजे यांना 1640 साली दिली. जिऊबाई हीच ‘सईबाई’. शहाजीराजे यांची आई आणि सून दोघी नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातून आलेल्या होत्या.
शिवाजीराजांना मुधोजीराजांची मदत आहे याची चाहूल आदिलशहाला लागल्यावर मुधोजीराजे यांच्याशी आदिलशहाचे संबंध पुन्हा बिघडले. मुधोजीराजे यांची इच्छा फलटणचे आधिपत्य बजाजी यांना द्यावे अशी होती. परंतु त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांना- म्हणजे साबाजी आणि जगदेवराव यांना – पित्याचा हा निर्णय मान्य नव्हता. मुधोजीरावांनी बजाजीला अधिपती करावे यासाठी आदिलशहाचे मन वळवले. परंतु त्यामुळे क्रुद्ध होऊन त्यांच्या दोन्ही मुलांनी आदिलशहाचीच मदत घेऊन मुधोजीरावांशी लढाई केली. ती लढाई शिरवळच्या जवळ असलेल्या भोळी या गावापाशी झाली, तीत मुधोजीराव एका वडाच्या झाडाखाली मारले गेले. प्रत्यक्ष पोटच्या मुलाच्या हातून तेथे झालेल्या हत्येमुळे या वृक्षाला ‘बापमारीचा वड’ असे नाव पडले !
बजाजी निंबाळकर यांची पुढील कहाणी हृदयस्पर्शी आहे. त्या लढाईत बजाजी यांना कैद करून विजापुरात नेले गेले. विजापूर दरबाराकडून तेथे त्यांना ठार मारण्याचा आदेश आला. परंतु माने-घाटगे-घोरपडे आणि काळजी शिंदे या सरदारांनी आदिलशहाला विनंती करून ती आज्ञा मागे घेण्यास लावली. बजाजी यांना त्या जीवदानाच्या मोबदल्यात आदिलशहाच्या मुलीशी विवाह करावा लागला, एवढेच नव्हे तर त्यांना मुसलमान धर्मही स्वीकारण्यास भाग पाडले गेले. नंतर, बेगमेचे फर्मान घेऊन बजाजी जेव्हा फलटणला आले, तेव्हा जिजाबार्इंनी शिंगणापूरमधील शंभू महादेवाच्या मंदिरात धर्मविधी करून बजाजी यांना परत हिंदू धर्मात आणले. एवढेच नाही, तर शिवाजी राजांनी त्यांची कन्या सकुबाई हिचा विवाह बजाजी यांच्या मोठ्या महादजी नावाच्या मुलाशी करून दिला. त्या विवाहामुळे दोन्ही घराणी नातेसंबंधांच्या रूपात अधिक जवळ आली. बजाजी यांचे निधन 1674 साली झाले. त्यानंतर बजाजी यांचा तिसरा मुलगा वनगोजी 1676 -1693, त्यानंतर त्यांचा पुतण्या जानोजी 1693-1748 आणि त्यानंतर जानोजी यांचा पुत्र मुधोजी (तिसरे) 1748-1765 यांनी फलटण संस्थानाधिपती म्हणून राज्य केले.
मुधोजी तिसरे यांच्या पत्नी सगुणाबाई दयाळू आणि परोपकारी होत्या. त्यांनी मुधोजी (तिसरे) यांच्या निधनानंतर (1765) नंतर काही काळ राज्यकारभार केला. परंतु माधवराव पेशवे यांच्या सगुणाबार्इंवरील नाराजीमुळे त्यांनी सगुणाबार्इंची जहागिरी जप्त करून फलटणचे आधिपत्य निंबाळकरांच्या दूरच्या नात्यातील मुलाला दिले. सगुणाबार्इंनी मालोजी तिसरे यांना दत्तक 1774 मध्ये घेतले. मालोजी तिसरे यांच्या निधनानंतर त्यांचे दत्तक पुत्र जानराव हे गादीवर आले, परंतु ते अज्ञान होते. राणी सगुणाबार्इंनी त्यांच्या नावाने राज्यकारभार 1791 पर्यंत समर्थपणे चालवला. त्या धर्मपरायण होत्या व त्यांच्या ठायी राज्यकुशलताही होती. त्यांनीच फलटण येथील ग्रामदैवत श्रीराम मंदिर बांधले. त्यासाठी बनारसमधून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती तयार करवून घेतल्या. सगुणा राणीसाहेब यांचे नाव फलटणमध्ये कृतज्ञतेने घेतले जाते. राणी सगुणाबाई 1791 साली निवर्तल्या. त्यानंतर जानराव नाईक यांनी 1825 पर्यंत राज्यकारभार केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी साहेबजीबाई यांनी कारभार सुरू केला. साहेबजीबाई यांनी त्यांच्या पुतण्याच्या मुलाला म्हणजे महादजी यांना दत्तक घेतले. दत्तक प्रसंगी महादजी यांचे नाव मुधोजी असे ठेवले. तो अज्ञान असल्याने साहेबजीबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थानात चांगल्या पद्धतीने कामकाज केले. त्यांचा मृत्यू 1853 मध्ये झाला. तोपर्यंत 1818 मध्येच मराठेशाहीचा अस्त होऊन ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली होती. 1853 नंतर 1860 पर्यंत ब्रिटिशांनीच फलटण संस्थानाचा कारभार चालवला.

No comments:
Post a Comment