दक्षिणेत स्वराज्याची धुरा आपल्या मजबूत बाहूंवर समर्थपणे पेलणाऱ्या
सरसुभेदार हरजीराजे महाडीक...
● १४ नोव्हेंबर १६८२ पूर्वीच दोन्ही सैन्यांच्या एकमेकांविरुद्ध हालचाली झाल्या. हरजीराजे यांनी म्हैसूरकरांच्या प्रांतात ५००० घोडेस्वारांनिशी जाऊन वसुली केली. ती भरपाई घेऊन परत येत असता म्हैसूरकरांच्या सैन्याशी गाठ पडली. भांडण झाले. त्यात हरजीराजे यांचे ३०० स्वार ठार अगर जखमी व एक सेनापतीही जखमी होऊन शत्रूच्या हाती लागला. म्हैसुरकरांचेही बरेच नुकसान झाले...
पूर्वीच्या मदुरानायकांचे राज्य आता अगदी लहान तुकड्या तुकड्यात बाकी राहिले आहे. नायकाकडे अगदी लहानसाच भाग राहिला आहे. त्याचा एक भाग म्हैसुराकडे गेला आहे. तिसरा भाग मरवाच्या नायकाकडे असून चौथा संभाजी महाराजांकडे काबिज झाला आहे. पाचवा एकोजीने बळकाविला आहे. मदुरेच्या राज्यातील म्हैसूरकरांची सत्ता मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण संभाजी महाराजांनी त्याच्याच राज्यावर घाला घातला आहे. म्हैसूरकरांनी मागे जिंकलेल्या मुलुखातील लोक आता त्याचे फेकून देत आहेत. तंजावर प्रांतातील काही भाग सोडून जो मरवाचे नायकाने घेतला होता तो आता एकोजीकडे आहे. ही भांडणे चालूच राहिली. श्रीरंगपटणकर व संभाजीराजे यांचा तह होऊन स्थिरस्थावर होईल असे वाटत होते...
छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध झालेल्या कटात सामील असल्यामुळे कर्नाटकचा सुभेदार रघुनाथ नारायण हणमंते यास अटक केली व त्या जागी हरजीराजे महाडिक यांची संभाजी महाराजांनी नियुक्ती केली. दक्षिणेत त्यावेळी म्हैसूर, मदुराई, तंजावर, रामनाड, इक्केरी इ. छोटी छोटी हिंदू पाळेगारांची राज्ये व आदिलशाही, कुतुबशाही ही दोन मोठी राज्ये अस्तित्वात होती. विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही यांच्याशी संभाजी महाराजांनी योग्य ते संबंध प्रस्थापित केले व प्रसंगी अनेकवेळा त्यांना आर्थिक व लष्करी मदत करून मोगलांविरुद्धच्या लढाईत साहाय्य देखील केलं. या सर्वांमधे म्हैसूरच्या राजा चिक्कदेवराय हा शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयापासून मराठ्यांविरोधात होता. शिवाजी महाराजांनी या मोहीमेत तंजावर, वेल्लूर, जिंजी, होसकोट, दोड्डाबाळापूर हा सबंध प्रदेश स्वराज्यात आणला होता. मराठ्यांच्या या विजयामुळे संपूर्ण कर्नाटकावर राज्य करण्याचे चिक्कदेवरायाचे स्वप्न भंग पावले होते. व्यंकोजीराजांची राजधानी बंगळूरला होती तोपर्यंत चिक्कदेवरायाच्या उत्तरेतील हालचालींना आळा बसला होता. मात्र व्यंकोजीराजांनी राजधानी तंजावरला हलवल्याने चिक्कदेवरायाच्या राज्यविस्ताराच्या आकांक्षेला नवं बळ मिळालं. त्याने मदुराईच्या नायकावर हल्ला करून त्याचे गड घेण्यास सुरवात केली. यात त्याचा सेनापती कुमारय्या याने मदुराईची राजधानी त्रिचनापल्लीपर्यंत धडक मारली. हरजीराजांनी व व्यंकोजीराजांनी वेळेत येऊन मदुराईकरांची मदत केल्याने म्हैसूरकरांना माघार घ्यावी लागली. हरजीराजांनी म्हैसूरकरांना मदुराईच्या राज्यातून हाकलून लावण्याचा सपाटा लावला व म्हैसूरकरांकडून जिंकलेला नवीन मदुराईचा मुलुख स्वराज्यात सामील केला, हरजीराजे, जैताजी काटकर, दादजी काकडे यांनी म्हैसूरकर चिक्कदेवरायाचा सेनापती कुमारय्या याचा पराभव करत २,००० घोड़ी पाडाव केली...
संभाजी महाराजांच्या या म्हैसूरकरांविरोधी मोहिमेला काही इतिहासकार अवास्तव व विनाकारण ठरवतात. पण या मोहिमेमुळे दक्षिणेतील राज्यांची एकजूट तर झालीच त्याच बरोबर मराठ्यांच्या या तरुण, पराक्रमी छत्रपतीने मराठा राज्यातील प्रजेचा विश्वास संपादन केला व मराठा सैन्याला मुघलांविरुद्ध लढण्याला बळ प्राप्त करून दिले. परिणामी आदिलशाही व कुतुबशाहीच्या अस्तानंतरही स्वराज्य टिकून राहिलं ज्याचा फायदा छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांना झाला. दक्षिणेतल्या या एकजुटीचं श्रेय छत्रपती संभाजी महाराजांबरोबरच हरजीराजे महाडिक यांनाही जातं...!
.jpg)
No comments:
Post a Comment