'पुरुष' म्हणून शिंद्यांच्या लष्करात भरती झालेली जोरावरसिंग नावाची स्त्री.
हा किस्सा आहे १८०९ सालचा.
शिंद्यांच्या पलटणीतील मेजर ब्राऊटनने ह्यावर सविस्तर लेख लिहिला होता. शिंद्यांच्या फौजेत असताना त्याने असाच एक किस्सा पाहिला होता. त्याने ह्याच खूप सुंदर वर्णन केलेलं आहे.
मेजर ब्राऊटनने त्याच्या लेखात काय म्हंटले ते पाहू:
शिंद्यांच्या फौजेतील जीन बाप्टिस्ट च्या ब्रिगेडमध्ये हि घटना घडली. या ब्रिगेडमध्ये जोरावरसिंग नावाचा एक शिपाई दोन वर्षांपासून भरती झालेला होता.
आश्चर्य म्हणजे सुमारे दोन वर्षानंतर हि घटना उघडकीस आली. पण तो पुरुष नसून स्त्री होता असे अखेर उघडकीस आले.
दोन वर्षात कोणालाही त्या स्त्रीचा संशयही आला नाही. आपल्या कसब आणि कवायतींत हा जोरावरसिंग इतका वाकबार होता कि त्याचे वरिष्ठ त्याच्या हुशारीवर आणि
धाडसावर बेहद्द खुश असत. हा जोरावरसिंग शांत स्वभावाचा असून आपले काम बरे आणि आपण बरे अशी त्याची वृत्ती होती. हा शिपाई दुसऱ्याच्या हातचे खायचा नाही. स्वतःचा स्वयंपाक भांडीकुंडी, धुणेभांडी सगळे स्वतःच उरकायचा.
दोन वर्ष ह्या जोरावरसिंगने हे असेच निभावून नेले.
पण एक दिवस एका दुसऱ्या शिपायाला काही संशय आला म्हणून त्याने जोरावरसिंगच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायायला सुरवात केली आणि शेवटी अंघोळीच्या वेळी त्याने
त्याला पकडले.
अडचणीच्या प्रसंगी पकडल्यामुळे जोरावरसिंगचा काही उपाय चालला नाही.
अर्थात ह्या गोष्टीचा सैन्यात मोठाच गवगवा झाला. बायजाबाई शिंद्यांपर्यंत हि वार्ता गेली. ह्या जोरावरसिंग नावाच्या पुरुषाचं सोंग घेतलेल्या स्त्रीला बायजाबाईंच्या पुढे उभं करण्यात आलं.
तीच धाडस बघून बायजाबाई शिंदे खूप खुश झाल्या आणि कौतुकाने तिला अभय देऊन 'तुला घरच्या माणसासारखे वागवीन' असे आश्वासन दिले. दौलतराव शिंद्यांनीही तिला
सांगितले कि मी तुला तुझ्या पथकात बढती देतो.
पण जोरावरसिंग हे पुरुषी नाव घेतलेल्या त्या स्त्रीने अतिशय नम्रपणे सर्व गोष्टी नाकारल्या आणि आपण आहोत त्याच पेशाने आपणांस राहू द्यावे अशी विनवणी केली.
तिची हि मागणी शिंदे सरकारांनी मान्य केली. त्यानंतर हि बाई काही महिने त्याच पथकात शिपाई ह्या पेशाने राहत होती. या बाईला पाहण्याची मला जिज्ञासा असल्यामुळे ( म्हणजे लेख लिहिणाऱ्या मेजर ब्राऊटनला) तिच्या ओळखीच्या एका
शिपायामार्फत मी तिला बोलावून घेतले.
बाई अवघी बावीस वर्षांची असून दिसायला खूप सुंदर नसली तरी फार सुस्वरूप होती. तिच्या चेहऱ्यात काहीतरी जादू होती खास. तिने आपल्या कामकाजासंबंधी अगदी मोकळेपणे सर्व संभाषण केले. मुद्दाम लाजण्याचा स्रियांचा अविर्भाव तिने केला नाही, किंवा मुद्दाम पुरुषासारखा उर्मट शिपाई बाणाही दाखविला नाही.
एक गोष्ट मला मात्र अभिमानाने नमूद करावीशी वाटते ( म्हणजे लेख लिहिणाऱ्या मेजर ब्राऊटनला) ती म्हणजे; या स्त्री शिपायाचे बिंग बाहेर पडल्यापासून साऱ्या लष्करांत तिची
कोणी टवाळी किंवा हेटाळणी तर केली नाहीच पण उलट तिच्याशी लोकांची वागणूक अधिक सौजन्यपुर्वक आणि आदबशीर होऊ लागली.
त्या नंतर काही दिवसांनी ह्या बाईंनी आपल्या लष्करी पेशाला रामराम ठोकला.
ह्या बाईला आईबाप नव्हते. फक्त एकुलता एक भाऊ होता. त्या दोघांचा एकमेकांवर फार जीव होता. पुढे काही कारणाने भोपाळ येथे त्या भावाला गरिबीमुळे कर्ज घेण्याचा प्रसंग आला. त्याला कर्ज मिळाले पण ते कर्ज काही त्याच्या हातून फिटेना.
तेंव्हा सावकाराने त्याला पकडून कैदेत टाकले. ते पाहून त्याच्या ह्या बहिणीने पैसे मिळवून सावकाराचे सर्व कर्ज फेडून भावाला मुक्त करण्यासाठी शिंद्यांच्या सैन्यात भरती होण्याचा हा विचित्र आणि धाडसी निर्णय घेतला.
दौलतराव शिंद्यांना ही खबर कळल्यावर त्यांनी उदार मनाने तिला कर्जफेडीचे सर्व पैसे दिलेच पण वरती मोठी देणगीही दिली. लष्करातून तिला निवृत्तीही दिली आणि भोपाळच्या नवाबाला आपले खास दस्तूराचे पत्र देऊन कळविले कि "या उपर ही बहीण भावंडे माझी कुटुंबीय आहेत असे समजून त्यांचा प्रतिपाळ आणी परामर्ष करीत जावा."
तर अशी ही जोरावरसिंग नावाची स्त्री.
दुर्दैवाने इतिहासाला हीच खरं नाव माहिती नाही.
लेख समाप्त.
श्री भवानीशंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर

No comments:
Post a Comment