विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 January 2026

अहिल्यादेवी होळकर (१७२५-१७९५)

 हीच एका राजयोगिनीची शोकांतिका.


अहिल्यादेवी
 होळकर (१७२५-१७९५)
भाग्यात राजयोग, सुखसोयी असूनसुद्धा दुःखाने काही या स्त्रीचा पाठलाग आजन्म सोडलाच नाही.
लग्न होऊन सासरी आल्या त्या राजकारणात कच्चा असलेल्या पती खंडेरावांचा हात धरून आणि त्यालाही अवघ्या २९ व्या वर्षीच गमावले. त्यानंतर ११ सवती पतीसह चितारोहण करून धन्य झाल्या पण तेही सुख नव्हते या साध्वीच्या नशिबी, सासऱ्याच्या आग्रहावरून मागेच जिवंत रहावे लागले.
आईसारखी लाभलेली सासू गौतमाबाई आणि काहीच काळात पितृवत सासरे मल्हारराव होळकर यांनाही इहलोकीची यात्रा संपवून जाताना बघितले आणि तेही वयाच्या चाळिशीतच.
पुढे आपल्या नादिष्ट चिरंजीव मालेरावाच्या नावे कारभार बघू लागल्या तर ४२-४३ व्या वर्षीच डोळ्यांदेखत वेड लागून मुलाला तथा त्याच्यासोबत सर्व सुनांनाही सहगमन करताना पहावे लागले.
आता पंतप्रधानांकडून सरदारकी मिळाली तरी गंगाधर यशवंत उपाख्य गंगोबातात्या चंद्रचूड हा पाताळयंत्री दिवाण होताच विरोध करायला सतत मानगुटीवर. गंगोबातात्या आणि राघोबादादा यांची तर चक्क एकटी स्त्री बघून होळकरांची सम्पूर्ण संपत्ती हडपण्याइतपत मजल गेली.
शिवाय दत्तक घेतलेला दिर तुकोजी होळकर तर होताच जन्मभर त्रास द्यायला आणि कटकारस्थान करून सत्ता उपभोगायला, कधी त्याचा तर कधी शिंदे तर कधी फडणवीस या सर्वांचा त्रास होताच पाचवीला पुजलेला.
आज ५८ व्या वर्षी लोक पुढील पिढीस कर्तव्यांचे कर्मांतर करत निवृत्ती पत्करतात पण या वयात उरलेले कर्तबगार असे आशेचे किरण, जावई यशवंतराव फणसे यांचाही काळाने घास घेतला आणि एकुलती एक कन्या मुक्ताबाई हिनेही सहगमन केले हा तर आणखीनच एक आघात.
अवघ्या चारच वर्षांनी मुक्ताबाईचा एकुलता एक मुलगा उरलेला रक्ताचा शेवटचा आप्त, वारसदार असलेला लाडका नातू नाथ्याबा उपाख्य धोंडिबा याचेही देहान्त बघण्याचे हलाहल पचवणे लिहिले होते या देवीच्या भाळी, तेव्हाही आपल्या तरुण नातसुनांना सती जाताना उघड्या डोळ्यांनी तथा करंट्या भाग्यानी बघावे लागले.
प्रजेसाठी अहोरात्र झटणारी ही महासाध्वी स्रीरूपी देवी पण जन्मभर एकटेपणा, दुःख, शोक, स्वकीयांकडूनच घात सोसत जगली आणि डोळ्यांदेखत आपल्या वैभवाचा निर्वंश बघत निजधामास निघून गेली.

No comments:

Post a Comment

इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला.

  इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला. इतिहास एका रात्रीत घडत नसतो. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले परिश्रपूर्वक काम आणि चत...