विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

छत्रपती थोरले शाहू महाराज.

,


छत्रपती थोरले शाहू महाराज...

पूर्व हिंदुस्थानातील मराठा साम्राज्य विस्तार म्हणजे प्रामुख्याने रघुजी भोसले या सरदारांचे कार्य व क्षेत्र होय. १७३८ साली शाहू महाराजांनी रघुजींला लखनौ, मुर्शिदाबाद, बुंदेलखंड, अलाहाबाद, पाटणा, ढाका, बिहार असा पूर्वेकडील प्रदेश चौथाई, सरदेशमुखी वसुलीसाठी कार्यक्षेत्र म्हणून दिला होता. रघुजी भोसले यांचे पूर्वचरित्र मागील प्रकरणात थोडक्यात लिहिले आहे...
मराठ्यांनी सर्वप्रथम १७४२ साली बंगालवर स्वारी केली. एप्रिल १७४२ मध्ये मराठ्यांनी प्रबळ सैन्यासह बंगालमध्ये प्रवेश केला. ते नागपूरला पोहोचल्याचे कळताच बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान तातडीने कटकहून ससैन्य निघाला. कलकत्तापासून ५३ मैलांवरील बारद्वान येथे पोहोचला. तेथे त्याने छावणी केली आणि संकटात अडकला. मराठ्यांनी त्याला सर्व बाजूंनी घेरले. त्याचा रसद पुरवठा तोडला. त्याला चौथाईची मागणी केली ती सुद्धा मागील अनेक वर्षापासूनची. पण नवाबाने त्यास नकार दिला. २७ एप्रिलला झालेल्या 'युद्धात दोन्ही बाजूंची जीवहानी मोठी झाली. पण नवाबा कडील ३५०० घोडदळातील काही मारले गेले. तर काही त्याला सोडून गेले. ३ मे रोजी पुन्हा युद्ध झाले. त्यात विजय मिळवून मराठे कटकला पोहोचले, शिवाय लालबागही मिळाले. मुर्शिदाबाद पासून ते ठिकाण जवळ होते. आणि मुर्शिदाबाद हे नवाबाचे निवास ठिकाण होते. मराठ्यांनी नवाबाचा पाठलाग केला. सगळे भीतीचे वातावरण तयार झाले. मराठ्यांनी लूटमार केली. फतेचंद हा साम्राज्यातील सर्वात श्रीमंत सावकार होता. मराठ्यांनी त्याची तसेच इतर अनेक श्रीमंतांची वसूली केली. त्यानंतर मराठे परतले आणि नवाब त्याच्या राजवाड्यात गेला...
रघुजी भोसले आणि बाळाजी बाजीराव पेशवे यांच्यात अनेक कारणांमुळे वितुष्ट होते. अनेक जुन्या सरदारांवर कारवाई करून पेशव्यांनी त्यांना शह दिला होता आणि आपल्या मर्जीतील नवीन सरदारांना बळ व संधी दिली. सरदेसाई लिहितात, 'शाहूराजास बाजूस ठेवून, परभारे रघुजीचा बंदोबस्त करण्याचा निश्चय नानासाहेब पेशव्याने मनाशी केला होता..' नानास पेशवाई न मिळावी यासाठी रघुजीने उघड खटपट केल्याचे विसरणारा नाना नव्हता. त्या प्रमाणे नंतर संघर्ष झाला. पण दाभाडे प्रमाणे रघुजी बाबत घडू नये असे ठरवून महाराजांनी पेशवे व रघुजी यांना सातारला बोलवून त्यांच्यात तडजोड केली होती. त्या कराराचा तपशीलही सरदेसाई यांनी दिला आहे...
● मराठ्यांचा सर्व दिशांना संचार :
वरीलप्रमाणे शाहू महाराजांच्या मराठा सत्तेचा सर्व दिशांना विस्तार झाला. महाराजांनी योग्य वेळी आवश्यक निर्णय घेतले. सरदारांना मदत केली, आदेश दिले. त्यांनीही ते पाळले. अनेक स्वाऱ्या यशस्वी करून दाखवल्या. चौथाई, सरदेशमुखी वसूल करीत महाराजांचे वर्चस्व स्वीकारायला अनेक सत्ताधीशांना भाग पाडले. सर्वत्र मराठे संचार करू लागले. हे सांगताना डॉ. पवार लिहितात, '१७२६ साली पश्चिमेस अहमदाबादवर वर्चस्व मिळविले. १७३७ साली उत्तरेत दिल्लीवर आक्रमण केले. १७४१ साली त्रिचनापल्ली वर ध्वज फडकविला, १७४२ साली पूर्वेकडील मुर्शिदाबाद मध्ये प्रवेश केला. शाहू महाराजांच्या पुढील सहा वर्षांच्या काळात (१७४३-४९) नवीन प्रदेशात जरी आक्रमण केले. नसले तरी मिळविलेल्या प्रदेशावर वर्चस्व कायम ठेवले. शिंदे, होळकर, पवार उत्तरेत, गायकवाड, दाभाडे, कदम, पश्चिमेस, नाईक व घोरपडे दक्षिणेत, तर रघुजी भोसले पूर्वेस हे महत्त्वाचे सरदार होते. त्यांनी मोहिमा यशस्वी केल्या. आतापर्यंतच्या विवेचनात आम्ही हे स्पष्ट केले आहे...
● शाहू महाराजांच्या निधनसमयी मराठा घोडदळ व पायदळाने उत्तर-दक्षिण सुमारे १३०० मैल प्रदेशावर आणि सुमारे ११०० मैल पूर्व-पश्चिम रुंद प्रदेशावर वर्चस्व निर्माण केले होते.. 'At the time of the King's death the Maratha horse and foot had traversed a territory of about 1300 miles in the length from north to south and about 1000 miles in breadh from east to west..."
● हा होता शाहूकालीन मराठा साम्राज्य विस्तार. एवढी मोठी कामगिरी कशी साध्य केली, हे सांगताना सरदेसाई लिहितात, "The expansion of the Maratha Kingdom in his time was not due so much to fortuious circumstances as his happy choice of ministers and his own lovable personality..."
● शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार हा आकस्मिकपणे झालेला नसून महाराजांनी योग्य माणसांची केलेली निवड व त्यांच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वामुळे झाला होता. या साम्राज्य विस्ताराचे वर्णन सरदेसाई असेही करतात, "The Maratha Kingdom which at the time of Shahu's death extended from Kaveri to the Ganga and Jamuna..."
● शाहू महाराजांच्या काळात स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले, हे सांगताना आपल्या पीएच.डी. प्रबंधात डॉ. कुंटे लिहितात, "It is true that the Marathas during the period of Shahu's reign transformed the Swarajya into the Samarajya and extended their territories far and wide in all directions of the Indian continent..."
प्रत्यक्ष स्वराज्यातील व जेथून चौथ वसूल केला जात असे, अशा शाहू महाराजांच्या राजवटीतील महाल, परगणे, गावे अशी सुमारे ८०० नावे कुंटे यांनी पान ७६१ पासून पुढील दिली आहेत. शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या महाराष्ट्र सत्तेचा प्रसार जसा जोमाने होऊ लागला व हिंदुस्थान तिने जेव्हा आक्रमून टाकिले, तेव्हा हिंदुस्थानात असलेली विभिन्न व विविध एतद्देशीय व परदेशीय राज्ये व संस्थाने स्वाधीन व काबीज करून घेण्यासाठी मराठ्यांचे मुत्सद्दी उत्तरेकडील हिमाचलाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या गढवाल संस्थाना पासून ते दक्षिण रामेश्वरजवळील रामनाथ-सेतूपतीच्या राज्यापर्यंत सर्वत्र नांदू लागले होते...
● शाहूकालीन मराठा साम्राज्य विस्ताराचे महत्त्व डॉ. सेन यांनी किती समर्पक शब्दात लिहिले आहे पाहा. "With the return of Shahu to his paternal Kingdom opened a new era of conquest and expansion. The Maratha horseman reached the entrance North-Western frontier of India, their horses drunk the water of Indus and the empire extended from sea to sea..."
आपल्या वाडवडिलांच्या राज्यात शाहू महाराजांचे आगमन होताच विजय व साम्राज्य विस्ताराचे नवे युग सुरू झाले. मराठा घोडदळ भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत पोहोचले. त्यांच्या घोड्यांनी सिंधू नदीचे पाणी पिले आणि मराठा साम्राज्य समुद्राच्या या तीरापासून त्या तीरापर्यंत पोहोचले. म्हणूनच 'मराठा साम्राज्याचे विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज होते...'🙏🏽🚩

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...