६ मार्च १६७३ “नरवीर कोंडाजी फर्जंद”...
अवघ्या साठ मावळ्यांनिशी पन्हाळा गड ताब्यात घेणारे जंजिरा किल्ला दारूगोळ्याच्या साहाय्याने उडवून देण्याचा धाडसी प्रयत्न करणारे कोंडाजी फर्जंद छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना लाभलेले एक नररत्न होते..
आग्र्याहून सुटल्यानंतर तीन वर्ष तयारी करून शिवाजी महाराजांनी मोगलांवर हल्ला करून पहिल्या सहा महिन्यात मोघलांच्या ताब्यातील जवळपास सर्व किल्ले स्वराज्यात आणले होतेे (जून १६७०) पण पन्हाळगड स्वराज्यात आला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली (सन १६७३) यावेळी उपस्थित असलेल्या कोंडाजी फर्जंद यांनी छत्रपतींना पन्हाळगडच्या मोहिमेवर आपणांस पाठविण्याची विनंती केली. त्यांनी अवघे तीनशे मावळे राजेंकडे मागितले अवघ्या तीनशे मावळ्यांनिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजींचे राजेंनी कौतुक करून त्यांस सोन्याचे कडे दिले त्यांच्यासोबत गणाजी मोत्याजी खळेकर या दोन बलदंड सेनानींना दिले कोंडाजींनी कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला पन्हाळगडावर हेर पाठवून त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली त्यावेळी गडावर अंदाजे दोन हजार गनीम होते गडावर बाबूखान हा आदिलशाही किल्लेदार होता..
फाल्गुन वद्य त्रयोदशी (इ.स ६ मार्च १६७३) रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन कोंडाजी गडाच्या जवळ पोहोचले तीनशे मावळ्यांपैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला पुसाटी बुरुजाकडून असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला गडावर पोहचल्यावर मराठ्यांनी शंख फुंकले तुताऱ्या, रणवाद्ये वाजवत आदिलशाही सैन्यावर चाल केली या अतर्क्य प्रकारामुळे शत्रूसैन्याच्या मनोबलावर परिणाम झाला..
मराठे गडावर आल्याचे कळाल्यावर आदिलशाही सैन्याचे अवसान गळाले मराठ्यांनी गडावर आल्यावर युध्दास सुरुवात केली गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द झाले अखेर कोंडाजींच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले किल्लेदार पडल्यामुळे बाबूखानाच्या सैन्यात गोंधळ उडाला ते पळून जाऊ लागले पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला..
आदिलशहाचे उरलेले सैन्य पळून गेले छत्रपतींना इ.स ८ मार्च १६७३ रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले कोंडाजींची पन्हाळगडावरील तीन दरवाजा नजीक असलेल्या तुपाच्या विहिरी जवळ त्यांनी गळाभेट घेतली छत्रपतींनी कोंडाजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोंडाजींनी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली..
सन १६८२ साली छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्याचा बेत आखला कोंडाजी फर्जंद यांनी या मोहिमेची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली संभाजीराजेंच्या मसलती प्रमाणे कोंडाजींनी सिद्दीस सामील होऊन जंजिरा किल्ल्या वरील दारूगोळ्याचे कोठार उडवायचे होते कोंडाजींनी सिद्दीच्या किल्ल्यात कसा प्रवेश केला आणि त्याच्या दरबारात नोकरी कशी मिळविली हे मोठे गूढच आहे..
किल्ल्यावर गेल्यावर त्यांनी किल्ल्यावरील एका बटकीच्या साहाय्याने सर्व माहिती काढली व किल्ल्यावरील दारूगोळा उडविण्याचा बेत आखला किल्ल्याचा बुरुज उडविल्यानंतर संभाजीराजे किल्ल्यावर आक्रमण करणार होते तो बेत कोंडाजींकडून चुकून त्यांच्या बटकीस सांगितला गेला बटकी कडून नकळतपणे ती माहिती एका दासीस कळाली..
सदर दासी, सिद्दीचा सरदार महंमद तालकर याची स्त्री असल्यामुळे सिद्दीस सदरची माहिती कळाली सिद्दीने कोंडाजींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कैद केले कोंडाजींचा शिरच्छेद केला गेला तर इतर सहकाऱ्यांना पाण्यात बुडवून मारण्यात आले सिद्दीच्या तावडीतून वाचलेल्या कोंडाजींच्या एका सहकाऱ्याने समुद्रातून पोहत येऊन किनाऱ्यावर कोंडाजींच्या पराक्रमाची वाट पाहत असणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना या घटनेची माहिती दिली..
● चिटणीस बखरीमध्ये या घटनेचा उल्लेख पुढीलप्रमाणे :
“कोंडाजी फरजंद यांनी आपण जंजिरे जाऊन फितूर करितो, त्याने तिकडे जाऊन चाकरी धरली आत जाऊन दारूखाना वगैरे आग लावून जाळवावे भेद होईल तो करावा असे सांगून ठेविले होते एके दिवशी महमत तालकर याची बंदी महाराजांचे (कोंडाजींचे) लष्करात गेली होती ती तिथे त्याने ओळखली आणि हबशी यास वर्तमान सांगितले तेच समयी चौकशी करिता सर्व कळले नंतर फरजंद यांची डोचकी मारिली, कोणास बुडवले, कोणी पळाले..”
कोंडाजींच्या बलिदानाची वार्ता शंभुराजेंना कळताच त्यांनी समुद्रात भराव टाकून जंजिरा जिंकण्याचा धाडसी बेत आखला समुद्रात काही अंतरावर भराव टाकल्यानंतर मराठ्यांनी आपल्या मोठ्या तोफा काढून किल्ल्यावर मारा चालू ठेवला त्यामुळे किल्ल्याचा बुरुज कोसळून किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी आग लागली रात्रीच्या वेळी सिद्दी खैरत व कासीम किल्ला सोडून इंग्रजांच्या आश्रयाला मुंबईला पळून गेले किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असे वाटले असतानाच मोगल सरदार हसन अलिखान कल्याणमार्गे रायगडाच्या दिशेने येत असल्याची खबर समजल्यामुळे संभाजीराजेंना जिंकत आलेल्या जंजिराची मोहीम अर्धवट सोडून रायगडच्या संरक्षणार्थ जावे लागले..
अवघ्या साठ मराठ्यांसह पन्हाळा किल्ला जिंकणारे कोंडाजी जंजिराच्या सिद्दीच्या गुहेत शिरून त्याचा दारूगोळा उडविण्याचा धाडसी प्रयत्न करणारे कोंडाजी आपल्या पराक्रमाने इतिहासात कायमचे अमर झाले..
No comments:
Post a Comment