विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

मोगल कैदेतून छत्रपती थोरले शाहू महाराजांची सुटका ।।

 मोगल कैदेतून छत्रपती थोरले शाहू महाराजांची सुटका ।।



● कोकरमुंडा : शाहू महाराजांना या बिकट परिस्थितीत मदत मिळणारी महत्त्वाची घटना येथे घडली. तापी नदीकाठी उत्तरेस हा किल्ला असून तेथे अमृतराव कदमबांडे या मराठा सरदाराचे वर्चस्व होते. त्याला ताराबाईंनी तिकडे नेमणूक दिली होती. डॉ. अप्पासाहेब पवार यांनी या सरदाराचे बळ व शाहूंना झालेली मदत याचा सविस्तर तपशील प्रबंधात दिला आहे. त्यानुसार शाहूंचे हे मोठे यश होते की, त्यांनी ताराबाईं साहेबांच्या या प्रबळ सरदारास आपल्या बाजूस वळविले. कदमबांडेकडे १०,००० घोडदळ व १०,००० पायदळ असून सुरत ते बुऱ्हाणपूरपर्यंत त्याचे वर्चस्व होते. असा हा प्रबळ सरदार शाहू महाराजांना मिळाल्याने त्यांची बाजू भक्कम होण्यास मदत झाली, तर ताराबाई साहेबांना एक धक्का बसला असे म्हणता येईल. कोकरमुंडा गुजरातमधील तापी जिल्ह्यात आहे...

● नेवासा : गोदावरी नदी ओलांडून येथे आगमन.
● खेड कडूस : राजगुरूनगरजवळ, ताराबाईसाहेब विरुद्ध युद्ध विजय.
● पुणा : पुणे प्रांतात १० ऑक्टोबर १७०७ दरम्यान प्रवेश.
● सासवड, जेजुरी : देवदर्शन, नवस, पुढे पूर्तताही.
● वीर वाल्हे : म्हस्कोबा देवस्थान.
● शिरवळ : सचिवाची आत्महत्या, शाहूंनी सांत्वन केले, मुलास पद.
● चंदन-वंदन : किल्ला काबीज, साताऱ्यापासून सुमारे ३५ कि.मी.
● सातारा : १२ जानेवारी १७०८. अजिंक्यतारा काबीज, राज्याभिषेक.
● कराड : दक्षिणेस सुमारे ५० कि.मी.
● कोल्हापूर : साताऱ्यापासून दक्षिणेस १२० कि.मी.
औरंगजेबाचा मृत्यू आणि शाहू महाराजांची सुटका या १८ व्या शतकाच्या पहिल्या दशकात घडलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटना होती. पहिल्या घटनेने या देशातील एका विशाल मोगल साम्राज्याचा हास सुरू झाला. किंबहुना मुस्लिम राजवट संपली असे म्हणता येईल. मुस्लिम पर्व संपले आणि मराठा पर्व सुरू झाले. या नवीन पर्वाचा प्रारंभ म्हणजे शाहू महाराजांची मोगल कैदेतून झालेली सुटका ही दुसरी घटना होय. अस्त आणि आरंभ अशा दोन घटनांचा प्रारंभ म्हणजे बादशहाचा अंत व शाहू महाराजांचे स्वराज्यात आगमन होय...
शक्तिशाली औरंगजेब आयुष्याच्या उत्तरार्धात थोडी नव्हे तर तब्बल २६ वर्षे मराठ्यांविरुद्ध लढत राहिला. एवढे प्रदीर्घ काळ चाललेले युद्ध जगाच्या इतिहासात एकमेव होय. त्याने यश मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. याबाबतीत आम्ही तज्ज्ञ इतिहासकारांच्या भाषेत त्याचे मूल्यमापन मागील प्रकरणात केले आहे. असे म्हणता येईल की, “मराठे त्याला पुरून उरले..” छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, भद्रकाली ताराराणी या धुरंदर राज्यकर्त्यांबरोबर असंख्य पराक्रमी मराठा सरदारांना याचे श्रेय द्यावे लागेल. उलट बाजूला एकमेव औरंगजेब आपल्या धर्मवेडापायी माघार घेत नव्हता. पण त्याचे शहजादे, सरदार, सैनिक कोणालाही ते मान्य नव्हते. किंबहुना बादशहाच्या मृत्यूची व उत्तरेला परतण्याची सगळे वाट पाहत होते. मग यश कसे येणार..? तसेच झाले. बादशहाचे निधन झाले. जे जगले वाचले होते ते उत्तरेकडे निघाले तर मुघल साम्राज्य हासाकडे चालले. त्याच बरोबर सत्ता प्राप्तीसाठी मुघल शहाजांद्यामध्ये युद्ध, संहार असा वंशपरंपरागत खेळ सुरू झाला. त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. कारण शाहू महाराजांच्या सुटकेशी त्याचा संबंध आहे...
● औरंगजेबानंतरचा सत्ता संघर्ष :
(...जसा बाप, तसा मुलगा...) सत्ताधीश वडिलांच्या मृत्यूची वाट पाहणे, त्यानंतर कुटुंबातील स्पर्धकांमध्ये सत्तेसाठी वारसा युद्ध होणे या गोष्टी मुघल इतिहासात प्रचलित होत्या. जे औरंगजेबाने वडिलांना कैद करून व भावांना ठार मारून सत्ता मिळविली. तोच कित्ता त्याच्या मुलांनी गिरविला. फरक फक्त ते बघायला औरंगजेब हयात नव्हता, पण तसेच घडणार हे त्यांनीही ओळखले होते आणि तसे झालेही...!
औरंगजेबाचे चार मुलगे होते. १) अकबर २) मुअज्जम ३) आज्जमशहा व ४) कामबक्ष त्यांची अशी नावे होती. त्यापैकी अकबरने वडिलांविरुद्ध बंड करून तो दक्षिणेत छत्रपती संभाजींराजेंच्या आश्रयाला आला. पण, शेवटी अपयश आले व तो इराणमध्ये मरण पावला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या तीन भावांत सत्ता-संघर्ष सुरू झाला. फेब्रुवारी १७०७ मध्ये सुरू झालेले वारसा युद्ध शेवटी मुअज्जम याने (बहादूरशहा या नावे सत्तेवर आला होता.) १३ जानेवारी १७०९ रोजी कामबक्षला ठार मारून संपवले. हे युद्ध दोन वर्षे चालू होते. प्रथम जवळ असणाऱ्या आज्जमने वडिलांचे अंत्यसंस्कार घाईने उरकले आणि १४ मार्च १७०७ रोजी स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले, तर तिकडे उत्तरेत असणाऱ्या मुअज्जमने लाहोर जवळ स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. या दोन स्वयंघोषित बादशहांत सामुगड जवळ जाजू येथे युद्ध होऊन त्यात आज्जम (आजमशहा) मारला गेला. या अगोदर आजमशहाने बेगम, कुटुंबातील अन्य स्त्रिया यांना ग्वालेरच्या किल्ल्यात ठेवले होते. (त्या समवेत येसुबाईसाहेब देखील असाव्यात.) जाजूच्या युद्धावेळी भीमसेन सक्सेना आझमशहाच्या बाजूने युद्धात असून जखमी झाला होता. १८ जून १७०७ रोजी हे युद्ध झाले. आजमशहाबरोबर असलेला महत्त्वाचा सरदार झुल्फीकारखान या युद्धात ऐनवेळी तटस्थ राहिला...
बहादूरशहाच्या मार्गात आता कामबक्ष या भावाचा अडथळा राहिला. कामबक्ष वडिलांचा लाडका होता; पण त्याने हेही ओळखले होते की, त्याला हे बंधू ठार मारणार. म्हणून मृत्यूपूर्वी दहा दिवस या लाडक्या पुत्रास सुरक्षित म्हणून दक्षिणेस पाठवले. पण, सत्तापिपासूपणात तो सुरक्षित कसा राहणार. बहादूरशहाने त्याला १३ जानेवारी १७०९ रोजी ठार मारले व त्याची राजकीय कारकीर्द सुरू झाली. तर असा हा सत्तासंघर्ष, वारसायुद्ध व भावांची सहजपणे केलेली पण अत्यंत क्रूर हत्या होय. आपण आपल्या मुख्य व मूळ विषयाकडे वळूया. शाहू महाराजांची सुटका या घटकाकडे...
● आजमशाह सत्तेवर व शाहूंच्या सुटकेचे राजकारण :
औरंगजेबाने शाहूराजेंना कैद करून अठरा वर्षे आपणासोबत पण कैदेतच ठेवले. शाहू महाराजांच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा हे बादशहा अखेरपर्यंत ठरवू शकला नाही. त्याला हवं ते करू शकला असतां पण पूर्ण असफल ठरला. त्याचा मृत्यू झाला, तेव्हा शाहू, येसुबाई तेथेच होते. आता पुढे आपले काय? असा प्रश्न शाहूंना पडला असणार. दरम्यान, शहाजादा आज्जमने (आजमशहा) स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. सर्व राजकीय परिस्थिती बदलली गेली. आता आपली सुटका होऊ शकेल, अशी शाहू राजेंना आशा वाटू लागली. परंतु आजमशहाने त्याबाबत काही निर्णय न घेता तो ससैन्य उत्तरेकडे निघाला. कारण त्याला त्याचा बंधू मुअज्जम या शत्रूचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे होते. त्याच्यासमवेत शाहू व सगळे राजकैदी उत्तरेकडे निघाले. त्याबरोबर शाहूंची अस्वस्थता वाढत गेली. जसे मुघल उत्तरेकडे निघाले, तशी इकडे ताराबाईंना संधी मिळाली. धनाजी जाधव सेनापतीने पुण्याचा फौजदार लोदी खानचा पराभव केला. चाकण घेतले. अनेक किल्ले मराठ्यांनी जिंकले...
मराठ्यांनी बादशहाच्या छावणीजवळ व अनेक ठिकाणी हल्ले सुरू केले होते. कारण त्यांना ही संधीच होती आणि ते ती संधी सोडणे शक्य नव्हते. इतकेच नव्हे तर मराठा सैन्यांची ४०,००० ची दुसरी तुकडी अहमदाबादजवळ पोहोचली होती आणि ते शहर लुटण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शाहूबाबत विचार करणे बादशहाला भाग पडले. आजमशहा समोर त्याचे दोन बंधू शत्रूसारखे असून प्रथम त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय त्याची सत्ता सुरक्षित नव्हती. त्याचवेळी दक्षिणेत मराठे आक्रमक झाले होते. आपल्या भावांना त्यांची मदत मिळू नये हेही त्याला महत्त्वाचे होते. म्हणून शाहूंना सोडणे त्याला आवश्यक झाले...
१३ मार्च १७०७ रोजी बादशहा बुऱ्हाणपूर येथे असताना त्याचा प्रमुख सरदार झुल्फीकारखान याने बादशहा व शाहू महाराज यांची भेट घडविली. शाहूस सोडावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. पण आजमशहाने काही निर्णय न घेता शाहू महाराजास पोशाख देऊन निरोप दिला. या झुल्फीकारखानास दक्षिणेत स्वतंत्र सत्ताधीश व्हायचे होते. त्यादृष्टीने शाहू महाराजांशी सलोखा राखणे व अन्य डावपेच तो आखीत होता. त्याला २५ वर्षांचा दक्षिणचा मोठा अनुभवही होता. त्याचा हा हेतू शाहूंच्या उपयोगी पडला. येथे या झुल्फीकारखानाबद्दल थोडा तपशील देत आहोत. हा पराक्रमी होता. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत त्याने अनेक विजय मिळवले होते. पण बादशहाच्या मृत्यूनंतर त्याचे वर्तन धरसोडीचे झाले. आजम शहाचा पक्ष स्वीकारला. सोबत उत्तरेकडेही निघाला, पण तो संतुष्ट नव्हता. पुढे त्याने बहादूरशहाचा पक्ष स्वीकारला. त्याच्या या संशयी स्वभावाचे परिणाम म्हणजे नंतर फर्रुखसिअर बादशहाने त्याला ठार मारले...
२५ एप्रिल १७०७ रोजी बादशहाने बुऱ्हाणपूर सोडले. नर्मदा ओलांडली. १४ मे रोजी सिरोंज येथे बादशहाचा तळ पडला. सरदेसाई मात्र ४ मे तारीख देतात. शाहूराजे जसजसे स्वराज्यापासून दूर जाऊ लागले तसतशी शाहू राजेंची चिंता वाढत गेली. त्यांच्या सुटकेचे राजकारण व अंतस्थ हालचालीही वाढत गेल्या. तोवर मुघलांचा पुढील प्रवासही चालू राहिला. बादशहाची छावणी नेमाड येथे पडली. नेमाड किंवा नेवाड हा प्रांत होता. या दरम्यान शाहूंच्या सुटकेच्या हालचाली गतिमान झाल्या आणि आठ मे १७०७ रोजी दोहरा येथून शाहूंची सुटका झाली. या ठिकाणाचा उल्लेख दारोहा असाही मिळतो. भोपाळच्या वायव्येस २० मैलावर हे ठिकाण आहे...
"Julfikar Khan was very intimate with shahu grandson of Shivaji and had long been interested in his affairs. He now persuaded Azam Shah to set this shahu at Liberty along with several persons who were his friends and companions."
शाहू महाराजांची सुटका कशी झाली याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. मुस्लीम इतिहासकार म्हणतात, शाहू बादशाही छावणीतून पळून गेले, पण मराठा इतिहासकार ते अमान्य करतात. बादशहाशी तोंडी करार करून शाहू महाराज दक्षिणेकडे निघाले त्या करारानुसार :
१) शाहूराजेंनी बादशाही ताबेदारीत राहून दक्षिणेचे राज्य साध्य करावे.
२) आवश्यक तेव्हा बादशहाची कुमक करावी.
३) मातोश्री वगैरे कबिले व मदनसिंग ओलीस दाखल बादशहाचे ताबीन ठेवावे.
४) चौथाही सरदेशमुखींचे हक्क दक्षिणच्या सहा सुभ्यांतून वसूल करावे.
५) त्याच्या सनदा मागाहून तयार करून पाठविण्यात येतील.
६) तूर्त २०० रांगडे स्वार बरोबर घेऊन जावे.
अशा प्रकारचा तोंडी करार झाला असावा की, ज्यानुसार सुटका करताना बादशहाने शाहूंवर काही अटी लादल्या असाव्यात. याला पुष्टी देणारे पत्र बहादूर शहाने २७ मे १७१८ रोजी शाहू महाराजांना पाठवलेले असून त्यानुसार हे स्पष्ट होते. शाहूंनी खेडचे युद्ध जिंकल्याचा वृत्तांत बादशहास कळविला असून त्यामध्ये तोंडी करारातील अपेक्षेनुसार धोरण असेल असे शाहू लिहितात. त्या पत्राला उत्तर म्हणजे बादशहाचे हे पत्र व व्यक्त केलेला संतोष होय. विजयाचा वृत्तांत कळवताना सनदा मिळवणे हा शाहूंचा हेतू होता व त्यासाठी नंतर त्यांनी आपला वकीलही पाठविला होता. या राजकीय हालचाली चालू होत्या. त्यावर बेगमचे लक्ष होते. शाहूमहाराज येसुबाई साहेबांबद्दल त्यांना सहानुभूती होती. किंबहुना शाहू महाराजांची सुटका होण्यात त्यांची मदत झाली होती. करार ठरत असताना त्यांनी सांगितले, 'तुम्ही आताच निघून जा उद्या शहांची बुद्धी कशी फिरेल कोणी सांगावे. मातोश्रीविशीं काही काळजी करू नये. लवकरच रवानगी करुन देववितो...'
मोगलांच्या लष्करात दतीयांचा दलपतसिंग, कोठ्याचा रामसिंग, जयपूरचा सवाई जयसिंग इ. तर कान्होजी शिर्के, जाधव, निंबाळकर इ. मराठे सरदार होते. यांच्याशी शाहू महाराजांचे स्नेहसंबंध होते. त्यांची सुटका होते आहे, या आनंदात रजपुतराजांनी शाहू महाराजास मेजवानी दिली होती. मुघल दरबारातील समकालीन व्यक्ती म्हणजे औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना होय. तो या दरम्यान बादशाही छावणीत हजर होता. शाहू राजेंच्या सुटकेसंबंधित याची साक्ष देखील महत्त्वाची आहे. त्याबद्दल डॉ. जयसिंगराव पवार लिहितात, सक्सेना लिहितो, 'छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा राजा शाहू महाराज याला झुल्फीकारखान यांच्या हवाली करण्यात आले होते. त्याला उघड उघड निरोप देणे इष्ट वाटले नाही म्हणून बादशहाच्या इशाऱ्याने हा काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन दोराहा जवळ मोगली छावणी होती तेथून पळाला. त्याने दक्षिणेची वाट धरली आणि धामधुम उडविण्यास सुरुवात केली...
आजमशहाने कबिला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात ठेवला होता. हा मागे उल्लेख आलेला आहे तो आता आग्ऱ्याच्या किल्ल्यात आणला. त्यामध्ये राजमाता येसुबाईसाहेब व अन्य परिवार देखील असावा. निघताना शाहू राजेंनी त्यांच्या सेवेत आपला विश्वासू म्हणून उद्भव योगदेव राजाज्ञा या अधिकाऱ्यास ठेवले होते. 'राजाज्ञा' शब्द 'हुकूमतपन्ना'चा संस्कृत पर्याय आहे. उद्धव योगदेव 'राजाज्ञा' असून त्याने येसुबाईसाहेब व शाहू महाराज कैदेत असताना मनोभावे त्यांची सेवा केली. म्हणून त्याचा पुत्र रंगराव राजेंना नंतर राजाज्ञा पद दिले. १७१३ साली ते पद नारोरास यास दिले, तर १७१६ साली नारोरास यास मंत्रिपद देऊन राजाज्ञा पदावर पंताजी शिवदेव याची नेमणूक केली. हा तपशील रियासत ३, पा. ५२ तळटीपेत मिळतो. ज्योत्याजी केसरकरास सनदासाठी मागे ठेवले होते...
सुटका झाल्यावर शाहूराजें बरोबर मोरोपंत सबनीस, महादजी कृष्णा गदाधर नासिककर, मनोरंजन करणारा शुक्ला इ. होते. तसेच शाहू महाराज समवेत त्यांच्या राणी सावित्रीबाई आणि त्यांची रक्षा वीरूबाई होत्या. असे सांगून डॉ. अप्पासाहेब पवार त्यांच्या प्रबंधातील पान नं. २९ तळटीप ९७ मध्ये लिहितात की, शाहू महाराज समवेत त्यांच्या दोन्ही राण्या होत्या, असे रियासतकार लिहितात ते चूक आहे. कारण त्यांची एक राणी कैदेत असतानाच वारली होती. सुटका झाल्यावर सोबत आलेल्या राणीसाहेब काही वर्षांनी मृत्यू पावल्या. त्या वेळी कोल्हापूरच्या संभाजी महाराजांनी सांत्वनपर पत्र पाठवले होते. शाहू राजे म्हणजे "अजातशत्रू" व्यक्तिमत्त्व होते. शत्रूला देखील त्यांच्याबद्दल प्रेम सहानुभूती वाटावी असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांनी माणसं जवळ केली, मिळविली. याचे प्रत्यंतर त्यांच्या कैदी जीवनातही आले होते. अठरा वर्षांच्या त्याकाळात त्यांनी अनेकांचे प्रेम मिळविले. त्यांचा सुटकेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला. प्रत्यक्ष औरंगजेबालाही त्यांच्या बाबत कठोर निर्णय घेता आला नाही. अनेक हिंदू-मुस्लीम सरदारांचे प्रेम मिळविले. त्यांचे ठळक उदा. म्हणजे राजा सवाई जयसिंग (जयपूर) होय. सुटकेसाठी त्यांनी अनुकूल वातावरण तयार केले. प्रत्यक्ष मदत केली. ही मदत शाहू राजेही विसरले नाहीत. किंबहुना अशी त्यांच्या कृतज्ञेची अनेक उदाहरणे आहेत. पुढे १९ मार्च १७३० रोजी चिमाजी आप्पांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “स्वामींचा व सवाई जयसिंगांचा घरोबा पूर्वीपासून चालत आला आहे. त्यांचे मनोधारण व रक्षण स्वामी अगत्य. ते म्हणतील त्याप्रमाणे वर्तणूक करणे. अनुमान न करिता मांडोगड त्यांचे स्वाधीन करणे...
दोराहाहून शाहू राजेंचा स्वराज्याकडील प्रवास सुरू झाला, तर आपल्या पुत्रास निरोप देणाऱ्या राजमाता येसुबाईसाहेब मात्र ओलीस राहून नंतर उत्तरेकडे गेल्या. या प्रसंगाची माहिती देणारे संदर्भ नाहीत. पण आपण कल्पना करू शकतो की, त्या माता पुत्रास किती दुःख झाले असेल..? त्यांनी ते कसे सहन केले असेल..? तेही स्वराज्यासाठी, रयतेसाठी होय. खरोखर फार मोठा त्याग फार मोठ्या वेदना सहन केल्या, या राज परिवाराने. यातूनच भविष्यातील 'मराठा साम्राज्य' निर्माण झाले. त्यात शाहू राजेंच्या नेतृत्वाखाली आणि येसुबाई राणी साहेबांच्या अपूर्व त्यागामुळे होय. शाहू राजेंचा दक्षिणेकडील परतीचा प्रवास ८ मे १७०७ ला सुरू झाला आणि सात महिन्यांनंतर संपला. सातारला पोहोचले आणि जानेवारी १७०८ रोजी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला. असा हा सात महिन्यांचा कालखंड मुद्दाम होऊन आम्ही एका स्वतंत्र प्रकरणाचा विषय ठरविला असून आपण आता त्याच्या विवेचनाकडे वळणार आहोत...
वयाच्या सातव्या वर्षी मातेसमवेत कैद झालेले शाहू महाराज तब्बल १८ वर्षे मोगलांच्या कैदेत होते. आपणासारख्या सामान्य माणसाला केवळ कल्पनेनेही अंगावर काटा येईल. इतके भयंकर जीवन ते जगले. वयाच्या पंचविशीत १७०७ साली ते कैदेतून सुटले. त्यांच्या जीवनातील एक दुःखद जीवन मरणाचा कालखंड संपला. सुटका झाली आणि आणखी एका बिकट संकटातून त्यांना जावे लागले. अग्निसंस्कारातून सोन्याला आकार व तेज मिळते, तसेच जणू या राजाचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. या पुरुषाने संयमाने व तेवढ्याच धीराने या सर्व संकटांना तोंड देत देत आघात सहन करीत ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवली. यशस्वी होत गेले. असेही वाटते की, जणू नियतीच त्यांची परीक्षा घेत होती आणि ते त्या सर्व अवघड परीक्षा पार करीत निघाले होते. स्वराज्य त्यांची प्रतीक्षा करीत होते आणि त्याच नियतीला त्यांच्या करवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करावयाचे होते. ते संभाव्य उत्तुंग शिखर साध्य करण्यासाठी त्यांचा स्वराज्याकडील प्रवास सुरू झाला. माळव्यातील सद्य मध्य प्रदेशातील भोपाळच्या दोहरा येथून शाहू राजांचे आगमन सुरू झाले मे १७०७ रोजी आणि महाराष्ट्रातील सातारा येथे जानेवारी १७०८ मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाले. डॉ.अप्पासाहेब पवार यांच्या प्रबंधात सुटकेची तारीख १८ एप्रिल १७०७ अशी देतात...
शाहू राजेंचा परतीचा प्रवास सुरू झाला. पण, सोबत काय होते..? काही विश्वासू माणसं व इतर मिळून फार तर शे-दोनशे लोकांसह हा भावी छत्रपती निघाला. सोबत ना पैसा, ना सैन्य, ना सत्ता अशा अवस्थेत निघालेला हा राजा लवकरच छत्रपती होतो, पुढे विशाल साम्राज्य निर्माण करतो हेही तितकेच आश्चर्य व कौतुकास्पद. शस्त्र किंवा सैन्यबळ सोबत नव्हतेच, पण परिस्थितीच प्रतिकूल होती. मोगल बादशहाकडून स्पष्ट लिखित स्वरूपाने काही मिळाले नव्हते, म्हणजे तो पाठिंबा अनिश्चित होता व नंतरही काही वर्षे तशीच गेली. मोगलांच्या छावणीतून सुटले होते एवढेच. पण अजून मातोश्री व इतर मंडळी कैदेत असून आता तर ते सगळे दूर दिल्लीला नेले गेले होते. ती चिंता होती. म्हणजे शाहू महाराजांना केवळ ताराबाईं साहेबांशी (चुलतीशी) लढायचे होते असे नव्हे, तर अनेक सरदार सोबत नव्हते. अशा अनेक संकटांपैकी सरदारांना अनुकूल करीत करीत, सैन्यबळ वाढवित निघालेल्या शाहूंनी ताराबाईंसाहेबांच्या विरोधही खेडच्या युद्धात मोडून काढला. पण बादशाही अपेक्षित पाठबळ आणि सनदा मिळविणे यात काही वर्षे गेली. याबाबतीत त्यांना मदनसिंग, म्हणजे शाहूंचे बंधू यांची मदत झाली. शाहूंचे बस्तान यथायोग्य बसविण्यात यांचीच मदत झाली असे रियासतीवरून दिसते. १७३० पर्यंतचे त्यांच्या संबंधीचे उल्लेख मिळतात. येसूबाई साहेबांची सुटका होऊन त्यांच्यासोबत तो दक्षिणेत आला व इकडेच राहिला...
मे, १७०७ ते १२ जानेवारी, १७०८ असा हा शाहूराजेंचा आगमनाचा एकूण कालखंड असून भोपाळ जवळच्या दोहरा गावापासून सुरू झालेला प्रवास सातारला संपला. हा सुमारे ८९२ कि.मी. प्रवास पार करण्यास शाहू राजेंना सात महिन्यांहून अधिक काळ लागला. या काळात त्यांना अनेक सरदार मिळाले. अनेकांनी मदत केली, तर विरोधही झाला. विरोधकांशी युद्धे करावी लागली. विजय मिळवित प्रवास चालू ठेवला. त्यांनी या काळात शेकडो पत्रे लिहिली. पत्रे लिखाणाचे काम गदाधर प्रल्हाद यांनी केले, तेव्हा शाहू महाराजांच्या आगमनाचा मार्ग, महत्त्वाची ठिकाणे, ठाणी, त्या त्या ठिकाणी घडलेल्या घटना, तारखा, अंतर इ. शक्य तेवढा तपशील पुस्तकाद्वारे लिखाण केलेले आहे...
पुस्तक : श्रीशंभूपुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज
―――――――――――――

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...