विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

छत्रपतीसंभाजीमहाराज

 १६८९ च्या फेब्रुवारी महिन्यात संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेसाठी आलेल्या औरंगजेबाच्या हाती पहिले काही वर्ष काहीच लागलं नव्हतं. पण आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवल्यावर मात्र त्याची हालचाल वाढली. याची खबर संभाजी महाराज व मुघल दोघांवर लक्ष ठेऊन असलेल्या इंग्रजांना लागली असावी...

● त्याबाबत मद्रासहुन इंग्रज लंडनला लिहितात,
"संभाजी महाराजांला मदत करणाऱ्या दोन्हीही शाह्यांचा नाश केल्यानंतर आता आपल्यावर येणाऱ्या संकटाला कसे तोंड द्यावे या विवंचनेत संभाजीराजा सध्या तयारीत गुंतलेला आहे. मुघलांच्या छावणीतून भगवानदास नावाचा एक ब्राम्हण इथे आला आहे. तो म्हणतोय की औरंगजेब संभाजीराजेंला जीवंत पकडण्याची भाषा करतो आहे.." दोन शाह्या बुडवण्याचं मोठं यश हाती लागलेल्या औरंगजेबाचा आत्मविश्वास दुणावला असणार एवढं नक्की. दोन्ही शाह्या जिंकल्यानंतर औरंगजेबाने त्याची सगळी ताकद संभाजी महाराजांच्या शोधासाठी लावलेली असणार. मुकर्रबखानाला संभाजी महाराजांची माहिती औरंगजेबाने पेरलेल्या हेरांनी दिली असण्याची जास्त शक्यता आहे. कारण औरंगजेब त्याचा अधिकारी असदखान याला लिहितो,
"ज्याला तू पन्हाळा घ्यायची जबाबदारी दिली आहेत त्या मुकर्रबखानाला माझे आदेश कळव की 'त्या जमीनदारला लवकर कैद कर'. तू त्याला लिही की सध्या तो घमेंडी जमीनदार एकटाच रायगडाहून खेळण्याला गेला आहे. तो त्याच्या नातेवाईकांचे वाद मिटवण्यासाठी जात आहे. तिथे त्याला पकडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्याचा बदला घे." यावरून असे लक्षात येईल की खुद्द औरंगजेब त्याच्या हेरांमार्फत संभाजी महाराजांवर लक्ष ठेऊन होता. संभाजी महाराज मुघलांच्या हाती सापडले त्यावेळी औरंगजेब अकलूजला होता. साकीमुस्तैद खान देखील तिथेच होता...
● संभाजी महाराज आणि कलश यांना पकडून बादशाहच्या छावणीत कसे आणले गेले त्याबाबत तो लिहितो,
संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी औरंगजेबाला अकलूजला मिळाली. बादशाहाने सरदारखान आणि हमीदुद्दीन खानाला आदेश दिले की मुकर्रबखानासमोर जाऊन संभाजी महाराजांना बेड्या घालून घेऊन या. मुकर्रबखान चलाखीने, युक्त्या वापरुन सुखरूपपणे मराठ्यांच्या मुलुखातून बाहेर आले. संभाजी महाराजांच्या आप्त, समर्थकांपैकी संभाजी महाराजांला सोडवण्यासाठी कोणीही आडवे आले नाही व त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बादशहा अकलूजहून बहादूरगडावर (धर्मवीरगड) आला. त्याच वेळी महाराजांना छावणीत आणण्यात आले. बादशहाने आदेश दिले की कैद्यांना छावणी पासून कोस डोक्यावर लाकडी टोपी घालावी. त्यांना वेगवेगळे त्रास देऊन त्यांची हेटाळणी करावी. त्यांना उंटावर बसवून त्यांची धिंड काढून वाद्य वाजवत त्यांना दरबारात घेऊन आले. यामुळे सर्व मुस्लिमांचा उत्साह द्विगुणित झाला होता. ज्या सकाळी संभाजीराजेंला दरबारात आणलं त्या सकाळच्या पूर्वीची रात्र म्हणजे शबेरात होती. कारण आनंदात कोणीच झोपले नव्हते. आणि हा दिवस देखील ईद सारखा होता. कैद्यांची धिंड पाहायला संपूर्ण छावणी लोटली होती. तो दिवान-ए-आम होता. बादशहा सिंहासनावर बसला होता. संभाजीराजेंला त्याच्यासमोर आणले त्यावर संभाजीराजेंला कैदेत टाकण्याचे आदेश बादशहाने दिले. त्या वेळी तो (बादशहा) सिंहासना वरून खाली आला आणि एक कोपऱ्यात जाऊन देवाचे आभार मानण्यासाठी गुढघ्यावर बसून नमाज पढू लागला..."
● कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबासमोर आणण्यात आले त्याबाबत खाफीखान लिहितो,
"कैद्यांची (संभाजी महाराज आणि कवी कलश) धिंड काढून त्यांना औरंगजेबासमोर आणले. त्यांना पाहताच औरंगजेब तख्तावरून खाली उतरला आणि त्यांने प्रार्थना केली. असे म्हणतात की कवी कलशाने ते पहिले. तो कविता करण्यात सराईत होता. बंदीवान असल्यामुळे त्याला जीभेशिवाय कोणत्याही अवयवाचा वापर करता येत नव्हता. औरंगजेब तख्तावरून खाली उतरून प्रार्थना करताना पाहून त्याने संभाजीराजेंकडे पाहून पुढील ओळी म्हटल्या,
“यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग
लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग
ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।
त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।”
―――――――――――――
छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक आरोप केले जातात. त्यातल्या सर्व आरोपांचं ससंदर्भ निरसन (इतिहासकार वा.सी.बेंद्रे लिखित, छत्रपती संभाजी महाराज) याच पुस्तकात वाचायला मिळते...
(उर्वरित माहिती पुढील पोस्ट द्वारे लिखाण करु).

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...