गुत्ती राज्याचा विस्तार, घोरपडे घराण्यातले राजे बहिर्जी हिंदुरावानंतरचे "
राजे सिधोजीराव हिंदुराव घोरपडे"...
राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांना तीन मुले होती. सयाजीराव, मुरारराव आणि सिधोजीराव. त्यांपैकी सयाजीराव बालपणीच मृत्यू पावले. मुरारराव आपल्या वडिलांबरोबर स्वारीत काम करीत होते. पण त्यांच्यासंबंधी केवळ एक दोन उल्लेख सापडतात. पहिला उल्लेख १५ जून १६९५ चा आहे. (राजवाडे खंड १५, पत्र नंबर १६०) आणि दुसरा उल्लेख १८ मे १६९६ चा आहे. (पत्र नंबर ४८) या पत्रांतील उल्लेखावरून असे दिसते की सन १६९५ साली मुराररावांचे वय १५ वर्षांचे असावे. म्हणजे त्यांचा जन्म सन १६८० सालचा असला पाहिजे. या पत्राच्या शिक्यावर 'बहिर्जीचा मुलगा' असे स्पष्ट म्हटले आहे...
एका कैफियतीतील मुराररावांच्या (पहिले) उल्लेखावरून ते २२ वर्षांचे असताना एका लढाईत मरण पावले. वरील दोन उल्लेखांखेरीज मुराररावासंबंधी अधिक माहिती मिळत नाही. लढाईत मारले गेले, या उल्लेखावरूनच मुरारराव (पहिले) तत्कालिन संघर्षात सहभागी झाले होते हे स्पष्ट होते. ते वयाच्या बावीसाव्या वर्षी सन १७०२ मध्ये शत्रूशी लढाई करत असताना निधन पावले. योगायोग असा की संताजींचा राणोजी हाही त्याच वर्षी आणि तशाच प्रकारे लढाईच्या मैदानावर मुलगा मृत्यूमुखी पडला. घोरपडे घराण्यात त्यावेळी राजे बहिर्जी वडिलकीच्या नात्याने सेनापती संताजी घोरपडे यांच्या परिवाराचाही सांभाळ करीत होते. संताजींच्या मृत्यूनंतर ते दक्षिणेकडे निघून गेले, पण छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाई साहेबांच्या आवाहनावरून पुन्हा औरंगजेबा विरुद्ध चाललेल्या लढाईत भाग घेण्यासाठी आले. अर्थात त्यांच्या बरोबर त्यांचे पुत्र मुरारराव (पहिले) हेही आलेच असावेत. मुरारराव आणि राणोजी दोघेही समवयस्क होते आणि एकाच वर्षी लढाईत मृत्यू पावले. ही दुर्दैवी घटना बहिर्जी आणि घोरपडे कुटुंबातील सर्वच मंडळींवर आघात करणारी होती. दोन कर्तबगार तरुण एकाच वेळी मृत्यू पावले.
राजे बहिर्जी हिंदूराव घोरपडे यांच्या निधनानंतर सिधोजीरावांनी आपल्या घराण्याची पराक्रमी परंपरा राखली...
बहिर्जी हिंदुराव यांनी १६९७ मध्ये "गुत्तीचा किल्ला" जिंकला, आणि हिंदुराव घोरपडे यांच्या स्वतंत्र सत्तेचा पाया घातला. सिधोजी हिंदुराव वाणि सोंडूरचा प्रदेश १७१४ मध्ये जिंकून मूळ गुत्ती राज्याच्या प्रदेशाचा विस्तार केलनी तेथेच त्यांनी आपल्या लष्कराचे ठाणे उभारले. त्यांचे पुत्र मुरारराव हिंदुराव यांनी या प्रदेशात मोठी भर घातली...
राजे सिधोजीरावांचा जन्म कोणत्या वर्षी झाला यासंबंधी कागदोपत्री निश्चित पुरावा सापडत नाही. पण तत्कालिन ऐतिहासिक कागदपत्रे, घोरपडे खुद्द सिधोजीरावांच्या घराण्यातील पुरुषांनी घडवलेल्या घटना आणि कारकीर्दीतील सनदापत्रे यांच्या आधाराने असे विधान करता येते की सिधोजीरावांचा जन्म १६८३-१६८४ सालचा असावा. त्यांचे ज्येष्ठ बंध मुरारराव (पहिले) सन १६९५ मध्ये पंधरा वर्षांचे होते असा उल्लेख केलेली पत्रे उपलब्ध आहेत. त्यावरून त्यांचा जन्म १६८० मध्ये झाला असावा आणि त्यानंतर सुमारे ३-४ वर्षांनी सिधोजीराव जन्मले, असे गृहीत धरावयास हरकत नाही...!
राजे सिधोजीराव तत्कालीन पद्धतीप्रमाणे लढाईच्या क्षेत्रावर सतरा-अठरा वर्षांच्या वयापासून जात होते. छत्रपती राजाराम महाराज निधन पावल्यानंतर बहिर्जी दक्षिणेतून परत आले त्याचवेळी त्यांची आणि संताजीरावांची कुटुंबीय मंडळीही त्यांच्या बरोबर मराठी मुलखात आली. सिधोजीरावही त्याच वेळेला वडिलांच्या छावणीत दाखल झाले. आणि लढायांत भागही घेऊ लागले. सन १७०० ते १७०७ पर्यंत महाराष्ट्रात मराठे आणि मोगल यांच्या संघर्षाचे अखेरचे पर्व चालू होते. महाराणी ताराबाईसाहेबांचा तो काळ होता. एकीकडे मोगलांचे प्रचंड सामर्थ्य आणि औरंगजेबासारखा मुरब्बी मुत्सद्दी तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांची विस्कळीत झालेली शक्ती आणि ताराबाईसाहेब सारखी राजकीय रणांगणावर नव्यानेच प्रवेश केलेली वीरांगना असा तो सामना होता. हा सामना १७०७ मध्ये संपला...
औरंगजेबाच्या निधनाबरोबरच त्याची व पर्यायाने मोगल साम्राज्याची सत्ता महाराष्ट्रापुरती तरी समाप्त झाली. महाराष्ट्रात नवे राजकारण सुरू झाले. ते समजून घेण्यासाठी तत्कालीन काही प्रमुख घटनांची नोंद घेणे आवश्यक आहे, तरच त्या पार्श्वभूमीवर हिंदुराव घोरपडे घराण्याच्या धोरणाचा आणि कार्याचाही परिचय होऊ शकेल. आणि त्याचे महत्त्वही लक्षात येऊ शकेल. किंबहुना राजे सिधोजीरावांना दक्षिणेकडे जाऊन गुत्तीच्या होईल.. स्वतःचा राज्याचा विस्तार करण्यास वाव कसा मिळाला हे समजण्यासही मदत. मराठे आणि मोगल याची झुंज सन १७०७ पर्यंत हिरीरीने चालली होती, औरंगजेब त्या वर्षी अहिल्यानगर येथे मरण पावला. आणि मोगली संकटाचे अंधारपर्व संपले. वस्तुतः त्याच्या फौजेचा आवाका मोठा होता. आणि त्याचा युद्धक्षेत्रावरील अनुभवही फार दांडगा होता. पण एवढे असले तरी त्याला अपेक्षित यश मिळू शकले नाही. मोगल सैन्यही अतिशय जेरीला आले. होते. सतत सत्तावीस वर्षे या सैन्याने मराठ्यांना नामोहरम करण्याची खटपट केली पण त्यामुळे उत्तरेकडून औरंगजेबाबरोबर आलेल्या अनेक सरदारांची पिढीच्या पिढी त्यात खपली अशा मनःस्थितीत मोगल सैन्यातील प्रमुख सेनानींनाही केव्हा दिल्लीकडे परत जाऊ असे झाले होते. तेवढ्यात औरंगजेब निधन पावला...
मध्यवर्ती सत्तास्थान कोसळून पडल्यामुळे मोगलांची शक्ती दुभंगली. त्याच्या मुलांमधे सत्तास्पर्धा सुरू झाली. मोगल सैन्याला दक्षिणेत रहाता येणे शक्य नव्हते. औरंगजेबाच्या मुलांची भाऊबंदकी विकोपाला गेली. या सर्व घटनांचा परिणाम मराठ्यांच्या दृष्टीने अनुकूल झाला. किंबहुना मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी अत्यंत महत्त्वाची घटना घडली. आणि ती म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची मोगलांच्या बंदीवासातून सुटका झाली. ते महाराष्ट्रात परत आले...
छत्रपती शाहू महाराजांची सुटका एका अर्थाने अत्यंत आनंददायक घटना ठरावी. पण नेमक्या त्याच घटनेने छत्रपतींच्या घराण्यात एक नवा पेचप्रसंग निर्माण झाला. शाहू महाराजांचे छत्रपतीपद ताराबाईसाहेबांना मान्य नव्हते. छत्रपती पदावर शाहू महाराजांचा काहीही अधिकार राहिलेला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. शाहू महाराज आपल्या भोवती सहकारी जमवून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते...
अशा परस्पर विरोधी दाव्यामुळे मराठ्यांच्या राज्यात दुही निर्माण झाली. काही प्रमुख सरदार या पक्षाला तर काहीजण त्या पक्षाला सामील झाले. संघर्ष वाढत गेला. युद्धाशिवाय निर्णय लागण्याची शक्यता उरली नाही. दोन्ही प आपापल्या भूमिकेवर ठाम उभे होते. दोन्ही बाजूला लढाईची तयारी होत लागली. शेवटी भीमा नदीच्या काठी खेडनजिक मराठ्यांच्या फौजा एकमेकांसमोर उभ्या राहिल्या. ताराबाई साहेबांचे सेनापती धनाजी जाधव होते. ताराबाई साहेबांची सर्व भिस्त त्यांच्यावरच होती. पण शाहू महाराजांनी ऐन वेळी धनाजीला आपल्या बाजूला वळवले. धनाजीने अचानकपणे लढाईच्या आदल्या रात्री आपल्या सैन्यासह शाहू महाराजांच्या गोटाकडे कूच केले. सेनापतीने ताराबाई साहेबांचा पक्ष सोडल्यानंतर लढाई करण्याची गरज उरली नाही. ताराबाई साहेबांच्या पक्षाचा निर्णायक पराभव झाला...
राजे सिधोजीराव हिंदुराव घोरपडे ताराबाई साहेबांच्या विश्वासातील होते. शाहू महाराजांनी त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचे कागदोपत्री उल्लेख सापडतात. पण सिधोजीरावांनी त्याकडे लक्ष दिले नाही असे दिसते. ताराबाई साहेबांनी सिधोजीरावांना सेनापतीपद देईपर्यंत शाहू महाराजांची अशी खटपट चालू होती. 'राजश्री सिधोजी घोरपडे यांजकडून कारकून व जासूद आले. त्यास वस्त्रे दिली. सनगे पाच' असा शाहू दप्तरात ११ जानेवारी १७१० या तारखेचा स्पष्ट उल्लेख आहे. पण ते ताराबाईसाहेबांच्या राज्याचे सेनापती झाल्यावर मात्र अशा स्वरूपाचा पत्रव्यवहार आढळत नाही. राजे सिधोजीराव सन १७१३ पर्यंत करवीर राज्याचे सेनापती होते. सन १७१४ साली करवीर छत्रपतींच्या राजवाड्यात फार मोठे सत्तांतर घडून आले. या सत्तांतराने ताराबाईसाहेब आणि त्यांचे पुत्र शिवाजी राजे यांना पन्हाळयावर कैदेत पडावे लागले. व सत्तेची सूत्रे ताराबाई साहेबांची सवत राजसबाईसाहेब आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे यांच्या हाती गेली...
या सत्तांतराच्या उद्योगात सिधोजीरावांचा सहभाग कितपत होता हे सध्याच्या उपलब्ध साधनांवरून तरी समजू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित दिसते आणि ती म्हणजे त्या वर्षीच सिधोजीरावांनी पन्हाळा सोडला आणि ते दक्षिणेकडे आपल्या मूळच्या गुत्ती राज्याकडे निघून गेले. सेनापतीपद सोडून जाण्याइतकी त्यांची नाराजी त्यात दिसून येते. राजे सिधोजीरावांवर कोल्हापूरचे संबंध सोडून एवढ्या तडका फडकी दक्षिणेकडे जाण्याचा प्रसंग का आला..? व त्यांना करवीर दरबाराचे राजकारण किती आणि कसे कारणीभूत झाले हे पाहणे अगत्याचे आहे...

No comments:
Post a Comment