छत्रपती थोरले शाहू महाराजांची मदत आणि इंग्रज पराभूत...
शत्रूंच्या वरील हालचाली कान्होजींना कळत होत्या. त्यादृष्टीने त्यांचीही तयारी चालू होती. त्यांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवून आपण तडजोड करावी असा प्रयत्न केला. त्याच वेळी साताऱ्याला शाहू महाराजांना मदत पाठवावी अशी विनंती केली. त्यानुसार महाराजांनी लगेच १५०० घोडदळ पिलाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली पाठविले. तोवर अलिबागवर चालून गेलेल्या शत्रूवर पिलाजींनी एवढ्या त्वेषाने हल्ला केला की, त्यात शत्रूची फार मोठी जीवहानी झाली आणि त्यांना माघार घ्यावी लागली. पिलाजींच्या या पराक्रमावर संतोष होऊन महाराजांनी त्याबद्दल त्यांना नंतर ४ नोव्हेंबर १७२२ रोजी काही प्रदेशाची जहागिरी दिली. इंग्रजांना मराठ्यांनी याप्रमाणे शह दिला. पोर्तुगीज गव्हर्नर आजारी पडला. १६ डिसेंबर १७२१ त्याला परतावे लागले. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली ६००० घोडदळ कान्होजींच्या मदतीस पाठविले. त्यामुळे मराठ्यांचा उत्साह व बळ वाढले. सागरावर कान्होजी सक्षम होते. आता बाजीराव या प्रसिद्ध योद्ध्यामुळे भूभागावरून शत्रूवर सर्व प्रकारे तीव्र प्रतिकार सुरू झाला. मराठ्यांच्या तोफांनी शत्रूची दाणादाण उडवून दिली. त्यादरम्यान शाहू महाराजांच्या संमतीने बाजीरावाने पोर्तुगीजांकडे तहाची बोलणी सुरू केली. मराठ्यांचे सामर्थ्यं पाहून आणि पंधरा दिवसांच्या अनुभवाने गव्हर्नर पूर्ण हतबल झाला होता. त्याने पेशव्यांचा प्रस्ताव लगेच मान्य केला. २९ डिसेंबरला तह मान्य झाला. सरदेसाई ९ जानेवारी १७२२ अशी तारीख देतात. बाजीराव व कान्होजी यांनी मान्यता दिली. पोर्तुगीजांनी युद्ध संपवले. दुसऱ्या दिवशी ३० डिसेंबर १७२१ रोजी इंग्रजांची वरील चार जहाजे, सैन्य, अपयश पदरी घेऊन मुंबईला परतले. हे होते सामर्थ्य मराठ्यांचे आणि हा होता शाहूकालीन मराठा आरमाराचा विकास. इंग्रज हे पोर्तुगीजांसमवेत मोहिमेत होते. म्हणून हा तह संमतीसाठी मुंबईला पाठविला. पण, तह अमान्य केला. त्यांच्या पुरता विषय संपला...
● यानंतर शाहू महाराज असेपर्यंत इंग्रजांनी आंग्रेविरुद्ध कसलीही हालचाल केली नाही. १७१५ ते १७२२ ही ब्रूनची कारकीर्द अपयशाने संपली. त्याच्याबद्दलचे मूल्यमापन या शब्दात केले आहे,
"The net result of Boone's excessive zeal and industry was that at the end of his tenure of office the East India Company's stock had slumped for lower than it had been upon his arrival..."
इंग्रजांविरुद्धचा संघर्ष चालू असताना अखेरच्या काळात मराठा सत्तेला बसलेला धक्का म्हणजे कर्तबगार, मुत्सद्दी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे निधन होय. कान्होजी आंग्रे यांना फार दुःख झाले, कारण त्या दोघांची एकमेकांना मोलाची साथ मिळाली होती. कान्होजींना शाहू महाराजांच्या बाजूला घेऊन एक प्रकारे मराठा साम्राज्याच्या निर्मितीत सामील करून घेण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात बाळाजीस जाते. त्यांच्या नंतर त्यांचा कर्तबगार मुलगा बाजीराव पेशवा याने इंग्रजांचा पराभव करून संकट संपविण्यात वाटा उचलला होता. जरी या मोहिमेत अपयश आले होते तरी इंग्रजांनी आपले आरमारी बळ वाढविण्याकडे लक्ष कायम ठेवले होते. त्यासंबंधीचे काही संदर्भ देत आहोत. ७ जून १७२२ रोजी फोर्ट सेंट जॉर्जहून मुंबईच्या गव्हर्नरला पत्र पाठवून माहीम नदीत पोर्तुगीज व आंग्रेंविरुद्ध केलेल्या संघर्षाबद्दल अभिनंदन केले होते. प्रत्यक्ष आंग्रेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, पण तयारी चालू होती. त्यांचे प्रत्यंतर या पत्रातून मिळते. १ ऑक्टोबर १७२२ रोजी सुरतहून मुंबईला कळविले होते की, ‘आंग्रेविरुद्ध लढण्यासाठी सुरत येथे गलबते बनवली आहेत...'
आंग्रेविरुद्ध अपयशाचे कारण कंपनीने मुंबईला सांगितल्या नुसार आंग्रेचे आरमार प्रबळ होते हे मान्य केले आहे. म्हणून यापुढे आपले बळ वाढविण्यासाठी इंग्लंडहून १७२८ साली ‘प्रिन्सेस कॅरोलीन' हे प्रबळ जहाज पाठविले. १७३० साली ‘किंग जॉर्ज’ व ‘प्रिन्स ऑफ वेल्स' ही अधिक प्रबळ दोन जहाजे पाठविली. दरवर्षी एक 'गार्डशिप' पाठवण्याचाही निर्णय घेतला...
―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #छत्रपतीशाहूमहाराज
#रणमार्तंड_मरहाट्टे #गडवाटप्रवाससह्याद्रीचा

No comments:
Post a Comment